Wednesday, July 8, 2020


वृत्त क्र. 626    
नांदेड जिल्ह्यात आज 53 बाधितांची भर
सहा व्यक्ती बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी
नांदेड (जिमाका) दि. 8 :-  कोरोना आजारातून आज पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 1 बाधित व्यक्ती, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथून 1, व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय येथील 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथील 1 बाधित तसेच मुखेड कोविड केअर सेंटर येथील 1 बाधित व्यक्ती असे एकुण 6 बाधित व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 341  व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत.
बुधवार 8 जुलै 2020 रोजी सायं 6 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 276 अहवालापैकी 198 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. यात नवीन 53 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे‍ जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तीची संख्या 511 एवढी झाली आहे.
नवीन बाधितांमध्ये कंधार विकासनगर येथील 72 व 39 वय वर्षाचे 2 पुरुष, काटकळंब गावातील 24 वर्षे वयाचा 1 पुरुष बाधित झाला. मुखेड दत्तात्रयनगर येथील 52 वर्षाचा 1 पुरुष तसेच 35 व 38 वय वर्षे वयाच्या 2 महिला, मुखेड तग्लीन गल्ली येथील 34 वर्षे वयाचा 1 पुरुष, 21 वर्षाची 1 महिला व 10 वर्षाची 1 मुलगी, मुखेड दापका येथील 10 वर्षे वयाचा 1 बालक, पोलीस कॉलनी मुखेड येथील 30 वर्षे वयाचा 1 पुरुष, शिवाजीनगर मुखेड येथील 17 वर्षे वयाचा 1 पुरुष, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भागातील 36 वर्षे वयाची 1 महिला, कंधार तालुक्यातील मोहिजा परंडा येथील 23 वर्षे वयाची 1 महिला, हस्सापूर नांदेड येथील 47 वर्षाचा 1 पुरुष, 6 वर्षे वयाचा 1 बालक, 50 वर्षे वयाची 1 महिला, 2 वर्षे वयाची 1 मुलगी, उमर कॉलनी नांदेड येथील 34 व 61 वर्षाचे 2 पुरुष व 4 वर्षे वयाचा 1 बालक, बालाजीनगर तरोडा येथील 25, 30, 58 वर्षाचे 3 पुरुष, 5 वर्षाचे 2 बालक, 34 व 55 वर्षाचा 2 महिला. सिडको येथील 36 वर्षाचा 1 पुरुष, सावित्रीबाई फुलेनगर येथील 38 वर्षाचा 1 पुरष, पिरबुऱ्हानमधील 18 वर्षाची 1 महिला, देगलूरनाका नांदेड येथील 42 वर्षाची 1 महिला, हदगाव तालुक्यातील पळसा येथील 25 वर्षे वयाचा 1 पुरुष, देगलूर येथील फाजोदिन टॉकिज जवळील 46 वर्षाचा 1 पुरुष, परभणी जिल्ह्यातील वसा येथील 70 वर्षाचा 1 पुरुष, बिलोली गांधीनगर येथील 32 वर्षाचा 1 पुरुष, किनवट तालुक्यातील गोकुंदा 18 व 20 वर्षाचे 2 पुरुष, मुक्रमाबाद येथील 48 वर्षाचा 1 पुरुष, नायगाव येथील बोंबनाले गल्लीतील अनुक्रमे 40, 60, 31 वर्षाच्या 3 महिला, 7 व 2 वर्षाचा 2 मुली, 38 व 40 वर्षाचे 2 पुरुष व 6 वर्षाचा 1 बालक, यशवंतनगर येथील 52 वर्षाचा 1 पुरुष, अंबेडकरनगर येथील 28 वर्षाचा 1 पुरुष, देगलूरनाका येथील 60 वर्षाचा 1 पुरुष, विजयनगर येथील 75 वर्षाचा 1 पुरुष, गणेशनगर येथील 21 वर्षाचा 1 पुरुष व 47 वर्षाची 1 महिला हे बाधित झाले आहेत. सर्व बाधितांवर उपचार सुरु आहेत. आज रोजी 147 पॉझिटिव्ह बाधित व्यक्तींवर औषधोपचार सुरु असून त्यातील 16 बाधित व्यक्तींची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 9 महिला व 7 पुरुषांचा समावेश आहे.    
नांदेड जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 147  बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 45, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 60, तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे 8, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 2 बाधित, जिल्हा रुग्णालय येथे 4 बाधित, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 7 बाधित तर हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे 2 बाधित, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तर किनवट कोविड केअर सेंटर येथे 2, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1 बाधित तसेच नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयात 3 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 6 बाधित  औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. 8 जुलै 2020 रोजी 237  व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 47 हजार 452,
घेतलेले स्वॅब- 7 हजार 478,
निगेटिव्ह स्वॅब- 6 हजार 235,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 53,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 511,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 22,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 02,
मृत्यू संख्या- 23,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 341,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 147,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 237 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000


वृत्त क्र. 625   
अटी व शर्तीच्या अधीन राहून
हॉटेल, अतिथीगृह, लॉज चालू ठेवण्यास परवानगी
नांदेड (जिमाका), दि. 8 :- नांदेड जिल्‍हयातील हॉटेल,‍ अतिथीगृह व लॉज  चालू ठेवण्‍यासाठी आदेशात नमूद अटी व शर्तीचे अधीन राहून बुधवार 8 जुलै 2020 पासून पुढील आदेशापर्यंत सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्‍यास परवानगी देण्‍यात आली आहे. राज्य शासनाचे आदेश 6 जुलै 2020 नुसार हॉटेल, अतिथीगृह व लॉज चालू ठेवण्‍यासाठी अटी व शर्तीचे अधीन राहून परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यासाठी हा आदेश निर्गमीत केला आहे.
या आदेशात नमुद संपुर्ण निर्देशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही याबाबी तपासून आवश्‍यक कायदेशर व दंडात्‍मक  कारवाई करण्‍यास खालील यंत्रणेस प्राधिकृत करण्‍यात आले आहे. महानगरपालिका हद्दीत महानगरपालिका व पोलीस विभागांची संयुक्‍त पथके गठीत केली आहेत. नगरपालिका हद्दीत नगरपालिका व पोलीस विभागांनी संयुक्‍त पथके गठीत  केली आहेत. गावपातळीवर ग्रामपंचायत व पोलीस विभागाचे संयुक्‍त पथक गठीत करण्याबाबत सुचना दिल्या आहेत.
वरीलप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा इंसिडंट कमांडर (Incident Commander) यांचेकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा इंसिडंट कमांडर (Incident Commander) यांच्यावर वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असेल.
या आदेशात म्हटले आहे की, कोरोना विषाणू कोविड-19 बाबत मार्गदर्शक सूचना व त्यासंबधाने घ्यावयाची खबरदारी याची माहिती दर्शविणारे पोस्टर, फलक, दृकश्राव्य, ध्‍वनीफित इ. विशेषत्‍वाने दर्शनी भागी उभारण्यात यावीत. हॉटेलमधील तसेच हॉटेलच्या इमारती बाहेरल ठिकाणी जसे की पार्किगचे ठिकाण या जागी लोकांचे जमावाचे योग्य प्रकारे नियोजन करावे.
तसेच सामाजिक अंतर राखण्याचे दृष्टिकोनातुन रांगाची आखणी करुन बसण्याच्या व्यवस्थेबाबतही पुनर्नियोजन करावे. प्रवेशद्वारावर अनिवार्यपणे तापमान गणना केली जावी. तसेच स्वागत कक्ष टेबल इत्‍यादींना संरक्षक काचा बसविण्यात याव्यात. प्रवेशद्वारावर, अतिथीगृहामध्‍ये आणि व्‍हरांडा (लॉबी) या सर्व ठिकाणी सहजतेणे उपलब्‍ध होतील असे पायाने कार्यान्वित होणारे हॅन्‍ड सॅनिटायझर्सची  व्यवस्था करण्‍यात यावी. योग्य प्रकारचे वैयक्तिक सुरक्षेची साधने जसे मास्क ग्लोव्हज इ. हॉटेल प्राधिकरणाने त्यांचे कर्मचारी व ग्राहकांना पुरवावेत.
हॉटेल व्‍यवस्‍थापनांनी  ऑनलाईन पेमेंटचा वापर करणे अनिवार्य आहे जसे की ई वालेट, डिजिटल पेमेंट, क्यु.आर.कोड अशा ऑनलाईन संसाधनांचा वापर करावा जेणेकरून ग्राहकाशी प्रत्‍यक्ष संपर्क होणार नाही. लिफ्टमध्ये नागरिकांची संख्या मर्यादित ठेवावी जेणेकरुन सामाजिक अंतराचे नियम पाळले जावेत. वातानुकूलित यंत्र व व्हेंटिलेटरचा वापर करताना CPWD च्या नियमांवलीचे पालन व्हावे. सदर यंत्रांचे तापमान 24-30 डीग्री दरम्‍यान असावे आर्द्रता 40-70 डिग्री दरम्यान असावी जेणेकरुन शुद्ध हवा श्वसनास पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावी.
कोरोना विषाणू-कोविड 19 सदृष्‍य लक्षणे नसलेल्‍या ग्राहकांनाच हॉटेल, अतिथीगृह, लॉजमध्‍ये प्रवेश द्यावा.   चेहऱ्यावर आवरण असणारे, मास्‍क परिधान केलेले ग्राहक यांनाच हॉटेल, अतिथीगृह, लॉजमध्‍ये प्रवेश द्यावा. तसेच सदर ठिकाणी मास्‍क सतत परिधान करणे आवश्‍यक आहे. ग्राहकांनी आपला सर्व तपशल जसे, प्रवासाचा इतिहास वैद्यकिय स्थिती,ओळखपत्रासह स्वयंघोषणापत्र .बाबी. स्‍वागतकक्षात देण्‍यात याव्‍यात. ग्राहकांनी आरोग्‍य सेतू अॅपचा वापर करणे अनिवार्य राहील. ग्राहकांना (House Keeping) हाऊस किपींग सेवेचा किमान वापर करण्‍यास प्रोत्‍साहित करावे.
हॉटेल, अतिथीगृह, लॉजमध्‍ये मार्गदर्शक तत्‍वाचे पालन काटकोरपणे करण्‍यात यावे. हॉटेल, अतिथीगृह, लॉज व्‍यवस्‍थापनाने बैठक व्‍यवस्‍थेची पुर्नरचना करावी. एकवेळा वापर करावयाचे (Disposable) साहित्‍य इ. वापरास प्रोत्‍साहन देण्‍यात यावे. जसे पेपर नॅपकिन इत्‍यादी. हॉटेल, अतिथीगृह, लॉजमध्‍ये जेवणाबाबतींत रुम सेवा व पार्सल सेवा द्यावी. हॉटेल, अतिथीगृह, लॉज हे प्रामुख्‍याने निवासी ग्राहकांना उपलब्‍ध असावेत. हॉटेल, अतिथीगृह, लॉज या ठिकाणी क्रिडादालने, जिम, मुलांसाठी असणारे खेळाची ठिकाणे जलतरण तलाव बंद ठेवण्यात यावे. मोठा जमाव हा काटकोरपणे निर्बंधित असावा, बैठकीचे दालन हे 33 टक्के क्षमतेने कार्यान्वित असावे व बैठकत एका वेळेस 15 लोकांनाच प्रवेश असावा. ग्राहकांनी रुम रिकामी केल्यानंतर सर्व रुमचे निर्जंतुकीकरण व स्वच्छता करावी.
सदर रुम पुढ24 तासाकरिता रिकामी ठेवण्यात यावी व इतर कोणालाही त्‍यामध्ये प्रवेश देण्यात ये नये. रुम रिकामी झाल्यानंतर तेथील टॉवेल व इतर कपडे बदलण्यात यावेत. हॉटेल, अतिथीगृह, लॉज या ठिकाणी वारंवार व परिणामकारक स्वच्छता करण्यात यावी विशेषत प्रसाधनगृह, हात धुण्याची जागा व पिण्याचे पाण्याचे ठिकाण इत्यादी. वारंवार संपर्कात येणारे लिफ्टचे बटन, दाराचे हॅन्‍डल, कडी, बेंचेस इत्यादीचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. याकरिता 1 टक्के सोडिअम हायपोक्लोराइटचा वापर करावा.
नियमित कालांतराने प्रसाधनगृहांची पूर्णत: स्वच्छता करण्यात यावी. अतिथी, ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांचे वापरलेले मास्क हातमोजे इत्यादीची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी. इमारतीत जर एखादा संशयत किंवा पुष्टी झालेला आजारी व्‍यक्‍ती, रुग्ण आढळला तर त्‍यास इतरांच्‍या  संपर्कापासून अलिप्‍त ठेवण्‍यात यावे. नजिकच्‍या आरोग्‍य यंत्रणेस त्‍याबाबत अवगत करावे किंवा जिल्‍हा हेल्‍पलाईन क्रमांकावर संपर्क करावा. अशा प्रकरणी नियुक्‍त केलेल्‍या सार्वजनिक आरोग्‍य प्राधिकरणाद्वारे जोखमीचे मुल्‍यांकन करुन प्रकरणात त्‍यानुसार पुढल कार्यवाही करावी. जर एखादी व्‍यक्‍ती संक्रमित झाल्‍याची पुष्टि झाल्‍यास सर्व इमारतीचे निर्जतुकीकरण करण्‍यात यावे.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्‍यात येईल व कारवाई करण्‍यात येईल. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना सद्हेतुने केलेल्‍या कृत्‍यासाठी कुठल्‍याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुद्ध कुठल्‍याही प्रकारची कायदेशर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 7 जुलै 2020 रोजी  निर्गमित केला आहे.
0000


वृत्त क्र. 624   
परराज्यातील कामगारांना स्वत:च्या राज्यात
जाण्याची इच्छा असल्यास त्यांनी नोंदणी करावी
नांदेड (जिमाका), दि. 8 :- परराज्यातील कामगारांना आपापल्या राज्यात परत जाण्याची इच्छा असेल त्यांनी http://migrant.mahabocw.in/migrant/form या संकेतस्थळावर नोंदणी करावी. देशाच्या विविध राज्यातून महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेल्या परराज्यातील कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने हे संकेतस्थळ निर्माण केले आहे.
याबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी महाराष्ट्राचे कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दि. 16 जून 2020 रोजी आदेश निर्गमीत केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कामगार अधिकाऱ्यांची या कामासाठी नियुक्ती केली आहे. नांदेड जिल्ह्यातील परराज्यातील कामगारानी त्यांच्या अडचणी संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, शिवाजी नगर, औद्योगिक वसाहत उद्योग भवन, नांदेड दूरध्वनी क्र. 02462-254764 (Emailid-aclnanded@gmail.com) यावर संपर्क साधावा, असे आवाहन नांदेडचे सहाय्यक कामगार आयुक्त मोहसिन. अ. सय्यद यांनी केले आहे.
00000

वृत्त क्र. 623


शालेय शिक्षण मंत्री
प्रा. वर्षा गायकवाड यांचा दौरा
नांदेड (जिमाका), दि. 8 :- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 9 जुलै 2020 रोजी मुंबई येथून विमानाने दुपारी 2.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व सोयीनुसार नांदेड येथून हिंगोलीकडे मोटारीने प्रयाण करतील.
00000

Tuesday, July 7, 2020


वृत्त क्र. 619   
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते
लेंडी प्रधान प्रकल्प संपादित घरमालकांना मावेजाचे वाटप
नांदेड (जिमाका) दि. 7 :-  भुसंपादन प्रस्‍ताव लेंडी प्रधान प्रकल्‍प ( जुने गावठाण) वार्ड क्र. 1 ते 8 बुडीत क्षेत्रासाठी मुखेड तालुक्यातील मौजे मुक्रमाबाद येथील संपादित घराचा मावेजा 6 जुलै  2020 रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील  नियोजन भवन येथे वाटप करण्यात आला.  भुसंपादन प्रकरणात एकुण (1659) खातेदार असुन  11  घरमालकांना मावेजाचे वाटप करण्‍यात आले आहे. रमेश हुलाजी कांबळे,   केरबा मष्‍णाजी कांबळे, बंडु मष्‍णाजी कांबळे,  देविदास मष्‍णाजी कांबळे, आनंदा मष्‍णाजी कांबळे,  खंडु कडेप्‍पा काबंळे,  सुभाष कोंडीबा कांबळे, माधव नामदेव इंदुरे, नामदेव माधव  इंदुरे, अशोक भुमन्‍ना भुरुळे, सुमनबाई काशीनाथ खलुरे यांना मावेजाचे धनादेश वाटप करण्यात आले.                                                          
यावेळी आमदार तुषार राठोड, जिल्‍हाधिकारी विपीन इटनकर, जिल्‍हाधिकारी किनवट अभिनय गोयल,  निवासी उपजिल्‍हाधिकारी सचिन खल्‍लाळ, उपजिल्‍हा निवडणुक अधिकारी, प्रशांत शेळके, उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी  शक्‍ती कदम, उपजिल्‍हाधिकारी भुसंपादन लसिका संतोषी देवकुळे, कार्यकारी अभियंता देगलुर लेंडी प्रकल्‍प विभाग रा.मा. देशमुख, तहसीलदार मुखेड काशीनाथ पाटील, तहसीलदार वैशाली पाटील, अव्‍वल कारकुन लक्ष्‍मण व्हि. टेकाळे , मंडळ अधिकारी एस.एस. साले, डी. डी. धांडे, आठवले व्हि. एस. तसेच मुक्रमाबाद येथील माजी सरपंच शिवराज आवडके, सुरेश पंदिलवार,  सुभाष अप्‍पा बोधने, गंगाधर वटटमवार, तलाठी ज्ञानेश्‍वर रातोळीकर, ग्रामसेवक पांडुरंग नागेश्‍वर व प्रतिष्‍ठीत नागरीक आदी उपस्थित होते.
                                                              00000


वृत्त क्र. 618   
 पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी
निकषांमध्ये योग्य तो बदल करणे आवश्यक
     -                  पालकमंत्री अशोक चव्हाण  

नांदेड (जिमाका) दि. 7 :- इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमासाठी पात्र होण्याचे प्रमाण हे अत्यल्प प्रमाणात आहे. नांदेड जिल्हा हा हमखास पडणाऱ्या पावसाच्या क्षेत्रात मोडत जरी असला तरी अलिकडच्या काळात पर्यावरणातील बदलामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतमाल नुकसानीचे प्रमाण हे पिक विमा कंपन्याच्या निकषापलिकडचे आहेत. या सर्व गोष्टीचा सारासार विचार करुन जिल्ह्यातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना अधिकाधिक पिक विमा योजनेचा लाभ कसा मिळेल याचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
कृषि विभाग व सहकार विभागाच्या जिल्ह्यातील विविध योजनांची व सद्यस्थितीची आढावा बैठक पालकमंत्री अशोक  चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, गणपतराव तिडके आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात यावर्षी सोयाबिन व कापूस पिकाची शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात पेरणी केली.  यात अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबिन बियाणांची उगवण कमी झाल्याने संबंधित बियाणे कंपनी विरुद्ध गुन्हे दाखल करुन तेवढ्यावर थांबता येणार नाही. या बियाणे कंपन्यांनी स्वत:हून पुढे येत शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देणे अपेक्षित आहे. यासाठी शासनस्तरावरुन जर काही हस्तक्षेप करावा लागला तर जिल्हा प्रशासनाने तो वेळेवर करुन शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.
कृषि विभागाच्या विविध विषयाचा त्यांनी तपशीलवार आढावा घेतला. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांची कमतरता होऊ नये, यासाठी कृषि विभागाने दक्षता घ्यावी. बँकांकडून शेतकऱ्यांना वेळेत पिक कर्जाचे वाटप होणे गरजेचे असून त्यात शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. 
बैठकीत जिल्ह्यातील पर्जन्यमान, पेरणी क्षेत्र, बियाणे व खत उपलब्धता, पिक कर्ज वाटप, शेतमालाची हमी भावाने खरेदी आदीं विषयाचा आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी घेतला. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी जिल्ह्यात सोयाबिन पिकाची 3 लाख 8 हजार 4 हेक्टर व कापूस पिकाची 1 लाख 93 हजार 441 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीन पिकामध्ये उगवन कमी झाल्याने 11 हजार 53 एवढ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात 15 ते 16 हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागणार आहे. यातील बहुतांश क्षेत्रावर पेरणी सुरु झाली असून कापूस, तूर, मुग व इतर पिकांची बियाणे बाजारात उपलब्ध आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
000000

वृत्त क्र. 617


दोनशे खाटांचे नवीन हॉस्पिटल व सी.टी.स्कॅन विभागाचे
ना. अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण
नांदेड जिल्हावासियांसाठी अद्ययावत वैद्यकिय संकुल निर्माण करण्याचा मानस
-         पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड (जिमाका) दि. 7 :-  नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक अद्यावत असे जिल्हा रुग्णालय संकुल निर्माण करण्याचा माझा मानस आहे. याचाच एक भाग असलेल्या 200 खाटांच्या नविन हॉस्पिटलचे लोकार्पण करतांना मला मनस्वी आत्मिक समाधान असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकिय रुग्णालय येथील 200 खाटांच्या अद्ययावत बाह्यरुग्ण विभागाच्या इमारतीचे व सी. टी. स्कॅन विभागाचे लोकार्पण आज त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
शासकिय निमयामांच्या अंतर्गत निवडक उपस्थितीत छोटेखानी झालेल्या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर,  महापौर सौ. दिक्षा धबाले, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे आदि मान्यवर उपस्थित होते.
नांदेड येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या इतर इमारती या अत्यंत जीर्ण झाल्या असून याचा कायापालट करणे आवश्यक झाले आहे. जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेत सहाय्यभुत ठरणारे येथील नर्सींग कॉलेज व इतर विभागांना चांगल्या इमारतीची गरज आहे. हे लक्षात घेता आजच्या घडिला जिल्हा रुग्णालय परिसरात उपलब्ध असलेल्या जागेवर लवकरच अद्ययावत वैद्यकिय सुविधांचे एकत्रित संकुल लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. याठिकाणी सी. टी. स्कॅन विभागाचीही अत्यंत गरज होती. ती गरज लक्षात घेऊन या 200 खाटाच्या ओपीडीसह हा सी. टी. स्कॅन विभागही जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांच्या आरोग्य विषयक गरजा पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवीन उभारण्यात आलेल्या या इमारतीची स्वच्छता व येथील उपकरणांची निगा ही तितक्याच गुणवत्तापूर्ण पद्धतीने घेतली पाहिजे. शासन जनतेच्या सुविधेसाठी चांगल्या वास्तू निर्माण करते मात्र कालांतराने त्याठिकाणी स्वच्छता व निगा याबाबत फारशी काळजी घेतल्या जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त करुन या नवीन वास्तुच्या स्वच्छतेबद्दल योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले.       
कोरोना आपत्तीमुळे जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करुन त्यांना जनतेच्या सेवेत तत्पर ठेवणे हे अतिशय महत्वाचे झाले आहे. यासाठी येत्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकटीकरण, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी 41.54 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 5 कोटी 28 लक्ष 66 हजार रुपये एवढा निधी किनवट आणि माहूर तालुक्यातील आदिवासी भागात आरोग्य सेवा बळकटी करणासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  
या नवीन 200 खाटांच्या रुग्णालयात प्राथमिक तपासणी, पॅथॉलॉजी विभाग, क्ष किरण विभाग, ओपीडी, इंजेक्शन आणि ड्रेसिंग, डायलेसीस, औषध भांडार, महानगर ब्लड बँक, फिजिओ थेरपी, प्रतिक्षागृह आदि अद्ययावत वैद्यकिय सुविधा अंतर्भूत केल्या आहेत.
सद्यस्थितीत कोरोनाचे आव्हान लक्षात घेता ही नवीन 200 खाटांचे इस्पितळ कोविडसाठी उपयोगात आणले जाणार आहे.    
00000

मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ #जलसंधारणदिन #वॉकेथॉन२०२६ #वॉकफॉरवॉटर #रीलस्पर्धा #WalkForWater #WaterConservationDay...