Friday, July 8, 2022

 नांदेड जिल्ह्यात 9 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  270 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, नांदेड ग्रामीण 1, बिलोली 1, मुखेड 2  व ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1 असे एकूण 9 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 949 एवढी झाली असून यातील 1 लाख 226 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 31 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 7 व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 4 असे एकूण 11 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 9, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 21, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1 असे एकुण 31 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 9 हजार 603

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 89 हजार 314

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 949

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 226

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.35 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-31

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 

0000

 जिल्हाधिकारी कार्यालयात पेन्शन अदालत  

नांदेड (जिमाका) दि. 8  :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 12 जुलै 2022  रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.    

 

जिल्ह्यामधील महसूल विभागातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी 12 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 जिल्हा कारागृहातील बंदीजणांसाठी

विशेष तपासणी शिबिर  

 

·  33 महिला बंदीजणांची झाली तपासणी

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्हा कारागृहात असलेल्या बंदीजणांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासह कुणाला जर गंभीर आजार असेल तर त्याचे लवकर निदान करता यावे या उद्देशाने आज जिल्हा कारागृहात विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.आय. भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरासाठी नेमण्यात आलेल्या पथकाकडून एनसीडी वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत उच्चरक्तदाब, मधुमेह, एचआयव्ही इत्यादीची तपासणी करण्यात आली. या शिबिरात उच्चरक्तदाब व मधुमेहाचे निदान झालेल्या बंदीजणांवर त्वरीत औषधोपचार सुरु करण्यात आले.

 

संपूर्ण कैद्यांची  जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकामार्फत नियमित तपासणी केली जाते. याचबरोबर दररोज वैद्यकीय अधिकारी कैद्यांच्या आरोग्यासाठी उपलब्ध असतात. कोरोनाच्या विविध मर्यादानंतर आता एकत्रित आरोग्य तपासणी शिबिर सुरु करण्यात येत असल्याची माहिती कारागृह अधिक्षक एस.एम. सोनवणे यांनी दिली.

 

या आरोग्य शिबिरात एनसीडी वैद्यकीय अधिकारी डॉ. विखारुनिसा खान, भूलतज्ञ डॉ. सोनाली जाधव, समुपदेशक सुवर्णकार सदाशिव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संतोष बेटकर, अधिपरिचारिका प्रियंका झगडे, एसटीडी समुपदेशक उषा वानखेडे यांनी बंदीजणांची आरोग्य तपासणी केली. यावेळी तुरुंगाधिकारी तुकमे, औषध निर्माण अधिकारी आर. के. देवकत्ते, महिला रक्षक टेकुळे व ताई बिनवडे यांनी सहकार्य केले.

0000



 पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

 

·  मेळाव्यात 191 उमेदवारांची प्राथमिक निवड

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व श्री हजुर साहिब औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री हजुर साहिब औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात 9 नामांकित कंपन्यानी सहभाग नोंदवला. या मेळाव्यात एकूण 310 उमेदवार उपस्थित होते. नऊ कंपन्यांनी उमेदवारांची मुलाखती घेऊन 191 विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड केली.

 

या मेळाव्यास श्री गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अधिक्षक श्री गुरुविंदरसिंग वाधवा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बिराजदार, भोकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री पाटणुरकर, गुरुद्दारा सचंखड बोर्डाचे सहायक अधीक्षक रवींद्रसिंग कपुर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती सुजाता पोहरे, सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार, प्राचार्य गुरबचन सिंग शिलेदार यांची उपस्थिती होती.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुविंदरसिंग वाधवा यांनी युवकांना स्वत:चे कौशल्य ओळखून जीवनातील समस्यांना कशाप्रकारे सामोरे गेले पाहिजे याविषयी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य बिराजदार यांनी विद्यार्थ्यांना कामाशिवाय या जगात कुणीही महत्व देत नाही या विषयावर मार्गदर्शन केले. श्री पाटणुरकर यांनी मराठवाडयातील मुलांची मानसिकता कशी असते व त्यांना या स्पर्धेच्या जगात स्वत:ला सिध्द केले पाहिजे असे सांगितले. सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या वेळी वर्तन कसे असावे याबाबत मार्गदर्शन करुन मार्गदर्शन केंद्रातील योजनांची माहिती दिली. श्रीमती सुजाता पोहरे यांनी विद्यार्थ्यांना आपले कर्तृत्व कसे सिध्द करावे याबाबत मार्गदर्शन केले.

00000







 आयटीआयमध्ये अल्पसंख्याक समाजातील

युवक-युवतींसाठी विविध ट्रेडसाठी राखीव जागा

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :-औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अल्पसंख्याक समाजासाठी विविध ट्रेडच्या राखीव जागा उपलब्ध आहेत. अल्पसंख्याक समाजातील युवक-युवतींनी या राखीव ट्रेडसाठी प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. बिरादार यांनी  केले आहे.

 

सन 2022 साठी आयटीआय प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 20 ट्रेडसाठी जवळपास 724 जागा  उपलब्ध आहेत. त्यापैकी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी काही जागा राखीव ट्रेडसाठी उपलब्ध आहेत. फक्त अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना यात प्रवेश घेता येईल. ड्रासमन सिव्हिल-24, फिटर-24, मेसन -24, ट्रॅक्टर मेकॅनिक -20, टुल ॲन्ड डायमेकर-24 या ट्रेडसाठी अल्पसंख्याक समाजातील युवक-युवतींनी ऑनलाईन प्रवेश अर्ज करावा, असेही आवाहन संस्थेचे प्राचार्य  यांनी केले आहे.

00000

औरंगाबाद येथे युवकांसाठी आर्मी भरतीचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- अग्नीपथ योजनेंतर्गत 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2022 या कालावधीत आर्मी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद परिसरात होणाऱ्या भरतीत जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कर्नल प्रविण कुमार एस यांनी केले आहे.

 

भरती बाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. उमेदवाराचे वय 1 ऑक्टोबर 2022 या तारखेस अनुसरुन निश्चित केले जाईल. यासाठी ऑनलाईन नोंदणी 1 ते 30 जुलै या कालावधीत www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर करणे आवश्यक आहे. अग्निवीर सामान्य कर्तव्य, यांत्रिकी, क्लार्क/स्टोअर किपर टेक्निकल, यांत्रिकी 10 वी उत्तीर्ण, अग्निवीर यांत्रिकी (सर्व शाखा) 8 वी उत्तीर्ण या पदासाठी अर्ज करता येतील. नोंदणी केलेल्या उमेदवारांना 7 ते 11 ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रवेशपत्र मिळतील. नांदेड, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, जालना, बुलढाणा आणि जळगाव या जिल्ह्यातील उमेदवार या भरतीत सहभाग घेवू शकतात. ही भरती प्रक्रिया पारदर्शक पार पाडण्यात येत आहे. उमेदवारांनी कुठल्याही आमिषाला व दलालांना बळी पडु नये, असे आवाहन आर्मी विभागाने केले आहे.

 

उमदेवारांची पात्रता याप्रमाणे आहे : अग्नीवीर सामान्य कर्तव्य सर्व शाखा या पदासाठी वयोमर्यादा 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्षे अशी आहे. उमेदवाराची उंची 168 सेंटीमिटर तर वजन 50 किलो आणि छाती 77/82 सेंटीमिटर असावी. उमेदवार इयत्ता दहावीत 45 टक्के गुण घेवून उत्तीर्ण झालेला असावा. वाहन चालविण्याचा परवाना असलेल्या प्राध्यान्य देण्यात येईल.

 

अग्निवीर तांत्रीक सर्व शाखा या पदासाठी वयोमर्यादा 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्ष अशी राहील. उमेदवाराची उंची 167 सेंटीमिटर तर वजन 50 किलो आणि छाती 76/81 सेंटीमिटर असावी. उमेदवार इयत्ता 10+2/ इंटरमिजिएट परिक्षा उत्तीर्ण असावा. विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयात किमान एकुण 50 टक्के गुण आणि प्रत्येक विषयात 40 टक्के गुण असावेत.

 

अग्निवीर क्लार्क/स्टोअर किपर तांत्रीक सर्व शाखा या पदासाठी वयोमर्यादा 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्ष अशी राहील. उमेदवाराची उंची 162 सेंटीमिटर तर वजन 50 किलो आणि छाती 77/82 सेंटीमिटर असावी. उमेदवार इयत्ता 10+2/ इंटरमिजिएट परीक्षा (कला, वाणिज्य, विज्ञान) यामध्ये 60 टक्के गुण असावेत. तसेच प्रत्येक विषयात 50 टक्के गुण आणि इंग्रजी व गणित, अकाऊंट, बुक किंपीग विषयात 50 टक्के गुण असावेत.

 

अग्निवीर यांत्रिकी (सर्व शाखा) 10 वी उत्तीर्ण आचारी, टेलर, ड्रेसर, व्यवस्थापक, स्वच्छक, मदतनीस आदी पदासाठी उमेदवाराचे वयोमर्यादा 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्ष अशी राहील. उमेदवाराची उंची 168 सेंटीमिटर तर वजन 48 किलो आणि छाती 76/81 सेंटीमिटर असावी. उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा.

 

अग्निवीर यांत्रिकी (सर्वशाखा) 8 वी उत्तीर्ण या हाऊस किपर आणि मेस किपर या पदासाठी उमेदवाराचे वयोमर्यादा 17 वर्ष 6 महिने ते 23 वर्ष अशी राहील. उमेदवाराची उंची 168 सेंटीमिटर तर वजन 48 किलो आणि छाती 76/81 सेंटीमिटर असावी. उमेदवार हा आठवी उत्तीर्ण असावा. अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

00000

 गावनिहाय सूक्ष्म कृती आराखड्यावर भर द्या

-   पालक सचिव एकनाथ डवले

 

·        आपत्ती व्यवस्थापन बैठकीत सुरक्षितता व नियोजनाचा आढावा  

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- इतर जिल्ह्याच्या तुलनेत नांदेड जिल्ह्यातील भौगोलिक रचना व जैवविविधता वेगळी आहे. गोदावरी, मांजरा, मन्याड, आसना, पेनगंगा व इतर लहान नदी-नाले यांची संख्या अधिक आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्जन्यमानाव्यतिरिक्त या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम नांदेड जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर होतो. स्वाभाविकच पाणी वाढल्यामुळे नदी शेजारच्या गावात पूर सदृष्य परिस्थिती निर्माण होते. याला अटकाव करणे आपल्या हातात जरी नसले तरी यात जीवीत अथवा इतर हानी होऊ नये यासाठी अधिक दक्षता व सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याच्या कृषि विभागाचे प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी केले.

 

नांदेड जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या आढावा बैठक आज जिल्हा नियोजन भवन येथे पालक सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. याबैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बी. के. शेटे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.​​

 

आपत्कालीन व्यवस्थापनासाठी इतर सुरक्षिततेच्यादृष्टिने ज्या सेवा-सुविधा आवश्यक असतात तेवढ्याच जिल्ह्यातील विविध सर्व  संबंधित अधिकाऱ्यांचे अचूक दूरध्वनी क्रमांक, प्रत्येक तालुका निहाय टिमची निवड व परस्पर समन्वय अत्यावश्यक असल्याचे डवले यांनी स्पष्ट केले. यंत्रणातील परिपूर्ण संपर्कासाठी सर्व तालुका प्रमुखांना त्यांनी निर्देश देऊन दक्ष राहण्याच्या सूचना केल्या. पाऊसाळ्यामध्ये केवळ नद्यांनाच पाणी वाढल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते असे नाही. असंख्य भागात लहान-मोठे तलाव जर योग्य स्थितीत नसतील तर त्याची फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य सर्व धोक्यांचा विचार करून त्याचे परिपूर्ण नियोजन हे अत्यंत आवश्यक बाब आहे. आरोग्या पासून ते सुरळीत वाहतुकी पर्यंत, योग्य वेळेला योग्‍य ठिकाणी संदेश पोहचवून त्या-त्या गावांमध्ये योग्य माहिती पोहचविणे यापासून सर्व गोष्टीचे बारकाईने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या. आढावा बैठकी नंतर नांदेड जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापनासाठी घेतलेल्या विविध उपक्रमांची प्रात्यक्षिकासह माहिती प्रधान सचिवांनी घेतली.

0000




वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...