Tuesday, April 9, 2019


नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचा अभिनव उपक्रम
आदर्श मतदाकेंद्र ठरले प्रशिक्षणार्थ्यांचे आकर्षण केंद्र
नांदेड, दि. 8 :- प्रत्यक्ष मतदान केंद्र कसे असावे, मतदान केंद्रात प्रत्येक कर्मचा-यांचे स्थान कोठे असावे, मतदान प्रक्रियेचा क्रम काय असावा, प्रत्येक मतदान अधिका-यांचे कार्य काय व कसे चालते, परदानशीन स्त्रियांची ओळख कशी पटविल्या जाते, मतदान कक्ष कसे तयार करावे, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटचे मतदान केंद्रातील स्थान कोठे असावे, विविध फॉर्मस्‍ कसे भरले जातात, कोणकोणते लिफाफे कसे परिपूर्ण करतात, आक्षेपित मत कसे घेतले जाते, दिव्यांगासाठी कोणत्या सुविधा असाव्या आणि मतदान केंद्राध्यक्ष ते मतदान अधिकारी यांचे कार्य काय असते तसेच डमी मतदानाच्या माध्यमातून प्रक्रीया कशी चालते अशा विविध समस्यांच्‍या निवारणासाठी प्रशिक्षित मतदान अधिका-यांमार्फत आदर्श मतदार केंद्र 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाने दुस-या प्रशिक्षण सत्रात तयार करुन प्रशिक्षणार्थ्यांना अनुभवण्‍यास दिल्यामुळे आदर्श मतदार केंद्र प्रशिक्षणार्थ्यांचे आकर्षण केंद्र ठरले.
सोमवार 08 रोजी डॉ. शंकरराव चव्‍हाण प्रेक्षागृहात नांदेड उत्‍तर विधानसभा मतदार संघाचे दुसरे प्रशिक्षण संपन्‍न झाले. याच प्रशिक्षण स्‍थळी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत आदर्श मतदान केंद्राची उभारणी केली होती. हुबेहुब प्रत्‍यक्ष मतदान स्‍थळी जसे मतदान केंद्र उभारणी केल्‍या जाणार आहे, तंतोतंत तसेच मतदान केंद्र उभारले होते. मतदान केंद्राध्‍यक्ष व विविध मतदान अधिका-यांची नेमणूक करुन प्रशिक्षणार्थ्‍यांच्‍या सोयीसाठी डमी मतदान प्रक्रियाही घेण्‍यात आली.
या आदर्श मतदान केंद्रास जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे व उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके यांनी भेट दिली असता मतदान केंद्राची अत्‍यंत योग्‍य सुविधा, रांगेतून होत असलेले मतदान, प्रशिक्षित मतदान अधिकारी, केंद्राची केलेली योग्‍य उभारणी व रचना पाहून जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कौतुक करुन अभिनंदन केले.
या आदर्श मतदान केंद्रामुळे प्रशिक्षणार्थ्‍यांना प्रत्‍यक्ष मतदान केंद्राचा अनुभव घेता आला व अनेक शंकांचे निरसन झाल्‍यामुळे प्रशिक्षणार्थ्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले. या आदर्श मतदान केंद्रास एकूण 1 हजार 226 प्रशिक्षणार्थ्‍यांनी प्रत्‍यक्ष भेट देऊन कार्यपध्‍दती समजून घेतली. प्रशिक्षण काळात प्रथमच असे आदर्श मतदान केंद्र उभारणीची अभिनव कल्‍पना नायब तहसीलदार स्‍नेहलता स्‍वामी यांची असून अनुराधा ढालकरी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभल्‍यामुळे अनेक प्रशिक्षणार्थ्‍यांनी त्‍यांचे अभिनंदन केले. हे आदर्श मतदान केंद्र उभारणीसाठी सहायक जिल्‍हा पुरवठा अधिकारी जीवराज डापकर, प्रसाद कुलकर्णी तहसिलदार सामान्‍य, नायब तहसिलदार स्‍नेहलता स्‍वामी, विजयकुमार पाटे, संजय भालके, राजेश कुलकर्णी, दत्‍तात्रय झरीवाड, मो. मजहर खादर, रमेश स्‍वामी, एस. एन. गोस्‍केवार, लक्ष्‍मीकांत मोरे, श्रीमती शोभा माळवतकर, संजय कोठाळे, श्रीमती सारिका आचमे, संजय वाकोडे तथा सर्व मंडळ अधिकारी, तलाठी व कार्यालयीन कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. 
00000


No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...