Wednesday, May 10, 2023

आपली आवड ओळखून त्याला कष्टाची जोड आवश्यक- जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

 आपली आवड ओळखून त्याला कष्टाची जोड आवश्यक

-         जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

§   नांदेड येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती शिबिरात

   सहभागी हजारो युवकांना पोलीस अधिक्षकांचा गुरुमंत्र 

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- दहावी व बारावीची परीक्षा दिल्यानंतर करिअर घडविण्याची जबाबदारी ही पालकावर नाही तर विद्यार्थी म्हणून प्रत्येकावर येवून पडते. आपल्या उज्वल भवितव्यासाठी युवकांनी सर्वप्रथम स्वत:ला ओळखले पाहिजे. आपली आवड काय आहे याचा निर्णय स्वत: हाच घेतला पाहिजे. ज्यावेळेला ही प्रक्रीया प्रत्येक विद्यार्थी स्वत: हून पार पाडेल त्या दिवसापासून तुमचे भवितव्य अर्थात करिअर घडण्यास सुरुवात झाली हे आत्मविश्वासाने समजून घ्या, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी युवकांना केले.


 

आज नांदेड येथील भक्ती लॉन्स येथे भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, सहसंचालक सतिश सुर्यवंशी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी. गणवीर, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या सह आयुक्त रेणुका तम्मलवार यांची उपस्थिती होती.

 

आयुष्याचा मार्ग शोधताना कोणत्याही विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती असणे स्वाभाविक आहे. या द्विधा मनस्थितीतून मी ही गेलेलो आहे. बीएससीला घेतलेले ॲडमिशन रद्द करुन मी शेवटी बीकॉमपर्यत पोहोचलो. बीकॉम यासाठी की मला युपीएससीची तयारी करता यावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेवला. यासाठी क्लासेस लावले. पहिल्या टप्प्यात माझा अभ्यास न झाल्याने मी परीक्षा दिली नाही. घरचे नाराज झाले. माझ्या मित्राने मला स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिला. त्याच्या नोट्सवरुन माझा आत्मविश्वास वाढला. नंतरच्या परीक्षेत मी इतरापेक्षा अधिक मार्क मिळवून घवघवीत यश संपादन केले.


 

माझे मी ध्येय निश्चित केल्यानंतर कुणाकडेच पाहिले नाही. राहणीमान व भौतिक सुविधा याला शुन्य महत्व देवून अभ्यासाला प्राधान्य दिल्यामुळे  मी या पदापर्यंत पोहोचू शकलो अशी अनुभवाची शिदोरी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी विद्यार्थ्यांना दिली. पॅशन, डेडीकेशन, डिव्होशन, डिस्परेशन याबाबी आपल्या यशाची गुरुकिल्ली आहेत हे युवकांनी विसरता कामा नये हे त्यांनी स्पष्ट केले.


 

18 वर्षापासून 25 वर्षापर्यंत जे अपार कष्ट घेतात, मेहनत करतात त्याची पुढची 50 वर्षे ही राजासारखी असतात या शब्दात मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी युवकांना यशाचे महत्व पटवून दिले. आयुष्यातील हा तुमचा अत्यंत महत्वाचा काळ आहे. शिक्षणासमवेत आपल्या भोवताली असलेल्या स्वयंरोजगाराच्या संधी तपासून घेतल्या पाहिजे. मोबाईलच्या आहारी न जाता त्या वेळेचा सदउपयोग आपल्या करियरच्या दृष्टीने इतर वाचनामध्ये विद्यार्थ्यांनी द्यावा असे ते म्हणाले. उद्घाटनाच्या पहिल्या सत्रानंतर अनेक मान्यवरांची यावेळी समयोचित भाषणे झाली.

0000   

एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 एमएच-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- एमएच-सीईटी परीक्षा-2023  ही 21 मे 2023 पर्यत (15 मे वगळून) दोन सत्रात जिल्ह्यात 7 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे.  परीक्षा केंद्राच्या परिसरात बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होऊ नये व परीक्षा स्वच्छ सुसंगत पार पाडण्याच्यादृष्टिने या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले आहेत. 

 

या परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात 21 मेपर्यंत (15 मे 2023 वगळून) सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करता  येणार नाही. परीक्षा कालावधीत या परीसरात 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.  

00000

 

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या अनुदान, बिजभांडवल योजनेसाठी कर्जप्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

 संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या अनुदान,

बिजभांडवल योजनेसाठी कर्जप्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 10:- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. नांदेड जिल्हा कार्यालयास सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजनेअंतर्गत 20 लाभार्थी व बीज भांडवल योजनेअंतर्गत 16 लाभार्थ्यांचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचा कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यात अर्ज 8 जून 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत (सकाळी 9.30 ते सायं 6.15 वाजेपर्यंत) जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर, कामठा रोड, नांदेड येथे स्विकारले जातील. 

 

या दोन योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. चांभार समाजात अंतर्भाव असणाऱ्या चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत पुढील ठिकाणी स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून दाखल करावीत. त्रयस्थ / मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. 

 

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे लागतील. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला, तहसीलदार यांच्याकडून घेतलेला अर्जदाराच्या कुटुंबाचा चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला. नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तीन प्रतीत जोडावे. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला. राशन कार्ड झेरॉक्स प्रती, आधार कार्ड / मतदान कार्ड / पॅन कार्डची झेरॉक्स प्रत, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नंबर आठ), लाईट बील, टॅक्स पावती, बिजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल, वाहनासाठी लायसन्स परवाना बॅच, व्यवसायाचे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला. अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्र याप्रमाणे कागदपत्रे स्वयंसांक्षाकित करुन घोषणापत्र देण्यात यावे. 

 

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, ढोर, मोची, होलार, समाजातील बेरोजगार युवक, युवतींना तसेच होतकरु गरजू अर्जदारांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अरुण राऊत यांनी केले आहे.

00000

परिवहन प्रवर्गासाठी 15 मे पासून नवीन मालिका सुरु

 परिवहन प्रवर्गासाठी 15 मे पासून नवीन मालिका सुरु

नांदेड (जिमाका) दि. 10 :- परिवहन प्रवर्ग (एचजीव्ही, एलसीव्ही, बस इ) साठी एमएच 26-सीएच ही नविन मालिका सोमवार 15 मे 2023 पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर व ईमेल सह) अर्ज दि.15 मे रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येतील. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 16 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता कार्यालयात त्याची यादी प्रदर्शित करण्यात येईल व टेक्स्ट मॅसेजद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

Tuesday, May 9, 2023

 छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या

माध्यमातून भक्ती लॉन्स येथे समुपदेशन मेळाव्याचे आयोजन


नांदेड (जिमाका) दि. 8 :- छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यात बुधवार 10 मे रोजी भक्ती लॉन्स, मालेगाव रोड, तरोडा (खु) नांदेड येथे समुपदेशन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी https://mahacareer.globalsapio.com/  या गुगल फार्म लिंकवर नोंदणी करुन मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.बी.गणवीर यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे 5 हजार प्रशिक्षणार्थ्यांसाठी या समुपदेशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात दहावी, बारावीनंतरचे, महाविद्यालयीन शिक्षण व इतर अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रीया कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना, कर्ज योजना माहिती करिअर प्रदर्शन या विषयावर तज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. जास्तीत विद्यार्थी व प्रशिक्षणार्थ्यांनी या मेळाव्यास नोंदणी करुन सहभागी व्हावे, असेही संयोजक समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.

00000

 कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी

मतदारांना मतदान करण्यासाठी बुधवारी सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 9 :- भारत निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2023 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी बुधवार 10 मे 2023 रोजी मतदान होणार आहे. कर्नाटक राज्‍यातील जे मतदार महाराष्‍ट्र राज्‍यातील सीमा लगतच्‍या (सिंधुदुर्ग, कोल्हापुर, सांगली, सोलापुर, उस्‍मानाबाद, लातुर व नांदेड ) जिल्‍हयात कार्यरत आहेत. तथापि ज्यांची नावे कर्नाटक राज्‍यातील मतदार यादीमध्‍ये समाविष्‍ट आहेत, अशा मतदारांना मतदानाचा हक्‍क योग्‍य रितीने बजावता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी केवळ मतदानाच्या दिवशी अनुज्ञेय राहील, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 0000

 भविष्यातील आव्हाने व विकासाच्या संधीचा वेध घेणारा जिल्ह्याचा व्हिजन आराखडा होणार साकार

▪️विकासासमवेत स्वयंरोजगाराच्या संधी देणाऱ्या
क्षेत्रावर भर - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (जिमाका) दि. 9 :- देशाच्या क्रमवारीत महाराष्ट्राने विविध क्षेत्रात आपला अपूर्व ठसा उमटविलेला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची विविधता व संधी लक्षात घेऊन नांदेडचा वैशिष्ट्यपूर्ण असा व्हिजन आराखडा आपल्या अभ्यासपूर्ण अनुभवातून मांडा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. भविष्यातील विकासाच्या संधी, स्वयंरोजगारासाठी उपलब्ध होणारे मार्ग, यासाठी जिल्ह्याची असलेली बलस्थाने, संधी, धोके व आव्हाने लक्षात घेऊन 25 वर्षानंतरही परिपूर्ण ठरेल असा आराखडा तयार होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा विकास आराखडा बाबत डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील शिक्षण, कृषि, कृषिपूरक उद्योग, पर्यटन, वैद्यकियक्षेत्र, ऐतिहासिक वारसा, अध्यात्मिक शक्तीस्थळे, सिंचन, वने, आदिवासी क्षेत्र आदीबाबत भविष्यातील विविध संधी जाणून घेण्याच्यादृष्टिने या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
नांदेड जिल्ह्याला समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे. चालुक्यापासून इतिहासाच्या पाऊल खुणा इथे उपलब्ध आहेत. कृषिक्षेत्राने आपली जागतिक ओळख निर्माण केली आहे. नांदेड जिल्हातील जंगल, वनसंपदा, वन्यजीव, विविध धरणे, पुरातन मंदिरे, भक्कम शिल्पकला असलेली मंदिरे, शिक्षण, वैद्यकिय क्षेत्रात निर्माण झालेले क्लासेसचे जाळे हे सारे लक्षात घेता मोठ्याप्रमाणात स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. याचबरोबर कृषिक्षेत्रालाही अनुभव आणि तंत्रकुशल युवकांची गरज निर्माण झाली आहे. या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून भविष्यातील 25 वर्षानंतरच्या काळाला पुरून उरेल असा भव्य विकास आराखडा तयार करून आपण आतापासूनच कामा लागू यात, असा आशावाद जिल्हाधिकारी राऊत यांनी बोलून दाखविला.
000000



वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...