Thursday, January 10, 2019


दिव्यांगाच्या विशेष शाळा / कर्मशाळेतील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसास

अनुकंपा तत्वा धरतीवर नियुक्तीबाबत यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

            नांदेड, दि. 10 :-  नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगाच्या विशेष शाळा / कर्मशाळेतील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वा धरतीवर नियुक्ती देण्यासंदर्भात अनुकंपाधारकांची प्रसिध्दी यादी जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग (दिव्यांग ) येथे नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे. तसेच जिल्हा परिषद , नांदेड यांच्या  zpnanded.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या यादी संदर्भात काही आक्षेप असल्यास आठ दिवसाच्या आत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांच्याकडे आक्षेप नोंदवावेत, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

0000

पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व प्रेरणादायी

--- विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे   

 

            नांदेड, दि. 10 :- भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे सच्चे देशभक्त होते. त्यांच्यासारखे चतुरस्त्र व्यक्तिमत्व देशाला नेहमी प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी अटलजींच्या कर्तत्वाचा गौरव केला.

भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी या चरित्रात्मक पुस्तकाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, संतूक हंबर्डे, लेखक डॉ. सुरेश सावंत, प्रकाशक संजीव कुळकर्णी आणि प्रा. डॉ. पी. विठ्ठल व्यासपीठावर उपस्थित होते.

अटलजींच्या विविध आठवणी सांगतांना विधानसभा अध्यक्ष बागडे म्हणाले की, अटलजी त्याकाळी जयपूरच्या एका सभेला जातांना सायकलवरुन प्रवास केला होता. त्या सभेत त्यांनी “ मै हार लेने नही, मैं जीत लेने आया हुँ ” हे सुचक वक्तव्य केले . जेंव्हा तेथील आयोजक पुष्पहाराने स्वागत करीत होते. त्यांच्या त्या सुचक वक्तव्याने अनेकांना अवाक केले होते. सिलींगच्या कायद्यासाठी केलेला आग्रह आणि पंडित नेहरुंच्या निधनानंतर त्यांनी व्यक्त केलेला शोक अत्यंत ह्दयस्पर्शी होता. देशाच्या अर्थकारण, सामाजिक परिस्थिती आणि एकात्मतेविषयी अटलजींचा चोख अभ्यास होता. त्यांच्या चौफेर व्यक्तिमत्वामुळे ते पुढील काळात देशाचे प्रधानमंत्री होतील असा विश्वास जनतेमध्ये दिसत होता. त्यांचे देशावरील अपार प्रेम अनेकांना स्फुर्ती देत होते.

अटलजींना 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन 23 दिवसांचा कारावासही भोगावा लागला होता असे सांगून बागडे म्हणाले की, आणीबाणीच्या कठीण काळात अटलजींनी स्विकारलेली भूमिका साऱ्या देशाला माहित होती. त्यासाठी तुरुंगातही जावे लागले. लोकशाही सजविण्यासाठी देशानेही पुढाकार घेण्याची गरज अटलजींनी पुढे आणली होती. राष्ट्रहितासाठी घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने अटलजी ठामपणे उभे रहायचे अटलजी प्रधानमंत्री म्हणून घेतलेल्या विविध निर्णयांचीही माहिती बागडे यांनी यावेळी दिली.

            अटलजींच्या विविध पैलूंचा आपल्या भाषणात उल्लेख करीत अध्यक्ष बागडे यांनी यावेळी अनेक घटना आणि अटलजींच्या आठवणी सांगितल्या. 

            भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तीमत्वाच्या विविध पैलूंचा उल्लेख करीत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आपल्या भाषणात वाजपेयींच्या कणखर निर्णयामुळे भारत देश बलशाली झाला. अणू चाचणीमुळे आपल्या देशाची शक्ती साऱ्या जगाला कळली. अशा व्यक्तीमत्वाला शतकानुशतके देशवासी विसरणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला.

            आमदार रातोळीकर यांनी आपल्या भाषणात अटलजींच्या चरित्रात्मक ग्रंथ निर्मितीबद्दल विशेष कौतुक केले. निष्कलंक व्यक्तीमत्वाच्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या चरित्र लेखनाबद्दल आणि प्रकाशनाबद्दल कौतुक करुन संतुक हंबर्डे यांनी यावेळी वाजपेयी यांच्या स्मृति जाग्या केल्या.

            प्रास्ताविकात अभंग प्रकाशनचे संजीव कुळकर्णी यांनी भारतरत्न अटल बिहारी बाजपेयी यांच्या समग्र चरित्राविषयी व पुस्तकाच्या अभ्यासपूर्ण लेखनाविषयी सविस्तर विवेचन केले.

            प्रारंभी अंभग प्रकाशनच्यावतीने विधानसभा अध्यक्ष बागडे आणि मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. पुस्तकाविषयी डॉ. पी. विठ्ठल यांनी भाष्य केले. तर पुस्तकाचे लेखक डॉ. सुरेश सावंत यांनी ग्रंथलेखनामागील भूमिका स्पष्ट केली. पुस्तकाची पहिली प्रत सौ. विठाबाई व जगदेव सोळंके यांना सुपूर्द करण्यात आली.

            अभंग प्रकाशनच्यावतीने बागडे यांच्या हस्ते लेखक डॉ. सावंत यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. दर्पण पुरस्काराबद्दल देगलूरचे पत्रकार विवेक केरुरकर यांचाही सत्कार करण्यात आला. महानरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या श्रीमती सोढी व वैजनाथ जाधव यांचाही पुस्तकाची प्रत देवून सत्कार करण्यात आला. प्रवीण साले यांनी वाचक म्हणून सविस्तर मनोगत व्यक्त केले. या सोहळ्यास अभंग प्रकाशनचे सौ. नीमा कुलकर्णी , गणेश कस्तुरे, उमेश कस्तुरे यांच्यासह साहित्यिक, कवि, वाचक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचे सुत्रसंचालन निळकंठ पाचंगे यांनी केले.

0000

 

Tuesday, January 8, 2019


   हरभरा पिकाचा कृषि संदेश
नांदेड, दि. 8 :- जिल्ह्यात हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी हरभरावरील घाटेअळीसाठी क्लोरॅनट्रीनीलीप्रोल 18.5 एस. जी. 2.5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तसेच मर रोगाची लक्षणे दिसत असल्यास अशी झाडे उपटुन नष्ट करावीत व हरभरा पिकास पाणी देणे टाळावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000


  जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 8 :- जिल्ह्यात 15 जानेवारी 2019 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 1 ते 15 जानेवारी 2019 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
000000


मानसिक आरोग्य शिबिराचे
गुरुवारी धर्माबाद येथे आयोजन
नांदेड, दि. 8 :- मानसिक आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत ताण-तणाव व मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन गुरुवार 10 जानेवारी रोजी धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे. हे शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वि. रा. मेकाने यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्यावतीने मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रणद जोशी यांनी केले आहे.
या शिबिरात मानसिक रोग, चिंता, डिप्रेशन, टेन्शन, नैराश्य, बेचैनी, जुनाट डोकेदुखी, व्यसन समस्या, झोपेचे आजार, फिट, मिरगी, आकडी, लैगिक समस्या, वयोवृद्ध लोकांमध्ये असलेला विसराळूपणा, भानामती, करणी आदी आजारावर मोफत औषधोपचार व समुपदेशन करण्यात येणार आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निलकंठ भोसीकर, नोडल अधिकारी डॉ. एच. आर. गुंटूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. इकबाल शेख यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा मानसिक आरोग्य सेवा कार्यक्रम (प्रेरणा प्रकल्प) कार्यालय नांदेड येथील 02462-233093 येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
000000


जिल्हयात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा
अंतीम टप्पा 15 जानेवारी पर्यंत लस घेण्याचे आवाहन
नांदेड दि. 8 :- जिल्हयात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम सुरु असून एमआर लस प्रशिक्षीत व्यक्तीमार्फत दिल्या जात आहे. या मोहिमेत जिल्हयातील सर्व बालरोग तज्ज्ञांचे सहकार्य असून एमआर लसीकरणाबाबत पालकांचा विश्वास वाढला आहे. लसीपासुन वंचित असलेल्या लाभार्थ्यांना पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता मंगळवार 15 जानेवारी पर्यंत या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
ग्रामीण, शहरी व महानगरपालिका  क्षेत्रातील 7 लाख 20 हजार बालकांना गोवर रुबेलाची लस देण्यात आली आहे. या मोहिमेत जिल्हयाचे 71 टक्के काम पूर्ण झाले आहे. अद्याप ग्रामीण, शहरी व मनपा क्षेत्रातील 2 लाख बालकांचे लसीकरणाचे कार्य शिल्लक आहे.
राज्य स्तरावरुन या मोहिमेचा अंतिम दिनांक 15 जानेवारी देण्यात आला आहे. जिल्हयात लसीकरणाचे कार्य वाढविण्यासाठी ज्या भागात काम कमी झाले आहे अशा भागातील शाळा व शाळांचे मुख्याध्यापक, प्रभावशाली व्यक्ती, धर्मगुरु, पालक व सर्व स्तरावरील व्यक्तींनी उर्वरित कालावधीत लाभार्थ्यांना लस घेण्यास प्रवृत्त करावे.
या मोहिमेचा लाभ देण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हयातील सर्व आरोग्य यंत्रणामधील कर्मचारी यांचे मार्फत जिल्हयातील शाळा व इतर ठिकाणी आयोजित लसीकरण सत्राद्वारे एमआरची लस देण्यात येत आहे.
0000



अनाथ मुलांना प्रमाणपत्रासाठी
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन 
नांदेड दि. 8 :- बालगृहातून बाहेर पडलेल्या ज्या अनाथ मुलांच्या जवळ जातीचे प्रमाणपत्र नाहीत अशा मुलांनी त्यांच्या शेवटच्या वास्तव्यास असलेल्या संस्थेशी संपर्क साधून ते अनाथ असल्याबाबतचा प्रस्ताव  संबंधीत संस्थेमार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमांतर्गत राज्यात कार्यरत शासकीय, स्वयंसेवी बालगृहात दाखल होणाऱ्या अनाथ मुलांना संस्थेतून बाहेर पडतांना त्यांच्या जवळ जातीचे प्रमाणपत्र नसल्याने त्यांना शैक्षणिक, अर्थिक, सामाजिक सवलती आणि विशेष लाभ मिळत नाहीत. त्यामुळे या लाभार्थ्यांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र महिला व बाल विकास आयुक्तालय स्तरावरुन निर्गमित करण्यात येणार आहेत.
0000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...