Friday, May 10, 2019


जिल्ह्यातील पाणी टंचाई संदर्भात आढावा
पाणी पुरवठा योजनेतील कामे तातडीने पूर्ण करा
-         जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 10 :- पाणी पुरवठा योजनेतील तीन लाखापर्यंतची कामे तातडीने 20 मे पर्यंत पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.   
जिल्ह्यातील पाणी टंचाई संदर्भातील उपाययोजनेबाबत आढावा जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांचेसह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  
श्री. डोंगरे म्हणाले, जिल्ह्यात मागणीनुसार टँकरच्या फेऱ्या पुर्ण करुन नागरिकांना वेळेवर शुद्ध पाणी मिळेल याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी. टंचाई काळात पाण्याअभावी कोणालाही त्रास होणार नाही यासाठी पाणी पुरवठ्यासह आवश्यक त्या उपाययोजना तातडीने पूर्ण कराव्यात. जिल्ह्यात जलपुनर्भरणासारखी कामे मोठ्याप्रमाणे सुरु करुन पाणी आडवल्यास टंचाईग्रस्त भागातील पाणी प्रश्न हा कायमस्वरुपी सोडविण्यासाठी मदत होणार आहे. या कामांबाबत तालुकास्तरावर नियमित आढावा घेऊन संबंधीत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करावे. जिल्ह्यातील कुटुंबांचे स्थलांतर होणार नाही यासाठी रोहयो अंतर्गत कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात यावीत. यात प्रत्येक तालुक्यात  किमान एक हजार मजूर असली पाहिजेत. या मजुरांना मागणीनुसार कामे उपलब्ध करुन त्यांना वेळेवर मजुरी मिळेल यासाठी बँकेसह इतर आवश्यक माहितीची पडताळणी करुन घ्यावी. टंचाई निवारणासाठी नळ दुरुस्ती व तात्पुरती पुरक नळ योजनेतील कामे तातडीने पुर्ण करुन टंचाईग्रस्त भागाला दिलासा दयावा, असे निर्देश देऊन आवश्यक तेथे चारा छावणीची मागणी असल्यास त्यास मंजुरी दिली जाईल, असे श्री. डोंगरे यांनी यावेळी सांगितले.
 बैठकीत पर्जन्यमान, जलाशयातील पाणीसाठा, पाणी आरक्षण मागणी, टँकर व विहिर / बोअर अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा, नळ योजना दुरुस्ती, तात्पुरती नळ योजना, ग्रामीण व नागरी भागातील पाणी टंचाई, मनरेगा संदर्भातील कामांबाबत तालुकानिहाय आढावा घेऊन उपयुक्त सुचना देण्यात आल्या.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...