Tuesday, August 21, 2018


शासकीय तंत्रनिकेतनच्या
प्राचार्य पदी डॉ. गर्जे रुजू
नांदेड, दि. 21 :- येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्य पदाचा पदभार डॉ. गोरक्ष गर्जे यांनी प्रभारी प्राचार्य पी. डी. पोपळे यांच्याकडून नुकताच स्विकारला आहे. ते यापुर्वी गोंदिया येथे शासकीय तंत्रनिकेतन संगणक आभियांत्रिकी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.
            डॉ. गर्जे यांनी तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई येथे व्यावसायिक अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी सन 2017-18 व सन 2018-19 मध्ये विशेष अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात विद्या परिषदेवर सदस्य म्हणून सन 2005 ते 2016 या कालावधीत कार्यरत होते. पुणे विद्यापिठात प्रथमत: त्यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची ऑनलाईन परिक्षा घेण्याचे काम सुरु केले. पीएचडी पदवी त्यांनी पुणे विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकी या विषयात प्राप्त केली आहे.
डॉ. गर्जे यांनी नांदेड शासकीय तंत्रनिकेतन संस्थेला एन.बी. ए. ची मान्यता मिळवून देण्याचा मानस व्यक्त केला. फुड टेक्नॉलजीचा नवीन अभ्यासक्रम पुढील वर्षी सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून संस्थेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्य करणार असल्याचे मत व्यक्त केले.
            डॉ. गर्जे हे मुळचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रहिवासी असून त्यांनी नांदेड येथील श्री गुरुगोबिंद सिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात सन 1990 साली संगणक अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे, हे विशेष.  
000000

Monday, August 20, 2018


सण उत्सवातुन सामाजिक सलोखा वाढवावा
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 20 :-  बकरी ईद (ईद-उल-झुआ) सण शांततेत, उत्सवातुन सामाजिक सलोखा वाढीस लागेल यापद्धतीने साजरे करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय शांतता समितीचे अध्यक्ष तथा‍ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आज संपन्न झाली. बकरी ईद (ईद-उल-झुआ), रक्षाबंधन , नारळी पोर्णिमेच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन श्री. डोंगरे बोलत होते.
यावेळी महापौर शिलाताई भवरे, मनपा आयुक्त लहूराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अपर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, इदगाहच्या ठिकाणी साफसफाई, पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी. बकरी ईद सण कालावधीत शांतता अबाधीत रहावी म्हणून जिल्ह्यातील  यंत्रणांनी आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी संबंधीत यंत्रणेला दिल्या.  
पोलीस अधीक्षक श्री जाधव म्हणाले, जिल्ह्यात हा उत्सव शांततेत पार पाडून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असते. तसेच सर्वांनी कायद्याचे पालन करावे. कुठल्याही सोशल मिडियावरील अफवावर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाकडे माहिती तात्काळ कळवावी. त्यासंबंधीत माहितीची खात्री करुन घ्यावी.  
उपस्थित शांतता समितीतील सदस्यांनी विविध उपयुक्त अशा सुचना मांडल्या. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी केले  तर आभार अपर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी मानले.
00000  


जिल्ह्यात राबविण्‍यात येत असलेल्‍या
केंद्र पुरस्‍कृत योजनेचा लाभ नागरिकांनी घ्‍यावा 
- जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे   
      नांदेड, दि. 20 :- जिल्ह्यात राबविण्‍यात येत असलेल्या विविध केंद्र पुरस्‍कृत योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. सर्व अंमलबजावणी अधिकाऱ्यांची बैठक जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण  नियोजन भवन येथे घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.    
            बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. आर. चलवदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  श्री. राजपूत, उपनिबंधक प्रवीण फडणीस यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी जिल्ह्यात राबविण्‍यात येत असलेल्या केंद्र पुरस्‍कृत योजनेचा आढावा घेतांना नागरिकांना झालेला लाभ, त्‍याची फलनिष्‍पती व त्‍यामधुन पात्र लाभार्थ्‍यांना झालेला लाभ याबाबतची माहिती 28 ऑगस्ट पर्यंत सादर करण्‍याचे निर्देश दिले. केंद्र पुरस्‍कृत योजनेसाठी केंद्र शासनाचे पाहणी पथक येणार असल्यामुळे ज्‍यांना या योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे, अशा नागरिकांची मुलाखत घेण्‍यात येणार आहेत. 
     या बैठकीत जिल्‍हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना व अनु.जाती उपयोजना) सन               2018-19 चा योजनानिहाय आढावा घेण्‍यात आला आहे. या योजनेबा‍बतचे परिपुर्ण प्रस्‍ताव  31 ऑगस्ट पर्यंत सादर करण्‍याबाबतच्‍या निर्देश जिल्‍हाधिकारी श्री. डोंगरे यांनी दिले.   
000000


जिल्ह्यात गत 24 तासात
सरासरी 37.70 मि. मी. पाऊस
नांदेड, दि. 20 :- जिल्ह्यात सोमवार 20 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 37.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण 603.25 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 622.66 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 65.16 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 20 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- 48.50 (707.87), मुदखेड- 69.67 (811.69), अर्धापूर- 57.00 (682.00), भोकर- 43.50 (822.50), उमरी- 63.00 (650.99), कंधार- 31.83 (584.66), लोहा- 35.00 (568.49), किनवट- 11.14 (695.70), माहूर- 12.00 (908.00), हदगाव- 25.86 (751.47), हिमायतनगर- 30.33 (773.01), देगलूर- 33.33 (270.00), बिलोली- 35.80 (425.00), धर्माबाद- 45.00 (485.66), नायगाव- 32.00 (438.60), मुखेड- 29.29 (386.97). आज अखेर पावसाची सरासरी 622.66 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 9962.61) मिलीमीटर आहे.  
00000

Saturday, August 18, 2018


अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्ती
ऑनलाईन अर्ज करण्याची 30 सप्टेंबर मुदत
      नांदेड,  दि. 18 :- नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन 2018-19 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर 2018 पर्यंत मुदत आहे. पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावीत, असे आवाहन नांदेड विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक यांनी केले आहे.
      शासकीय, अशासकीय, कनिष्ठ, वरिष्ठ, कला, वाणिज्य, विज्ञान अनुदानीत, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालय तसेच व्यवसायिक महाविद्यालयातील मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी व जैन या समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार शंभर टक्के पुरस्कृत ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. नवीन मंजूरी व नुतनीकरणासाठी अर्ज विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने मुदतीत करावेत. संबंधीत महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थाप्रमुखांनी महाविद्यालयातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत, असेही आवाहन नांदेड विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक यांनी केले आहे.   
000000


कापूस, सोयाबीन पिकाचा कृषि संदेश
      नांदेड,  दि. 18 :- जिल्ह्यात कापूस व सोयाबीन पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. पिकावरील किडीपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी कृषि संदेश पुढील प्रमाणे दिला आहे.  
      कापसावरील गुलाबी बोंडअळीसाठी 20 कामगंध सापळे प्रती हेक्टर लावावे. तसेच ट्रायकोग्राम बॅक्टरी 1.5 लाख प्रती हेक्टर सोडावेत आणि निंबोळी अर्क 5 टक्केची फवारणी करावी.
      सोयाबीन- तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीसाठी कामगंध सापळे लावावीत, आणि निरीक्षण करावे. तसेच प्रोफेनोफॉस 50 ईसी 25 मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.
00000

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन
व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी
शेतकऱ्यांनी 9 सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करावीत  
नांदेड दि. 18 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकऱ्यांनी व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांकडून 9 सप्टेंबर 2018 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज www.agriwell.mahaonline.gov.in  या संकेतस्थळावर गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचेकडे सादर करावीत, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी व कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे.
जिल्हा परिषद कृषि विभागामार्फत  सन 2018-19 या वर्षासाठी हे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.        या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचे अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत. लाभार्थी शेतकऱ्याने अर्ज विहीत नमुन्यात सादर करावा. त्यामध्ये योजने अंतर्गत समाविष्ठ असलेल्या कोणत्याही एकाच पॅकेजची मागणी करावी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छूक लाभार्थी   हा अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकरी असला पाहिजे. तसेच बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणारा शेतकरी अनुसूचित जमातीचा असला पाहिजे. शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाण पत्र असले पाहिजे. शेतकऱ्याकडे त्याच्या स्वत: च्या नावे जमीन धारणेचा 7/12 दाखला व 8-अ चा उतारा असणे आवश्यक आहे. नविन विहिरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्याकडे त्याच्या स्वत: च्या नावे किमान 0.40 हेक्टर व नविन विहीर खोदणे ही बाब वगळून योजनेतील अन्य बाबीसाठी किमान 0.20 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.  या योजनेअंतर्गत लाभ घेणेसाठी कमाल क्षेत्र मर्यादा 6.00 हेक्टर राहील. लाभार्थ्यांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे बँक खाते असणे व हे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाख 50 हजार रुपया पेक्षा जास्त नसावे. अशा शेतकऱ्यांनी संबंधीत तहसीलदार यांचेकडून सन 2017-18 चे उत्पन्नाचा अद्ययावत दाखला घेणे व अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील. ग्रामसभेने शिफारस केलेल्या ठरावाची प्रत जोडावी. प्रस्तावधारक अनु.जाती / नवबौध्द शेतकऱ्यांने या पूर्वी विशेष घटक योजना / डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत व अनु.जमातीच्या शेतक-यानी ओटीएसपी / टिएसपी योजनेत स्वत: किंवा कुटंबातील सदस्याने लाभ घेतलेला नसावा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत देय उच्चत्तम अनुदान मर्यादा (रुपये) व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत देय उच्चत्तम अनुदान मर्यादा (रुपये) या दोन्ही योजनेअंतर्गत लाभ दयावयाचे घटक व देय अनुदान मर्यादा पुढील प्रमाणे राहील. नवीन विहीर - 2 लाख 50 हजार रुपये. जुनी विहीर दुरुस्ती- 50 हजार रुपये. इनवेल बोअरींग- 20 हजार रुपये. वीज जोडणी आकार- 10 हजार रुपये. शेततळयांचे प्लॅस्टीक अस्तरीकरण- 1 लाख रुपये. सुक्ष्म सिंचन संचात ठिबक सिंचन 50 हजार रुपये तर तुषार सिंचन- 25 हजार रुपये. परसबाग (बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेत)-500 रुपये. पंप संच- 20 हजार रुपये (10 अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे विद्युत पंप संच करीता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार शंभर टक्के अनुदान देय राहिल. पीव्हीसी पाईप (बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेत )- 30 हजार रुपये (राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार 100 टक्के / 600 मी. पाईप्सच्या मर्यादेत यापैकी किमान प्रमाणे अनुदान देय राहिल.) या घटकामधून नविन विहीर पॅकेज, जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज व शेततळयाचे प्लॅस्टीक अस्तरीकरण पॅकेज या तीन पॅकेज मधील एकाच पॅकेजचा लाभ लाभार्थीस अनुज्ञेय राहील. अधिक माहितीसाठी पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांचेशी संपर्क  साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...