Tuesday, September 11, 2018


अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी
364 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित
आक्षेपाबाबत 15 सप्टेंबरची मुदत
नांदेड, दि. 11 :- अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच 364 अनुकंपा धारकांची प्रतिक्षा यादी जिल्हा परिषद नांदेडच्या www.zpnanded.in या वेबसाईटवर आणि जिल्हा परिषदेच्या, नांदेड जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयातील आवाराच्या भिंतीवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रतिक्षा यादी 30 जून 2018 अखेर प्राप्त प्रस्तावाप्रमाणे घोषित करण्यात आली आहे. घोषित केलेल्या यादीतील ज्या उमेदवारांचे प्रस्ताव अपूर्ण आहेत अशा अनुकंपा धारकांनी कागदपत्रांची पुर्तता केली नाही अथवा ज्येष्ठेतबाबत काही आक्षेप असल्यास संबंधित अनुकंपा धारकांनी 15 सप्टेंबर 2018 पर्यंत त्यांचे म्हणणे लेखी पुराव्यानिशी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागास सादर करावे. त्यानंतर आलेल्या आक्षेपाच्या विचार करण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.
000000


प्रेरणा प्रकल्पच्यावतीने
“जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन” साजरा
नांदेड, दि. 11 :-  जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त प्रेरणा प्रकल्प शेतकरी समुपदेशन व आरोग्य सेवा कार्यक्रमाच्यावतीने येथील गुरुगोबिंद सिंघजी शासकीय रुग्णालय येथे 10 सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम होते.   
यावेळी डॉ. एच. आर. गुंटूरकर, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दि. भा. जोशी, आतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर, नोडल आधिकारी डॉ.वाघमारे, वैद्यकीय आधिकारी डॉ. हजारी, डॉ. पाटील, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कदम यांनी विविध आजाराबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. गुंटूरकर यांनी सध्या आत्महत्या वाढण्यामागचे कारण नैराश्य आसल्याचे सांगितले. डॉ.जोशी यांनी आत्महत्येमागची विविध कारणांची माहिती दिली. प्रेरणा प्रकल्प कार्यक्रमाचे कार्यक्रम आधिकारी डॉ. प्रणद जोशी यांनी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजनाबद्दल तसेच ताण-तणाव नियोजन यावर सखोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सन्मित्र फाेेउंडेशन पत्रिकेचे अनावरण करण्यात आले. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्येवर पथनाट्य सादर करुन जनजागृती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सामाजिक कार्यकर्त्या शीतल उदगीरकर यांनी केले तर आभार मानसशास्त्रज्ञ डॉ. कैलास चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमाचे संयोजन प्रेरणा प्रकल्पचे राहुल कराळे, वंदना कसपटे व रुपाली मस्के यांनी केले.
000000

Monday, September 10, 2018


गणेश मंडळांनी वर्गणी गोळा
करण्यासाठी परवानगी घ्यावी
नांदेड, दि. 10 :-  गणेश मंडळांना वर्गणी गोळा करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने परवानगी देणे चालू आहे. गणेश मंडळांना परवानगी मिळण्यासाठी पुढील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
सर्व सभासदांचे आधार कार्ड व पॅन कार्ड, ई-मेल आयडी, मोबाईल आयडी, जागा मालकांची संमती, पोलीस स्टेशनचे नाहरकत पत्र. गणेश मंडळांच्या स्थापनेबाबतचा ठराव. मागील वर्षाचा हिशोब. सर्व गणेश मंडळांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन परवानगी घेऊनच वर्गणी गोळा करावी, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त सौ. प्रणिता श्रीनीवार यांनी केले आहे.
000000


गणेशोत्सव, मोहरम सण शांततामय वातावरणात
उत्साहात साजरा करु या - जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड, दि. 10 :- येत्या काळातील गणेशोत्सव, मोहरम हे सण शांततामय वातावरणात व उत्सवात साजरे करण्याच्यादृष्टीने सर्वजण प्रयत्न करु या, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.  
गणपती, मोहरम व इतर सण उत्सव काळात करावयाची कार्यवाही व उपाययोजना अनुषंगाने शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे आज संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महापौर शिलाताई भवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहूराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांच्यासह समिती सदस्यांची उपस्थित होती.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, येत्या 13 सप्टेंबर रोजी श्री ची स्थापना होऊन गणपती उत्सवास सुरुवात होत आहे. पुढे 23 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दर्शी रोजी श्री विसर्जन होणार आहे. तसेच येत्या 11 ते 20 सप्टेंबर या कालावधीत मोहरम हे सण दरवर्षी जिल्ह्यात उत्साहाने साजरा करण्यात येतात. या उत्सवाचे महत्व लक्षात घेता हे सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.
श्री. डोंगरे पुढे म्हणाले, समाजाची बांधिलकी लक्षात घेऊन गणेश मंडळांनी धुम्रपान रोखणे, प्लॅस्टिक बंदी, मतदार नोंदणीबाबतचे संदेश, देखावे उभारुन नागरिकांमध्ये जनजागृती करावी. यातून एक सकारात्मक संदेश समाजात जाईल. चांगले देखावे उभारणाऱ्या गणेशमंडळांना प्रोत्साहन दयावे. उत्सवात एकोप्याने एकत्र येवून काम करावे. अवैद्य वीजचोरी होणार नाही यासाठी महावितरणने कार्यवाही करावी, असेही श्री. डोंगरे यांनी सांगितले.  
पोलीस अधीक्षक श्री. पाटील म्हणाले, डिजेला कुठल्याही प्रकारे परवानगी दिली जाणार नाही. कुठल्याही नियमाचं उल्लंघन करण्यात येवू नये. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच गणेशोत्वादरम्यान गणेश मंडळांनी आपली वाहने तपासून घ्यावीत. नागरिकांना नवीन संदेश द्यावा. व्हॉट्सअपचा तसेच अन्य सोशल मिडीयाचा संवेदनशिलतेने वापर करण्यात यावा, असेही श्री. पाटील यांनी आवाहन केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. काकडे म्हणाले गणेश मंडळांना "एक वार्ड एक गणपती" यासाठी प्रयत्न करावेत. तसेच "एक गाव एक गणपती" ही संकल्पना गणेश मंडळांनी राबविली तर गणेशोत्सव चांगल्या पध्दतीने साजरा करण्यास मदत होऊ शकेल.
बैठकीत विविध समाज घटकांचे प्रतिनिधी आदीनी मत मांडून महत्वपूर्ण सूचना केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वेणीकर यांनी बैठकीचे संयोजन केले .
000000


मराठवाडा विकास मंडळाची 11 सप्टेंबरची 
जिल्हास्तरीय बैठक पुढे ढकलण्यात आली
नांदेड दि. 10 :- औरंगाबाद मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांचे अध्यक्षतेखाली मराठवाडा विभागातील विकास कामांना गती देण्यासाठी मंगळवार 11 सप्टेंबर 2018 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आलेली बैठक काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा नियोजन समिती, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात यांनी केले आहे.  
00000

Friday, September 7, 2018


महाराष्ट्र भूजल नियम मसुदाबाबत सूचना,
हरकती पाठविण्यास 30 सप्टेंबरची मुदतवाढ
नांदेड दि. 8 :- महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम 2018 या मुसदा नियमासंबंधी कोणत्याही व्यक्तीस हरकती / सूचना पाठविण्यासाठी रविवार 30 सप्टेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम 2018 या मसुदा नियमासंबंधी कोणत्याही व्यक्तीस हरकती / सूचना अपर मुख्य सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांचेकडे 31 ऑगस्ट 2018 पर्यंत लेखी स्वरुपात अथवा psec.wssd@maharshtra.gov.in या ईमेलवर पाठवावयाच्या होत्या. आता शासन परिपत्रक दि. 5 सप्टेंबर 2018 नुसार महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम 2018 हे मुसदा नियम शासनामार्फत विचारात घेण्यास रविवार 30 सप्टेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मसुदा नियमासंबंधी कोणत्याही व्यक्तीस हरकती / सूचना पाठवायच्या असतील तर त्या अपर मुख्य सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, 7 वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय इमारत संकुल लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई या पत्त्यावर दिनांक 30 सप्टेंबर 2018 पर्यंत लेखी स्वरुपात अथवा psec.wssd@maharshtra.gov.in या ईमेलवर स्विकारण्यात येतील, असे आवाहन पुणे येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांनी केले आहे.
000000

राष्ट्रीय पोषण महिना विशेष लेख क्र. २ : -



स्तनपान म्हणजे अमृतपानच…
दि. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत देशभर ‘राष्ट्रीय पोषण महिना’ साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोठी मोहीम राबविण्यात येत असून पोषणाचे महत्व लोकांना पटवून देण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून बाळाच्या सकस आणि पोषण आहारासाठी स्तनपानाचे महत्व सांगणारा हा लेख ...
बाळाच्या जीवनातील पहिले १ हजार दिवस हे बाळाच्या आरोग्यविषयक विकासाच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात. यादृष्टीने स्तनपान व शिशुषोषण मिळण्यासाठी मातेला प्रोत्साहन, आधार व संरक्षण देणे आवश्यक आहे. जन्मानंतर लगेच अर्ध्या तासाच्या आत स्तनपान केल्यामुळे गर्भाशय आकुंचन पावून रक्तस्त्राव कमी होतो आणि दूध तयार होण्यास चालना मिळते. तसेच गर्भाशय साधारण स्थितीत येण्यास मदत होते. निव्वळ स्तनपान म्हणजे बाळ सहा महिन्याचे होईपर्यत मातेचे दूध देणे व इतर कोणतेही पदार्थ न देणे होय. पहिले ६ महिने बाळाला मध, साखरेचे पाणी, साधे पाणी, गायीचे दूध, डब्यातले दूध, फळाचा रस, ग्राईप वॉटर, जीवनसत्वाचे थेंब इ. काहीही देऊ नये. या पदार्थांमधून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे बालके आजारी पडून दगावण्याचा धोका असतो. जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाच्या संपूर्ण शारीरिक व मानसिक वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व अन्नघटक मातेच्या दुधात पुरेशा व आवश्यक प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे इम्युनोग्लोब्यूलिन्स, पांढऱ्या पेशी, बायाफिड्स घटक, लॅक्टोफेरिन लायसोझाईन इ. रोगप्रतिकारक संरक्षण द्रव्ये मातेच्या दुधात भरपूर प्रमाणात असल्यामुळे जंतूसंसर्ग टाळण्यास मदत होते. शिवाय ॲलर्जीपासूनही बाळाचे संरक्षण होत असल्यामुळे जंतुसंसर्ग टाळण्यास मदत होते. त्यामुळे बाळाला पहिले ६ महिने निव्वळ स्तनपान देणे गरजेचे आहे. 
निव्वळ स्तनपान न करणाऱ्या मुलांमध्ये निव्वळ स्तनपान करणाऱ्या मुलांपेक्षा मृत्यूचे प्रमाण जास्त असते. जुलाबामुळे मृत्यू 14.2 पटीने जास्त, श्वसनाच्या आजारामुळे मृत्यू 3.6 पटीने जास्त आणि इतर जंतूदोषामुळे मृत्यू 2.5 पटीने जास्त प्रमाणात आढळतात.
स्तनपान करताना येणारे दूध
सुरुवातीचे दूध –जास्त पातळ असते. स्निग्ध पदार्थ कमी असून साखर (लॅक्टोज), प्रथिने, जीवनसत्वे, खनिजपदार्थ यांचे प्रमाण जास्त असते. पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे बाळाची तहान भागते.
नंतर येणारे दूध :-  घट्ट असते. स्निग्ध पदार्थ भरपूर असून त्यामुळे बाळाची भूक भागते. म्हणून बाळाला एका स्तनावरच स्तन पूर्ण रिकामे होईपर्यंत पाजावे. म्हणजे प्रथम येणाऱ्या दुधामुळे बाळाची तहान आणि नंतर येणाऱ्या दुधामुळे  बाळाची भूक भागते. नंतर किंवा दुसऱ्या वेळेस बाळास दुसऱ्या स्तनावर पाजावे.
मागणीनुसार स्तनपान देणे:- दिवसा किंवा रात्री केव्हाही बाळ भुकेमुळे रडले तर आईने त्याला दूध पाजायला घ्यावे. याला मागणीनुसार स्तनपान म्हणतात.
अनिर्बंध स्तनपान : बाळाला हवे तेव्हा हवा तितका वेळ दूध पाजणे याला अनिर्बंध स्तनपान म्हणतात. म्हणून बाळाला हवे तितका वेळ दूध द्यावे. बाळाला तहान लागली असेल तर पहिले पातळ दूध 2-4 घोट पिऊन बाळ स्तन सोडून देईल आणि भूक लागली असेल तर नंतर येणारे घट्ट दूध पिऊनच दूध पिणे बंद करील. बाळाचे  पोट भरले की बाळ आपोआप स्तन सोडून देते. बाळ साधारणत: 24 तासात 10 ते 12 वेळा स्तनपान करतो. बाळंतपणानंतर लगेचच ( अर्ध्या तासाच्या आत ) स्तनपान सुरु करावे.
स्तनपानाची सुरुवात :-  जन्म झाल्यानंतर लगेच अर्ध्या तासाच्या आत स्तनपान सुरु करावे. सुरुवातीला दूध कमी येत असले तरीसुध्दा ते ( चिकाचे दूध ) बाळासाठी अत्यावश्यक आहे. कारण यात भरपूर रोगप्रतिकारक द्रव्ये असतात. लवकर स्तनपान केल्याने मातेला दूध येण्याचे प्रमाण वाढते. आई व बाळ याच्यातील भावनिक संबंध मजबूत होतात. स्तनपान देताना बाळाचे डोके मातेच्या दंडावर विसावले पाहिजे. दुसऱ्या हाताने स्तनाला आधार देऊन स्तनाच्या टोकाने बाळाच्या तोंडाला स्पर्श केला की बाळ आपोआप स्तनाकडे तोंड वळवून दूध ओढते. बाळाला स्तनपान देण्यात अडचणी येत असतील किंवा बाळ स्तनपान करीत नसेल तर त्वरित संदर्भसेवा केंद्रात तपासणी करावी.
स्तनपानामुळे बाळाला होणारे फायदे :-
आईचे दूध हे परिपूर्ण अन्न असून पहिले सहा महिने बाळाची आहारविषयक गरज स्तनपानाद्वारे पूर्ण होते. बाळाच्या वाढीकरिता आवश्यक ते सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळतात. पचनास सोपे, योग्य तापमान असलेले व निर्जंतूक असते. दूध ओढण्याच्या क्रियेमुळे बाळाच्या जबड्याचे स्नायू बळकट होतात. माता व बालकात जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते. आईच्या दुधातील रोगप्रतिकारक द्रव्यांमुळे बाळाला जंतूसंसर्ग व किरकोळ आजारापासून बचाव होतो (उदा. न्युमोनिया, जुलाब इ.). आईच्या दुधावर वाढणाऱ्या मुलांची बौध्दिक व मानसिक  क्षमता अधिक असते. भावी आयुष्यात दात व कानाचे विकार, स्थुलता, रक्तदाब, हृदयविकार,मधुमेह या रोगापासून संरक्षण मिळते. कुपोषण आजाराचे प्रमाण कमी होते व बालमृत्यू टाळता येतात.
मातेला होणारे फायदे :-
स्तनपानामुळे ऑक्सिटोसीन व प्रोलॅक्टिन हे नैसर्गिक तयार होऊन ते रक्तात मिसळतात. ऑक्सिटोसीनमुळे गर्भाशय आंकुचन पावते, त्यामुळे वार गर्भाशयापासून लवकर वेगळी होऊन बाहेर पडते आणि रक्तस्त्राव कमी होतो. प्रोलॅक्टिनमुळे दूध निर्माण होते. बिजकोशांच्या कार्यात बदल होतो व मासिक पाळी उशिरा येते. मातेचा बांधा पूर्ववत होण्यास मदत होते. बाळाला  केव्हाही, कुठेही स्तनपान देता येते. बाळाची तहान व भुकेची गरज भागते. उतारवयातील हाडांच्या ठिसूळपणापासून संरक्षण होते. स्तनांचा, गर्भाशयाचा तसेच अंडाशयाचा कर्कराग टाळता येतो. आर्थिकदृष्ट्या बचत होते. शिवाय स्तनपान केल्याने बाळ वारंवार आजारी पडत नाही. त्यामुळे बाळाच्या औषधपाणावरील खर्च वाचतो. मातेचा वेळ व शक्तीची बचत होते.
कुटुंबाला होणारे फायदे :-
पैसे आणि वेळ वाचतो. वरचे दूध, भांडी, इंधन इ. चे पैसे वाचतात. स्तनपान करणाऱ्या बालकात आजाराचे प्रमाण कमी असून औषधांचा खर्च कमी होतो. दोन मुलामध्ये अंतर ठेवता येते, त्यामुळे मुलांचे संगोपन/ देखभाल नीट करता येते.
सामाजिक आणि राष्ट्रीय फायदे :-
            बालमृत्यूचे प्रमाण कमी होते. आजारपण कमी झाल्याने त्यावरील खर्चात बचत होते. नैसर्गिकपणे पाळणा लांबल्यामुळे लोकसंख्या आटोक्यात रहायला मदत होते.
बाळाला चीक दूध पाजल्यामुळे होणारे फायदे :-
त्यांत प्रथिने, जीवनसत्व अ व क भरपूर प्रमाणात असते. यातील सारक गुणांमुळे बाळाला शौचास साफ होते. चीक दूध पोटात गेल्यामुळे बाळाच्या आतड्याची वाढ पूर्ण होण्यास मदत होते. रोग प्रतिकारकशक्ती वाढते.
मातेच्या दुधात पाण्याचे प्रमाण जवळपास 88 टक्के असते. त्यामुळे बाळाला पहिल्या सहा महिन्यात मातेच्या दुधाव्यतिरिक्त इतर काहीही देऊ नये. बाळाला प्रती 1 किलो ग्रॅम शरीर वजनास 170 मिली दुधाची आवश्यकता असते. बाळाचे जन्म वजन साधारणत: 2.8 ते 3 कि ग्रॅम असते. म्हणजेच त्याला 510 मिली दूध रोज लागते.
स्तनपानानंतर बाळाची ढेकर काढणे
बाळाला खांद्यावर छातीशी उभे धरुन किमान 15 ते 20 मिनिटे थोपटून ढेकर काढावी. किमान 2 ते 3 ढेकर निघणे आवश्यक आहे.
स्तनपानाबाबत :-
पहिले 2- 3 दिवस येणारे पिवळसर घट्ट दूध म्हणजेच चिकाचे दूध फेकून न देता बाळाला द्यावे. कारण त्यात भरपूर प्रमाणात रोगप्रतिकारक द्रव्ये, प्रथिने, क्षार, जीवनसत्वे असतात. बाळ किंवा माता आजारी असेल तरी स्तनपान सुरु ठेवावे. किमान 2 वर्षापर्यत स्तनपान द्यावे. 6 महिन्यापासून पूरक आहाराची जोड द्यावी. 5 वर्षापर्यत स्तनपान देता येईल.
-डॉ. दिलीप टी. रणमले,
प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण
प्रशिक्षण केंद्र, अमरावती
००००

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...