Tuesday, November 1, 2022

 महाराष्ट्र गट क संयुक्त (पुर्व) परीक्षा केंद्र

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- महाराष्ट्र गट क संयुक्त (पूर्व) परीक्षा-2022 परीक्षा शनिवार 5 नोव्हेंबर 2022 रोजी नांदेड जिल्ह्यातील 31 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी अभिजित राऊत यांनी कळवले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील विविध 31 विद्यालय, महाविद्यालयातील केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत परीक्षा होणार असून त्यासाठी 8 हजार 426 प्रवेशपात्र उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.

00000

 प्रादेशिक परिवहन विभागातर्फे स्कुलबस तपासणी विशेष मोहिम 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने बुधवार 9 नोव्हेंबर 2022 पासून स्कुलबस तपासणी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. सर्व स्कूलबस धारकांनी वाहनासंबंधिचे सर्व वैध कागदपत्रे वाहनासोबत ठेवावीत. वाहने तांत्रिक दृष्टया दोषमुक्त व सुस्थितीत ठेवावी. ज्या वाहनंचे कागदपत्र वैध नसल्यास त्यांनी सर्व कागदपत्रे वैध करून घ्यावीत. या मोहिमेत तपासणी दरम्यान दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. स्कुल बसमध्ये वाहतूक करतांना विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची स्कुलबस चालक, मालक यांनी दक्षता घ्यावी. या गैरसोईबाबत संबंधित स्कुलबस चालक, मालक व शाळेच्या मुख्याध्यापक यांची जबाबदारी राहील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

 आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण  

नांदेड (जिमाका) दि. 1 :- आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या  प्रशिक्षण केंद्रात 1 डिसेंबर 2022 पासून विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यांसाठी विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेण्यात येते. पात्र इच्छुक आदिवासी (अनुसूचित जमातीचे) उमेदवारांनी रविवार 27 नोव्हेंबर 2022 पर्यंत शैक्षणीक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट यांनी केले आहे. 

 

आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण केंद्रात 1 डिसेंबर 2022 पासून सुरू होणाऱ्या 104 च्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी 27 नोव्हेंबर 2022 तत्पुर्वी या कार्यालयास पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसूचीत जमातीचे ) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी या पत्त्यावर आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, पेटकुले नगर, गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड संपर्क दुरध्वनी क्रमांक 02469-221801/ 9881524643 / 7620304096 संपर्क करावा, असेही कळविले आहे. 

 

या प्रवेशाच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवार अनुसूचित जमाती पैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीत कमी शालांत परीक्षा उतीर्ण असावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: रहाण्याची व जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महीने 15 दिवस असून शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदवीधारकांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा - उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2022 रोजी 18 वर्ष पुर्ण असावे व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन संबंधित प्रशिक्षणार्थीचे बँक खात्यामध्ये दरमहा जमा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थींचे बँक खाते चालू असणे आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा सदर प्रशिक्षण सत्र अर्ध्यातुन सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 शासकीय तंत्रनिकेतन येथे वाचन कट्टा उपक्रमाची सुरुवात 

नांदेड (जिमाका) दि. 1 :-  शासकीय तंत्रनिकेतन येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून नुकताच साजरा करण्यात आला. या दिवशी संस्थेमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले. केवळ एक दिवस वाचन करून भागणार नाही. विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी यांना कायमस्वरूपी वाचनाची आवड लागावी. या उद्देशाने संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांच्या मार्गदर्शनाने "वाचन कट्टा" हा वाचकमंच शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरू करण्यात आला आहे.

चला वाचूया स्वतःला घडू असे या वाचन कट्टा उपक्रमाचे ब्रीदवाक्य आहे. या अंतर्गत दर महिन्यातील चौथ्या शुक्रवारी 'मी वाचलेले साहित्य' या विषायास अनुसरून एखादा उतारा, कविता, ललित, जीवनचरित्राचा भाग इत्यादी उपस्थितांसमोर वाचून आपला वाचनानंद इतरांपर्यंत पोहोचवावा हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमात पहिल्या कार्यक्रमात दिवाळीच्या सुट्ट्या असतानाही विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉ. डी.जी कोल्हटकर यांनी प्रसिद्ध निसर्ग कवी ना.धों महानोर यांचा जीवनपट सांगतानाच त्यांच्या दोन कविता यावेळी सादर केल्या.

पायल जाधव, देशपांडे संस्कृती या विद्यार्थिनींनी आपली साहित्यकृती यावेळी सादर केली. ए. एन. यादव यांनी वार्ध्यक्य काळात कुढत जगण्यापेक्षा हसत जगण्या संदर्भातली एक अनामिक कवीच्या कवितेला उपस्थितांनी दाद दिली. कार्यक्रमाच्या समन्वयिका डॉ. अनघा जोशी यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा. आर एम सकळकळे, विभाग प्रमुख यंत्र विभाग यांनी सर्व सहभागी प्राध्यापक व विद्यार्थी यांचे कौतुक व अभिनंदन केले. प्रभारी प्राचार्य पी. डी. पोफळे यांनी वाचन कट्ट्याच्या या उपक्रमास शुभेच्छा देताना कुठल्याही औपचारिकते शिवाय हा कार्यक्रम व्हावा अशा सदिच्छा व्यक्त केल्या. ए एन यादव यांनी आभार प्रदर्शन केले.

0000

Monday, October 31, 2022

रस्ते अपघाताला रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईची आवश्यकता - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 

रस्ते अपघाताला रोखण्यासाठी कठोर

कायदेशीर कारवाईची आवश्यकता

-         जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 

§  जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत अपघात स्थळांचा आढावा

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  नांदेड जिल्ह्यातून जात असलेल्या महामार्ग निर्मितीच्या कामामुळे वाहतूकीत निर्माण झालेले अडथळे, वाहन चालकाकडून न पाळले जाणारे नियम, अपघात प्रवण स्थळांबाबत  अपुरी असलेली सांकेतिक सुविधा आदी कारणाने अपघाताचे प्रमाण गंभीर होत चालले आहेत. याला आळा घालण्याच्या उद्देशाने आहे त्या स्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, वाहतुक पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागाने परस्पर समन्वयातून आप-आपल्या जबाबदाऱ्या व कायदेशीर बाबीचे कठोर पालन करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.  


 

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहीत तोंडले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर,  राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


 

वाहन चालविताना फोनवर बोलणे कायद्याने गुन्हा आहे. यात होणाऱ्या अपघातात जीवीत हानीचे प्रमाणही  वाढत आहे. वाहन चालकांना यांची माहिती असूनही जर ते फोनवर बोलत वाहने चालवित असतील तर अशा चालकांविरुध्द कठोर कायदेशिर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी वाहतूक पोलीसांना दिले. यासाठी 250 ए कलमानुसार दंडही संबंधिताना लावला पाहिजे. रस्त्यात होणाऱ्या अपघाताला जखमीना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागते. अशा दुताची संख्या वाढावी व लोकांच्या मनात याबाबत जर काही गैरसमजुती असतील तर त्या पोलीस व आरोग्य विभागानी दूर केल्या पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.


 

नांदेड मधील विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षात घेता शाळा, महाविद्यालयामध्ये रस्ते सुरक्षिततेवर भर द्यावा लागेल. या जागृतीतून रस्त्यावर जबाबदार वाहतूक होवून अपघाताचे प्रमाण कमी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या बैठकीत चाकूर ते लोहा, लोहा ते वारंगा, वारंगा ते महागाव, अर्धापूर ते हिमायतनगर व जिल्हा अंतर्गत मार्गावरील ब्लाक स्पॉट अर्थात अती धोक्याच्या अपघात स्थळांची माहिती घेवून त्याठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.

0000

 

 

 

रदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते एकता दौडचा शुभारंभ

 

सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी

 

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते एकता दौडचा शुभारंभ

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध उपक्रम घेण्यात आले. जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एकता रॅलीचा शुभारंभ खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.


 

यावेळी महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी,  अप्पर पोलीस  अधिक्षक निलेश मोरे, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियाळे, अनुराधा ढालकरी, संतोषी देवकुळे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिका रेखा काळम-पाटील, प्रविण साले आदींची उपस्थिती होती.

 



जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरु झालेली रॅली जुना मोंढयातील टॉवर येथील सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या  पुतळयापर्यत आयोजित करण्यात आली होती.  रॅलीच्या निमित्ताने महात्मा गांधी यांच्या पुतळयास आणि सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उपस्थितांना भ्रष्टाचार निर्मुलन व राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.  मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जीवन कार्याची माहिती देणाऱ्या प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आले. याचबरोबर  सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जीवनावर आधारित चित्रफितीचे अवलोकन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रलोभ कुलकर्णी यांनी मानले.


0000

 

 

 

जिल्ह्यातील 2427 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा 4 लाख 15 हजार 636 पशुधनाचे लसीकरण

 

जिल्ह्यातील 2427 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

4 लाख 15 हजार 636 पशुधनाचे लसीकरण

 नांदेड (जिमाका) दि. 31 :- गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 872 बाधित गावात 2 हजार 427 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे.

आतापर्यत 110 पशुधन मृत्यूमुखी पडले असून आजारातून बरे झालेले पशुधनाची संख्या 1 हजार 471 आहे. औषधोपचार चालू असलेले पशुधन 846 आहे. सद्यस्थितीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 15 हजार 636 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 31 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

0000

 

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...