Thursday, December 15, 2022

काळेश्वर येथील जलक्रीडा सुविधेचे प्रस्ताव

तांत्रिक मान्यतेसाठी सादर करा

-  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

विष्णुपुरी जलाशय परिसरात विकसित होणाऱ्या

पर्यटन केंद्र व साहसी जलक्रीडा योजनेचा आढावा  

 

नांदेड, (जिमाका) दि. 15 :- नांदेड येथील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने विष्णुपुरी जलाशयात पर्यटन व साहसी व जलक्रीडा सुविधा अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. नांदेड येथील श्री तख्त सचखंड हुजूर साहिब गुरूद्वाराच्या माध्यमातून व जिल्ह्यातील माहूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या निमित्ताने भाविक-पर्यटकांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील या शक्तीस्थळासमवेत विष्णुपुरी जलाशयातील साहसी जलक्रीडा सुविधा कामांचे तांत्रिक प्रस्ताव संबंधित यंत्रणेने त्वरीत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

 

त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंडले, नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) चे  कार्यकारी अभियंता आशिष चौगले व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

या बैठकीत जलक्रीडा व्यवस्थापन समितीस लागणारी नाहरकत प्रमाणपत्र, तांत्रिक मान्यता, पाण्याची पातळी, सुरक्षितता याबाबत चर्चा करण्यात आली. विष्णुपुरी धरणात आजुबाजुच्या परिसराच्या पुनर्विकासासह बोटिंग क्लब आणि ॲडव्हेंचर पार्कचे प्रस्तावित बांधकाम, मल्टी ॲडव्हेंचर टॉवर आणि जायंट स्विंग स्थापित करणे, झिप लाइन, रोप कोर्स आणि मुलांच्या खेळाची उपकरणे, बोट क्लबसाठी विविध प्रकारच्या बोटी उपलब्ध करुन देणे आदी कामांचा यात समावेश आहे. यातील बोट क्लबसाठी विविध प्रकारच्या ज्या बोटी लागणार आहेत त्याची तांत्रिक मान्यता महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाकडून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले.

00000 

सुधारित वृत्त

गुंठेवारी संचिका व कागदपत्र इतर  संबंधित विभागात सुरक्षित 

 

नांदेड, (जिमाका) दि. 15 :- येथील जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवनमध्‍ये असलेल्‍या ग्रामीण गुंठेवारी कक्षास 15 डिसेंबर 2022 रोजी रात्री 12.10 वाजेच्‍या दरम्‍यान अचानक आग लागली. मनपाच्या अग्निशमन दलाने ही आग विझवली आहे. या घटनेत गुंठेवारी विभागात असलेल्‍या गुंठेवारीच्‍या संचिका तसेच निवडणुकीचे जुने नमुने असलेले रेकॉर्ड हे 5 ते 10 टक्‍के अंशत: जळाले आहे. गुंठेवारीच्‍या प्रकरणांमध्‍ये नगररचना कार्यालयाचा अभिप्राय घेण्‍यात येतो. नगररचना विभागाचे हे अभिप्राय व प्रमाणित नकाशाच्‍या मुळ प्रती नगररचना कार्यालयात उपलब्‍ध आहेत. त्‍यामुळे अंशत:  जळालेल्‍या  गुंठेवारीच्‍या संचिकेची पुर्नरबांधणी होऊ शकते. त्‍यामुळे जनतेने घाबरु नये असे, आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील गुंठेवारी कक्षाचे प्राधिकृत अधिकारी  यांनी केले आहे.

00000

लेख

 दृष्टी आणि श्रवणापलीकडची अनूभुती !

 

संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील तब्बल 75 पेक्षा अधिक शाळेतील मुले मोठ्या कुतहलाने, आत्मविश्वासाने नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहात जमले आहेत. या मुलात काही सहा वर्षाचे आहेत, काही सात, काही दहा तर काही पंधरा वर्षाचे आहेत. या मुलांपेक्षा त्यांच्या आई-वडिलांसाठी हा परिक्षेचा क्षण असल्यागत तेही मोठ्या उत्साहाने इथे दाखल झाले आहेत. हॉलच्या बाहेर काही मुले तयार होत आहेत. कोणी राम होत आहे तर कोणी लक्ष्मण तर कुठे वानरसेना शेपटी लावून तयार होत आहे.

 

हॉलमधील मुले एकमेकाच्या आधाराने आपले सादरीकरण करून बाहेर येत आहेत. यातील काही मुलांच्या चेहऱ्यांवर नवी धडकन जागविल्याचे भाव आहेत, तर काही मुलांच्या चेहऱ्यावर गाण्यातील बोलाप्रमाणे झाडाची सावली मिळाल्याचा आनंद आहे. बाहेर एका कोपऱ्यात ज्यांना ऐकू आणि बोलता येत नाही, अशा मुली संपूर्ण साजश्रृंगारासह तयार होऊन एकमेकीच्या चेहऱ्यांवरचा आत्मविश्वास टिपून घेत आहेत. त्यांना खूप काही बोलायचे आहे. ऐकीचे हात विजेच्या गतीने वर होऊन बोटांच्या खुणातील परीभाषा झरझर बोलते करीत आहे. कोणाला फोटो काढून घ्यायचे आहेत. या साऱ्या मुलांच्या भावभावनाला तोलत शिक्षक या मुलांना सांस्कृतिक स्पर्धेसाठी विश्वासाने स्टेजकडे घेऊन जात आहेत.

 

एखादा शासकीय उपक्रमाला भावभावनांचे किती किनार असू शकतात याची प्रचिती कोरोना नंतरच्या तीन वर्षाच्या खंडानंतर अधिकारी आणि कर्मचारी समजून घेत आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षे व जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्याने जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांची स्पर्धा सर्वांनाच खूप काही शिकवून जात आहे. किनवट तालुक्यातील बोधडी येथील अंध विद्यालयातील मुलांनी वंदे मातरम गिताने राजेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभारंभ केला.   

 

समूह नृत्यामध्ये मुलांनी गितातील बोलानुसार ज्या स्टेप्स दिल्या आहेत त्यानुसारच वेळेवर सादर करणे साध्या मुलांसाठी खूप आव्हानात्मक अशी गोष्ट आहे. इथे तर क्षणाक्षणाला असंख्य बाबी विसरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून गितातील शब्दानुसार हावभाव करून घ्यायचे आहेत. काही दृष्टीहीन मुले स्टेजवर आल्यावर आपले डोळे किलकिले करून मनातल्या मनात स्टेजवरील हॅलोजनचा स्पॉट लाईट उजळल्याचा भास करून घेत आहे. यातील काही मुलांना प्रेक्षक डाव्या बाजुला बसलेले आहेत असा भास झाल्यामुळे की काय त्याची मान सतत डाव्या बाजुला जात आहे.

 

जन्मापासूनच काही मुलांच्या डोळ्यावर लख्ख अंधाराचीच साथ दिली आहे. यातील काही मुलांना बोलते केल्यास तो आपल्या डोळ्यात उजळलेल्या लाखो किरणांची गोष्ट माहित आहे याची शाश्वती देत आहेत. ईश्वराने एक बाजु स्वत:कडे ठेवून एकच बाजु दिल्याबद्दल त्यांच्या मनात कोणती तक्रार नाही. एकमेकांना वाटेल तेवढे प्रेम व धैर्य देण्याची कसब त्यांनी अंगी बांधली आहे. या मुलांच्या मनातील ही ताकद पाहून शिक्षक आज पालकांच्याही कित्येक पलिकडे असलेल्या भुमिकेत स्वत:ला घेऊन गेले आहेत. आपल्या मुलांचे नृत्य चांगले व्हावे यासाठी स्टेजच्या समोर जिथून प्रकाश व ध्वनीची व्यवस्था झाली आहे त्या जागेवर उभे राहून स्वत: गिताच्या बोलाप्रमाणे फेर घेऊन तोही बेफाम नाचत आहेत. ज्यांना हात नाहीत त्यांचेही हात वर झाल्याचा भास हे पाहतांना होत आहे.    

 

या दोन दिवसीय या महोत्सवात पहिला दिवस हा क्रीडासाठी आणि दुसरा दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अशी विभागणी व्यवस्थापन मंडळाने केली आहे. कालच्या क्रीडा स्पर्धांना दिव्यांगानी भरभरुन प्रतिसाद दिला. ज्यांना चालता येत नाही त्यांना धावण्याचे बळ या स्पर्धांच्या माध्यमातून घेता आले. आजच्या सांस्कृतिक, समूहगान, सामूहिक नृत्य आदी स्पर्धांनीही जिल्ह्यातील या दिव्यांग शाळेच्या विद्यार्थ्यांना नवी संधी मिळाली. सर्वांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेत ज्यांना आजवर संधी मिळाली नाही त्यांच्या दारापर्यंत संधी उपलब्ध करून देणे हा उद्देश सामाजिक न्याय विभागाच्या या स्पर्धेतून सफल झाला नसेल तर नवलच.

 

विनोद रापतवार,

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

000000

Wednesday, December 14, 2022

 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्क दिवस 

नांदेड, (जिमाका) दि. 14 :-  महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाकडून 18 डिसेंबर  हा दिवस “अल्पसंख्यांक हक्क दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाची माहिती सर्व नागरिकांपर्यत पोहचावी या उद्देशाने 18 डिसेंबर 2022 रोजी अल्पसंख्याक दिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. 

 

अल्पसंचयाक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशिर हक्कांची जाणीव /माहिती होण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयामध्ये अशासकीय संस्थाच्या मदतीने सामाजिक कार्यकर्तेस्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्यासाठी विविध कार्यक्रमा आयोजित करण्यात यावेत.  महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामार्फत अल्पसंख्याकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांना मेळावेचर्चासत्रे इत्यादीद्वारे प्रसिद्धी करावी. जिल्ह्यात हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्यात यावा  असे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्देशीत करण्यात आले आहे.

0000

 दिव्यांग विद्यार्थ्यांचे कर्तृत्व सामान्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी

-         जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे 

नांदेड, (जिमाका) दि. 14 :-  शैक्षणिक असो की क्रीडा  सर्वच क्षेत्रात दिव्यांग विद्यार्थ्याचे कर्तृत्व सामान्य शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे, प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,  मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव, समता पर्व व जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

समाज कल्याण विभागाच्यावतीने आज  वजिराबाद पोलीस परेड ग्राउंड येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा आयोजित या कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव दलजित कौर जज, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, अधीक्षक अशोक पंडित, लेखाधिकारी सय्यद मिनाज, वैसाका संजय गोडगोडवार, निरीक्षक कैलास मोरे, महेश दवणे, मुख्याध्यापक नितीन निर्मल, यादव साळुंके आदींची उपस्थिती होती. 

दिव्यांग विद्यार्थ्याचे पथसंचलन, त्यांची ऊर्जा व कामगिरी ही प्रेरणादायी आहे. दिव्यांग विद्यार्थ्याचे शिस्त, लय, ताल, सूर प्रशंसनीय होते. दिव्यांग विद्यार्थ्यांचे त्यांच्या शिक्षकांची प्रेरणा जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे सांगून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

दिव्यांग विद्यार्थी सामान्य विद्यार्थ्यासारखी कामगिरी करू शकतो. त्यांच्यातील लपलेल्या सुप्तगुणांना वाव देण्याची गरज असते. दिव्यांग इतरांसारखाच विकास प्रक्रियेतील प्रमुख भागीदार आहेत. दिव्यांगांना लागणाऱ्या कायदेशीर मदतीसह अन्य मदतीसाठी आपण तत्पर असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजित कौर जज यांनी सांगितले.

प्रास्ताविकात जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्याचा आढावा घेतला. विशेष शिक्षकांच्या परिश्रमातून भविष्यात हे विद्यार्थी जिल्हाच नव्हेच तर राज्य, राष्ट्रीय पातळीवर यशस्वी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी क्रीडाज्योत प्रज्वलित करत क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला. या सोहळ्याचे सूत्रसंचलन मुरलीधर गोडबोले यांनी केले. जिल्हाभरातील शाळेतील खेळाडू व त्यांच्या समवेत आलेल्या  शिक्षकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

00000




 मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 14 :- राज्यात मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना राबविण्याबाबत 29 जून 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळयाचा अर्ज पुढील तपशिलाप्रमाणे करावा. या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालय नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
लाभार्थी पात्रता
अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रीकदृष्टया योग्य असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांनी यापुर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकासाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
लाभार्थी निवड
मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडती नुसार लाभ देण्यात येईल.
अर्ज सादर करण्याची पध्दत
महा-डीबीटी पोर्टलचे http://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा. शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील.
शेततळयासाठी आकारमान
मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळयासाठी कमाल मर्यादा रुपये 75 हजार रुपये रकमेच्या मर्यादेत अनुदान देय राहील.
शेततळयाच्या आकारमानानुसार देय होणारी अनुदानाचा रक्कम निश्चीत करण्यात आली आहे. तथापि देय अनुदानाची कमाल रक्कम 75 हजार रुपये इतकी राहील. रक्कम 75 हजार रुपये पेक्षा जास्त खर्च झाल्यास सदर अतिरिक्त खर्च संबधित लाभार्थ्याने स्वत: करणे अनिवार्य राहील, असेही प्रसिध्दी पत्रकाद्वारे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
0000

 आधारभूत किंमत खरेदी योजनेत नोंदणी

करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

 नांदेड (जिमाका) दि. 14 :-आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी धान/भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी बिलोली (कासराळी) येथील केंद्रावर सुरू आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी गुरुवार 15 डिसेंबर 2022  पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

 नोंदणीसाठी चालू हंगामातील पीकपेरा, ऑनलाईन नोंद असलेला सातबारा, बँक खात्याची साक्षांकीत प्रत, आधार कार्ड व शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रासह शेतकऱ्यांनी स्वत: हजर राहून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी दरम्यान लाईव्ह फोटो अपलोड करावयाचा आहे.

00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...