Wednesday, October 16, 2019


पदवीधर व शिक्षकसंघाच्या मतदार याद्या
नव्‍याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर
दावे हरकती स्विकारण्याची 6 नोव्हेंबर अंतिम मुदत
नांदेड दि. 16 :- पदवीधर व शिक्षकसंघाच्‍या मतदार याद्या नव्‍याने दिनांक 1 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनांकावर (Qualifying Date) आधारीत तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नांदेड तालुक्यातील 86 नांदेड उत्तर व 87 नांदेड दक्षिण मतदारसंघात पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्‍या मतदार यादीत नव्‍याने तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने पुढीलप्रमाणे कार्यक्रम जाहीर केला आहे.  
पुनरिक्षणाचे टप्पे व कालावधी पुढील प्रमाणे राहील. नमूना 18 किंवा 19 व्‍दारे दावे व हरकती स्‍वीकारण्‍यांचा अंतिम दिनांक बुधवार 6 नोव्‍हेबर 2019 आहे. हस्‍तलिखीते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई मंगळवार 19 नोव्‍हेंबर 2019. प्रारुप मतदार यादयांची प्रसिध्‍दी शनिवार 23 नोव्‍हेंबर 2019 ते सोमवार 9 डिसेंबर 2019 आहे. दावे व हरकती निकाली काढण्‍याचा दिनांक व पुरवणी गुरुवार 26 डिसेंबर 2019 असून मतदार यादीची अंतिम प्रसिध्‍दी सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2019 होणार आहे.
 भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनेनुसार नांदेड तालुक्‍यातील पदवीधर व शिक्षक  मतदारांना मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्‍वये पदवीधर व शिक्षक संघाच्‍या मतदार यादया नव्‍याने तयार करण्यासाठी जाहीर सूचना प्रसिध्‍द करण्‍यांत येत आहे. या प्रसिध्‍दी पत्रकात नमूद दिनांकापर्यंत सर्व पदवीधर व शिक्षक मतदारांनी आपले फॉर्म तहसिल कार्यालय नांदेड येथे जमा करावेत, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी केले आहे.
00000


स्तन कर्करोग सप्ताहाचे उद्घाटन,
जनजागृती कार्यक्रम संपन्न
नांदेड दि. 16 :-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्तन कर्करोग सप्ताहाचे येथील जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालयात जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन आज करण्यात आले.
याप्रसंगी अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष शिरसीकर यांनी स्त्रियांच्या मनामध्ये असलेला न्यूनगंड व भीती यामुळे ते डॉक्टरांकडून योग्य वेळी तपासणी न करून घेतल्यामुळे अशा प्रकारचे आजार बळावण्याची दाट शक्यता असते असे सांगितले.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन हजारी, स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुजाता राठोड व डॉ. सभा खान यांनी उपस्थित रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांना स्तन कर्करोगाबद्दल मार्गदर्शन केले. याचबरोबर श्यामनगर येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगेवार, डॉ. शिवकाशी धमले, डॉ. मोहिनी भोसीकर, डॉ. मुद्दम (बालरोगतज्ञ) हे उपस्थित होते. या कार्यक्रमास रुग्णालयीन अधिकारी , कर्मचारी तसेच रुग्ण व त्यांची नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी समुपदेशक सुवर्णकार सदाशिव यांनी परिश्रम घेतले.
0000


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक
क्ष‍ेत्रिय अधिकाऱ्यांची  
विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक  
नांदेड दि. 16 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी अरूण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) कलम 21 अन्वये मला प्रदान करण्‍यात आलेल्‍या अधिकाराचा वापर करून नांदेड जिल्‍ह्यातील 83-किनवट,  84-हदगाव, 85-भोकर,  86-नांदेड उत्‍तर,  87-नांदेड दक्षिण,  88-लोहा, 89-नायगाव,  90-देगलूर,  91-मुखेड अशा एकुण 9 विधानसभा मतदार संघामध्‍ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्‍या कामासाठी (322) क्षेत्रिय अधिकारी (Zonal Officer) यांची नियुक्‍ती केली आहे. त्यांना विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्र हद्दीपर्यंत दिनांक 19 ऑक्टोंबर 2019 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते दिनांक 21 ऑक्टोंबर 2019 पर्यंतच्‍या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक करून त्‍यांना  संहितेचे कलम 129, 133, 143 व 144 खाली अधिकार प्रदान केले आहेत. हा आदेश नांदेडचे जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी 16 ऑक्‍टोबर 2019 रोजी निर्गमीत केला आहे.   
00000


मतदान, मतमोजणीच्या  
अनुषंगाने दारु दुकाने बंद
नांदेड दि. 16 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून अनुसचित प्रकार घडू नये साठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4, एफएल/बीआर-2 व ताडी दुकाने (टिडी-1) अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत.
संपूर्ण नांदेड जिल्ह्यात मतदान संपण्यापूर्वी म्हणजे 48 तास अगोदर शनिवार 19 ऑक्टोंबर 2019 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून मतदानाच्या अगोदरचा दिवस रविवार 20 ऑक्टोंबर 2019 रोजी संपूर्ण दिवस तर मतदानाचा दिवस सोमवार 21 ऑक्टोंबर 2019 रोजी संपूर्ण दिवस अनुज्ञप्ती बंद राहतील. मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी (नांदेड मनपा हद्द व मनपा हद्दीलगत 8 किमीचा परिसर, नायगाव शहर, मुखेड, भोकर, हदगाव, लोहा, देगलूर, किनवट शहर व गोकुंदा ग्रामपंचायत हद्द) मतमोजणीचा दिवस गुरुवार 24 ऑक्टोंबर 2019 रोजी संपूर्ण दिवस अनुज्ञप्ती बंद राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000


   मी मतदान करणारच ....!
विद्यार्थ्यांचे प्रभावी पथनाट्य
नांदेड दि. 16 :- मतदान हे राष्ट्रीय कार्य असून प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे असे शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी "मी मतदान करणारच....!" या पथनाट्याद्वारे प्रभावीपणे आवाहन केले.
नांदेडच्या श्री विद्यानिकेतन पब्लिक स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती अभियानांतर्गत हे पथनाट्य सादर केले. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी नांदेड जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अनेक उपक्रम सुरु केले. त्यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत शाळेच्या मुलांनी  ग्रामीण भागातून आणि शहरातील काही भागात याचे सादरीकरण केले.
काल मरळक येथे हे पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी गावकरी ही यात सहभागी झाले होते. आई-बाबा, काका-काकू, भाऊ-वहिनी, मामा-मामी, आजी-आजोबा, अशा सर्वांना आपल्या पथनाट्यातून मतदानाचे महत्व अधोरेखित करीत मतदानाच्या राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे व लोकशाही बळकट करावी, असे आवाहन केले. तर अनेक जण या दिवशी सुट्टी समजून मतदान करत नाहीत अशांवर पथनाट्यातून मार्मिक टीका ही केली. या पथनाट्यात आरती मुळे, दीक्षा उनग्रतवार, साई मुळे, वैष्णवी शिंदे, तानाजी साखरे, मयूर सुपारे, हर्षद जाधव, राधिका पत्रे, शिवशंकर कदम, जान्हवी शर्मा, जगदीश होकर्णे, सिमरन कौर, वैष्णवी जाधव, साईस्वरूप बंडेवार, अर्णव गाईकवाड, साक्षी जाधव, तनयराज धर्माधिकारी, शरयू राठोड, मयुरी कदम, शंतनू गुरव, सिद्धी कदम,  समर्थ मुळे, पृथ्वीराज कदम, लब्धी सोनी, दुर्वा येरुळकर, शब्बीर शेख, सुकेश जाधव, नवदीप चिलगार, जान्हवी भुरे, वैष्णवी काळे,  यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सुरुवातीला मरळक गावातून मुलांनी मतदान जनजागृतीच्या घोषणा देत मोठी रॅली काढली, गावकऱ्यांनीही उस्फुर्त प्रतिसाद देत आमचं सगळं गाव मतदान करणारच असे आश्वासन देऊन मुलांच्या अभिनयाच कौतुक केले.
संस्थेच्या अध्यक्षा शितल पांडे, मुख्याध्यापिका पल्लवी निळेकर, मुख्याध्यापिका गीता शर्मा, शिक्षिका प्रमिला आठवले यांच्या सह शिक्षकांनी अत्यंत प्रभावीपणे विद्यार्थ्यांकडून या पथनाट्याचे सादरीकरण करून घेतले.
00000


वॉक फॉर वोट पदयात्रेत सहभागी हाण्याचे
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे आवाहन
नांदेड दि. 16 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता दि.21 ऑक्टोबर, 2019 रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. यासाठी मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती होण्यासाठी  वॉक फॉर वोट या पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
शुक्रवार, दि. 18 ऑक्टोबर, 2019 रोजी सकाळी 6-30 वाजता पदयात्रेचा मार्ग जुना मोंढा, महावीर चौक,वजिराबाद, एस.पी. ऑफिस, कलामंदिर, शिवाजी नगर, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा आय. टी.आय परिसर येथे समारोप करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000

Tuesday, October 15, 2019


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  
नांदेड, दि. 15 :- जिल्ह्यात बुधवार 30 ऑक्टोंबर  2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात बुधवार 16 ऑक्टोंबर 2019 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते बुधवार 30 ऑक्टोंबर 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...