Thursday, January 28, 2021

 

38 कोरोना बाधितांची भर तर

45 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- गुरुवार 28 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 38  व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 24 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 14 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 45 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 1 हजार 489 अहवालापैकी 1 हजार 415 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 416 एवढी झाली असून यातील 21 हजार 314 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 315 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 9 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 584 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 28,  मुखेड कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3, देगलूर कोविड रुग्णालय 1, हदगाव कोविड रुग्णालय 1 असे एकूण 45 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.08 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 15, भोकर 1, मुखेड 2, परभणी 1, नांदेड ग्रामीण 3, किनवट 1, हिंगोली 1 असे एकुण 24 बाधित आढळले.  ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 10, जालना 1, अर्धापूर 3 असे एकूण 14 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 315 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 16, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 13, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 9, मुखेड कोविड रुग्णालय 9, महसूल कोविड केअर सेंटर 16, किनवट कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 4, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 196, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 39, खाजगी रुग्णालय 11 आहेत.   

गुरुवार 28 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 167, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 93 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 8 हजार 142

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 81 हजार 407

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 416

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 314

एकुण मृत्यू संख्या-584

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.08 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-33

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-315

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-9.          

00000

 

शिक्षणासाठी ऑनलाईन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर  व्हावा

-         पालकमंत्री अशोकराव चव्हाण

▪ महात्मा फुलेच्या अटल टिकरींगचे शानदार उद्घाटन 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- कोरोना महामारीमुळे समाजाच्या सर्वच घटकांवर मोठा दुष्पपरिणाम झाला हे नाकारता येणार नाही. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. शाळेतील वर्गाद्वारे शिक्षकांचे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना जे शिक्षण व्हायचे ते थांबले होते.  या कालावधीत डिजिटल शिक्षण हाच पर्याय उपलब्ध असल्याने  ऑनलाईन शिक्षणाची अनुभूती कोरोना काळाची देण ठरली असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

महात्मा फुले हायस्कूलच्या अटल टिकरींग लॅबचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री तथा संस्थेचे सचिव डी.पी.सावंत तर प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद प्रतोद आ.अमर राजुरकर, आ.मोहन हंबर्डे, संस्थेचे सहसचिव अ‍ॅड. उदयराव निंबाळकर, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, कार्यकारिणी सदस्य पांडुरंग पावडे, नरेंद्र चव्हाण आदिंची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना पालकमंत्री अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर आता काळाची गरज झाली आहे. यापासून शिक्षण क्षेत्रही दूर राहू शकत नाही. व्हर्च्युअल बैठका, सभा यासोबतच आता व्हर्च्युअल क्लासेसही तयार होत आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण हीच आता खऱ्या अर्थाने कोरोनाची देण समजून इष्टापत्तीचा उपयोग शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान वाढीसाठी करावा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी असेही ते म्हणाले. 

यावेळी माजी  पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. महात्मा फुलेच्या मुख्याध्यापिका सौ. माया जयस्वाल यांनी आपल्या भाषणातून महात्मा फुले हायस्कूलमधील सुरू असलेले विविध उपक्रम, ऑनलाईन शिक्षण, विद्यार्थ्यांची प्रगती व संस्थेचा सहभाग याविषयी प्रास्ताविकपर भाषणातून माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डी. बी. नाईक यांनी केले तर आभार सौ. कोलेवाड यांनी मानले. या कार्यक्रमास प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.शेंदारकर, उपमुख्याध्यापक संजीवकुमार तायडे, पर्यवेक्षिका सौ.सुरेखा कदम, पर्यवेक्षक बाळासाहेब शिंदे यांच्यासह शारदा भवन शिक्षण संस्थेंतर्गत शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

00000

 

नारी शक्ती पुरस्कारासाठी

नामांकन सादर करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 28:-  महिलांच्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिला, संस्थांना शासनामार्फत नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्कारासाठी इच्छूक महिलांनी व संस्थानी नारी शक्ती पुरस्कारासाठी www.narishaktipuraskar.wcd.gov.in  व  www.wcd.nic.in या संकेतस्थळावर शनिवार 30 जानेवारी 2021 पर्यंत नामाकंने सादर करावेत, असे आवाहन नांदेडचे जिल्हा माहिला बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.   

अर्जदार महिलेचे वय 1 जुलै 2020 रोजी 25 वर्षे असावे. अर्जदार संस्थेला महिला विकास कार्याचा 5 वर्षे अनुभव असावा. नामाकंन सादर करताना महिला विकास क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याचे व इतर आवश्यक कागदपत्रे नामांकन सोबत सादर करावे. नामांकने सादर करण्याचे अंतिम मुदत 30 जानेवारी 2021 आहे. नामाकंने www.narishaktipuraskar.wcd.gov.in.  व  www.wcd.nic.in  या वेबसाईटवर फक्त ऑनलाईन पध्दतीने भरावेत. अधिक माहितीसाठी www.wcd.nic.in या संकेतस्थळास भेट दयावी, असेही जिल्हा महिला बाल विकास अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 मराठवाडा विभागाच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयातील

बारा कर्मचाऱ्यांच्या कार्यसंस्कृतीचा होणार गौरव

 

          औरंगाबाद, दि. 28, (विमाका) - सन 2020 या वर्षात आपल्या वैशिष्टयपूर्ण कामाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटविणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक (माहिती) कार्यालय, मराठवाडा विभाग, औरंगाबाद  अंतर्गत  कार्यालयांतील बारा कर्मचाऱ्यांची  उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली आहे.  संचालक (माहिती) गणेश रामदासी यांनी  नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. तसेच स्वच्छ व सुंदर कार्यालय म्हणून संपूर्ण मराठवाड्यातून  जालना येथील जिल्हा माहिती कार्यालयाची निवड करण्यात आली आहे. उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच कार्यसंस्कृती  प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

             मराठवाडा विभाग अंतर्गत माहिती व जनसंपर्क विभागाचे  एकूण दहा कार्यालयं आहेत.  या कार्यालयांच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या प्रसिध्दीचे काम अव्याहतपणे सुरु असते.  गेल्या वर्षभरात आपल्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडण्याबरोबरच इतर कामातही हिरीरीने सहभाग घेऊन उत्तम काम करणाऱ्या तसेच कोरोनासारख्या आपत्कालिन परिस्थितीत तसेच निवडणुकीच्या कालावधीत उत्तम कार्य करणाऱ्या आणि अचानक आलेल्या कामाची जबाबदारी स्वीकारुन कार्यालयाची प्रतिमा उंचावणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा  उत्कृष्ट कर्मचाऱ्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

वर्ष 2020 साठीच्या उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी म्हणून निवड करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

            उत्कृष्ट शिपाई म्हणून प्रतिभा इंगळे, जिल्हा माहिती कार्यालय, जालना व अशोक बोर्डे, जिल्हा माहिती कार्यालय, लातूर, उत्कृष्ट वाहनचालक म्हणून  सुभाष पवार, जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद व रामकिसन तोकले विभागीय माहिती कार्यालय, लातूर, उत्कृष्ट छायाचित्रकार/छायाचित्रणकार म्हणून ना.गो.पुठ्ठेवाड, पर्यवेक्षक, जिल्हा माहिती कार्यालय, बीड, व विजय होकर्णे, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड, उत्कृष्ट लिपिक म्हणून शिवाजी गमे, दुरमुद्रण चालक जिल्हा माहिती कार्यालय, बीड, मनिषा कुरूलकर, विभागीय माहिती कार्यालय, लातूर, प्रसिध्दी कामाकाजासाठी  अमोल महाजन, माहिती सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, जालना व अश्रूबा सोनवणे, जिल्हा माहिती कार्यालय, लातूर  वर्ग-दोनचे उत्कृष्ट अधिकारी म्हणून मीरा ढास, सहायक संचालक, विभागीय माहिती कार्यालय, लातूर तर वर्ग-एकचे उत्कृष्ट अधिकार म्हणून मुकूंद चिलवंत, जिल्हा माहिती अधिकारी, औरंगाबाद यांची निवड करण्यात आली.

***

Wednesday, January 27, 2021

 

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्य

शासकीय जिल्हा ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन 

   नांदेड, (जिमाका), दि. 27 :- संपुर्ण महाराष्ट्रात दिनांक 14 ते 28 जानेवारी 2021 या कालावाधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा होत आहे. त्यानिमीत्य आज दिनांक 27 जानेवारी रोजी  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजीत  ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन प्रफुल कर्नेवार, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी, एन.आय.सी. नांदेड यांच्या हस्ते करण्यात आले. 

 या वेळी श्री कर्नेवार यांनी उपस्थीतांना मार्गदर्शन करतांना माहिती व तंत्रज्ञान युगात संगणक व मोबाईल माध्यमाद्वारे क्षणात माहिती प्राप्त्‍ होत असुन सुध्दा पुस्तकांच्या सहवासात राहुन प्रत्यक्ष पुस्तके वाचण्यामध्ये अधिक आनंद प्राप्त होतो असे नमुद केले. तसेच नुकतीच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे प्रस्थापीत करण्यात आलेली e-Granthlaya 4.0 क्लाऊड बेस प्रणाली (NIC मार्फत डेव्हलप करण्यात आलेली)  कामकाजाची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सदर उदघाटनाप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, के.एम.गाडेवाड, संजय पाटील, गजानन कळके  यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सदरचे ग्रंथ प्रदर्शन पुढील देान दिवसांकरिता खुले असुन सर्वांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.

00000



 

 

 

शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी

 जागा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्नशील

      - पालकमंत्री अशोक चव्हाण 

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अभियानाचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन  


नांदेड, (जिमाका), दि. 27 :-शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल धोरणाअंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान हे अत्यंत दिशादर्शक आहे. ज्याची मागणी आहे ते आपल्या शेतात पिकवून बाजारपेठेत त्या शेतमालाच्या विक्रीचे कसब शेतकऱ्यांनी अंगीकारल्यास निश्चितच अधिकचा लाभ होईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

 

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कृषी विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय रयत बाजाराचे उद्घाटन पालकमंत्री  अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे, आमदार बालाजीराव कल्याणकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ मंगाराणी अंबुलगेकर, सभापती कृषी बाळासाहेब रावणगावकर,माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर,जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर,मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, यांच्यासह अधिकारी कर्मचारी शेतकरी ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात रयत बाजारासाठी जवळपास 60 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे.जिल्ह्यातील विविध तालुक्यातील यशस्वी शेतकऱ्यांची तसेच रयत बाजारात सहभागी शेतकऱ्यांचा यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची यशोगाथेची पुस्तिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. 

यावेळी विविध स्टॉलला मान्यवरांनी भेटी देऊन शेतकऱ्याची आणि त्याच्या शेतमालाची आस्थेवाईकपणे पाहणी करून व चर्चा करून त्यांनी समाधान व्यक्त केले. या  समारंभात जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील मालासह मोठ्या प्रमाणावर उपस्थिती नोंदवली. या शेतीमालाव्यतिरिक्त रेशीम उद्योग, मत्स्यव्यवसाय, गांडूळ खत, महिला बचत गट यांच्यामार्फत उत्पादीत उत्पादने  मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आली आहेत. तसेच फळे, भाजीपाला विविध प्रकारचे धान्य, डाळी, मध, गूळ, ओल्या भुईमूग शेंगा, रसवंती असे अनेक शेती उत्पादने त्याचबरोबर सफेद मूसळी, ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरी, अशी नाविन्यपूर्ण उत्पादने  विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 

या उपक्रमास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणावर या सर्व शेतीमालाची विक्री झाली. ग्राहकांना ताजा माल मिळाला आणि थेट विक्रीमुळे शेतकऱ्यांनासुद्धा अधिकचा दर मिळून फायदा झाला. 

हा उपक्रम या पुढेही दिनांक 29 जानेवारीपर्यंत हा बाजार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवीशंकर चलवदे यांनी सांगितले. या उपक्रमाला आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार राजेश पवार, सौ. पवार यांनीही भेट दिली.

0000

नांदेड येथे आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या

अधिक्षक आणि कार्यकारी अभियंता विद्युत कार्यालयाची भर

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण 

नांदेड, (जिमाका), दि. 27 :- नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेली शासकिय कार्यालय नांदेड येथेच असावीत यासाठी माझा कायम आग्रह राहिलेला आहे. मागील काही वर्षात निर्माण झालेला अनुशेष पूर्ण करण्याच्यादृष्टिने सर्व विभागाशी समन्वय साधत नांदेडसाठी कोणतेही कमतरता पडणार नाही असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते स्नेहनगर नांदेड येथे सार्वजनिक बांधकाम, विद्युत शाखेच्या अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता कार्यालयाचे लोकार्पण आणि शासकिय विश्रामगृह नांदेड येथील मिनी सह्याद्री विश्रामगृहाची सुधारणा, नुतनीकरण व श्रेणीवर्धन कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर रोहिनी येवनकर, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, हरिहरराव भोसीकर, मुख्य अभियंता (विद्युत) संदिप पाटील, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. 

नांदेड येथे पूर्वी जलसंपदा विभागाचे विश्रामगृह होते. हे विश्रामगृह नादुरुस्त व बंद असल्यामुळे स्वाभाविकच विविध अभ्यागतांची गर्दी सध्या उपलब्ध असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागांच्या विश्रामगृहावर वाढली आहे. जिल्ह्यातील 16 तालुके, याचबरोबर बाहेरुन येणाऱ्या अभ्यागतांची संख्या लक्षात घेता नांदेड येथे विश्रामगृहाची अत्यंत आवश्यकता होती. सर्व बाबींचा विचार करुन आता आपण मिनी सह्याद्री विश्रामगृह व तपोवन विश्रामगृहाची सुधारणा, नुतनीकरण, श्रेणीवर्धन करीत असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत होणाऱ्या इमारत विकास कामांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचाही तेवढाच महत्वाचा सहभाग असतो. यापूर्वी नांदेड येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय उस्मानाबाद तर अधिक्षक अभियंत्यांचे कार्यालय पुणे येथे होते. यामुळे येथील विकास कामात विलंब होण्यासमवेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इतर विभागांना सारखे उस्मानाबाद व पुणे येथे जाणे जीक्रीचे झाले होते. जिल्ह्याची ही निकड लक्षात घेऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रजासत्ताक दिनी कार्यकारी अभियंता व मुख्य अभियंता विद्युत शाखेच्या कार्यालयाचे लोकार्पण करुन नांदेडच्या विकासात एक नवी भर घातली आहे.

0000 





वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...