Saturday, November 2, 2019


अल्पसंख्याक प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचे
ऑनलाईन अर्ज करण्यास 15 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
नांदेड दि. 2 :- अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार  सन 2019-2020   साठी अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनचे ऑनलाईन  अर्ज  भरण्याची प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत होती. परंतु आत्ता शुक्रवार 15नोव्हेंबर 2019 पर्यंत ऑनलाईन  अर्ज  पर्यंत भरता येतील.  
          सन 2019-20 या वर्षासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे  केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर अर्ज केवळ ऑनलाईन भरावयाचे आहेत. सन 2019-20  यावर्षी रीनिवल व फ्रेश विद्यार्थ्यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे. याबाबत सर्व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी व जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (मा.)  नांदेड यांनी केले आहे. 
00000


विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना
डॉ. आंबेडकर मॅट्रीकपूर्व ; मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती  योजना  
नांदेड दि. 2 :- भारत सरकारच्या डॉ. आंबेडकर मॅट्रीकपूर्व व मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ नांदेड जिल्हयातील पात्र विद्यार्थ्यांना करुन देण्यासाठी शासनमान्य शाळांनी प्रयत्न करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी संयुक्त केले आहे.  
विमुक्त जाती भटक्या जमाती (DNT) व इतर मागास प्रवर्गातील गरीब कुटुंबातील मुलांमध्ये शिक्षणाचे प्रमाणे वाढावे यासाठी केंद्र शासनाने भारत सरकारची डॉ. आंबेडकर मॅट्रीकपूर्व व मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना राज्यात इयत्ता 1 ते 10 वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यास शासन निर्णय 27 मे 2019 नुसार मान्यता दिली आहे.
            या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ पुढील अटी व शर्ती पुर्ण करणा-या विद्यार्थ्यांना अनुज्ञेय राहील. शासनाच्या मान्यता प्राप्त शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांस या योजनेचा लाभ मिळेल. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकाची उत्पन्न मर्यादा 2 लाख व इतर मागास प्रवर्गाकरीता 2 लाख 50 हजार  वार्षिक इतकी राहील. विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास शिष्यवृत्ती बंद करण्यात येईल. शिष्यवृत्ती मिळण्यासाठी विद्यार्थ्याने तो शिकत असलेल्या शाळेमार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक राहील. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांस अन्य मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही. शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक वर्षातील एकूण 10 महिन्यासाठी लागु राहील. एकदा मंजूर झालेली शिष्यवृत्तीचे पूढील शैक्षणिक वर्षामध्ये नुतनीकरण करण्यात येईल तथापी मागील शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची किमान उपस्थिती 60 टक्के नियमित असणे अनिवार्य राहील. शिष्यवृत्ती मंजूर रक्कम विद्यार्थ्यांचा आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येईल. विजाभज (डीएनटी) साठी आवश्यक निधी केंद्र हिस्सा 75 टक्के व राज्य हिस्सा 25टक्के असा राहील व इतर मागास प्रवर्गासाठी केंद्र हिस्सा 50 टक्के व राज्य हिस्सा 50 टक्के असा राहील.
डॉ. आंबेडकर मॅट्रीकपूर्व योजनेंतर्गत शिष्यवृत्तीचे दर पुढील प्रमाणे राहतील. इयत्ता 1 ते 8 वी पर्यंत प्रतीमाह शंभर रुपये. इयत्ता 9 ते 10 वी पर्यंत प्रतीमाह 150 रुपये. डॉ. आंबेडकर मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती (निर्वाह भत्ता) दर पुढील प्रमाणे राहतील. (विजाभज).- सुरवातीला गट (कंसात वसतिगृहात राहणाऱ्यांसाठी रक्कम) तर कंसाबाहेर वसतिगृहात न राहणाऱ्यांसाठी रक्कम  1 मधील अभ्यासक्रमातील विद्यार्थी (रु. 1 हजार200) रु. 550. 2 मधील अभ्यासक्रमातील विद्यार्थी ( रु. 820) रु. 530. 3 मधील अभ्यासक्रमातील विद्यार्थी(रु. 570) रु. 300. 4 मधील अभ्यासक्रमातील विद्यार्थी  (रु. 380)  रु. 230 दर याप्रमाणे राहतील.
इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे दर पुढील प्रमाणे राहतील. शिष्यवृत्तीचे दर (प्रतीमाह) व तदर्थ अनुदान (वार्षिक) योजना अनिवासी- 1 ते 10 वी पर्यंत शंभर रुपये, निवासी- इयत्ता तीसरी ते दहावीमध्ये पाचशे रुपये राहील.  
या योजनेचा लाभ नांदेड जिल्हयातील विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त करुन देण्यासाठी शासन मान्यताप्राप्त शाळांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी संयुक्त केले आहे.
00000


बागायतदारांनी ठिबक, तुषार सिंचनाचा
वापर करण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन
               नांदेड दि. 2 :- सिंचन प्रकल्पातील जलाशयाच्या उपसा साठ्यावरील कमांड क्षेत्रातील ऊस, केळी आणि फळबागा सारख्या बारमाही पिकांना सुक्ष्म सिंचन पध्दती लागु आहे. सर्व बागायतदारांनी / लाभधारकांनी ठिबक व तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाच्यावतीने  नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) नांदेडचे कार्यकारी अभियंता एन. पी. गव्हाणे यांनी केले आहे.
               राज्य शासनाचे पत्र 8 ऑगस्ट 2019 व महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण ठराव क्र. 42 दि. 20 मे 2019 अन्वये बारामाही पिकांसाठी ठिबक व तुषार सिंचन यासारख्या सुक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर सक्तीचे करण्याबाबत आदेश प्राप्त झाले आहेत.
              नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) नांदेड अंतर्गत शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प, आमदुरा उच्च पातळी बंधारा, बळेगाव उच्च पातळी बंधारा, बाभळी उच्च पातळी बंधारा व मध्यम प्रकल्पावरील उपसाद्वारे सिंचन करणाऱ्या सर्व बागायतदारांना व लाभधारकांनी शासनाच्या आदेशानुसार व महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण ठराव क्र. 42  दि.20 मे 2019 अन्वये बारामाही पिकांसाठी (ऊस, केळी, फळबाग इत्यादी) केवळ ठिबक व तुषार सिंचन पध्दतीने होणाऱ्या सिंचनास पाणी उपसा करण्याची परवानगी आहे. त्यामुळे उपसा पध्दतीने पाणी घेऊन सुक्ष्म सिंचन किंवा तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करण्यात यावा. ज्या बागायतदाराने, लाभधारकाने ठिबक किंवा तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब केला नाही अशा बागायतदार, लाभधारकांची उपसा परवानगी तात्काळ रद्द करण्यात येईल. सर्व बागायतदारांनी / लाभधारकांनी ठिबक व तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाच्यावतीने  नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) नांदेडचे कार्यकारी अभियंता एन. पी. गव्हाणे यांनी केले आहे.  
00000



पालकमंत्री रामदास कदम यांचा नांदेड दौरा
              
नांदेड दि. 2 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
               शनिवार 2 नोव्हेंबर 2019 रोजी औरंगाबाद विमानतळ येथून रात्री 10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.
               रविवार 3 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नांदेड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीची नुकसानीची पाहणी. त्यानंतर सायंकाळी 5 वा. औरंगाबादकडे शासकीय वाहनाने प्रयाण करतील.
00000

Thursday, October 31, 2019



पदवीधर मतदारांची नोंदणी अधिक प्रमाणात करा
कोणताही पात्र पदवीधर मतदार मतदानापासून वंचित राहू  नये
                                                  - विभागीय आयुक्त  सुनिल  केंद्रेकर
औरंगाबाद, दि-31:  05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याची अंतिम मुदत सहा नोंव्हेंबर आहे. त्यामुळे  कोणताही पात्र पदवीधर मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी विभागातील प्रत्येक पदनिर्देशित  निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील पदवीधर मतदारांची जास्तीत जास्त प्रमाणात नोंदणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी सुनिल  केंद्रेकर यांनी  संबंधीतांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी सुनिल  केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांचेसाठी "पदवीधर मतदारसंघ निवडणूक" प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी उदय चौधरी ,उपायूक्त वर्षा ठाकूर, पराग सोमण,अप्पर जिल्हाधिकारी भानूदास पालवे, अविनाश पाठक यांनी  पदवीधर मतदारांची नोंदणी संदर्भात मार्गदर्शन केले. तर उपजिल्हाधिकारी श्री.अरगुंडे आणि शिवाजी शिंदे यांनी पदवीधर मतदार संघासाठी पात्र मतदारांची नोंदणी करावयाचा कार्यक्रमासंबंधी सादरीकरणाव्दारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच उपजिल्हाधिकारी पी.आर.कुलकर्णी यांनी प्रशिक्षणाचा समारोप केला.
यावेळी, मतदारांच्या नोंदणीसाठी प्राप्त अर्जांवर तात्काळ अचुक व गतीने निर्णय घेऊन त्याची संगणक प्रणालीवर नोंद घ्यावी. त्याबाबतचा अहवाल वेळेवर सादर करण्याची सूचना यावेळी केंद्रेकर यांनी केली.
जिल्हाधिकारी श्री. चौधरी  यांनी पदवीधर मतदारांची यादी अद्ययावत करून नवीन पात्र मतदारांची अचुकपणे नोंदणी करण्याच्या कामास गती देण्याची सुचना केली. सर्व अधिकाऱ्यांनी नमुना नं. 18 नुसार दाखल अर्जाची कसून तपासणी करावी व मुळ अभिलेख्यांशी ती माहिती पडताळून घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच श्रीमती ठाकूर यांनीही सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील  सर्व शासकीय कार्यालये, सर्व विद्यापीठे येथील पदवीधर मतदार नोंदणीला प्राधान्य द्यावे व अधिकाधिक पदवीधर मतदारांची नोंदणी करुन लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची सुचना केली.
       मतदार नोंदणी नियम १९६० अंतर्गत नियम ३१ (३) अन्वये महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी पात्र मतदारांची नोंदणी करावयाचा कार्यक्रम  ०१ ऑक्टोबरपासून जाहीर झाला आहे. मतदार नोंदणीसाठी एक ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर या कालावधीत पात्र पदवी अहर्ता, पात्र तत्सम अर्हता व्यक्तींना नमुना नं.१८ मध्ये मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येईल. अर्जाचा नमुना तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विनामुल्य उपलब्ध आहे. या नोंदणीसाठी एक नोव्हेंबर २०१९ या अर्हता दिनांकापूर्वी किमान तीन वर्ष अगोदर पात्र पदवी अर्हता अथवा तत्सम पात्र पदविका इ. धारण करणा-या व्यक्तींना अर्ज करता येणार आहे. नमुना १८ च्या अर्जासह मूळ कागदपत्रे अथवा राजपत्रित अधिका-याकडून सांक्षांकित केलेल्या सत्यप्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार ज्या ठिकाणी अर्ज करेल त्या ठिकाणचा सामान्यत: रहिवासी असावा. अर्जासोबत पदवी , पदविका परीक्षेचे अंतिम गुणपत्रक देखील ग्राह्य धरले जाईल. मात्र, गुणपत्रकान्वये सदर व्यक्ती पास किंवा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणित झाले असले पाहिजे.
शासकीय कार्यालयात सामाजिक उपक्रमामध्ये काम करणा-या व्यक्तीच्या अर्हताबद्दल संस्थेकडील अभिलेख पाहून कार्यालय प्रमुखांना मतदार नोंदणीसाठी विहित नमुन्यात प्रमाणपत्र देता येईल. तसेच विद्यापीठांकडील पदवीधारकांची नोंदणी, अभियंत्यांची नोंदणी, विधी अभिकर्त्याची नोंदणी, वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी , सनदी लेखापालांची नोंदणी आदी नोंदणीबाबतचा दाखला अर्जासोबत अर्हतेबाबत पुरावा म्हणून देता येईल. तसेच राजकीय पक्ष संघटना अथवा कोणत्याही व्यक्तीस एका गठ्ठा अर्ज मिळणार नाहीत, तसेच एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारलेही जाणार नाहीत. मात्र, एका कुटुंबासाठी अथवा कार्यालय प्रमुख अथवा संस्थेस त्यांच्या कार्यालयातील कर्मचा-यांसाठी अर्जाची एकत्रित मागणी करता येईल व एकत्रित अर्ज सादर करता येतील.
                           प्राप्त मतदारांची प्रारूप यादी २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येऊन २३ नोव्हेंबर ते नऊ डिसेंबरपर्यंत संबंधितांना दावे, हरकती नोंदविता येतील. दिनांक ३० डिसेंबर रोजी मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.यावेळी  उपस्थित उपजिल्हाधिकारी,तहसीलदार यांच्या शंकाचे निरसन करण्यात  आले.
                                           000000000000

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या
 मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचे आवाहन
नांदेड दि. 31 :- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव समावेश करण्याबाबत सर्व पदवीधरांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
यापूर्वी मतदार यादीत नाव असेल ती यादी सदर निवडणुकीत वैध नाही. कुठलाही शाखेचा पदवीधर किंवा डिप्लोमा 1 नोव्हेंबर 2016 पूर्वीचा असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधीत तहसिल कार्यालयात संपर्क साधावा.  
अर्ज करण्याची शेवटचा दिनांक 6 नोव्हेंबर 2019 असून अर्जासोबत कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती पदवी किंवा डिप्लोमा, रहिवासी दाखला, मतदान ओळखपत्र / आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज नि:शुल्क उपलब्ध आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.    
0000


उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कारासाठी
सुक्ष्म, लघू उद्योगांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 31 :- जिल्ह्यातील लघु उद्योजकांकडून सुक्ष्म व लघु उद्योग घटकांसाठीच्या उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सन 2019 या वर्षासाठी शनिवार 30 नोव्हेंबर 2019 अखेर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी कळवले आहे.
उद्योग संचालनालयाच्यावतीने सन 1984 पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर दोन उत्कृष्ट सुक्ष्म व लघु  उद्योगांना पुरस्कार दिले जातात.  सन 2006 पासून प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे  15 हजार व 10 हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात येते.
जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाच्या  वेळी,  उद्योग घटक मागील तीन वर्षापूर्वी पासून उद्योग आधार व एमएसएमई डेटा बँक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. कमीतकमी मागील सतत दोन वर्षापासून उत्पादन सुरु असावे. उद्योग घटकाने बँकेचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असावी. थकबाकीदार असू नये. उद्योग घटकास यापुर्वी कोणताही जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेला नसावा. महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राने विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे.  
नांदेड जिल्हयातील लघु उद्योजकांनी शनिवार 30 नोव्हेंबर 2019 पुर्वी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांच्याकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग कार्यालयास संपर्क साधावा,  असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र ,नांदेड यांनी केले आहे.
000000


वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...