Friday, September 7, 2018

राष्ट्रीय पोषण महिना विशेष लेख क्र. २ : -



स्तनपान म्हणजे अमृतपानच
दि. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत देशभर राष्ट्रीय पोषण महिनासाजरा करण्यात येत आहे. या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोठी मोहीम राबविण्यात येत असून पोषणाचे महत्व लोकांना पटवून देण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून बाळाच्या सकस आणि पोषण आहारासाठी स्तनपानाचे महत्व सांगणारा हा लेख ...
बाळाच्या जीवनातील पहिले १ हजार दिवस हे बाळाच्या आरोग्यविषयक विकासाच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात. यादृष्टीने स्तनपान व शिशुषोषण मिळण्यासाठी मातेला प्रोत्साहन, आधार व संरक्षण देणे आवश्यक आहे. जन्मानंतर लगेच अर्ध्या तासाच्या आत स्तनपान केल्यामुळे गर्भाशय आकुंचन पावून रक्तस्त्राव कमी होतो आणि दूध तयार होण्यास चालना मिळते. तसेच गर्भाशय साधारण स्थितीत येण्यास मदत होते. निव्वळ स्तनपान म्हणजे बाळ सहा महिन्याचे होईपर्यत मातेचे दूध देणे व इतर कोणतेही पदार्थ न देणे होय. पहिले महिने बाळाला मध, साखरेचे पाणी, साधे पाणी, गायीचे दूध, डब्यातले दूध, फळाचा रस, ग्राईप वॉटर, जीवनसत्वाचे थेंब इ. काहीही देऊ नये. या पदार्थांमधून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे बालके आजारी पडून दगावण्याचा धोका असतो. जन्मानंतर पहिले सहा महिने बाळाच्या संपूर्ण शारीरिक व मानसिक वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व अन्नघटक मातेच्या दुधात पुरेशा व आवश्यक प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे इम्युनोग्लोब्यूलिन्स, पांढऱ्या पेशी, बायाफिड्स घटक, लॅक्टोफेरिन लायसोझाईन इ. रोगप्रतिकारक संरक्षण द्रव्ये मातेच्या दुधात भरपूर प्रमाणात असल्यामुळे जंतूसंसर्ग टाळण्यास मदत होते. शिवाय ॲलर्जीपासूनही बाळाचे संरक्षण होत असल्यामुळे जंतुसंसर्ग टाळण्यास मदत होते. त्यामुळे बाळाला पहिले महिने निव्वळ स्तनपान देणे गरजेचे आहे. 
निव्वळ स्तनपान न करणाऱ्या मुलांमध्ये निव्वळ स्तनपान करणाऱ्या मुलांपेक्षा मृत्यूचे प्रमाण जास्त असते. जुलाबामुळे मृत्यू 14.2 पटीने जास्त, श्वसनाच्या आजारामुळे मृत्यू 3.6 पटीने जास्त आणि इतर जंतूदोषामुळे मृत्यू 2.5 पटीने जास्त प्रमाणात आढळतात.
स्तनपान करताना येणारे दूध
सुरुवातीचे दूध जास्त पातळ असते. स्निग्ध पदार्थ कमी असून साखर (लॅक्टोज), प्रथिने, जीवनसत्वे, खनिजपदार्थ यांचे प्रमाण जास्त असते. पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे बाळाची तहान भागते.
नंतर येणारे दूध :-  घट्ट असते. स्निग्ध पदार्थ भरपूर असून त्यामुळे बाळाची भूक भागते. म्हणून बाळाला एका स्तनावरच स्तन पूर्ण रिकामे होईपर्यंत पाजावे. म्हणजे प्रथम येणाऱ्या दुधामुळे बाळाची तहान आणि नंतर येणाऱ्या दुधामुळे  बाळाची भूक भागते. नंतर किंवा दुसऱ्या वेळेस बाळास दुसऱ्या स्तनावर पाजावे.
मागणीनुसार स्तनपान देणे:- दिवसा किंवा रात्री केव्हाही बाळ भुकेमुळे रडले तर आईने त्याला दूध पाजायला घ्यावे. याला मागणीनुसार स्तनपान म्हणतात.
अनिर्बंध स्तनपान : बाळाला हवे तेव्हा हवा तितका वेळ दूध पाजणे याला अनिर्बंध स्तनपान म्हणतात. म्हणून बाळाला हवे तितका वेळ दूध द्यावे. बाळाला तहान लागली असेल तर पहिले पातळ दूध 2-4 घोट पिऊन बाळ स्तन सोडून देईल आणि भूक लागली असेल तर नंतर येणारे घट्ट दूध पिऊनच दूध पिणे बंद करील. बाळाचे  पोट भरले की बाळ आपोआप स्तन सोडून देते. बाळ साधारणत: 24 तासात 10 ते 12 वेळा स्तनपान करतो. बाळंतपणानंतर लगेचच ( अर्ध्या तासाच्या आत ) स्तनपान सुरु करावे.
स्तनपानाची सुरुवात :-  जन्म झाल्यानंतर लगेच अर्ध्या तासाच्या आत स्तनपान सुरु करावे. सुरुवातीला दूध कमी येत असले तरीसुध्दा ते ( चिकाचे दूध ) बाळासाठी अत्यावश्यक आहे. कारण यात भरपूर रोगप्रतिकारक द्रव्ये असतात. लवकर स्तनपान केल्याने मातेला दूध येण्याचे प्रमाण वाढते. आई व बाळ याच्यातील भावनिक संबंध मजबूत होतात. स्तनपान देताना बाळाचे डोके मातेच्या दंडावर विसावले पाहिजे. दुसऱ्या हाताने स्तनाला आधार देऊन स्तनाच्या टोकाने बाळाच्या तोंडाला स्पर्श केला की बाळ आपोआप स्तनाकडे तोंड वळवून दूध ओढते. बाळाला स्तनपान देण्यात अडचणी येत असतील किंवा बाळ स्तनपान करीत नसेल तर त्वरित संदर्भसेवा केंद्रात तपासणी करावी.
स्तनपानामुळे बाळाला होणारे फायदे :-
आईचे दूध हे परिपूर्ण अन्न असून पहिले सहा महिने बाळाची आहारविषयक गरज स्तनपानाद्वारे पूर्ण होते. बाळाच्या वाढीकरिता आवश्यक ते सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळतात. पचनास सोपे, योग्य तापमान असलेले व निर्जंतूक असते. दूध ओढण्याच्या क्रियेमुळे बाळाच्या जबड्याचे स्नायू बळकट होतात. माता व बालकात जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते. आईच्या दुधातील रोगप्रतिकारक द्रव्यांमुळे बाळाला जंतूसंसर्ग व किरकोळ आजारापासून बचाव होतो (उदा. न्युमोनिया, जुलाब इ.). आईच्या दुधावर वाढणाऱ्या मुलांची बौध्दिक व मानसिक  क्षमता अधिक असते. भावी आयुष्यात दात व कानाचे विकार, स्थुलता, रक्तदाब, हृदयविकार,मधुमेह या रोगापासून संरक्षण मिळते. कुपोषण आजाराचे प्रमाण कमी होते व बालमृत्यू टाळता येतात.
मातेला होणारे फायदे :-
स्तनपानामुळे ऑक्सिटोसीन व प्रोलॅक्टिन हे नैसर्गिक तयार होऊन ते रक्तात मिसळतात. ऑक्सिटोसीनमुळे गर्भाशय आंकुचन पावते, त्यामुळे वार गर्भाशयापासून लवकर वेगळी होऊन बाहेर पडते आणि रक्तस्त्राव कमी होतो. प्रोलॅक्टिनमुळे दूध निर्माण होते. बिजकोशांच्या कार्यात बदल होतो व मासिक पाळी उशिरा येते. मातेचा बांधा पूर्ववत होण्यास मदत होते. बाळाला  केव्हाही, कुठेही स्तनपान देता येते. बाळाची तहान व भुकेची गरज भागते. उतारवयातील हाडांच्या ठिसूळपणापासून संरक्षण होते. स्तनांचा, गर्भाशयाचा तसेच अंडाशयाचा कर्कराग टाळता येतो. आर्थिकदृष्ट्या बचत होते. शिवाय स्तनपान केल्याने बाळ वारंवार आजारी पडत नाही. त्यामुळे बाळाच्या औषधपाणावरील खर्च वाचतो. मातेचा वेळ व शक्तीची बचत होते.
कुटुंबाला होणारे फायदे :-
पैसे आणि वेळ वाचतो. वरचे दूध, भांडी, इंधन इ. चे पैसे वाचतात. स्तनपान करणाऱ्या बालकात आजाराचे प्रमाण कमी असून औषधांचा खर्च कमी होतो. दोन मुलामध्ये अंतर ठेवता येते, त्यामुळे मुलांचे संगोपन/ देखभाल नीट करता येते.
सामाजिक आणि राष्ट्रीय फायदे :-
            बालमृत्यूचे प्रमाण कमी होते. आजारपण कमी झाल्याने त्यावरील खर्चात बचत होते. नैसर्गिकपणे पाळणा लांबल्यामुळे लोकसंख्या आटोक्यात रहायला मदत होते.
बाळाला चीक दूध पाजल्यामुळे होणारे फायदे :-
त्यांत प्रथिने, जीवनसत्व अ व क भरपूर प्रमाणात असते. यातील सारक गुणांमुळे बाळाला शौचास साफ होते. चीक दूध पोटात गेल्यामुळे बाळाच्या आतड्याची वाढ पूर्ण होण्यास मदत होते. रोग प्रतिकारकशक्ती वाढते.
मातेच्या दुधात पाण्याचे प्रमाण जवळपास 88 टक्के असते. त्यामुळे बाळाला पहिल्या सहा महिन्यात मातेच्या दुधाव्यतिरिक्त इतर काहीही देऊ नये. बाळाला प्रती 1 किलो ग्रॅम शरीर वजनास 170 मिली दुधाची आवश्यकता असते. बाळाचे जन्म वजन साधारणत: 2.8 ते 3 कि ग्रॅम असते. म्हणजेच त्याला 510 मिली दूध रोज लागते.
स्तनपानानंतर बाळाची ढेकर काढणे
बाळाला खांद्यावर छातीशी उभे धरुन किमान 15 ते 20 मिनिटे थोपटून ढेकर काढावी. किमान 2 ते 3 ढेकर निघणे आवश्यक आहे.
स्तनपानाबाबत :-
पहिले 2- 3 दिवस येणारे पिवळसर घट्ट दूध म्हणजेच चिकाचे दूध फेकून न देता बाळाला द्यावे. कारण त्यात भरपूर प्रमाणात रोगप्रतिकारक द्रव्ये, प्रथिने, क्षार, जीवनसत्वे असतात. बाळ किंवा माता आजारी असेल तरी स्तनपान सुरु ठेवावे. किमान 2 वर्षापर्यत स्तनपान द्यावे. 6 महिन्यापासून पूरक आहाराची जोड द्यावी. 5 वर्षापर्यत स्तनपान देता येईल.
-डॉ. दिलीप टी. रणमले,
प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण
प्रशिक्षण केंद्र, अमरावती
००००

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...