Sunday, September 17, 2023

 मराठवाडा मुक्तिसाठी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान

भारताच्या अखंडतेच्या दृष्टीने अनमोल

-         पालकमंत्री गिरीश महाजन

 

·         उमेद च्या माध्यमातून ग्रामीण महिला सक्षमीकरणावर भर

·         छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत नांदेड जिल्ह्यासाठी अनेक विकासात्मक कामांना चालना

·         पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम हा भारताच्या अखंड सार्वभौमत्वाला सिद्ध करणारा आहे. निझामाच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान संपूर्ण भारताच्या अखंडतेच्या दृष्टीने अत्यंत अनमोल असल्याचे, प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाच्या 75 वा वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

 

मराठवाडा मुक्तिदिन समारंभात माता गुजरीजी विसावा उद्यान येथे  हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पालकमंत्री गिरीश महाजन व मान्यवरांच्या हस्ते  मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.  यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपाचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी उपस्थित होते.

 

भारतीय स्वातंत्र्य चळवळीने, मराठवाडा मुक्तिसंग्रामाने लोकशाहीच्या मूल्यांसह जो समृध्द वारसा दिला आहे तो नव्या पिढीपर्यंत पोहचावा यादृष्टीने आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासह मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा करीत आहोत. हा समृध्द वारसा पुढे नेण्यासह भारतातील शेती, शेतकरी व सर्वसामान्यांच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेवून विकासाला गती दिली आहे. जी-20 परिषदेचे अत्यंत समर्थपणे आयोजन करून जगातील सर्व देश प्रमुखांनी भारताला प्रधानमंत्री मोदीजींच्या स्वरुपात एका समर्थ नेतृत्वाची अनुभूती घेतल्याचे त्यांनी सांगितले.  

 

मराठवाडा मुक्ती दिनाच्या औचित्याने विविध विकास कामाचे लोकार्पण

मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज विसावा उद्यान येथील मुख्य शासकीय समारोहात प्रातिनिधीक स्वरुपात लोकार्पण करण्यात आले. यात अर्धापूर आणि भोकर येथील पोलीस स्टेशनच्या नुतन इमारत, नांदेड जिल्हा रुग्णालय येथील डायलेसीस सेंटर, आयपीएचएल प्रयोगशाळा, नांदेड येथील कोषागार कार्यालय सुरक्षा कक्ष नुतन इमारतीचे लोकार्पण झाल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाहिर केले. याचबरोबर क्रिडांगण व डिजीटल क्लासरुमचे भूमीपूजन,  इंडियन स्वच्छता लिग 2.0 अंतर्गत विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. जिल्हा क्रीडा विभागाअंतर्गत पंडित दिनदयाल उपाध्याय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन झाल्याचे त्यांनी जाहिर केले.

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या

विशेष कॉफीटेबल बुक व स्मृतिदर्शिकेचे प्रकाशन

 

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विशेष कॉफीटेबल बुक व स्मृतिदर्शिकेचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाबाबत आधारित या विशेष कॉफीटेबल बुकचे संपादन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, डॉ. सुरेश सावंत, संजीव कुळकर्णी व शंतनु डोईफोडे यांनी केले आहे. यात माजी कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. प्रभाकर देव, ज्येष्ठ संपादक निशिकांत भालेराव, जयप्रकाश दगडे, डॉ. महेश जोशी, डॉ. संपदा कुलकर्णी यांचे लेख आहेत. स्मृतिदर्शिकेत नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्तिसंग्रामातील महत्वपूर्ण घटनांवर प्रख्यात चित्रकार राजु बाविस्कर यांच्या रेखाटनासह संक्षिप्त माहिती देण्यात आली आहे.

 

शेतकऱ्यांसाठी भरीव आर्थिक मदत

 

गतवर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांच्या मदतीला शासन खंबीरपणे उभे राहिले. शेतकऱ्यांना यातून सावरण्यासाठी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली. सुमारे 8.89 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत 472 कोटी रुपये नुकसान भरपाई वाटप करण्यात आले. या खरीप हंगामासाठी 1 हजार 812.14 कोटी रुपये पीक कर्ज वाटप केले. यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी 420 कोटी रुपये लवकरच देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.   

 

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 अंतर्गत 15 सप्टेंबर 2023 अखेरपर्यत 31 हजार 181 शेतकऱ्यांना 117.61 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ शासनामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. मार्च व एप्रिल 2023 या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या 42 हजार 793 बाधित शेतकऱ्यांना 34 कोटी 21 लाख 68 हजार 863 रुपये  इतका निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्‍यावर वितरीत करण्‍यात आला. पी.एम.किसान योजनेअंतर्गत जिल्ह्यात 4 लाख 32 हजार 587 इतके पात्र शेतकरी असून त्‍यांना आजपर्यत एकूण रूपये 1 हजार 147 कोटी 1 लाख इतकी मदत वितरीत झाली आहे असेही पालकमंत्री महाजन यांनी यावेळी नमूद केले.

 

केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी आपण विविध योजना राबवित आहोत. याला राज्य शासनानेही जोड दिली आहे. नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत मनरेगाच्या माध्यमातून वैयक्तिक विहीर योजनेवर जिल्हा परिषदेने विशेष भर दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील बालकांच्या सुपोषणासाठी आयआयटी पवई यांच्या विद्यमानातून विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळा दत्तक योजनाबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेतला आहे. देणगीच्या माध्यमातून ही दत्तक योजना कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  

जिल्ह्यातील आरोग्याच्या सुविधेत नवीन भर

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी 4 ठिकाणी सिटी स्कॅन यंत्रणा, 6 ठिकाणी डायलेसीस यंत्रणा, 15 ठिकाणी मॉड्युलर शस्त्रक्रिया कक्ष, टुडी ईको तपासणी, 16 ठिकाणी ब्लड स्टोरेज युनिट या सर्व सुविधा आरोग्याच्यादृष्टिने जिल्ह्यात वाढविल्या आहेत. राज्यातील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी “तीर्थक्षेत्र विकास योजना” राबविण्याचा मानस असून त्या योजनेच्या माध्यमातून माहूर तीर्थक्षेत्र विकासासाठी सुमारे 7 कोटी एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे. याव्यतिरिक्त नांदेड जिल्ह्यातील इतर पर्यटन क्षेत्राचाही विकास करण्यात येणार असल्याचे म्हणाले.

 

ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी  1 हजार 76  कोटींची वाढीव तरतूद

उमेदच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी  1 हजार 76  कोटींची वाढीव तरतूद करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 लाख 8 हजार  स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करून साधारण 60 लाखापेक्षा जास्त महिलांना या कार्यक्रमात सामावून घेतलेले आहे.  यापैकी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये 1 लाख 24 हजार स्वयंसहाय्यता गटांमध्ये साधारणपणे 12 लाख 23 हजार  महिलांचा समावेश आहे.  

 

महाराष्ट्र शासन मराठा आरक्षणासाठी कटिबध्द

महाराष्ट्र शासन मराठा आरक्षणासाठी कटिबध्द आहे. मुख्यमंत्री व संपूर्ण मंत्रीमंडळ मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे. सर्व पातळीवर आरक्षणाचा निर्णय टिकलाच पाहिजे यादृष्टिने शासनाची भूमिका असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालना जिल्ह्यातील अंतवरली येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडले. त्यांच्यासह संपूर्ण समाजाला त्यांनी विश्वास दिला आहे.  

 

छत्रपती संभाजी नगर येथील मंत्रिमंडळ बैठकीत नांदेडसाठी भरीव तरतूद

सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बाभळी येथील मध्यम प्रकल्पासाठी 771 कोटी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले. या प्रकल्पामुळे 1 हजार 600 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. जिल्ह्यातील उनकेश्वर (ता. किनवट) येथील उच्च पातळी बंधारा प्रकल्पाच्या 232 कोटी 71 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. यातून किनवट   तालुक्यातील   1 हजार 90  हेक्टर आणि यवतमाळ  जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील 370 हेक्टर असे एकूण 1 हजार 460 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी 14 हजार 40 कोटीची योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातील विविध स्मारके व मंदिराच्या विकास कार्यक्रमात होट्टल मंदिराचाही समावेश केलेला आहे. मराठवाड्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वत:च्या कार्यालयासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षात 180 कोटी रुपये दिले जाणार आहेत. निझामकालीन शाळांची दुरूस्ती व पुर्नबांधणीसाठी 20 टक्के लोकसहभागाची अट शिथील केली आहे. नांदेड शहरात सुरक्षिततेच्यादृष्टिने 100 कोटी रुपयांचे सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले जाणार आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी 329 कोटी 16 लाख रुपये, माहूर नगरपरिषदेसाठी 24 कोटी 62 लाख रुपये, माहूर येथे वनविश्रामगृह, साबरमती घाटाप्रमाणे नांदेडच्या गोदावरी घाटाचे सौंदर्यीकरण, रिव्हर फंडसाठी 100 कोटी रुपयांचे सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले जाणार आहे. नांदेड येथे स्वयंमचलित चाचणी पथप्रकल्प, घनकचरा प्रकल्पासाठी 8 कोटी 7 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.  

 

 या विशेष समारंभात पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मराठवाडा गौरव गीताचे गीतकार लक्ष्मीकांत तांबोळी यांचा सत्कार करण्यात आला. जागतिक दिव्यांग बॅडमिंटन खेळाडू लता उमरेकर यांना 2 लक्ष रुपयांचा धनादेश त्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. याचबरोबर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सभामंडपात असलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींची आस्थेवाईक विचारपूस करुन भेट घेतली. जिल्हा पोलीस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह महाराष्ट्र गीत, व मराठवाडा गीत सादर केले. पालकमंत्री यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणाच्या अगोदर प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले.

0000

(छाया- सदा वडजे)



















Saturday, September 16, 2023

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन

                          मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त

                              मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन

·         बास्केटबॉल स्पर्धेस सुरुवात

·         विविध जिल्ह्यातील स्पर्धकाचा सहभाग

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :-  जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त खुले मॅरेथॉन स्पर्धेचे आज आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

 

यावेळी सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे, मराठवाडा शासकीय पुनोनित माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष, जिल्हा व मंडळ अधिकारी महसुल श्री. पठाण, अथलेटिक्स संघटनेचे सचिव प्रलोभ कुलकर्णी आदी उपस्थीत होते.




 

ही मॅरेथॉन रॅली महात्मा फुले पुतळा (आयटीआय चौक) येथून  शिवाजीनगर मार्गे बस स्टॅन्ड कलामंदीर छ. शिवाजी महाराज पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय, चिखलवाडी कॉर्नर, ओव्हर ब्रीज, अण्णाभाऊ साठे चौक, व्ही.आय.पी.रोड, कुसुमताई सभागृह (आयटीएम कॉलेज), स्टेडीयम मार्ग, विसावा उद्यान हुतात्मा स्मारक येथे समाप्त करण्यात आली.

या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहे.

खुले मॅरेथॉन पुरुष गटासाठी – प्रथम क्रमांक सगरोळी येथील छगण मारोती बोंबले, द्वितीय विष्णु विठठलराव लव्हाळे (सगरोळी), तृतीय-प्रदीप उदयसिंह राजपूत (संभाजीनगर), चौथा रोहित शिवाजी बिन्नर (नाशिक) , पाचवा सचिन रोहीदास पवार (परभणी) व सहावा विनय बालासाहेब ढोबळे (परभणी) यांनी प्राविण्य संपादन केले.







तर खुले मॅरेथॉन महिला गटात - प्रथम निकीता विठ्ठल मात्रे (परभणी), द्वितीय परिमाला बालासाहेब बाबर (परभणी), तृतीय वैष्णवी विनोद दुधमल (नांदेड), चौथा आरती बाळगीर गोस्वामी (एकनाथ पाटील अकॅडमी,नांदेड), पाचवा मंजुषा पुंडलिक राठोड (एकनाथ पाटील अकॅडमी,नांदेड), सहावा- सारीका अशोक भालेराव (एकनाथ पाटील अकॅडमी,नांदेड) यांनी प्राविण्य संपादन केले आहे.  पुरुष व महिला प्राविण्य स्पर्धकांना प्रथम क्रमांक 11 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 9 हजार रुपये, तृतीय क्रमांक 7 हजार रुपये, चौथा क्रमांक 6 हजार रुपये, पाचवा क्रमांक 5 हजार रुपये व सहावा क्रमांक 4 हजार रुपये असे एकुण 84 हजार रुपये रोख, मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.  या खुले मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्र राज्यातील संभाजीनगर, परभणी, यवतमाळ, बुलढाणा, जालना, अकोला, वाशिम, लातूर, उस्मानाबाद व इतर जिल्हयातील स्पर्धक मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. बक्षीस वितरण कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी खेळाडूंना मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाल्याबददल शुभेच्छा दिल्या. निरोगी शरीर राहण्यासाठी मैदानावर खेळ खेळणे महत्वाचे असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी सांगीतले.


यासाठी पंच प्रमुख म्हणुन प्रलोभ कुलकर्णी व  बंटी सोनसळे यांनी काम पाहीले. त्यांचे सोबत पंच व रॅडर म्हणुन  वैभव दमकोंडवार, गोविंद पांचाळ, प्रभु धुमाळ, सिध्दोधन नरवाडे, अजय राठोड, अन्वर महमद, शिवाणी कापसे, वैभव अंभोरे, राजर्षी पुयड, विशाखा, शेख आमेर, अरविंद कोकाटे, बुध्दभुषग गायकवाड, कांचन मस्के आदीनी काम पाहिले. याप्रसंगी गजानन फुलारी (जिम्नॅस्टिक्स संघटना), चंद्रकांत आढाव (शिकई मार्शल आर्ट संघटना) व जिल्हयातील विविध क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रलोभ कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन बालाजी शिरसीकर यांनी मानले.

 

ही मॅराथॉन स्पर्धा यशस्वी करणेसाठी क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोयर तर कार्यालयातील मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, विद्यानंद भालेराव, ज्ञानेश्वर रोठे, सोनबा ओव्हाळ आदींनी परिश्रम घेतले.

 

तसेच जिल्हास्तर क्रीडा महोत्सव अंतर्गत बास्केटबॉल, बॅडमिंटन व टेबल टेनिस स्पर्धेपैकी आज सायं 4 वा. बास्केटबॉल स्पर्धेस सुरुवात होणार आहे. यासाठी जिल्हयातील क्रीडाप्रेमीनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी केले आहे.

00000      

 आदराची भावना यातच

ज्येष्ठांच्या आनंदी जीवनाचा मार्ग

-         सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे

 

·         मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

55 ज्येष्ठ नागरीकांची आरोग्य तपासणी व सत्कार

 

नांदेड (जिमाका) दि. 16 :-  ज्येष्ठ नागरिक हा समाजातील महत्वाचा घटक आहे. त्यांच्या कष्टावरच कुटूंब उभे राहिले यांची सतत जाणीव ठेवून तरुण पिढीने ज्येष्ठांना आदर व सन्मानाने वागविले पाहिजे. तसेच त्यांच्या आनंददायी जीवनासाठी त्यांना अत्यावश्यक असलेल्या सुविधा वेळेत मिळतील यांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सहाय्यक आयुक्त  शिवानंद मिनगीरे यांनी केले. 15 सप्टेंबर रोजी संध्याछाया वृध्दाश्रमात ज्येष्ठ नागरीकांची आरोग्य तपासणी व सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.  

 

या कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय चिकित्सक डॉ. साहेबराव मोरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.पी. डी.जोशी पाटोदेकर हे होते. तर प्रमुख अतिथी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे होते. यावेळी समाज कल्याण अधिकारी बापू दासरी,  फेस्कॉम अध्यक्ष अशोक तेरकर, संध्याछाया वृद्धाश्रमाच्या सचिव सुरेखा पाटणी  यांची उपस्थिती होती. 


 

या कार्यक्रमात विशेष कार्य केलेल्या श्रीमती काडगे, ॲड.सिध्दीकी, डॉ. काप्रतवार व इतर जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. वृध्दाश्रमातील 55 ज्येष्ठ नागरिकांची जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील 12 वैद्यकिय अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी केली . 

 


वृध्दाश्रमातील प्रवेशीत ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्यमान भारत  कार्ड काढून देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित केले जाणार असल्याचे सहाय्यक आयुक्त  शिवानंद मिनगीरे यांनी सांगितले. जेष्ठ नागरीकांसाठीच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.  नागरिकांच्या समस्या वरचेवर  गंभीर बनत आहेत. समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येवून काम करण्याची गरज असल्याचे समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांनी  सांगितले.   तसेच आपण वृद्धांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत अशी ग्वाही डॉ. साहेबराव मोरे यांनी दिली. यावेळी पी.डी. जोशी पाटोदकर यांनी जेष्ठ नागरिकांच्या समस्यांचा मागील तीस वर्षाचा आढावा घेतला.


 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अंजली नरवाडे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती गंगातीर यांनी केले. हा कार्यकम यशस्वी होण्यासाठी वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीमती एम.पी.राठोड , झंपलवाड, जेटलावार यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या मार्गदशनाखाली संपन्न झाला. 

0000

 

 

 

 वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास 

महामंडळाच्या विविध योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 16 :-  वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाअंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रर्वगातील लोकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील इच्छूक लाभार्थ्यांनी www.vjnt.in   या संकेतस्थळावर अर्ज करावेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक वि.जा.भ.ज विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड यांचा दूरध्वनी क्रमांक (02462) 202044 येथे संपर्क करावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा व्यवस्थापक आर.एस.नरवडे  यांनी केले आहे.

 

योजनेची माहिती पुढील प्रमाणे आहे.

 

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना : या योजनेची कर्ज व्याज परतावा मर्यादा 10 लाख पर्यंत असून अर्जदार हा विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. ही योजना ऑनलाईन असून यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, वयाचा पुरावा संबंधीत व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल व इतर कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.

 

 गट कर्ज व्याज परतावा योजना : या योजनेसाठी कर्जाची मर्यादा 10 ते 50  लाख रुपये पर्यत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत गट असावा व गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. गटातील सदस्याचे वय 18 ते 45 वर्षा पर्यंत असावे. गटातील लाभार्थ्यांचे कर्ज खाते हे आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. गटातील सर्व सदस्यांचे सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा. उत्पन्नाची मर्यादा नॉन क्रिमीनल करीता 8 लाख रुपयाची मर्यादा असावी. ही योजना ऑनलाईन असून याकरिता सदस्यांचे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, वयाचा पुरावा संबंधित व्यवसायाचे कोटेशन प्रकल्प अहवाल सोबत सर्व मूळ कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.

 

रुपये 1 लाख थेट कर्ज योजना : या योजनेत महामंडळाकडून रुपये 1 लाख थेट  कर्ज दिले जाते. योजनेसाठी दोन जामिनदार व गहाणखत, बोझा नोंद करून देणे आवश्यक आहे. याकरिता जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला 1 लाख रुपया पर्यंत मर्यादा, रेशन कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा, व्यवसायाचा परवाना इत्यादी कागदपत्रांसह संबंधित व्यवसायानुसार कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. या योजनेचे अर्ज महामंडळाकडून जातीचा मूळ दाखला व आधार कार्ड दाखवून रितसर नोंद करून अर्जदारास मिळेल.

 

बीज भांडवल योजना : बीज भांडवल योजना ही बँकेमार्फत राबविली जाते. अर्जदाराने महामंडळाकडून जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (1 लाखापर्यंत), रेशन कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र, संबंधीत व्यवसायानुसार आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून कार्यालयात दाखल करावेत. यापूर्वी लाभार्थ्यांनी कर्जाचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही.

 

वरील योजना सन 2022- 2023 या आर्थिक वर्षाकरिता राबविण्यात येत आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचे  50, गट कर्ज व्याज परतावा योजनेचे 02,  बीज भांडवल कर्ज योजना 50, रुपये 1 लाख थेट कर्ज योजना 100 असे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. वरील योजनेचा जास्तीत-जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000000

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण

 मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण

 

नांदेड, (जिमाका)दि. 16 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार 17 सप्टेंबर 2023 रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथे सकाळी 8.30 वा. हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण केले जाईल. यानंतर  सकाळी  9 वाजता राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ होईल.  या समारंभास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.   

 

समारंभासाठी निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये.  या मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालये, संस्था, आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 पुर्वी किंवा 9.30 नंतर आयोजित करावेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लास्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना व आदेश दिले आहेत.

 

0000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...