Wednesday, September 8, 2021

 जिल्ह्यातील 101 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 101 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. गुरुवार 9  सप्टेंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल या 17 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. याचबरोबर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पौर्णिमा नगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, रेल्वे हॉस्पिटल  या 17 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस डोस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 7 सप्टेंबर 2021 पर्यंत एकुण 10 लाख 96 हजार 735लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 8 सप्टेंबरपर्यत कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 9 लाख 67 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 2 लाख 88 हजार 160 डोस याप्रमाणे एकुण 12 लाख 55 हजार 190 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणी सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 मध केंद्र योजनेतील (मधमाशापालन) पात्र व्यक्ती / संस्थानी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 8 :-महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) कार्यान्वित झालेली असून पात्र व्यक्ती, संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय, औद्योगिक वसाहत उद्योग भवन, एमआयडीसी एरिया शिवाजीनगर नांदेड यांचा दुरध्वनी क्रमांक 02462-240674 व 9921563053 या क्रमांकावर संपर्क करावा, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

या योजनेचे वैशिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. मध्य उद्योगांचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संर्वधनाची जनजागृती करणे. योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहेत. वैयक्तीक माधपाळ पात्रता अर्जदार साक्षर असावा स्वत:ची  शेती असल्यास प्राधान्य वय 18 वर्षापेक्षा जास्त, 10 दिवस प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. केंद्रचालक प्रगतीशिल मधपाळ व्यक्तीची पात्रता किमान 10 वी उत्तीर्ण, वय वर्ष 21 पेक्षा जास्त अशा व्यक्तीच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीच्यानावे किमान 1 एकर शेती जमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेतजमीन, लाभार्थीकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. 

केंद्रचालक संस्था यांची पात्रतेत संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडेतत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. तसेच 1 एकर शेत जमिन स्वमालकीची किंवा भाडयाने घेतलेली असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावीत. अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. लाभार्थी निवड प्रक्रीयेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरु करणेसंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. 

0000

 

 "नीट" परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (जिमाका) दि. 8 :- "नीट" परीक्षा 2021 ही रविवार 12 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2 ते 5 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील एकूण 35 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे. या परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. 

या परीक्षा केंद्राच्या परिसरात 12 सप्टेंबर रोजी 2  वाजेपासून ते सांयकाळी 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी व कर्मचारी या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील शंभर मीटर पर्यंतची सर्व झेरॉक्स मशीन चालू ठेवण्यास व भ्रमणध्वनी व पेजर चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.

00000

 अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे त्वरीत पंचनामे करावेत  

- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 
नांदेड (जिमाका) दि. 8 :- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतला. सप्टेंबरच्या 1 तारखेपासून जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात कृषिक्षेत्राचे नुकसान झाल्याच्या विविध घटना समोर आल्या आहेत. यात काही ठिकाणी मनुष्यहानीसह शेतकऱ्यांचे पशुधनही वाहून गेले आहे. काल 7 सप्टेंबर रोजी नाले व लहान नदी असलेल्या पुलांवरुन पाणी वाहू लागल्याने काही ठिकाणची वाहतुकही विस्कळीत झाली होती. या सर्व परिस्थितीचा एकत्रित आढावा तात्काळ घेण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रत्येक विभाग प्रमुखांना प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

 
जिल्ह्यातील अतिवृष्टीचा हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तात्काळ संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचे कृती दल स्थापन केले आहे. जिल्ह्यातील सर्व पाझर तलावांची सद्यस्थिती व उपलब्ध असलेला पाणीसाठा याचा आढावा घेण्याचे जबाबदारी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. काही भागात नाल्याच्या काठावर अथवा इतरत्र जर विविध जनावरे वाहून आल्याचे आढळले असल्यास त्याचा तात्काळ पंचनामा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 
जिल्ह्यात आतापर्यंत तीन वेळा विविध नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. यातील जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये नुकसानीची ज्या शेतकऱ्यांनी माहिती देऊन पंचनामे करुन घेतले आहेत त्यांच्या व्यतिरिक्त सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची काळजीपूर्वक पंचनामे करणे, पाण्याच्या प्रवाहामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमीनी जर कुठे खरडून गेले असतील तर त्याचेही माहिती घेऊन पंचनामे करणे यावर सर्व शासनाच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी जागेवर थांबून तात्काळ कामाला गती देण्याचेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

 

सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर या पिकांचा ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे व आताच्या पावसात ज्यांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पाहणी करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
00000




 अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील लाभार्थ्यांनी

मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 नांदेड (जिमाका) दि. 8 :- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडीया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्हयातील या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाचे समाज कल्याण निरीक्षक कैलाश तुकाराम मोरे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

 अनुसूचित जातीच्या उद्योजकांने हाती घेतल्याचा प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल व अर्जदारास बँकेने प्रकल्पासाठी कर्ज मंजुर केलेले असावे. तसेच अर्जदाराकडे उद्योग आधार, मागील तीन वर्षाचे विवरण, यापुर्वी इतर शासनाच्या योजनांचा लाभ घेतला नसल्याचे शपथपत्र, तसेच पाचशे रुपयाच्या बाँडपेपरवर दोन साक्षीदारांच्या सहयासह हमीपत्र, प्रकल्पाव्दारे उत्पादित होणाऱ्या वस्तु, उत्पादन याबाबत विक्रेत्याचे मागणीपत्र, अर्जदाराचा जातीचा दाखला, जात वैद्यता प्रमाणपत्र, कंपन्यांनी केलेल्या मागणी व पुरवठा आदेश प्रती व प्रकल्पासाठी एकुण प्रकल्प किंमतीच्या 75 टक्के बँकेने कर्ज मंजुर केलेले असणे आवश्यक आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय 9 डिसेंबर, 2020 व 16 मार्च 2020, 26 मार्च, 2021 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

0000

 अर्धापूर तालुक्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओची बैठक संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात पात्र मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी मोहिम कालावधीत बीएलओ यांनी उत्कृष्ठ काम करावे, असे आवाहन अर्धापूर तहसिलदार सुजित नरहरे यांनी केले. तालूक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)  यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.  या बैठकीत नायब तहसिलदार निवडणूक सुनिल माचेवाड यांनी आढावा घेतला.

 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 9 ऑगस्ट ते 31 ऑक्टोंबर 2021 या कालावधीत आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने अर्धापुर तालूक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)  यांची बैठक नुकतीच अर्धापुर तहसिल कार्यालयात संपन्न झाली .

 यावेळी तालूक्यातील  मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)  एजाज तांबोळी, आर. यु. शिंदे, आर. पी. पावडे, एस. पी. कवळे, शेख म. इरफान म.मुस्तफा, मो.मोहसीन मो. समी, ए. एम. कोंडावार, दमकोंडावार, शेख जावेद नुर महमंद, कैलास गायकवाड, शिवाजी मलदोडे, महेश चिटकूलवार, वैजनाथ हंगरगे, मो. इसाक अ. साजिदवली, मो. सिराजोधीन मो इक्बालोधिन, श्रीमती गजला तबस्तुम गुलाम एजदानी, श्रीमती मोबीन आयेशा नाजनीन, एस. आर बुरगुलवार, आर. व्ही. क्षीरसागर, डी. एम. देशमुख, विनोद भुस्से, एम. एस. मरशिवणे, एस. डी सुतनेपवाड, एस. जी. राजेगोरे, निवडणूक ऑपरेटर गिरिश गलांडे इत्यादी उपस्थित होते.

00000

विमा दावा मंजूर होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित विमा कंपनीस कळवावे

 - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि. 8 :- नांदेड जिल्ह्यात 1 सप्टेंबरपासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना मोठया प्रमाणात पुर येऊन शेती व पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे.  विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पुर्व सुचना संबधीत शेतकऱ्यांनी तात्काळ विमा कंपनीस कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. कंपनीच्या नियमाप्रमाणे ही माहिती 72 तास म्हणजेच तीन दिवसाच्या आत कळविणे क्रमप्राप्त आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गीक आग या नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. या जोखीमेंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडुन वाहणारी विहिर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो.

विमा दावा मंजूर होणेसाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती, पुर्वसुचना कंपनीस देणे गरजेचे आहे. त्यासाठी पीक विमाधारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन क्रॉप इंन्सुरन्स हे ॲप डाउनलोड करुन घ्यावे. त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा 18001035490 या टोल फ्री क्रमांकावर किंवा supportagri@iffcotokio.co.in या पत्यावर ई- मेलवर नुकसानीची पुर्वसुचना द्यावी. काही तांत्रीक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमांद्वारे विमा कंपनीस पुर्वसुचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी, इफ्को टोकीयो विमा कंपनी किंवा संबधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयास  किंवा आपल्या  गावातील संबधित कृषि  सहाय्यकाकडे ऑफलाईन अर्ज सादर करावेत, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाने कळविले आहे.

0000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...