“विकसीत भारत संकल्प यात्रा” मोहिमेअंतर्गत
प्रत्येक गावात होणार शासकीय योजनांचा जागर
· फिरत्या एलईडी वाहनांद्वारे प्रसिद्धीचे नियोजन
नांदेड, (जिमाका) दि. 22 :- भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लक्ष निर्धारीत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासह विकसीत भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे व्यापक मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात जाऊन केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रसिद्धी करणाऱ्या फिरत्या एलईडी वाहनांना आज जिल्हाधिकारी कार्यालयातून मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, उपजिल्हाधिकारी संगिता चव्हाण, संदीप कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी किशोर कुऱ्हे, आइनवाड व इतर उपस्थित होते.
आजवर जे वंचित घटक विकासाच्या प्रवाहात येऊ शकले नाहीत, अशा लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यावर या प्रसिद्धी मोहिमेत भर दिला जाणार आहे. सर्व सामान्यांच्या विकासासाठी विविध विकास योजना प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज आहे. या यात्रेतून दुर्गम भागातील प्रत्येक गावात ज्या व्यक्तींना आजवर कोणत्या योजना मिळाल्या नाहीत अशा लाभार्थ्यांची निवड करून त्यांना त्या-त्या योजनांचा लाभ देण्याचे नियोजन या मोहिमेत करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून “विकसीत भारत संकल्प यात्रा” होत असून केंद्र सरकार, राज्य सरकार यासाठी प्रयत्नरत आहे. उज्ज्वला सारखी योजना, आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना प्रत्येक गावात पोहोचविली जात आहे. सुमारे 12 फिरते वाहन जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करणार आहेत.
00000
No comments:
Post a Comment