Friday, June 9, 2023

कृपया सुधारीत वृत्त घ्यावे, ही विनंती.

वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून

नांदेड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल 

 

·         10 जून रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत असेल बदल 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- नांदेड शहरात शनिवार 10 जून 2023 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपा पक्षातर्फे अबचलनगर मैदान नांदेड येथील आयोजित जाहीर सभेस उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या अनुषंगाने नियमित चालणाऱ्या वाहनांच्या वाहतूक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे. ही अधिसूचना शनिवार 10 जून 2023 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत लागू राहिल. 

आसना ते विमानतळ टीपॉईट, शिवमंदीर-राज कार्नर-वर्कशॉप-भाग्यनगर-आनंदनगर-नाईक चौक-अण्णाभाऊ साठे चौक-यात्री निवास-चिखलवाडी कॉर्नर-गुरुद्वारा गेट नंबर 1 कडे येणारा-जाणारा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद राहील. नाईक चौक-महाराणा प्रताप चौक ते बाफना टीपॉइटकडे  येणारा-जाणारा रस्ता हा वाहतुकीस पूर्णपणे बंद राहील. देगलूरनाका-बाफना टी पॉइट ते हिंगोली गेटकडे येणारा-जाणारा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद राहील. जुना मोंढा ते कविता रेस्टॉरेन्टकडे येणारा-जाणारा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद राहील.   

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग 

पुर्णा रोडवरून येणारी छोटी वाहने ही छत्रपती चौक-मौर चौक-पावडेवाडी नाका-रेस्ट हाऊस मार्गे शहरात ये-जा करतील. तसेच मोठी वाहने ही शेतकरी पुतळा-कॅनॉल रोड-साई मंदीर-संकेत हॉस्टेल मार्गे नवीन आसना बायपासने आसना टी पॉइन्ट येथून महामार्गावरून बाहेर जातील. 

मालेगाव रोडने येणारी मोठी वाहने पासदगाव-संकेत हॉस्टेल तरोडा मार्गे आसना हायवेकडे जातील व छोटी वाहने छत्रपती चौक-मौर चौक-पावडेवाडी नाका-रेस्ट होऊस मार्गे ये-जा करतील. 

वाजेगावकडून येणारी वाहने वाजेगाव-देगलूर नाका-बाफना टी पॉइन्ट मार्गे हिंगोली गेटकडे येणारी-जाणारी छोट्या वाहनांची वाहतुक देगलूरनाका ते माळटेकडी रोडचा वापर करतील व मोठी वाहने वाजेगाव ते धनेगाव मार्गे बायपासचा वापर करतील. 

जुना मोंढा ते कविता रेस्टारेन्ट ते बाफना टी पॉइन्टकडे येणारी-जाणारी वाहतुक दैनाबॅक महावीर चौक-वजिराबाद चौक या रस्त्याचा वापर करतील. 

शंकरराव चव्हाण चौक मार्गे सभेसाठी येणारी वाहने माळटेकडी उडान पुलाच्या खालुन नमस्कार चौक-महाराणा प्रताप चौक मार्गे खालसा हायस्कूल पार्कीग मैदानावर जातील. 

देगलूर, बिलोली, नायगावकडून सभेसाठी येणारी वाहने केळी मार्केटच्या जवळील चैतन्य बापु देशमुख यांच्या जागेत पार्कींग करतील. 

लोहा, कंधार, उस्माननगर, मुखेडकडून येणारी वाहने यात्री निवास मैदान येथे पार्कींग करतील. 

वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून वरीलप्रमाणे शनिवार 10 जून 2023 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत या पर्यायी मार्गाची अधिसूचना नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी प्रसिद्ध केली आहे.

0000

Thursday, June 8, 2023

 अन्यथा नांदेड विमानतळ आम्ही पुढील तीन महिन्यात सुरू करु

- उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा

 

·  विमानतळाच्या सुविधा कार्यान्वित करण्यासाठी उद्योग मंत्री सामंत यांनी घेतला आढावा

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- नांदेड येथील विमानतळाच्या सेवा-सुविधांबाबत मागील अनेक महिन्यांपासून सर्व स्तरातून तक्रारी येत आहेत. लातूर, हिंगोली, परभणी, बिदर या अशा पाच जिल्ह्यातील अनेक प्रवाशांसाठी येथील विमानतळाची सुविधा ही अत्यंत गरजेची आहे. याच बरोबर नांदेड येथील शिख भाविकांची जगभरातून वर्दळ सुरु असते. एका बाजूला मोठ्या संख्येने विमान प्रवासी असूनही येथील विमानतळाच्या कुशल व्यवस्थापना अभावी येथील प्रवासी विमान सुविधा बंद पडली. सदर विमानतळ चालविणाऱ्या एजन्सीने यात तात्काळ सुधारणा केल्या नाहीत तर राज्याच्या उद्योग विभागामार्फत इतर विमानतळाच्या धर्तीवर नांदेड विमानतळ उद्योग विभागातर्फे येत्या तीन महिन्यात सुरु करू, अशी घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली.

 

नांदेड विमानतळाच्या सुविधांबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक विमानतळ येथे संपन्न झाली. या बैठकीस खासदार हेमंत पाटील, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजी कल्याणकर, प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगांवकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, रिलायन्स एअरपोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी तारीख बट्ट, प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

एमआयडीसीमार्फत राज्यातील अनेक ठिकाणी सक्षमपणे विमानतळाचे व्यवस्थापन केले आहे. नांदेड विमानतळाबाबत अनेकांच्या तक्रारी लक्षात घेता यात तात्काळ सुधारणा गरजेचे आहे. येथील कामे तात्काळ सुरु न झाल्यास या विमानतळाचे व्यवस्थापन आमच्याकडे घेवून आम्ही अधिक सक्षमतेने हे विमानतळ चालवून प्रवाशांना सुविधा देवू असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

 

विमानसेवा सक्षम सुरू झाल्यास पाच जिल्ह्यांसह उद्योग जगतालाही मिळेल चालना

- खासदार प्रताप पाटील चिखलीकर

 

नांदेडसह मराठवाडा विकासाच्यादृष्टिने हे विमानतळ खूप महत्वाचे आहे. येथील निर्यातीला मोठ्या प्रमाणात यातून चालना मिळू शकते. विमानसेवा पूर्ववत सुरू झाल्यास सुमारे पाच जिल्ह्यातील प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. केवळ येथील व्यवस्थापनाच्या चुकीमुळे जर जनतेच्या सुविधेला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होणार असेल तर यात बदल करणे आवश्यक असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले. याबाबत नागरी विमान वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासमवेत मी चर्चा केली आहे. त्यांनी याबाबत नागरी विमान वाहतुक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आहेत, असे खा. चिखलीकर यांनी सांगितले.

 

विमानतळ व्यवस्थापनाच्या कामकाजात सुधारणा आवश्यक

- खासदार हेमंत पाटील

विमानतळाच्या सेवा-सुविधांबाबत संबंधित व्यवस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बट्ट यांना वारंवार सूचना करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विमानतळाच्या सुविधा सक्षम नसल्याने इतर विमान वाहतूक कंपन्या पुढे यायला तयार नाहीत. येथील व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे अडचणी वाढल्या आहेत. ज्या चांगल्या स्थितीत हे विमानतळ संबंधित एजन्सीकडे सुपूर्द करण्यात आले होते ती स्थिती आज राहिली नसून व्यवस्थापनाच्या गलथान कारभाराबद्दल खासदार हेमंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड यांनी यात लक्ष देण्याचा आग्रह केला.

 

नांदेड येथील उद्योजकांच्या बैठकीतही अनेक उद्योजकांनी विमानतळ सुविधेबाबत प्रश्न उपस्थित करुन उद्योग मंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधले. उद्योजक शैलेश कऱ्हाळे, आनंद बिडवई, बंगाली, महेश देशपांडे यांनी विमानतळाचा मुद्दा उपस्थित करुन नांदेड व आजूबाजूच्या जिल्ह्यातील उद्योग जगताला चालना देण्यासाठी, एक्सपोर्टसाठी येथील सुविधा व विमानसेवा तात्काळ सुरु करण्याची आग्रही मागणी केली.

00000
















 उद्योग वाढीला चालना देण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा देण्यावर भर

- उद्योग मंत्री उदय सामंत

हळद क्लस्टरसाठी अतिरिक्त जागाही देवू

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- राज्याच्या विकासाला चालना मिळण्यासाठी शासनाच्यावतीने अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने स्वयंरोजगाराच्या निर्मितीसह युवकांना नौकरीची व्यापक संधी निर्माण व्हावी यावर भर देत आहोत. याच बरोबर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून राज्यात जास्तीत जास्त नवउद्योजक निर्माण व्हावेत यावर आमचा भर असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. पायाभूत सुविधा कोणत्याही क्षेत्राच्या उद्योग वाढीसाठी आवश्यक असून यादृष्टीनेही टप्याटप्याने निधी उपलब्ध करुन दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग भवन येथे जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधी समवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

 

यावेळी  खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, एमआयडीसीच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, प्रादेशिक अधिकारी धनजंय इंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे व उद्योजक शैलेश कऱ्हाळे, आनंद बिडवई, बंगाली, महेश देशपांडे व विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.

 

रोजगार निर्मिती व उद्योग व्यवसाय यासाठी आर्थिक बाजूही असावी लागते. युवकांच्या प्रकल्पाप्रमाणे त्यांना वित्त व कर्ज पुरवठा व्हावा यादृष्टीने काही अडचणी असतील तर त्याही प्राधान्याने विचारात घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बँकेचे अधिकारी व नवउद्योजक यांचा समन्वय साधून जागेवरच अडचणी दूर करण्यासाठी मेळावा आयोजित करावा असेही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

 

यावेळी बैठकीस उपस्थित असलेल्या उद्योजकांच्या शिष्टमंडळाने ग्रामपंचायत व एमआयडीसीलाही वेगवेगळया पध्दतीने कर द्यावा लागतो याकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांचा सहभाग असलेली समिती नेमण्यात येईल. या समितीच्या निर्णयानुसार उद्योजकांना भराव्या लागणाऱ्या कराच्या रकमेवर निर्णय घेण्यात येईल, असेही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.  यावेळी औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी त्यांच्या अडचणी मांडल्या. त्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

0000




Wednesday, June 7, 2023

 पर्यावरण दिनानिमीत्त जिल्हा व सत्र न्यायालय

नूतन इमारतीच्या प्रांगणात वृक्षारोपण संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 7 : प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नागेश व्ही. न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वनपरिक्षेत्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा व सत्र न्यायालय नूतन इमारत कौठा नांदेडच्या प्रांगणात 5 जून 2023 रोजी वृक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.


यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज यांची प्रमुख उपस्थीती होती. यावेळी त्यांनी उपस्थितांना पर्यावरणासंबंधी मार्गदर्शन केले. जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावावे व त्याचे संगोपण करावे जेणेकरुन पर्यावरणाचा समतोल राखता येईल असेही त्यांनी सांगितले.


याप्रसंगी मुख्य विधी सहाय्य संरक्षण सल्लागार लोकाभिरक्षक अॅड. स्वप्निल कुलकर्णी , उपमुख्य विधी सहाय्य संरक्षण सल्लागार लोकाभिरक्षक अॅड. नय्यूम खान पठाण, विधी सहाय्य संरक्षण सल्लागार लोकाभिरक्षक अॅड. सुरेश कुरोलू , रिटेनर लॉयर अॅड. मंगेश वाघमारे, अॅड.सचिन मगर, अॅड. मनिषा गायकवाड व वनपरीक्षेत्र अधिकारी संदीप शिंदे, उप वनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक भिमसींग ठाकुर व न्यायालयीन कर्मचारी के.जे. भोळे, सुनील चव्हाण आदीची उपस्थिती होती. वृक्षारोपणानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

0000




 प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांनी

 ई-केवायसी पूर्ण करून घेण्याचे आवाहन 

 नांदेड (जिमाका) दि. 7 :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत चौदाव्या हप्त्याच्या वितरण नियोजनासाठी राज्यात गाव पातळीवर व सर्वत्र मोहीम राबवून ई-केवायसी  व बँक खाते आधार संलग्न  करण्याचे निर्देश आहेत. ई-केवायसी प्रमाणीकरण अभावी कोणताही  पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी सर्व प्रलंबित शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषि  सहाय्यकांचे मदतीने प्रलंबित ई-केवायसी प्रमाणीकरण  व आधार संलग्न काम करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.  

केंद्र शासनाने पीएम किसान पोर्टलवर फार्मर कॉर्नरमध्ये ओटीपी आधारे तसेच सामायिक सुविधा केंद्राद्वारे लाभार्थ्याची ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने विकसित केलेल्या पीएम किसान ॲप अँड्रॉइड मोबाईलवर फेस ऑथेंटीकेशनद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनाही केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वतःचे ई-केवायसी प्रमाणीकरण तसेच इतर 50 लाभार्थ्यांचे सुद्धा ई-केवायसी प्रमाणीकरण करता येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रीय अधिकारी, कृषी सहाय्यक, कर्मचाऱ्यामार्फत गाव पातळीवरील सर्व  प्रलंबित ई-केवायसी प्रमाणीकरण  व आधार संलग्न  करुन घ्यावे. कमी वेळ शिल्लक असल्याने शनिवार रविवार यादिवशी काम सुरू ठेवण्यात येणार आहे. ॲपच्या माध्यमातून तात्काळ प्रलंबित ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.  

00000     

 शेतकऱ्यांनी कपाशीच्या विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये

-         जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- कपाशीला जो बाजार भाव मिळतो तो वाण पाहून मिळत नसून धाग्याची लांबी पाहून मिळतो. त्यामूळे शेतकऱ्यांनी एका विशिष्ट वाणांचा आग्रह न धरता इतर उत्पादन वाढीचे सूत्र लक्षात घ्यावे. जसे की एकात्मिक कीड व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, कामगंध सापळे, सापळा पिके वापरणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कपाशीच्या विशिष्ट वाणाचा आग्रह धरु नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

 

नांदेड जिल्ह्यामध्ये मागील वर्षी 882000 कापुस सर्व वाणांचे बियाणे पाकिटांचा पुरवठा झाला होता. यावर्षी कापुस सर्व वाणांचे बियाणे पाकिटांचा मिळवून तेवढाच पुरवठा होणार आहे. कंपन्यांनी व विक्रेत्यांनी बियाणे विक्रीबाबत सविस्तर नियोजन करावे. तसेच याबाबतची माहिती लिखित स्वरूपात कृषी विभाग व कृषि विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक आहे. काही ठराविक वाणांची मागणी शेतकऱ्यांकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या शेतकऱ्यांना कापुस उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. जसे उत्पादन वाढीच्या ज्या काही बाबी आहेत, त्यामध्ये एकात्मिक कीड व खत व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे. याबाबत शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही होणार नाही यांची काळजी घ्यावी, असेही कृषी विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

 

शेतकऱ्यांनी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या 35 ते 40 व्या दिवशी एकरी चार कामगंध सापळे वापरुन कमी खर्चात बोंड अळीचे नियंत्रण करणे शक्य आहे. एकाच वाणाला महत्व दिल्याचे निदर्शनास आले तर संपूर्ण साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल याची नोंद कापूस बियाणे उत्पादक कंपन्यानी घ्यावी.  शेतकऱ्यांना वाणाच्या निवडीसाठी जमिनीचा प्रकार, बागायत व कोरडवाहू क्षेत्र इत्यादी बाबत योग्य मार्गदर्शन व्हावे असेही जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

00000

 उद्योग मंत्री उदय सामंत यांचा नांदेड दौरा

 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे दि. 8 जून 2023 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

गुरुवार 8 जून 2023 रोजी सकाळी मुंबई येथून विमानाने सकाळी 10 वा. श्री गुरु गोबिंदसिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन व पाहणी. सकाळी 10.30 वा. श्री. गुरु गोबिंदसिंगजी विमानतळ नांदेड आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड. सकाळी 11.30 वा. म.औ.वि.म.नांदेड जिल्हा औद्योगिक क्षेत्र तसेच जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी व ग्रामोद्योग विभाग आढावा बैठकीस उपस्थित. स्थळ – उद्योग भवन, औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर नांदेड. दुपारी 12.30 वा. नांदेड जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधी समवेत बैठकीस उपस्थिती. स्थळ- उद्योग भवन, औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर नांदेड, दुपारी 1.30 वा. पत्रकार परिषद, स्थळ- उद्योग भवन, औद्योगिक वसाहत, शिवाजीनगर नांदेड. दुपारी 2 ते 2.30 वा. राखीव. दुपारी 2.30 वा. पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा, स्थळ – शासकीय विश्रामगृह, नांदेड. दुपारी 3 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथून मोटारीने नांदेड विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. श्री गुरु गोबिंद सिंगजी विमानतळ, नांदेड येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...