Tuesday, November 28, 2023

दि. 26.11.2023

 संविधान दिनानिमित्त आयोजित रॅलीला उत्स्फूर्त सहभाग

·         संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन

नांदेड (जिमाका) दि. 26 :- संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे नांदेड येथे महात्मा ज्योतीबा फुले पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत संविधान दिनाचे औचित्य साधून भव्य रॅली काढण्यात आली. सुरवातीला जिल्हाधिकारी पी.एस.बोरगावकर यांनी महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  त्यानंतर त्यांनी  संविधान रॅलीला  हिरवी झेंडी दाखवली.

 

यावेळी सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांची उपस्थिती होती. या संविधान रॅलीचा मार्ग महात्मा ज्योतीबा फुले पुतळा ते शिवाजी नगर, कलामंदिर, मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात येवून राष्ट्रगीताने संविधान रॅलीची सांगता करण्यात आली.

 

भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना असून सर्व नागरिकांनी त्याचा अभ्यास करावा. सर्वानी घटनेने दिलेल्या अधिकार व कर्तव्ये त्यांचे पालन करावे असे जिल्हाधिकारी पी.एस. बोरगावकर यांनी सांगितले. या कार्यक्रमास समाज कल्याण कार्यालयील अधिकारी कर्मचारी, जाती पडताळणी कार्यालयील अधिकारी कर्मचारी, बार्टीचे प्रकल्प अधिकारी व समतादूत तसेच विविध महामंडळाचे कर्मचारी यांची उपस्थिती होते.

 

या संविधान रॅली मध्ये पोलिस अधिक्षक कार्यालीयातील पोलिस बँड पथक कर्मचारी सुनिल पारधे यांच्या अधिपत्याखालील बँड पथक संच यांनी गीत सादर केले. या रॅलीमध्ये महात्मा फुले हायस्कुल येथील स्काऊट गाईड व एन.सी.सी. विद्यार्थी सहभागी झाले होते. वसंतराव नाईक महाविद्यालय, जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, नोबल हास्कुल, पंचशिल विद्यालय, सायन्स कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला.  शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक, कर्मचारी तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळेतील कर्मचारी हे रॅलीत सहभागी झाले होते तसेच जिल्हयातील नागरीकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

00000




Saturday, November 25, 2023

यशकथा : 

वेटरच्या नोकरीपासून ते

मालकीच्या धाब्यापर्यंतची अनोखी यशोगाथा 

अवघ्या पाच एकरच्या आतली वडिलोपार्जित शेती. त्यात भावा-भावातील हिस्से. यात भागत नाही म्हणून सुरुवातीला व्यवसायाकडे वळण्याचे धाडस करणारे धनेगाव येथील मुळ रहिवासी असलेले बाळु शिंदे ! काय करायचे याचा कोणताही आराखडा त्यांना बांधला नाही. शिक्षण कमी म्हणजे नसल्यागतच. बँकेतल्या खात्यावर व्यवहारासाठी तीन-तीनवेळा त्यांच्याकडून सही करून घेतल्यावरही सारखी न आल्याने बँकेतील कर्मचारी त्यांच्या प्रत्येक व्यवहारासाठी दचकून राहतात. “सहीपुरते कसेबसे अक्षरे जवळ करणाऱ्यांपैकी मी एक आहे” अशी प्रांजळ कबुली देण्याइतपत निर्मळपणा बाळु शिंदेनी जपला आहे. या निर्मळपणातच त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो. हा आत्मविश्वास त्यांचे मुख्य भांडवल.    

काही तरी काम करायचे आहे, हे डोक्यात घेऊन शिंदेनी अगोदर नांदेडला राहण्याचा निर्णय घेतला. महानगरपालिकेअंतर्गत काही करता येईल का याची चाचपणी त्यांनी केली. ही चाचपणी करतांना आपला रोजचा उदरनिर्वाह सुरू रहावा यासाठी ॲटोरिक्षा जवळ करायला त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. महानगरपालिकेतील तत्कालीन वरिष्ठ अधिकारी डॉ. निपुण विनायक यांनी शिंदेला घरकुलची कामे करण्याबाबत जी कौशल्य लागतात ती शिक्षणासाठी संधी दिली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर घरकुलच्या कामात हळूहळू शिंदेनी जम बसविला. घरांसाठी विट्टांचे एक-एक थर जसे वाढू लागले त्याप्रमाणात शिंदेला स्वत:ची ओळख निर्माण करायला उशीर लागला नाही. कष्टातील मिळकतीवर स्वत:चे एक घरकुल त्यांनी कॅनलरोडला बांधून घेतले.   

“घरकुलच्या कामातून माझे घर सावरल्या गेले. मात्र कालांतराने आणखी किती काळ याच कामात अडकून पडायचे” हा माझ्यापुढे मोठा प्रश्न होता. या विंवचनेत मी इतर व्यवसाय करता येतील का याची चाचपणी सुरू केली, असे आपल्या प्रवासाबद्दल शिंदे सांगतात. पुन्हा वेगळा व्यवसाय निवडायचा ही खुणगाठ मनाशी बाळगून सुरुवातीला चंद्रलोक व नंतर सिटी प्राईट या हॉटेलमध्ये त्यांनी काम करायला सुरूवात केली. हॉटेलमधील इतर कामे करतांना स्वयंपाकाची आवड शिंदे यांना निर्माण झाली. सुरुवातीला दाल फ्राय पासून छोटी-मोठे बारकावे त्यांनी शिकून घेतले. हा प्रवास पुढे  तंदूर, व्हेज हंडी, नॉनव्हेज हंडी करीत ज्वारीच्या रोटी पर्यंत पोहचला. यातच त्यांच्या हाताला चव लागली. “सारेकाही मी इथेच शिकलो” असे शिंदे सांगतात. यात आत्मविश्वास आल्याने मीही माझ्या स्वत:च्या मालकीचे छोटे का असेना पण स्वत:चे हॉटेल असावे हे स्वप्न उराशी बाळगले.   

अनुभवाची शिदोरी सोबत असल्यामुळे आपल्याला जे काही सुरू करायचे आहे, त्या व्यवसायाचे कौशल्य अंगी असल्याने मी स्वत:चे हॉटेल सुरू करण्यासाठी कुठून अर्थसहाय्य मिळेल का याचा विचार सुरू केला. यातूनच मला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे संपर्क करण्याचा मित्रांनी सल्ला दिला. त्यानुसार मी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेतली. त्यांनी माझ्यातला आत्मविश्वास पाहून व पडेल ते काम करण्याची माझी तयारी पाहून साडेनऊ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. यातूनच नांदेडमध्ये स्वत:चे एक हॉटेल (धाबा) सुरू करू शकलो यावर माझा मलाच कधीकधी विश्वास बसत नाही, असे शिंदेनी सांगतात. दर महिन्याला 23 हजार 300 एवढा हप्ता आजवर मी नित्यनियमाने फेडत आलो आहे. येत्या काही महिन्यात माझे हे संपूर्ण कर्ज पूर्णपणे फिटलेले असेल. नंतर ते हॉटेल विनाकर्जाचे असेल, हे त्यांचे स्वप्न साकार होणार आहे.   

नांदेड येथील महाराणा प्रतापसिंह चौक येथे बाळु शिंदे यांनी भाड्याचे जागा घेऊन हॉटेल तुळजाई अर्थात धाबा सुरू केला आहे. हॉटेल तुळजाईसाठी त्यांनी घरातील सर्व मनुष्यबळ उपयोगात घेतले हे विशेष ! कामाची लाज बाळगुन चालणार नाही, मला हे जमणार नाही, आपले हे काम नाही असा भेदभाव मनात कधीच येऊ दिला नाही. त्याच श्रद्धेने माझे मुले त्यांचे शिक्षण पूर्ण करत हॉटेलमध्ये किचनचे काम करतात हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे, असे शिंदे सांगतात. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने माझ्या स्वयंरोजगाराच्या कल्पनेला उचलून घेत जे कर्ज दिले आहे, जी योजना दिली आहे त्यामुळे मला पुढे येता आले, असे स्पष्ट सांगण्याचा निर्मळपणा बाळु शिंदे यांनी जपला आहे. 

विनोद रापतवार,

जिल्हा माहिती अधिकारी नांदेड.   

 






Friday, November 24, 2023

 शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी 30 नोव्हेंबर पर्यंत

संबंधित मुख्याध्यापकांनी मुदतीत कार्यपूर्ती करण्याचे आवाहन 

 

नांदेड (जिमाका) 24 :- सन  2023-24 वर्षासाठी केंद्रीय  शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या 'राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती' योजनेसाठी (एनएमएमएस) राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (एनएसपी) www.scholarships.gov.in वर नवीन आणि नूतनीकरण अर्जांच्या ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरण्यास 1 ऑक्टोबर 2023 पासून सुरवात झाली आहे. नोंदणीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे अशी आहे. याबाबत नांदेड जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांना बैठका व पत्राद्वारे यापूर्वीच कळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील काही शाळांनी आज पर्यंत विद्यार्थ्यांचे नवीन आणि नूतनीकरणाचे अर्ज आज पर्यंत भरलेले नाहीत. ही बाब गंभीर असून दिलेल्या मुदतीत अर्ज न भरणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती  प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद नांदेड यांनी दिली आहे.

0000

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास

महामंडळाच्या योजनांसाठी आत्मविश्वासाने पुढे या

-  व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे

 

नांदेड (जिमाका) 24 :- राज्यातील मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गोराडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाने बीज भांडवल योजना, अनुदान योजना सारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. ज्या क्षेत्रामध्ये आपला स्वयंरोजगार सुरू होईल, व्यवसाय सुरू करता येईल असा आत्मविश्वास व कौशल्य असलेल्या व्यक्तींना योजनेच्या अटी व निकषानुसार 45 टक्के बीज भांडवल योजना कार्यरत आहेत. अपेक्षीत लाभार्थ्यांनी यासाठी आत्मविश्वासाने पुढे येऊन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) अंतर्गत कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे यांनी केले.

 

आज 24 नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब  आंबेडकर, सामाजिक न्याय भवन सभागृह येथे सकाळी 11 वा. आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. नांदेड व परभणी आणि हिंगोली येथील मांग व तत्सम जातीच्या बांधव या मेळाव्यास  उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत व शेवटच्या व्यक्ती पर्यंत  पोहोचविण्यासाठी  योजनाचा प्रसार, प्रचारासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन व्यवस्थापक अनिल म्हस्के, प्रादेशिक व्यवस्थापक आर. जी. दरबस्तेवार हे उपस्थित होते.  

 

महामंडळमार्फत पूर्वी राबविण्यात येत असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेत बदल करुन देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर रक्कमेत देखील मोठयाप्रमाणात वाढ करण्यात आल्याची माहिती सांगळे यांनी दिली. देशाअंतर्गत शिक्षणासाठी 10 लाख तर परदेशात शिक्षणासाठी 30 लाख रुपये निकषानुसार  दिलेल्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज शासनाने उपलब्ध केले आहे. एनएसएफडीसी योजना  व त्यासाठी आवश्यक असलेली खंडहमी मिळणेसाठी शासन प्रयत्नशील आहे. सर्व सुरु असलेल्या योजना व प्रस्तावित योजना प्रभावीपणे सुरु राहण्यासाठी  100 कोटी रुपयांची मागणी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती वित्तीय विकास महामंडळ यांच्याकडे केल्याचे सांगळे यांनी सांगितले. महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ मोठया प्रमाणात घेण्याचे आवाहन महाव्यवस्थापक अनिल म्हस्के यांनी केले.

 

व्यवस्थापकीय  संचालक मनिष सांगळे यांनी महामंडळाचा पदभार स्विकारल्यापासून केलेल्या कामकाजाचा आढावा सादर केला. लाभार्थींनी योजनांचा लाभ घेण्यासाठी व्यवसाय निवड करताना, नवीन व नाविन्यपूर्ण व्यवसाय निवडीबाबत मार्गदर्शन केले. महामंडळाच्या योजना व प्रस्तावित योजना याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे शासनाने महामंडळास उपलब्ध करुन दिलेल्या जमीन/जागेवर सुरु करण्यात येणाऱ्या  युपीएससी / एमपीएससी सेंटर व बहुउपयोगी  प्रशिक्षण केंद्राबाबत मार्गदर्शन केले. महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

प्रास्ताविकात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टी. आर. शिंदे यांनी महामंडळाच्या योजनांची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. शिवा कांबळे,  प्राध्यापक अमरजित आईलवाड, सामाजिक कार्यकर्ते लालबाजी घाटे, प्रकाश मुराळकर, (स्थायी) समिती सदस्य नामदेव कांबळे, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते  रविकिरण वाघमारे,अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त श्रीमती हरीबाई कांबळे, रमेश गायकवाड यांचे मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करुन महामंडळातील योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी काही सुचना करण्यात आली. मनोगतामध्ये प्रामुख्याने जामिनदारांची अट शिथिल करण्याबाबत विनंती करण्यात आली. महामंडळाचे लाभार्थी यशस्वी उद्योजक रमेश गायकवाड यांची त्यांच्या यशाबद्दल महामंडळाच्या योजनेबद्दल मनोगत व्यक्त केले.

 

उपस्थित मान्यवरांचे स्वागत आर.जी.दरबस्तेवार, प्रादेशिक व्यवस्थापक लातुर व टी.आर.शिंदे जिल्हा व्यवस्थापक नांदेड आणि आर. एन. पवार जिल्हा व्यवस्थापक परभणी, पी. जी. सुर्यवंशी लेखापाल हिंगोली आणि श्रीमती स्नेहलता अरुणराव खुणे लेखापाल नांदेड यांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर श्रीमान खानजोडे व रामराव मोहन कांबळे लोणकर यांनी गाणे सादर केली. प्रकल्प अधिकारी समतादुत बार्टी श्रीमती सुजाता पोहरे यांनी आभार मानले तर सुत्रसंचलन कु. विशाखा बंडेवार, विनोद पाचंगे समतादुत बार्टी यांनी केले.

00000



 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त रॅली

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ होणार

संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन   

 

नांदेड, (जिमाका) दि. 24 :- संविधान दिनानिमित्त रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8 वा. सामाजिक न्याय विभागातर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा ज्योतीबा फुले पुतळा येथून या रॅलीचा प्रारंभ होईल. ही रॅली शिवाजीनगर, कलामंदिर, मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली जाईल व येथेच संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचनाने रॅलीचा समारोप होईल. नांदेड जिल्हा प्रशासनातील सर्व विभागाचे प्रतिनिधी या रॅलीत सहभागी होणार आहेत. संविधानाच्या जागरासाठी नागरिकांनीही या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.

00000

Thursday, November 23, 2023

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास

महामंडळामार्फत शुक्रवारी मेळाव्याचे आयोजन


नांदेड (जिमाका) 23 :- मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गोराडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी शुक्रवार 24 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड व परभणी आणि हिंगोली येथील मांग व तत्सम जातीच्या लोकांनी डॉ. बाबासाहेब  आंबेडकर, सामाजिक न्याय भवन सभागृह, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथे या मेळाव्यास  उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापक टि.आर. शिंदे यांनी केले आहे.

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत व शेवटच्या व्यक्ती पर्यंत  पोहोचविण्यासाठी  योजनाचा प्रसार, प्रचार करण्यात येत आहे.  लोकांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी नांदेड व परभणी आणि हिंगोली येथील मांग, मातंग, मिनी-मादीग,मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या समाजातील लोकांना महामंडळाच्या विविध योजनाची माहिती या मेळाव्यात देण्यात येणार आहे.

0000

Wednesday, November 22, 2023

 “विकसीत भारत संकल्प यात्रा” मोहिमेअंतर्गत

प्रत्येक गावात होणार शासकीय योजनांचा जागर

 

· फिरत्या एलईडी वाहनांद्वारे प्रसिद्धीचे नियोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 22 :- भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लक्ष निर्धारीत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासह विकसीत भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे व्यापक मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात जाऊन केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रसिद्धी करणाऱ्या फिरत्या एलईडी वाहनांना आज जिल्हाधिकारी कार्यालयातून मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, उपजिल्हाधिकारी संगिता चव्हाण, संदीप कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी किशोर कुऱ्हे, आइनवाड व इतर उपस्थित होते.

 

आजवर जे वंचित घटक विकासाच्या प्रवाहात येऊ शकले नाहीत, अशा लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यावर या प्रसिद्धी मोहिमेत भर दिला जाणार आहे. सर्व सामान्यांच्या विकासासाठी विविध विकास योजना प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज आहे. या यात्रेतून दुर्गम भागातील प्रत्येक गावात ज्या व्यक्तींना आजवर कोणत्या योजना मिळाल्या नाहीत अशा लाभार्थ्यांची निवड करून त्यांना त्या-त्या योजनांचा लाभ देण्याचे नियोजन या मोहिमेत करण्यात आले आहे.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून “विकसीत भारत संकल्प यात्रा” होत असून केंद्र सरकार, राज्य सरकार यासाठी प्रयत्नरत आहे. उज्ज्वला सारखी योजना, आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना प्रत्येक गावात पोहोचविली जात आहे. सुमारे 12 फिरते वाहन जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करणार आहेत.

00000




वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...