Tuesday, May 14, 2019


कारागृहात निबंध स्पर्धेतील
बंद्यांना प्रमाणपत्राचे वाटप
 नांदेड दि. 14 :- स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई व रामचंद्र प्रतिष्ठान मार्फत नांदेड जिल्हा कारागृह येथे राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेचे आयोजन 16 एप्रिल रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत 30 न्याय बंद्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत सहभागी न्यायबंद्याना प्रमाणपत्राचे वाटप करुन समुपदेशन करण्यात आले.
या स्पर्धेत पारितोषीक विजेत्यामध्ये सावरकरांची त्रिखंडात गाजलेली उडी या विषयावर विजय राठोड यांना प्रथम क्रमांकाचे 2 हजार रुपये. सावरकरांचा सामाजिक सुधारणा कार्यक्रम विषयावर उत्तम आनंदा कोमवाड यांना द्वितीय क्रमांक 1 हजार 500 रुपये. बिरसामुंडा विषयावर प्रबोध मधुकर राठोड यांना तृतीय क्रमांकाचे 1 हजार रुपये. विशेष उल्लेखनीय बक्षिस प्रसेनजित उमाजी धमसे यांना 750 रुपये, उत्तेजनार्थ विठ्ठल मारोतराव गोरकट्टे, दिनेश दिगांबर सोनसकर, ज्योती प्रभाकर कोकणे, सचिन चंद्रमणी लोणे, श्रीकांत साहेबराव भोसले यांना 500 रुपये व निबंध स्पर्धेत सहभागी इतर सर्व न्यायबंद्याना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रभारी कारागृह अधीक्षक उत्तरेश्वर गायकवाड तसेच तुरुंगाधिकारी बलभीम माळी, के. एम. वारगे यांनी बंद्यांचे समुपदेशन करुन अभिनंदन केले.  
000000

Monday, May 13, 2019


जिल्हाधिकारी कार्यालयात
          आज पेन्शन अदालत
नांदेड, दि. 13 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 14 मे 2019 रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे.   
जिल्ह्यामधील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्यासाठी मंगळवार 14 मे 2019 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत उपस्थित राहून तक्रारीचे निवेदने दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
0000



मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक
बुधवारी बचत भवन येथे आयोजीत  
 नांदेड दि. 13 :- पावसाळा नैसर्गिक आपत्तीच्यावेळी करावयाच्या कार्यवाहीबाबत मान्‍सून-2019 ची जिल्‍हास्‍तरीय पूर्वतयारीची आढावा बैठक बुधवार 15 मे 2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आली.
पावसाळयात उद्भवणाऱ्या विविध आपत्तींना तोंड देण्‍यासाठी आणि सावधगिरीच्‍या उपाययोजनांची पूर्वतयारी करण्‍यासाठी या बैठकीचे आयोजन करण्‍यात आले आहे. बैठकीस जिल्ह्यातील संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहे. 
000000

Saturday, May 11, 2019


मुख्यमंत्र्यांनी साधला धुळे जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद
मनरेगामधून जलसंधारण, मृदसंधारणासह
विविध नवीन 28 प्रकारच्या कामांना मान्यता
                                   - दुष्काळी भागात मनरेगाच्या कामांना गती देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुंबई, दि. 11: राज्यात मनरेगा योजनेतून जलसंधारण, मृदसंधारणासह शाळा कंपाऊंड बांधकामासारखी विविध 28 प्रकारची कामे एकत्रिकरणातून (कन्व्हर्जन्स) करण्यास मान्यता देण्यात आली आहेत. त्यामुळे गावात दुष्काळाच्या काळात मनरेगाची कामे करुन रोजगार निर्मितीबरोबर गावांमध्ये दुष्काळनिवारणासह विविध लोकोपयोगी कामांची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुळे जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधताना केले. प्रशासनानेही मनरेगाच्या कामांची मागणी येताच त्याला विनाविलंब तीन दिवसाच्या आत मान्यता द्यावी, अशा सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या.   
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज 'ऑडीओ ब्रीज सिस्टम'द्वारे धुळे जिल्ह्यातील साधारण 45 सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. तसेच गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचाही सहभाग होता. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल, त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
गावांची 2018 ची लोकसंख्या व जनावरांची संख्या लक्षात घेवून आवश्यक अतिरिक्त टॅंकर व जनावरांना मागणीनुसार तात्काळ चारा उपलब्ध करुन द्यावा. बंद पडलेल्या योजनाही विशेष दुरुस्ती योजनेमधून सुरु करुन गावकऱ्यांना टंचाईच्या काळात तातडीचा दिलासा देता येईल, मागणी येताच तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी विनाविलंब असे प्रस्ताव मान्य करावेत,जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तक्रारींची नोंद घेऊन कार्यवाही करावी व तसा अहवाल आपणास सादर करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यानी  यावेळीदिल्या.
पाणीसाठ्यांचे पहिले प्राधान्य पिण्याच्या पाण्याला
जिल्ह्यांमधील पाणीसाठे हे प्रथमत: पिण्याच्या पाण्यासाठी आहेत. त्यामुळे कोणी बेकायदेशीररित्या पाण्याचा उपसा करत असेल तर त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. पिण्याच्या पाण्यासाठी निधी तसेच आवश्यक तेथे बोअरवेलची संख्या वाढविण्यात यावी.जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे आणि आवश्यकतेनुसार जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात, टंचाईनिवारणाच्या तातडीच्या उपाययोजनांवर 48 तासांच्या आत कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
धुळे जिल्ह्यांतील मधुकर पाटील, वालचंद पवार, विलास शिंदे, गुलाब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, मीराबाई पाटील, योगेश पाटील, महादू राजपूत, बाळासाहेब रावल आदी सरपंचांशी मुख्यमंत्र्यांनी मोबाईलवरुन थेट संवाद साधला.
यावेळी मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, जलसंधारण आणि रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, पदुम विभागाचे सचिव अनुपकुमार, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दुष्काळ निवारणासाठी धुळे जिल्ह्यात करण्यात आलेल्या उपाययोजना
    धुळे जिल्ह्यामध्ये खालील 3 तालुक्यामध्ये टॅंकर सुरु आहे.
तालुक्याचे नाव
टॅंकरची संख्या
1. सिंदखेडा
16
2. धुळे
11
3. साक्री
4
एकूण
31

· सिंदखेडा तालुक्यात सर्वात जास्त 16 टॅंकर सुरु असून साक्री तालुक्यात सर्वात कमी 4 टँकर सुरु आहेत.
· पिण्याच्या पाण्याचा टंचाई निवारणार्थ आजअखेर धुळे जिल्ह्यांतील एका नळ पाणीपुरवठा योजनेची विशेष दुरुस्ती करुन 9 तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करुन 145 विहिरीचे अधिग्रहण करुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे.
·पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची रु.3.36 कोटी इतकी विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आलेली आहे. सर्व नळ पाणीपुरवठांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
·धुळे जिल्ह्यांतील दुष्काळ घोषित केलेल्या 3 तालुक्यातील 451 गावातील 1 लाख 55 हजार 628 इतक्याशेतकऱ्यांनारु. 122.11 कोटीइतकीरक्कमवाटपकरण्यातआलीआहे.
· धुळे जिल्ह्यातील एकूण 29 हजार 247 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेतंर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसान भरपाईपोटी रु. 6.44 कोटी अदा करण्यात येणार असून त्यापैकी रु. 6.40 कोटी इतकी रक्कम 7 हजार 181 शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.
·प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत धुळे जिल्ह्यांतील 1.90 लक्ष शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 46 हजार शेतकऱ्यांना रु. 2000 /- प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण रु. 9.20 कोटी इतके अर्थसहाय देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे.
· महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत धुळे जिल्ह्यांत 1 हजार 733 कामे सुरु असून त्यावर 4 हजार 109 मजूर उपस्थिती आहे. सर्वात जास्त 1 हजार 379 मजूर सिंदखेडा तालुक्यात असून सर्वात कमी 664 मजूर उपस्थिती साक्री तालुक्यात आहे. जिल्ह्यामध्ये 13 हजार 899 कामे शेल्फवर आहेत.
000000



जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगरचा सीबीएससी
दहावी, बारावी परिक्षेचा शंभर टक्के निकाल
नांदेड, दि. 11 :- जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगरचा इयत्ता 10 वी व 12 वीसाठी मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय माध्यमिक बोर्ड सीबीएससी परिक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
या विद्यालयातून दहावीत 80 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. त्यात 90 टक्केच्यावर गुण घेऊन 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर 75 टक्केच्यावर गुण घेऊन 43 विद्यार्थी उत्तीर्ण व प्रथम श्रेणीत 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत. यात सानिका कदम ही विद्यार्थींनी 97.6 गुण घेऊन प्रथम, महेश करेवाड 96.4 द्वित्तीय, साईनाथ रेनीवाड 96.2 गुण तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
इयत्ता बारावी विज्ञान परिक्षेत एकुण 33 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. त्यात 90 टक्केच्यावर गुण घेतलेले तीन विद्यार्थी, 75 टक्केच्यावर गुण घेऊन 20 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत. त्यात सुरज देवापुरे हा विद्यार्थी 92.6 गुण घेऊन प्रथम, अतुले वाघमारे 90.4 गुण घेऊन द्वितीय तर विक्रम मस्कले 90.2 गुण घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
हे घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य हरिवरा प्रसाद व उपप्राचार्य यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तर या यशाबद्दल सर्व संबंधीत शिक्षकांना त्यांच्या योगदानाबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहे.
000000

Friday, May 10, 2019

जि.प. आणि पं.स.च्या पोटनिवडणुकांसाठी
17 मे रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
मुंबई, दि. 10 (रानिआ) : राज्यातील विविध 7 जिल्हा परिषदांमधील 9; तर 12 पंचायत समित्यांमधील 16 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार याद्या 17 मे 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या निवडणुकांकरिता 10 एप्रिल 2019 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 17 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून त्यावर 21 मे 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय अंतिम मतदार याद्या 27 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी तसेच मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 29 मे 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे,विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशी माहितीही श्री. सहारिया यांनी दिली.
पोटनिवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदनिहाय निवडणूक विभाग असे: रायगड- कळंब (ता. कर्जत), पुणे- बावडा-लाखेवाडी (इंदापूर), अहमदनगर- बारागाव नांदूर (राहुरी), हिंगोली- येहळेगाव तु. (कळमनुरी), वर्धा- झडशी (सेलू) व मांडगाव (समुद्रपूर), भंडारा- ब्रम्ही (पवनी) व पालांदपूर (लाखनी) आणि गोंदिया- आसोली (गोंदिया).
पोटनिवडणूक होणाऱ्या पंचायत समितीनिहाय निर्वाचक गण असे: पेण (जि. रायगड)- वडखळ, पालघर (पालघर)- खैरापाडा, हवेली (पुणे)- वाडेबोल्लाई, कागल (कोल्हापूर)- माद्याळ, देवळा (नाशिक)- महालपाटणे, चाळीसगाव (जळगाव)- मेहुणबारे, नेवासा (अहमदनगर)- सोनई, कर्जत (अहमदनगर)- कोरेगाव, केज (बीड)- आडस,बिलोली (नांदेड)- अटकळी, माहूर (नांदेड)- वाई बा, मुखेड (नांदेड)- जांब बु., औंढा ना. (हिंगोली)- असोला तर्फे लाख, गोरेगाव (गोंदिया)- घोटी, अर्जुनी मोरगाव (गोंदिया)- माहुरकुडा आणि हिंगणघाट (वर्धा)- वडनेर.
०-०-०

जिल्ह्यातील पाणी टंचाई संदर्भात आढावा
पाणी पुरवठा योजनेतील कामे तातडीने पूर्ण करा
-         जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 10 :- पाणी पुरवठा योजनेतील तीन लाखापर्यंतची कामे तातडीने 20 मे पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.   
जिल्ह्यातील पाणी टंचाई संदर्भातील उपाययोजनेबाबत आढावा जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांचेसह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  
श्री. डोंगरे म्हणाले, जिल्ह्यात मागणीनुसार टँकरच्या फेऱ्या पुर्ण करुन नागरिकांना वेळेवर शुद्ध पाणी मिळेल याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी. टंचाई काळात पाण्याअभावी कोणालाही त्रास होणार नाही यासाठी पाणी पुरवठ्यासह आवश्यक त्या उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात. जिल्ह्यात जलपुनर्भरणासारखी कामे मोठ्याप्रमाणे सुरु करुन पाणी आडवल्यास टंचाईग्रस्त भागातील पाणी प्रश्न हा कायमस्वरुपी सोडविण्यासाठी मदत होणार आहे. या कामांबाबत तालुकास्तरावर नियमित आढावा घेऊन संबंधीत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करावे. जिल्ह्यातील कुटुंबांचे स्थलांतर होणार नाही यासाठी रोहयो अंतर्गत कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात यावीत. यात प्रत्येक तालुक्यात  किमान एक हजार मजूर असली पाहिजेत. या मजुरांना मागणीनुसार कामे उपलब्ध करुन त्यांना वेळेवर मजुरी मिळेल यासाठी बँकेसह इतर आवश्यक माहितीची पडताळणी करुन घ्यावी. टंचाई निवारणासाठी नळ दुरुस्ती व तात्पुरती पुरक नळ योजनेतील कामे तातडीने पुर्ण करुन टंचाईग्रस्त भागाला दिलासा दयावा, असे निर्देश देऊन आवश्यक तेथे चारा छावणीची मागणी असल्यास त्यास मंजुरी दिली जाईल, असे श्री. डोंगरे यांनी यावेळी सांगितले.
 बैठकीत पर्जन्यमान, जलाशयातील पाणीसाठा, पाणी आरक्षण मागणी, टँकर व विहिर / बोअर अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा, नळ योजना दुरुस्ती, तात्पुरती नळ योजना, ग्रामीण व नागरी भागातील पाणी टंचाई, मनरेगा संदर्भातील कामांबाबत तालुकानिहाय आढावा घेऊन उपयुक्त सुचना देण्यात आल्या.
000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...