Wednesday, September 20, 2023

 वृत्त 

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या अनुषंगाने

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

 

·    शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने महाविद्यालयांना विविध सूचना  

 

नांदेड (जिमाका) 20 :- भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्यांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती योजने अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील सन 2021-22 व 2022-23 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज मंजूर झाले आहेत. परंतु केंद्र शासनाच्या सुधारित निधी वाटपाच्या निर्णयानुसार शासन स्तरावर उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणाच्या अनुषंगाने तसेच काही तांत्रिक कारणास्तव सन 2021-22 व 2022-23 या शैक्षणिक वर्षाची काही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यास विलंब होत आहे व याच कारणास्तव काही महाविद्यालये मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे रोखून धरत असल्याबाबत विद्यार्थी संघटनेकडून निवेदन प्राप्त होत आहेत.

 

या अनुषंगाने बैठकीत पुढील विषयाबाबत चर्चा करण्यात आली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय परिपत्रक 6 सप्टेंबर 2023 नुसार शिष्यवृत्ती न मिळाल्याच्या कारणाखाली मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्रे अडवणूक करण्यात येऊ नयेत त्यांना तात्काळ कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात यावे. शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे शैक्षणिक कागदपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी. सर्व महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेले समान संधी केंद्र व्यवस्थित चालू ठेऊन त्यामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या अडचणी महाविद्यालय स्तरावर सोडविण्यात याव्या. स्वाधार योजनेसाठी विद्यार्थी समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करतात त्यांची उपस्थिती देताना सदरचा विद्यार्थी नियमित महाविद्यालयात उपस्थित राहतो का याची खात्री करून विद्यार्थ्यांना उपस्थिती प्रमाणपत्र देण्यात यावे. याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी कार्यवाही करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची यादी तात्काळ सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाकडे सादर करावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे नांदेड यांनी केले आहे.

00000

 वृत्त


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144  

नांदेड (जिमाका) दि. 20 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून बुधवार 20 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते गुरूवार 19 ऑक्टोंबर 2023 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.  

 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 मे  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जून 2023  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  

 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 वृत्त 

अंगणवाडी मदतनीस (मानधनी) भरती

उमेदवारांची अंतिम व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन निर्णय 2 फेब्रुवारी 2023 नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नांदेड या कार्यालयातील अंगणवाडी मदतनिसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका अंतर्गत स्थानिक रहिवाशी असलेल्या महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज 10 जुलै 2023 पर्यंत मागविण्यात आले होते. त्याअनुषंगाने उमेदवारांची अंतिम व प्रतिक्षा यादी http//nanded.gov.in या संकेतस्थळावर व तसेच संबंधित नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत यांच्या नोटीस बोर्डावर 18 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे आवाहन व्हि. एस. बोराटे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा नांदेड यांनी केले आहे.

000000

 वृत्त

 

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त

जिल्हास्तर क्रीडा महोत्सवास भरभरुन प्रतिसाद  

 

नांदेड (जिमाका) 20 :- जिल्हा प्रशासन नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त जिल्हास्तर क्रीडा महोत्सव अंतर्गत बास्केटबॉल, बॅडमिंटन व टेबलटेनिस स्पर्धेचे आयोजन 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल नांदेड येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. एस. आय. वाकोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त अभियंता निळकंठ गव्हाणे, सेवानिवृत्त आर.एस.आय. सय्यद जमील, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर आदि मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रम त्याचदिवशी 17 सप्टेंबर रोजी सायं 7.30 वा. संपन्न झाले. यावेळी अध्यक्ष म्हणुन अधिष्ठाता डॉ. एस. आय. वाकोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन ग्रामीण पोलिस स्टेशन सिडको-नांदेडचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, हिंगोलीचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, शिवछत्रपती पुरस्कारार्थी सुरज सोनकांबळे, आंतरराष्ट्रीय दिव्यांग बॅडमिंटन खेळाडू कु.लता उमरेकर, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, उपशिक्षणाधिकारी कृष्णा फटाले, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव डॉ. महेश वाखरडकर, डॉ. अश्विन बोरीकर, बास्केटबॉल असोसिएशन सचिव विनोद गोस्वामी, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसकर, चंद्रप्रकाश होनवडजकर आदि मान्यवर उपस्थित होते.

 

क्रीडा महोत्सव स्पर्धेचा अंतिम निकाल  

बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेत पुरुष खुला गट प्रथम – बॉलर्स बास्केटबॉल क्लब नांदेड,  द्वितीय- नेक्सस बास्केटबॉल क्लब नांदेड, तृतीय- बिलीव्हर्स बास्केटबॉल क्लब नांदेड यांना प्रथम 15 रुपये, द्वितीय-12 हजार 500 रुपये व तृतीय 11 रुपये रोख रक्कम, मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

महिला खुला गट प्रथम – मस्तानपुरा बास्केटबॉल क्लब नांदेड,  द्वितीय- बॉलर्स  बास्केटबॉल क्लब नांदेड, तृतीय- एसजीजीएस बास्केटबॉल क्लब नांदेड यांना प्रथम  10 हजार रुपये, द्वितीय-7 हजार रुपये व तृतीय 5 हजार रुपये रोख रक्कम, मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

 

17 वर्षे मुले गट प्रथम – राज अकॅडमी नागार्जुना बास्केटबॉल क्लब नांदेड,  द्वितीय- ज्ञानमाता विद्या मंदीर, नांदेड, तृतीय- जिल्हा क्रीडा प्रशिक्षण बास्केटबॉल केंद्र, नांदेड यांना प्रथम 10 हजार रुपये, द्वितीय-7 हजार रुपये व तृतीय 5 हजार रुपये रोख रक्कम, मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. तसेच

 

टेबल टेनिस स्पर्धेतील विजेते

पुरुष खुला गट एकेरी प्रथम – प्रणव सुदर्शन अडबलवार, द्वितीय अमिष आनंद आठवले, तृतीय- आयुष अश्विन बोरीकर, तसेच महिला एकेरी गटात प्रथम ऋतुजा बालाजी पेरके, द्वितीय- श्रृध्दा सुभाष रावणगावकर, तृतीय- शरयु निलेश देशमुख व मिक्स दुहेरी मध्ये प्रथम– आयुष अश्विन बोरीकर व सत्यम बालाजी पेरके, द्वितीय- प्रणव सुदर्शन अडबलवार- इषिका अश्विन बोरीकर, तृतीय- ऋतुजा बालाजी पेरके- रिया मधुकर अनलदास यांना अनुक्रमे प्रथम रु 5 हजार रुपये,  द्वितीय 3 हजार रुपये व तृतीय 2 हजार रुपये रोख रक्कम, मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. तसेच प्रोत्साहनपर 11 वर्षाखालील मुले प्रथम श्रेयष कदम, सक्षम आठवले, ऋतीक कनकावार, 13 वर्षाखालील मुले प्रथम अर्णव ठोके, द्वितीय- निरज नांदेडे, तृतीय तेजस ठोके, 15 वर्षाखालील मुले- प्रथम -राज एंगडे, द्वितीय गौरव इरमलवार, तृतीय वरद शिवनगावकर यांना वितरीत करण्यात आला.

 

बॅडमिंटन स्पर्धेतील विजेते

पुरुष खुला गट एकेरी प्रथम – चेतन उध्दवराव माने, द्वितीय- परिक्षीत सोनलकुमार पतंगराय, तृतीय- संतोष स्वामी, तसेच महिला एकेरी गटात प्रथम- साक्षी रामदास इंदुरे, द्वितीय- सई तुकाराम माने, तृतीय- शरवरी शंकरराव वडवळे, व पुरुष मिक्स दुहेरी मध्ये प्रथम – मोहन बाळासाहेब भोसले- संदिप राजाराम उल्लेवार, द्वितीय – श्रीनिवास भुसेवार- संदिपसिंग जोहर, तृतीय- संतोष नागनाथ स्वामी- संतोष पुलगमवार यांना अनुक्रमे प्रथम 5 हजार रुपये, द्वितीय 3 हजार रुपये व तृतीय 2 हजार रुपये रोख रक्कम, मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. यावेळी प्रोत्साहन म्हणुन सखाराम रामजी वाकोडे, सय्यद जमील व खुशी गव्हाणे आदीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

या जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवात देगलूर, नायगाव, धर्माबाद, अर्धापूर, किनवट, बिलोली, मुदखेड, लोहा व इतर तालुक्यातील अंदाजे 600 ते 650  स्पर्धक सहभागी झाले होते. याकरीता पंच म्हणुन बास्केटबॉल.विनोद गोस्वामी व विष्णु शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुहास कांबळे, विकास मेहरकर, सोहम सोनकांबळे, जयपाल गजभारे, सुनील भालेराव, नागसेन वाढवे, महमद अनवर, प्रदीप गायंका, आदिती जाधव, बॅडमिंटन करीता डॉ. महेश वाखरडकर, विक्रम शेख, संतोष भवनगीकर, अभिजीत संजयकुमार, सृष्टी रावनगावकर, टेबल टेनिस करीता हनमंत नरवाडे, श्रीकांत दुधारे, आनंद नरवाडे, प्रणव अडबलवार, सत्यम पेरक आदीन काम पाहिले.

 

उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर यांनी केले तर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रलोभ कुलकर्णी व सृष्टी रावनगावकर यांनी केले तर आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रप्रकाश होनवडजकर यांनी मानले.

 

जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी जगन्नाथ लकडे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे तर कार्यालयातील मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, विद्यानंद भालेराव, ज्ञानेश्वर रोठे, सोनबा ओव्हाळ आदींनी परिश्रम घेतले.  

0000

जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गाच्या परिक्षेसाठी

अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याची कार्यवाही सुरू

 

नांदेड (जिमाका) 19 :- ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील 18 संवर्गातील परीक्षेकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याच्या अनुषंगाने https://maharddzp.com या संकेतस्थळावर लिंक उमेदवारांसाठी 5 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. या संकेतस्थळाची लिंक जिल्हा परिषदेच्या www.zpnanded.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांनी https://maharddzp.com या संकेतस्थळावरील लिंक बँक खात्याचा अचूक तपशील काळजीपूर्वक नोंदवावा,  जेणेकरून संपूर्ण रक्कम प्रदान करण्याची कार्यवाही करणे सोईची होईल, असे आवाहन जिल्हा परिषेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

 

मार्च 2019 व ऑगस्ट 2019 अंतर्गत (अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील 18 संवर्गाची सर्व जाहिरात, परीक्षा व संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्याबाबत निर्णय 21 ऑक्टोंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत नांदेड जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील गट क मधील विविध संवर्गासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी या परीक्षा शुल्कापोटी भरणा केलेली रक्कम परत प्राप्त होण्याच्या अनुषंगाने https://maharddzp.com या संकेतस्थळावर जावून आपल्या बँक खात्याचा अचूक तपशील काळजीपूर्वक नोंदवावा, असेही आवाहन नांदेड जिल्हा परिषेदच्यावतीने करण्यात आले आहे.  

00000

Monday, September 18, 2023

 पारंपरिक लोककला व कलागुण विकसित

होण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आवश्यक

-  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·         आदिवासी बांधवांनी सादर केले पारंपारिक दंडार नृत्य

 

नांदेड, (जिमाका) दि. 17 :- पारंपारिक नृत्य व लोककला हे पिढ्यानपिढ्या जपत विकसित होत असतात. त्या जोपासणे हे आपले कर्तव्य आहे. लोककला हा सांस्कृतिक वारसा  पुढच्या पिढीपर्यंत, युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन वारंवार होणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवोदित कलाकाराना आपल्या कला विकसित करण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. 




 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज भक्ती लॉन्स येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, कुलगुरू उध्दव भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर व अधिकारी उपस्थित होते. 

 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी, लोक कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी आले होते. या गीत /नृत्य सादरीकरणात राज्यगीत, गोंधळ, स्वागत गीत, मराठवाडा गीत, बासरी वादन, देशभक्तीपर आधारित गीत व सादरीकरण, किनवट तालुक्यातील तलाईगुडा येथील आदिवासी बांधवाचे पारंपारिक पध्दतीचे आदिवासी सामुहिक नृत्य, खंडोबाची वारी, सर्जिकल स्ट्राईक, पोवाडा आदी वैविध्यपूर्ण कार्यक्रमानी प्रेक्षकांची मने वेधून घेतले.



 

किनवट तालुक्यातील तलाईगुडा येथील आदिवासी बांधवानी सादर केले पारंपारिक लोकनृत्य

 

सांस्कृतिक कार्यक्रमात सर्वच नृत्य व देशभक्तीपर गीते, सादरीकरण उत्तम प्रकारे विद्यार्थी व कलाकारांनी सादर केले. यामध्ये किनवट तालुक्यातील तलाईगुडा येथील जय जंगो बाई दंडार नृत्यमंडळ येथील आदिवासी बांधवानी पारंपारीक पध्दतीने डोक्यावर मोरपिसाचा टोप, पायात व कमरेला घुंगरु, हातात लाकडी दांडा व वाद्याच्या तालावर ठेका धरत दंडार नृत्य सादर केले. या आगळयावेगळया नृत्याने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. यासोबतच विद्यार्थ्यांनी सर्जिकल स्ट्राईक व उमरी बँक दरोडा सादरीकरणाने उपस्थिताच्या डोळयासमोर हा प्रसंग उभा केला. 

 

महसुल विभागाच्या मीना सोलापूरे यांनी देशभक्तीपर गीत व मराठवाडा गीत सामुहिक पध्दतीने गायले. गोंधळी व पोवाडा कलाकारानी पारंपारिक वेशभुषा करुन उत्तम कलाप्रदर्शनाचे सादरीकरण केले. आनंदी विकास व कलासंचाने सुरवातीला महाराष्ट्र गीताचे गायन केले.

00000


Sunday, September 17, 2023

 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

समाज कल्याण कार्यालयात विद्युत रोषणाई करुन ध्वजारोहण उत्साहात साजरा 

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ,सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,नांदेड यांचे वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डॉ.बाबासाहेब सामाजिक न्याय भवन इमातीवर विद्युत रोषनाई करण्यात आली होती. अपर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा जात पडताळणी समिती सुनिल महिंद्रकर यांचे हस्ते ध्वजारोहण आज करण्यात आले.

या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे व कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी,  जिल्हा जात पडताळणी कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी तसेच विविध महामंडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.  ध्वजारोहणानंतर, राष्ट्रगीत, सामुहिक संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन,  मराठवाडा प्रतिज्ञा, राज्य गीत आणि मराठवाडा गौरव गिताचे गायन केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 15 ते 17 सप्टेंबर 2023 कालावधीत कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी नांदेड यांच्या निर्देशानुसार विविध कार्यक्रम संपन्न झाले.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे,  यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त मनोगत व्यक्त करुन उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या . तसेच  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात आदरणीय प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. तद्नंतर वाहन चालक दिनानिमित्त कार्यालयातील वाहन चालक अनिल कंधारे यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 

या अंतर्गत  विशेष स्वच्‍छता मोहिम  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये  तसेच नांदेड जिल्हातील समाज कल्याण कार्यालय अधिनस्त कार्यरत वसतिगृह व अनु.जाती निवासी शाळा मध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. दिनांक 15 सप्टेंबर 2023 पासुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवानातील सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालयाच्या इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली , विविध योजनांची माहिती अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून कर्मचाऱ्या मार्फत लाभार्थ्यांना देण्यात आली. तसेच संध्याछाया वृध्दाश्रमात ज्येष्ठ नागरीकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले  तसेच विद्यार्थ्यांची नाटय स्पर्धा , चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा , वृक्षरोपण असे विविध कार्यक्रम शासकिय वसतिगृह व निवासी शाळेमध्ये राबविण्यात आले.

0000




वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...