Friday, June 1, 2018

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त दिली तंबाखू विरोधी शपथ
         
 नांदेड, दि. 1 :- जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त काल श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात तंबाखू विरोधी शपथ देण्यात आली. यावेळी डॉ. बी. पी. कदम व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर उपस्थित होते. जागतिक तंबाखू नकार दिन 31 मे रोजी साजरा करण्यात येतो. 
          यावेळी रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईकांनी तंबाखू विरोधी शपथ घेऊन तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प केला. कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, डॉ. डी. एल. मिर्झापुरे, डॉ. अर्चना तिवारी यांचे सहकार्य मिळाले.
00000


खरीप हंगाम 2018 :
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत
सहभागासाठी 24 जुलैपूर्वी अर्ज करावेत
कृषि कार्यालयाचे आवाहन   
नांदेड, दि. 1 :- खरीप 2018 हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी 24 जुलै 2018 पूर्वी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी केले.  
या योजनेंतर्गत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार असून ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. नांदेड जिल्ह्यातील भात, खरीप ज्वारी, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, तीळ व कापूस या पीकांचा समावेश आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी 24 जुलै 2018 अंतिम दिनांक आहे.
या योजने अंतर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता पुढील प्रमाणे राहणार आहे.
 पीक
विमा संरक्षीत रक्कम रुपये / हेक्टर
शेतकऱ्यांनी भरावयाचा
पिक विमा हप्ता ( रुपये )
भात
37,000/-
740/-
ख.ज्वार
24,000/-
480/-
तुर
31,500/-
630/-
मुग
18,900/-
378/-
उडीद
18,900/-
378/-
सोयाबीन
42,000/-
840/-
तीळ
23,100/-
462/-
कापुस
42,000/-
2,100/-

या योजनेंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार असून खरीप हंगामातील पिकांसाठी 2 टक्के व कापसासाठी 5 टक्के ठेवण्यात आला आहे. जोखीमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के निश्चित केला आहे. पिक पेरणीपासुन काढणी पर्यंतचा कालावधी नैसर्गीक आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग आदी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणी पश्चात नुकसान इ. जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
0000000

Monday, May 28, 2018


उच्चरक्तदाब, मधुमेह शिबिरात
367 व्यक्तींची तपासणी
नांदेड,दि. 28 :- जागतिक उच्चरक्तदाब दिन व सप्ताह 17 ते 24 मे 2018 या कालावधीत संपन्न झाला. त्याअनुषंगाने श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयाच्यावतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच.आर. गुंटूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली 30 वर्ष वायोगटावरील 367 व्यक्तींचे उच्च रक्तदाब व मधुमेहाची तपासणी करण्यात आली.
त्यात जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा, राज्यकर सहआयुक्त कार्यालय, सहाय्यक आयुक्त (अन्न व औषध प्रशासन) कार्यालय, एम्प्लॉयमेंट ऑफिस, रेल्वे स्टेशन नांदेड, वजिराबाद पोलीस स्टेशन तसेच मध्यवर्ती बस स्थानक नांदेड येथील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. या शिबिरास जिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप्रिया गहेरवार, डॉ. प्रदीप बोरसे, डॉ. साईप्रसाद शिंदे, समुपदेशक सुवर्णकार सदाशिव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संतोष बेटकर, अधिपरिचारिका वर्षा सोळंके, रावणवेणी राधिका उपस्थित होते. या शिबिरास जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दिपक हजारी यांचे सहकार्य मिळाले.
000000

Sunday, May 27, 2018


सहकार क्षेत्रात निस्वार्थ भावनेने व प्रामणिकपणे, जिद्द व चिकाटीने सेवा करणे आवश्यक

--- विधान परिषदेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे

 

नांदेड,दि.26:-  सहकार क्षेत्रात निस्वार्थ भावनेने व प्रामाणिकपणे, जिद्द व चिकाटीने सेवा केल्यास सहकार क्षेत्र अधिक सक्षम होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कुंडलवाडी येथे दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या 22 व्या शाखेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेच्या अध्यक्षा श्रीमती शैलेजाताई इनामदार तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुभाष साबणे , भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राम पाटील -रातोळीकर , माजी आमदार गंगाराम ठक्करवाड, जिल्हा परिषदेचे सदस्य लक्ष्मण ठक्करवाड , प्रमोद देशमुख , मनोहर देशपांडे, नगरसेवक पंढरीनाथ दाचावार, राजू गंदीगुडे, आदि. मान्यवरांची या कार्यक्रमास उपस्थिती होती.  

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विधान परिषदेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की, आपल्या देशातील लोकांच्या अंगी सहकार हा गुण असल्याने , ही एक आपली चांगली संस्कृती आहे. दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेसारख्या अनेक सहकारी बँका आजही कार्यक्षमपणे काम करीत आहेत. सहकारी बँकांनी कर्ज देतांना कांही महत्वाची पथ्य पाळावीत. तसेच कर्ज देणे जेवढे सोयीचे केले आहे, तवढेच वसूल करणेही अवघड असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच कर्जदारांना कर्ज देतांना कर्जदारांची पात्रता पाहूनच बँकानी कर्जाचे वितरण केले पाहिजे , असा सल्लाही विधान परिषदेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दि भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या संचालक मंडळास दिला. या उद्घाटन समारंभास शहर व परिसरातील शेतकरी, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थिती होती.  

या कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेचे पुजन करुन करण्यात आले. त्यानंतर बँकेच्या अध्यक्षा सौ. शैलेजाताई इनामदार यांनी प्रास्ताविक करुन बँकेकडून गोळवलकर सहकारी रुग्णालयास 4 लाख 51 हजार रुपयांची धनादेशाद्वारे देणगी म्हणून सुधीर कोकणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. तसचे या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कल्याण गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. आनंद इनामदार यांनी मानले.

****








Friday, May 25, 2018

पीक कर्जमाफीचे अर्ज करण्यास 5 जून
तर समझोता योजनेसाठी 30 जूनची मुदतवाढ  
वंचित शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 
नांदेड, दि. 25 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत यापुर्वी विहित कालावधीत अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा मंगळवार 5 जून 2018 पर्यंत उपलब्ध करुन दिली आहे. एक लाख 50 हजारापेक्षा जास्त थकीत कर्ज असणाऱ्या शेतक-यांना एकरकमी समझोता योजनेत 1 लाख 50 हजार रुपयापेक्षा अधिकची रक्कम बॅंकेत जमा करण्यासाठी शनिवार 30 जून 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तसेच दि. 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2009 पर्यत उचल केलेल्या पीक, इमुपालन, शेडनेट, पॉली हाऊसाठी मध्यम मुदत कर्ज 30 जून 2016 रोजी थकीत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 1 मार्च 2018 रोजी पासून केलेल्या अर्जात नवीन माहिती समाविष्टासाठी शेतकऱ्यांनी “आपले सरकार” सेवा केंद्रावर किंवा https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत: नोंदणी करुन युजर आयडी व पासवर्डच्या आधारे ऑनलाईन अर्ज सादर करावीत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नांदेड यांनी केले आहे.  
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ज्या शेतकऱ्यांना सन 2008 व 2009 मध्ये केंद्र व राज्य शासनाव्दारे कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, असे शेतकरी वगळून 1 एप्रिल 2001 ते  31 मार्च 2009 मधील कर्जदार शेतक-यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा दि. 9 व 21 मे 2018  रोजीच्या शासन निर्णयाद्वारे या योजनेची व्याप्ती वाढवली आहे.
ज्या शेतक-यांनी 22 सप्टेंबर 2017 पूर्वी किंवा 1 मार्च 2018 पासून आता पर्यत ऑनलाईन पध्दतीने कोणताही अर्ज सादर केला नाही त्यांनी ऑनलाईन अर्ज भरावीत. कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यांना नव्याने कर्जाची आवश्यकता असल्यास त्यांनी संबंधित बॅंकेकडे कर्ज मागणी करावी व ज्यांना कर्ज मिळण्याबाबत अडचणी आहेत त्यांनी संबंधित तालुका उपनिबंधक, सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांनी केले आहे.
000000

शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा
तुषार संच बसविण्यासाठी  
ऑनलाईन नोंदणी सुरु
नांदेड दि. 25 :- प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना सन 2018-19 साठी ई-ठिबक आज्ञावलीवर ठिबक / तुषार संच बसविण्यासाठी शेतक-यांची ऑनलाईन नोंदणी चालु झाली आहे. लाभार्थी आणि अर्ज नोंदणी करताना अर्जदारांनी अचुकपणे नोंद करावी. या योजनेचा शेतक-यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
ज्या शेतक-यांना ठिबक / तुषार संच बसवून अनुदानाचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी ई-ठिबक www.mahaagri.gov.in व www.mahaethibak.gov.in या वेबसाईटवर लाभार्थी नोंदणी आणि अर्ज नोंदणी करावी. लाभार्थी नोंदणी आणि अर्ज नोंदणी करताना अर्जदारांनी पुढील बाबींची अत्यंत अचुकपणे नोंद करावी. अर्जदाराचे संपूर्ण नाव, गावाचे नाव (ज्या गावाच्या शिवारामध्ये संच बसवायचा आहे आणि ज्या गावाचा 7/12 जोडावयाचा आहे ते गाव), पिकाचे नाव ( ज्या पिकासाठी संच बसवायचा आहे ते पीक), पिकाचे अंतर, सुक्ष्म सिंचनचा प्रकार ठिबक / तुषार , गट क्रमांक (ज्या गटात संच बसवायचा आहे तो गट क्रमांक), गटाचे क्षेत्र (ज्या गटात संच बसवायचा आहे त्या गटातील अर्जदाराचे क्षेत्र), आठ-अ प्रमाणे क्षेत्र (अर्जदाराचे त्या गावातील 8 अ प्रमाणे एकूण क्षेत्र). अर्जदाराच्या आधार संलग्न असलेल्या बँक खात्याचा तपशील जसे बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, आयएफसी कोड नंबर. ऑनलाईन अर्ज नोंदणी करताना याबाबींची अचुकपणे नोंद करणे गरजेचे आहे. त्याकरिता अर्ज नोंदणी झाल्यानंतर त्याची प्रिंट घ्यावी व तिचे व्यवस्थीत वाचन करुन खात्री करावी. यापैकी एक जरी बाब चुकीची नोंदली गेली तरी संपूर्ण अर्ज रद्द करावा लागतो. यामध्ये दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. असेही आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
00000

महाराष्ट्र विधासनभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे यांचा दौरा
नांदेड दि. 25 :- महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 26 मे 2018 रोजी सिंकदराबाद रेल्वे स्टेशन हैदराबाद येथून देवगिरी एक्सप्रेसने दुपारी 3.46 वा. धर्माबाद रेल्वे स्टेशन येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह धर्माबादकडे प्रयाण. सायं. 4 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सायं. 4.30 वा. शासकीय विश्रामगृह येथून कुंडलवाडी ता. बिलोलीकडे प्रयाण. सायं. 5 वा. कुंडलवाडी येथे आगमन व भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक लि. नांदेड - कुंडलवाडी शाखेच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. सोईनुसार मोटारीने कुंडलवाडी येथून शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन, राखीव व मुक्काम.
रविवार 27 मे 2018 रोजी मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथुन सकाळी 10.45 वा. ओम गार्डन नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11 वा. ओम गार्डन येथे आगमन व बाळासाहेब पांडे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यास उपस्थिती. सोईनुसार ओम गार्डन नांदेड येथुन मोटारीने उस्मानपुरा औरंगाबादकडे प्रयाण करतील.
000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...