Tuesday, April 9, 2019


नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचा अभिनव उपक्रम
आदर्श मतदान केंद्र ठरले प्रशिक्षणार्थ्यांचे आकर्षण केंद्र
नांदेड, दि. 8 :- प्रत्यक्ष मतदान केंद्र कसे असावे, मतदान केंद्रात प्रत्येक कर्मचा-यांचे स्थान कोठे असावे, मतदान प्रक्रियेचा क्रम काय असावा, प्रत्येक मतदान अधिका-यांचे कार्य काय व कसे चालते, परदानशीन स्त्रियांची ओळख कशी पटविल्या जाते, मतदान कक्ष कसे तयार करावे, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटचे मतदान केंद्रातील स्थान कोठे असावे, विविध फॉर्मस्‍ कसे भरले जातात, कोणकोणते लिफाफे कसे परिपूर्ण करतात, आक्षेपित मत कसे घेतले जाते, दिव्यांगासाठी कोणत्या सुविधा असाव्या आणि मतदान केंद्राध्यक्ष ते मतदान अधिकारी यांचे कार्य काय असते तसेच डमी मतदानाच्या माध्यमातून प्रक्रीया कशी चालते अशा विविध समस्यांच्‍या निवारणासाठी प्रशिक्षित मतदान अधिका-यांमार्फत आदर्श मतदार केंद्र 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाने दुस-या प्रशिक्षण सत्रात तयार करुन प्रशिक्षणार्थ्यांना अनुभवण्‍यास दिल्यामुळे आदर्श मतदार केंद्र प्रशिक्षणार्थ्यांचे आकर्षण केंद्र ठरले.
सोमवार 08 रोजी डॉ. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृहात नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघाचे दुसरे प्रशिक्षण संपन्‍न झाले. याच प्रशिक्षण स्‍थळी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत आदर्श मतदान केंद्राची उभारणी केली होती. हुबेहुब प्रत्‍यक्ष मतदान स्‍थळी जसे मतदान केंद्र उभारणी केल्‍या जाणार आहे, तंतोतंत तसेच मतदान केंद्र उभारले होते. मतदान केंद्राध्‍यक्ष व विविध मतदान अधिका-यांची नेमणूक करुन प्रशिक्षणार्थ्‍यांच्‍या सोयीसाठी डमी मतदान प्रक्रियाही घेण्‍यात आली.
या आदर्श मतदान केंद्रास जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे व उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके यांनी भेट दिली असता मतदान केंद्राची अत्‍यंत योग्‍य सुविधा, रांगेतून होत असलेले मतदान, प्रशिक्षित मतदान अधिकारी, केंद्राची केलेली योग्‍य उभारणी व रचना पाहून जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कौतुक करुन अभिनंदन केले.
या आदर्श मतदान केंद्रामुळे प्रशिक्षणार्थ्‍यांना प्रत्‍यक्ष मतदान केंद्राचा अनुभव घेता आला व अनेक शंकांचे निरसन झाल्‍यामुळे प्रशिक्षणार्थ्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले. या आदर्श मतदान केंद्रास एकूण 1 हजार 226 प्रशिक्षणार्थ्‍यांनी प्रत्‍यक्ष भेट देऊन कार्यपध्‍दती समजून घेतली. प्रशिक्षण काळात प्रथमच असे आदर्श मतदान केंद्र उभारणीची अभिनव कल्‍पना नायब तहसीलदार स्‍नेहलता स्‍वामी यांची असून अनुराधा ढालकरी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभल्‍यामुळे अनेक प्रशिक्षणार्थ्‍यांनी त्‍यांचे अभिनंदन केले. हे आदर्श मतदान केंद्र उभारणीसाठी सहायक जिल्‍हा पुरवठा अधिकारी जीवराज डापकर, प्रसाद कुलकर्णी तहसिलदार सामान्‍य, नायब तहसिलदार स्‍नेहलता स्‍वामी, विजयकुमार पाटे, संजय भालके, राजेश कुलकर्णी, दत्‍तात्रय झरीवाड, मो. मजहर खादर, रमेश स्‍वामी, एस. एन. गोस्‍केवार, लक्ष्‍मीकांत मोरे, श्रीमती शोभा माळवतकर, संजय कोठाळे, श्रीमती सारिका आचमे, संजय वाकोडे तथा सर्व मंडळ अधिकारी, तलाठी व कार्यालयीन कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. 
00000


Monday, April 8, 2019


मतदानाच्या तसेच अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिरातींबाबत आदेश
मुंबई, दि. 7 :- मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरूपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी व त्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध झाल्यास पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे प्रकार यापूर्वी झाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. अशा जाहिराती प्रसिद्ध झाल्यास प्रतिपक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नसून त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारे अन्याय होऊ शकतो. या बाबींना आळा घालण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने संविधानाच्या कलम 324 नुसार प्राप्त झालेले तसेच आयोगाला असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून हे आदेश काढले आहेत. त्यानुसार कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार,संघटना किंवा व्यक्तीला मतदानाच्या तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती नियमानुसार जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) करून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येणार नाही.
राज्यात पहिल्या टप्प्यात दि. 11 एप्रिल रोजी मतदान होत असून त्या अनुषंगाने दिनांक 10 व 11 एप्रिल रोजी दिल्या जाणाऱ्या राजकीय जाहिराती, दि. 18 एप्रिल रोजीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दि. 17 व 18 एप्रिल रोजी, दि. 23 एप्रिल रोजीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी दि. 22 व 23 एप्रिल रोजी, दि. 29 एप्रिल रोजी मतदानाच्या चौथ्या टप्प्यासाठीच्या दि. 28 आणि 29 एप्रिल रोजी प्रकाशित करावयाच्या राजकीय जाहिराती प्रसिद्धीपूर्वी प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे.
0000


जिल्हाधिकारी कार्यालयात
आज पेन्शन अदालत
नांदेड, दि. 8 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 9 एप्रिल 2019 रोजी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 यावेळेत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदन दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.
00000

Sunday, April 7, 2019


वोट करेगा, वोट करेगा... सारा नांदेड वोट करेगा... या घोषवाक्यांनी नांदेड शहर दुमदुमले  
मतदान जनजागृतीला पदयात्रेला उदंड प्रतिसाद

नांदेड दि. 7 :- जिल्ह्यात मतदानाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करुन मतदानाचे प्रमाण वाढावे. याकरिता भारत निवडणूक आयोगाच्यावतीने विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. देशाच्या विकासाला दिशा देण्‍यासाठी देणाऱ्या सरकारची निर्मिती आपल्या मताने होते, हे प्रत्येक मतदाराने लक्षात घेऊन जाणीवपूर्वक मतदान केले पाहिजे, यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थीनी यांची नांदेड शहरातून वॉक फॉर वोट (पदयात्रा) काढण्यात आली. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सकाळी ७-०० वाजता जुना मोंढा येथून पदयात्रेला सुरुवात झाली. 
वोट करेगा, वोट करेगा... सारा नांदेड वोट करेगा..., छोडकर सारे काम-चलो करे मतदान, सर्वांची आहे, ही जबाबदारी मत देणार सर्व नर-नारी, निर्भय होवून मतदान करा-देशाचा सन्‍मान करा, मतदानासाठी वेळ काढा-आपली आपली जबाबदारी पार पाडा आदि घोषवाक्यांनी नांदेड शहर दुमदुमले होते.
ही पदयात्रा जूना मोंढा येथून निघून महाविर चौक, वजिराबाद, पोलीस अधीक्षक कार्यालयापासून, कलामंदिर, शिवाजी नगर मार्गे आय.टी.आय येथील महात्‍मा फुले व क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या पुतळ्यास पुष्‍पहार अर्पण करुन मतदान जनजागृती पदयात्रेचा समारोप करण्यात आला.
जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०१९ साठी दिनांक १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे,यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदार जनजागृती रथ, कलापथक, पत्रलेखन आदि स्‍पर्धा तसेच जिल्ह्यामध्ये सर्वत्र फिरुन मतदारांकडून मतदान करण्याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज नांदेडमध्‍ये या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्‍वीप कक्षामार्फत काढण्‍यात आलेल्‍या लोकसभा चुनाव -२०१९  राष्‍ट्रीय महोत्‍सव या स्टिकर वाहनाला लावून जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांच्‍या हस्‍ते उद्घाटन करण्‍यात आले. याप्रसंगी चित्ररथ, मतदान करण्याविषयी करण्यात येणाऱ्या घोषणांना नागरिकांनी उर्त्स्फुत प्रतिसाद दिला.  “मी मतदान करणारच” हा संदेश लिहिलेल्‍या टोप्‍यांनी नांदेडकरांचे लक्ष वेधून घेतले.
निवडणूक प्रक्रियेतील मतदारांचा सक्रिय सहभाग, यशस्वी व सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचे असल्याने नांदेड लोकसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी येत्या १८ एप्रिल,२०१९ रोजी मतदान करावे, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पदयात्रेत उपस्थितांचे आभार मानले.
या पदयात्रेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, जात पडताळणी समितीचे राम गगरानी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) श्रीमती अनुराधा ढालकरी, मनपाचे मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी संतोष कंदेवाड, निळकंठ पाचंगे,जिल्‍हा प्रशासन अधिकारी राजेंद्र चव्हाण, मनपाचे उपायुक्‍त श्रीमती गीता ठाकरे, तहसीलदार किरण आंबेकर, मिलिंद व्यवहारे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर,  दिलीप बनसोडे, अशोक देवकरे,धर्मपाल शाहू, रमेश मारावार, विष्णू गोडबोले, शहरातील विविध कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी, विविध सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी, मेडिकल व व्यापारी असोसिएशन, क्रीडा संघटना, सामाजिक संघटना, पत्रकार, शाळा-महाविद्यालय, स्काऊट-गाईड, एनसीसीचे विद्यार्थी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, महिला व पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रलोभ कुलकर्णी, शेख रुस्तुम, रवी ढगे, कविता जोशी, गणेश रायेवार, प्रसाद शिरपूरकर, धिरेन आठवले, अभिजीत आदींनी पुढाकार घेतला.
०००००

Friday, April 5, 2019


फळे (आंबे) पिकविण्यासाठी
कार्बाईड गॅस ऐवजी इथेपॉन पावडरचा वापर करावा 
नांदेड दि. 5 :- कृत्रीमरित्या फळे पिकविण्यासाठी कार्बाईड गॅस (कॅलशियम कार्बाईड)चा वापर करण्याऐवजी इथेपॉन पावडर (इथेलीन गॅसचा) वापर फळे (आंबे) पिकविण्यासाठी करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
सध्या आंब्याचा मोसम सुरु होत असून फळांचा राजा आंबाची आवक बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. नैसर्गीकपणे आंबा पिकवून तो विक्रीसाठी बाजारात आणणे अभिप्रेत असतांना आंब्याचे व्यापारी त्याची वाहतूक, साठा करतांना कार्बाइडी गॅस (कारपेट) चा वापर करतात. अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या तरतुदीनुसार कार्बाइड गॅस (कॅलशियम कार्बाइड) चा वापरास प्रतिबंध असून त्याचा वापर करुन आंबे पिकविल्यास शरीराच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
आंबा पिकविण्यासाठी इथेपॉन पावडर (इथेलीन गॅस) चा मर्यादीत स्वरुपात वापर करण्याबाबत दिल्लीच्या भारतीय अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. सदर पावडर वापरतांना ती फळांच्या (आंब्याच्या) प्रत्यक्ष संपर्कात येणार नाही याची दक्षता फळ विक्रेत्यांनी घ्यावी. हे पावडर एका आवरणात छोट्या स्वरुपात पॅक करुन फळाच्या (आंब्याच्या) ठिकाणी ठेवावे, जेणे करुन आंबा पिकविण्यास मदत होईल. अशा प्रकारच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत.
आंबा किंवा इतर फळे पिकवतांना कार्बाइड गॅस (कॅलशीयम कार्बाईड) चा वापर न करता आवश्यकता वाटल्यास इथेपॉन पावडर (इथेलीन गॅस) मर्यादीत स्वरुपात विक्रेत्यांनी वापर करावा. त्याशिवाय नैसर्गिकरित्या आंबा किंवा इतर फळे पिकवण्यासाठी प्राधान्य दयावे. तसेच फळे व भाजीपाला विक्रेते कमिशन एजंट, वाहतूकदार यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्याअंतर्गत परवाना, नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा. FSSAI या वेबसाईटवर ऑनलाईन परवाना, नोंदणी घ्यावी, असेही आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
00000


लोकसभा सार्वत्रिक निवडणूक
विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती
नांदेड दि. 5 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) कलम 21 अन्वये जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघात निवडणूक कामासाठी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्र हद्दीत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून 16 ते 18 एप्रिलच्या कालावधीसाठी नेमणूक केली आहे.
नांदेड जिल्‍ह्यातील 15-हिंगोली लोकसभा मतदार संघातील :- 83-किनवट, 84-हदगांव विधानसभा मतदार संघ व 16-नांदेड लोकसभा मतदार संघातील :- 85-भोकर, 86-नांदेड उत्‍तर, 87-नांदेड दक्षिण, 89-नायगांव, 90-देगलूर, 91-मुखेड विधानसभा मतदार संघ तसेच 41-लातूर (अ.जा.) :- लोकसभा मतदार संघातील 88-लोहा विधानसभा मतदार संघ असे एकुण 9 विधानसभा मतदार संघात, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्‍या कामासाठी (325) क्षेत्रिय अधिकारी (Zonal Officer) यांची नियुक्‍ती केली असून त्यांना विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्र हद्दीपार्यंत 16 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते दिनांक 18 एप्रिल 2019 पर्यंतच्‍या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक करून त्‍यांना वरील संहितेचे कलम 129, 133, 143 व 144 अन्वये अधिकार प्रदान केले आहेत. हा आदेश जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी 5 एप्रिल 2019 रोजी निर्गमीत केला आहे.
000000


जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 
नांदेड, दि. 5 :- जिल्ह्यात 21 एप्रिल 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 7 एप्रिल ते 21 एप्रिल 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...