Friday, July 5, 2019

सुधारीत वृत्त क्र. 438
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम
योजनेत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 5 :- पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग योजनेसाठी जिल्हयातील नवीन उद्योग व  सेवाउद्योग करणाऱ्या  सुशिक्षीत बेरोजगारांनी www.kvic.org.in या वेबसाईट पोर्टलवर  ऑनलाईन  अर्ज करण्याचे आवाहन,  महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत ऑक्टोबर 2008 पासून लागू करण्यात आली आहे. ही योजना 1 जुलै 2016 पासून ऑनलाईन करण्यात आली असून शहरी व ग्रामीण भागासाठी जिल्हा उद्योग केद्र व ग्रामीण भागासाठी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ आणि खादी ग्रामोद्योग आयोग या तीन यंत्रणामार्फत  राबविण्यात येते. सन 2019-2020 या आर्थिक वर्षासाठीचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे.
या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्याचे प्रमाण व स्वरुप :- सर्वसाधारण गटातील प्रवर्गात शहरी भागासाठी अनुदान 15  टक्के, स्वत:चे भागभांडवल 10 टक्के तर ग्रामीण भागासाठी (वीस हजार लोकसंख्येपेक्षा कमी) : अनुदान 25 टक्के, स्वत:चे भागभांडवल 10 टक्के राहील. तर अनु.जाती जमाती / इतर / मागासवर्गीय / अल्पसंख्याक / महिला / माजी सैनिक / अपंग आदी प्रवर्गात शहरी भागासाठी :-  25 टक्के अनुदान, स्वत:चे भाग भांडवल 5 टक्के, ग्रामीण भागासाठी (वीस हजार लोकसंस्येपेक्षा कमी ) : अनुदान 35 टक्के, स्वत:चे भाग भांडवल 5 टक्के राहील. पात्रता अर्जदाराचे वय 18 वर्षे असावे, अर्जदारास नमुद योजनेअंर्गत सहाय्यासाठी कौटुंबीक उत्पन्नाची अट नाही.  उद्योगाकरीता 10 लाख रुपयावरील प्रकल्प किंमतीसाठी व सेवा व्यवसायासाठी 5 लाखा रुपयावरील प्रकल्प किंमतीसाठी किमान आठवी उत्तीर्ण आवश्यक आहे. नवीन प्रकल्पासाठी स्वतंत्र सहायता गट, सहकारी सोसायट्या, उत्पादीत सह. सोसायटी, चॅरीटेबल ट्रस्ट यांना अर्थसहाय्य करण्यात येते. वैशिष्टये- सेवा व्यवसायासाठी रुपये 10 लाख कर्ज मर्यादा असून उद्योगासाठी रुपये 25 लाख कर्ज मर्यादा राहील. अपग्रेडेशन व एक्झीस्टींग युनिटसाठी आर्थिक सहाय्याचे प्रमाण व स्वरुप- सर्व प्रवर्गासाठी स्वत:चे भागभांडवल 10 टक्के, अनुदान (एकूण प्रकल्प किमंतीच्या) 15 टक्के (20 % in North East Region and Hill states) टिप उद्योगासाठी रु. 1.00 करोड कर्ज मर्यादा असून सेवा व्यवसायासाठी 25 लाख रुपये कर्ज मर्यादा राहील, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
0000

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ध्येय मोठे ठेवावे - उपजिल्हाधिकारी संदिप भस्के

नांदेड, दि. 5 :- विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना स्वत:चे ध्येय मोठे ठेवून  अभ्यास करावा असे, प्रतिपादन रिसोड येथील उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदिप भस्के यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने उज्ज्वल नांदेड मोहिमेअंतर्गत आयोजित आज एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
          या शिबीरात संदिप भस्के यांनी उपस्थिताना राज्य व्यवस्था व कायदे या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी पुणे येथील विशाल सुतार व जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांची प्रमुख उपस्थिती होती.  कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणा गीताने करुन प्रमुख पाहुण्याचे स्वागत ग्रंथ देऊन करण्यात आले.
            प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. ढोक यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार मुक्तीराम शेळके यांनी मानले. शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी प्रताप सुर्यवंशी, आरती कोकुलवार, बाळू पावडे, संजय कर्वे, के.एम.गाडेवाड, रघुविर यांनी सहाय्य केले.
00000

Thursday, July 4, 2019


वृक्षारोपणाची मोहिम जलदगतीने राबवा
औरंगाबाद, दि.4, (विमाका) :- पर्यावरणाच्या रक्षणाकरीता दि.1 जुलै 2019 पासून शासनाने 33 कोटी वृक्ष लागवडीची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत शासकीय यंत्रणेसह लोकांचासुध्दा सहभाग आहे. वृक्षरोपणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वृक्षारोपणाच्या मोहिमेला सर्वांनी गती द्यावी. ज्याठिकाणी वृक्षारोपण योग्य पाऊस झाला असेल (जमिनीमध्ये 20 सें.मी. ते 30 सें.मी.ओलावा असेल) अशा ठिकाणी त्वरीत लागवड कामे सुरू करावीत. यासाठी संबंधित जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, उपवनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी यांनी वेळोवेळी लागवड कामांचा आढावा घेऊन संबंधीतांचे अडचणींचे निराकरण करावे व आपल्या औरंगाबाद महसूल विभागातील वृक्षारोपण कामे गतिमान पध्दतीने आघाडीवर नेऊन उद्दिष्ट यशस्विरित्या पुर्ण करावे, असे विभागीय आयुक्त कार्यालयाने कळविले आहे. 
*****

पालकमंत्री रामदास कदम यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची शनिवारी बैठक



नांदेड, दि. 4 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांचे अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवार 6 जुलै 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवनाच्या मुख्य सभागृहात सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीस जिल्ह्यातील सर्व सन्माननिय खासदार, आमदार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...