Tuesday, May 9, 2023

 भविष्यातील आव्हाने व विकासाच्या संधीचा वेध घेणारा जिल्ह्याचा व्हिजन आराखडा होणार साकार

▪️विकासासमवेत स्वयंरोजगाराच्या संधी देणाऱ्या
क्षेत्रावर भर - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (जिमाका) दि. 9 :- देशाच्या क्रमवारीत महाराष्ट्राने विविध क्षेत्रात आपला अपूर्व ठसा उमटविलेला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची विविधता व संधी लक्षात घेऊन नांदेडचा वैशिष्ट्यपूर्ण असा व्हिजन आराखडा आपल्या अभ्यासपूर्ण अनुभवातून मांडा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. भविष्यातील विकासाच्या संधी, स्वयंरोजगारासाठी उपलब्ध होणारे मार्ग, यासाठी जिल्ह्याची असलेली बलस्थाने, संधी, धोके व आव्हाने लक्षात घेऊन 25 वर्षानंतरही परिपूर्ण ठरेल असा आराखडा तयार होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा विकास आराखडा बाबत डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यातील शिक्षण, कृषि, कृषिपूरक उद्योग, पर्यटन, वैद्यकियक्षेत्र, ऐतिहासिक वारसा, अध्यात्मिक शक्तीस्थळे, सिंचन, वने, आदिवासी क्षेत्र आदीबाबत भविष्यातील विविध संधी जाणून घेण्याच्यादृष्टिने या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
नांदेड जिल्ह्याला समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे. चालुक्यापासून इतिहासाच्या पाऊल खुणा इथे उपलब्ध आहेत. कृषिक्षेत्राने आपली जागतिक ओळख निर्माण केली आहे. नांदेड जिल्हातील जंगल, वनसंपदा, वन्यजीव, विविध धरणे, पुरातन मंदिरे, भक्कम शिल्पकला असलेली मंदिरे, शिक्षण, वैद्यकिय क्षेत्रात निर्माण झालेले क्लासेसचे जाळे हे सारे लक्षात घेता मोठ्याप्रमाणात स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. याचबरोबर कृषिक्षेत्रालाही अनुभव आणि तंत्रकुशल युवकांची गरज निर्माण झाली आहे. या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून भविष्यातील 25 वर्षानंतरच्या काळाला पुरून उरेल असा भव्य विकास आराखडा तयार करून आपण आतापासूनच कामा लागू यात, असा आशावाद जिल्हाधिकारी राऊत यांनी बोलून दाखविला.
000000



No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...