Saturday, June 4, 2022

 भोकर येथील रेल्‍वे भुयारी पुलावरील

कामांमुळे वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- भोकर येथील रेल्‍वेच्या भुयारी पुलाच्या काम करण्‍यासाठी आंबेडकर चौक (भोकर) -प्रफुल्‍ल नगर (मुदखेड रोड) दरम्‍यानचा रेल्‍वे गेट नं. 3 मधुन जाणारा रस्‍ता सर्व प्रकारच्‍या वाहतूकीस प्रतिबंधीत केला आहे. यासाठी पर्यायी मार्ग (जाण्या-येण्यासाठी) आंबेडकर चौक (भोकर)- प्रफुल्‍लनगर (मुदखेड रोड) दरम्‍यानच्‍या नव्‍याने तयार झालेल्‍या उड्डान पुलावरुन वळविण्यात आला आहे.

 

मोटार वाहन  कायदा 1988  चे कलम 115 मधील  तरतुदीनुसार जिल्‍हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी  दिनांक 4  ते 13 जून 2022 या कालावधी पर्यंत वर नमुद केलेल्‍या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्‍यास मान्‍यता दिली आहे. संबधीत विभागाने पुढील उपाययोजना कराव्यात. पोलीस निरीक्षक भोकर यांनी कायदा व  सुव्‍यवस्‍थेच्‍या अनुषंगाने आवश्‍यक ती उपाययोजना करावी. उपमुख्‍य  अभियंता, दक्षिण मध्‍य रेल्‍वे नांदेड यांनी रस्‍ता वाहतूक प्रतिबंध व पर्यायी रस्‍त्‍यासाठी आवश्‍यक असलेले बोर्ड चिन्‍ह लावणे इत्‍यादी बाबतची कार्यवाही करावी, असे अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.

000000

 जेंव्हा गोलंदाज फलंदाज व यष्टिरक्षकाला विचारून चेंडू टाकतो !

 

श्री गुरूगोबिंद सिंघजी स्टेडियम येथे विभागीय अंधांच्या क्रिकेट स्पर्धांना प्रारंभ

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- येथील श्री गुरूगोबिंद सिंघजी स्टेडियमला अपरिचित नसणारी पाऊले आज पडली आहेत. प्रत्येक स्पर्धक हा टिमच्यापलीकडे जाऊन विचार करीत प्रतीस्पर्धी संघातील खेळाडुंच्या हाता-हात घालून मैदानाचा अंदाज घेत आहेत. प्रत्येक पाऊले त्यांचे जमिनीत कुठे चढउतार आहेत का याचा अंदाज घेत आहेत. मैदानाचा संपूर्ण आवाका लक्षात घेऊन आता ते आप-आपल्या संघाच्या लाइनमध्ये शिस्तीत उभे झाले आहेत. बॉलमधील छऱ्यांचा आवाज त्यांना खुणावतो आहे. हे सारे खेळाडू अंध आहेत याची उद्घाटनासाठी आलेल्या अपरिचितांना त्यांच्या जवळ गेल्याशिवाय जराशीही कल्पनाही बांधता येत नाही.

 

अशा खेळाडुंच्या माध्यमातून कोणालाही प्रेरणा व आत्मविश्वास देणाऱ्या मराठवाडा विभागीय पातळीवरील अंध क्रिकेट स्पर्धेचे आज येथील श्री गुरूगोबिंद सिंघजी स्टेडियम येथे शुभारंभ झाला. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून मनपाचे उपायुक्त कदम, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण संगेवार, क्रिकेट प्रशिक्षक राजू किवळेकर, नांदेड जिल्ह्याचे भूमिपूत्र अंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करणारा अंध क्रिकेटपटू दिलीप मुंडे, कोषाध्यक्ष दादाभाऊ कुटे, प्रशिक्षक मंगेश कामठेकर, सीएबीएमचे माजी अध्यक्ष रवी वाघ, गणेश काळे, डॉ. माधव गोरे, स्टेडियम व्यवस्थापक चवरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी एकुण 4 संघ सहभागी झाले आहेत.

 

आंतरराष्ट्रीय पातळीवर सन 2010 पर्यंत महाराष्ट्रातला एकही अंध क्रिकेटपटू पोहचवू शकला नाही. ही खंत मनात घेऊन क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंड ऑफ महाराष्ट्राने निर्धारपूर्वक यात उतरायचे ठरविले. आणि पहिल्याच वर्षी सन 2011 मध्ये नांदेड जिल्ह्यातील किनवटचा दिलीप मुंडे हा अंध खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचला. त्याच्या पाठोपाठ इतर खेळाडूंनी आपला आत्मविश्वास वाढवित ही संख्या 10 खेळाडूंवर नेऊन  पोहोचविली. नांदेड येथे आयोजित या स्पर्धेतूनही आता आणखी चांगल्या खेळाडूंची भर पडेल असा आत्मविश्वास क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंडचे माजी अध्यक्ष रवी वाघ यांनी व्यक्त केला. या स्पर्धेसाठी नांदेड वाघाळा महानगरपालिकेने क्रिडांगण मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे या स्पर्धा नांदेड येथे घेणे शक्य झाल्याची माहिती उपाध्यक्ष गणेश काळे यांनी सांगितले.

 

स्पर्धकांची बी-1 ते बी-3 असते वर्गवारी

आपल्या क्रिकेट स्पर्धे सारखेच अंधांच्या क्रिकेट स्पर्धाचे नियम असतात. फक्त फरक एवढाच असतो तो म्हणजे चेंडू जमिनीलाच टाकून फेकायचा. फलंदाजांना दृष्टि नसल्यामुळे त्यांना चेंडू नेमका कुठे आहे याचा अंदाज येण्यासाठी त्यात छर्रे टाकले जातात. प्रत्येक संघात 11 खेळाडू असतात. सर्व अंध. परंतू यात वर्गवारी केली गेली आहे. पूर्णत: दृष्टि नसणारे चार खेळाडू यांना बी-1 म्हटले जाते. तीन मीटर पर्यंत ज्यांना अंधूक दृष्टि आहे त्यांना बी-2 म्हटले जाते.  बी-2 वर्गवारीतील तीन खेळाडू असतात तर ज्यांना 6 मीटर पर्यंतच दृष्टि आहे असा खेळाडूंना बी-3 वर्गवारीत गणल्या जाते, असे 4 खेळाडू संघात असतात. बी-1 (पूर्णत: अंध) फलंदाजासाठी धावपटू दिले जातात. एकुण 14 खेळाडूंपैकी प्रत्यक्ष 11 खेळाडूंना खेळविले जाते.

00000












 6 जून रोजी नांदेड जिल्ह्यात "शिवस्वराज्य दिन" होणार साजरा

 

पालकमंत्री अशोक चव्हाण साधणार दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावर झाला होता. या महापुरुषांनी महाराष्ट्राला लोककल्याणकारी राज्याचा समृद्ध वारसा दिला. स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन म्हणून 6 जून हा दिवस कायम स्मरणात रहावा व या दिवसापासून प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रेरणा घेता यावी या उद्देशाने 6 जून हा शिवराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतला आहे. या निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये "शिवस्वराज्य दिन" येत्या सोमवारी साजरा केला जाणार आहे. यादृष्टिने नांदेड जिल्हा परिषदेतर्फे जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून पालकमंत्री अशोक चव्हाण यानिमित्ताने दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्वांशी संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी दिली.

 

सोमवार 6 जून रोजी जिल्हा परिषदेतर्फे शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन केले जाईल. यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येईल. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Friday, June 3, 2022

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष लेख

संकल्प करू या पर्यावरण रक्षणाचा !

संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे 1972 साली पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. यानुसार 1973 मध्ये 5 जून रोजी पहिल्यांदा पर्यावरण दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जागतिक तापमान वाढीची समस्या लक्षात घेत पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरु आहेत. पृथ्वीवरील नैसर्गिक वातावरणामुळे मानवी जीवन अस्तित्वात आहे. वातावरण आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. निर्सग आपल्याला श्वासोच्छवासासाठी हवेपासून खाण्या-पिण्यापर्यंत सर्व काही पुरवते आणि पृथ्वीवर राहण्यासाठी अनुकूल वातावरण देते. ही सर्व निसर्गाची देणगी आहे. निसर्ग आणि पर्यावरणामुळेच हे जग सुरळीतपणे सुरू आहे. निसर्ग आपल्याला जगण्यासाठी खूप काही देतो पण त्या बदल्यात मानवाने फक्त निसर्गाचे शोषण केले मानवाच्या या कृत्यामुळे निसर्गाची हानी होत असून, जीवसृष्टीचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.

 

अशा परिस्थितीत पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. ग्लोबल वार्मिंग, सागरी प्रदूषण आणि वाढती लोकसंख्या यांचा वाढता धोका नियंत्रित करणे हे एक आव्हान आहे. जेणेकरून पर्यावरणाचे संरक्षण करता येईल. यासाठी दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.या निमित्ताने आपण सर्व जण पर्यावरण संवर्धनासाठी पुढील संकल्प करू शकतो.


पर्यावरण दिनाचा पहिला संकल्प

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घरातून निर्माण होणारा कचरा योग्य ठिकाणी पोहचवण्याचा पहिला संकल्प घ्या. आपल्या घरातून दररोज खूप कचरा बाहेर पडतो.काही लोक कचरा इकडे तिकडे फेकतात. तो फेकलेला कचरा एकतर जनावरांच्या पोटात जातो किंवा नद्यांमध्ये वाहून जातो. त्यामुळे आपल्या नद्याही प्रदुषित झाल्या आहेत. कचरा इकडे-तिकडे न टाकता तो डस्टबीनमध्ये टाकावा. सुका व ओला कचरा वेगळा करून फेकून द्या जेणेकरून त्याचा योग्य वापर करता येईल.


पर्यावरण दिनाचा दुसरा संकल्प

माणसाचे जीवन श्वासोच्छवासाने चालते आणि श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा लागते.त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनी श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्नकरू, त्यासाठी पेट्रोल-डिझेलऐवजी ई-वाहन वापरू. अधिकाधिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा.


पर्यावरण दिनाचा तिसरा संकल्प

निसर्ग हा झाडे आणि वनस्पतींवर अवलंबून आहे. मात्र आजकाल कोणीही कधीही झाडे तोडत आहे. झाडे तोडल्याने ऑक्सिजनच्या कमतरता बरोबर हवामानाचे चक्रही बिघडत आहे. त्यामुळे अनेकदा भीषण नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत वृक्षतोड थांबवून आपण अधिकाधिक रोपे लावू, जेणेकरून निसर्गाची आतापर्यंत झालेली हानी भरून काढता येईल, अशी प्रतिज्ञा घ्या.

 
पर्यावरण संरक्षणाचा चौथा संकल्प

झाडे, रोपे, माती, , प्राणी, पाणी इत्यादींचा पर्यावरण स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यात महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करत पर्यावरणाचा समतोल सदैव राखला जावा, अशी प्रार्थना करा आणि पर्यावरणाचा समतोल व सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही करावे लागेल. ते सर्व काही आम्ही करू अशी शपथ घ्या.


पर्यावरण संरक्षणाचा पाचवा संकल्प

पर्यावरण दिनी, पाचवा आणि शेवटचा संकल्प घ्या की आम्ही पॉलिथिन किंवा प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रयत्न करू. पॉलिथिन आणि प्लास्टिक हे निसर्गाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतः त्यांचा वापर करणार नाही, त्याचप्रमाणे तुम्ही इतर कोणी पॉलिथिन किंवा प्लास्टिक वापरताना दिसले तर त्यांनाही पर्यावरणाबाबत जागरूक करेल अशी प्रतिज्ञा घ्या. कारण पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

 

-         श्वेता पोटुडे

माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

0000

2.6.2022

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- नांदेड जिल्ह्यात शुक्रवार 3 जून रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शुक्रवार 17 जून 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 


जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शुक्रवार 3 जून रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शुक्रवार 17 जून 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी,  शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.


अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 महात्मा फुले लिखीत “तृतीय रत्न”चा

कुसूम सभागृहात 4 जून रोजी प्रयोग


·  सर्वांसाठी नि:शुल्क प्रवेश

·  महाज्योती तर्फे आयोजन

 

नांदेड, (जिमाका) दि. 3 :- नांदेड येथील कुसुम नाट्यगृहात शनिवार 4 जून 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता महात्मा जोतिबा फुले लिखीत ‘तृतीय रत्न’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगासाठी नि:शुल्क प्रवेश ठेवण्यात आला आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या शैक्षणिक ध्येयांनी प्रेरीत सामाजिक विचारांचा प्रसार व्हावा, त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे या हेतूने राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पूनर्वसन मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार, संचालक डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे, लक्ष्मण वडले यांनी महाज्योतीच्यावतीने राज्यातील विविध जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या प्रयोग करण्याचे योजिले आहे.

 

अनिरुद्ध वनकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून क्रीएटीव्ह हेड प्रा. संगीता टिपले आहेत. एकुण 30 कलाकार व सहकाऱ्यांचा या नाटकात सहभाग असणार आहे. या आधी विविध जिल्ह्यात 26 प्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. प्रेक्षक आणि माध्यमांकडून त्याला उस्फुर्त असा प्रबोधनात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सदर नाट्यप्रयोगास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदिपकुमार डांगे यांनी केले आहे.

00000




 उद्योजकता विकास अंतर्गत

महिलांसाठी मोफत टेलरिंग प्रशिक्षण


 · आरसेडी व उमेदचा उपक्रम

 

नांदेड, (जिमाका) दि. 3 :- भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी महिला टेलरिंग प्रशिक्षणाचे आयोजन 1 ते 30 जुन 2022 पर्यंत आरसेडी नांदेड येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा प्रशिक्षक गजानन पातेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उमेद अभियानाचे राम भलावी, अतिष गायकवाड, कौशल्य समन्वयक प्रियंका चव्हाण, बालाजी गिरी, आशिष राऊत, विश्वास हटृटेकर यांची उपस्थिती होती.

 

या प्रशिक्षणात नांदेड जिल्ह्यातील 18 ते 40 वयोगटातील महिला सहभागी होऊ शकतात. आतापर्यत 35 महिलांनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेतला आहे. प्रशिक्षणात उद्योजकता विकास, कौशल्य विकास अंतर्गत उद्योजकता सक्षमता कार्य दृष्टिकोन, संभाषन, कौशल्य, वेळेचे नियोजन, बँकिंग, प्रकल्प अहवाल, मार्केटिंग सर्व्हे, आर्थिक साक्षरता, इंग्रजी ज्ञान, बेसिक संगणक ज्ञान, शासकीय योजना, सामाजिक सुरक्षा योजना, तसेच शिवणकला अंतर्गत विविध विषयांचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षक ज्योती वांगजे या महिलांना मोफत प्रशिक्षण देवून त्यांना कार्यकुशल करण्याचे काम करीत आहेत. प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थ्यांची निवासी आणि जेवणाची मोफत सोय करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रूनिता अर्ध्यापुरकर, अभिजित पाथरीकर, मारोती कांबळे यांनी परीश्रम घेतले.

00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...