Wednesday, November 15, 2017

शेतकऱ्यांनी मुग, उडीद, सोयाबीन
खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा  
नांदेड, दि. 15 :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडमार्फत हमी भावाने एफएक्यु प्रतीचा मुग, उडीद व सोयाबीन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावतीने जिल्हा मार्केटिंग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत नाफेड मार्फत हमी भावाने मुग, उडीद खरेदी करण्यासाठी देगलूर, धर्माबाद, बिलोली येथे खरेदी केंद्र सुरु आहेत. तसेच सोयाबीन खरेदीसाठी नांदेड, (अर्धापूर) भोकर, उमरी, हदगाव, लोहा, नायगाव, मुखेड, देगलूर, धर्माबाद, बिलोली याठिकाणी खरेदी केंद्र सुरु असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.

000000
डॉ. चंद्रशेखर एस. व जोस जोइमेट यांचा दौरा
नांदेड, दि. 15 :- डॉ. चंद्रशेखर एस. (आयजीआयडीआर) व जोस जोइमेट (युनिसेफ) हे नांदेड दौऱ्यावर येणार असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
गुरुवार 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा. सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्हा नियोजन अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासोबत ऑनलाईन आणि ऑफलाईन डेटाबेसचा आढावा. दुपारी 12 ते 12.30 वा. महिला आणि बालविकास विभाग यांच्या डेटाबेसबाबत चर्चा, दुपारी 12.30 ते 1 वाजेपर्यंत जिल्हा शिक्षण अधिकारी सोबत डेटाबेस चर्चा, दुपारी 1 ते 1.30 वा. जिल्हा कृषी अधिकारी यांच्या डेटाबेसविषयी चर्चा. दुपारी 1.30 ते 2.15 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2.15 ते 3 वाजेपर्यंत समाज कल्याण, आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत डेटाबेसबाबत चर्चा. दुपारी 3 ते 3.30 पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत डेटाबेस चर्चा, दुपारी 3.30 ते 4 वाजेपर्यंत विद्युतीकरण विभाग यांच्याशी डेटाबेस चर्चा. दुपारी 4 ते 4.30 पीडीएस विभागाचे अधिकारी यांच्या कार्यालयाच्या पीडीएसबाबत माहिती. दुपारी 4.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती एकत्रित करतील.  

00000
मतदारांची माहिती बीएलओ घरोघरी भेटी देऊन गोळा करणार ;
दावे व हरकती 30 नोव्हेंबर पर्यंत स्विकारण्यात येणार  
नांदेड, दि. 15:- भारत निवडणूक आयोगाने छायाचित्र मतदार याद्यांचा संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने जिल्‍हयातील नऊ विधानसभा मतदारसंघाच्‍या प्रारूप  मतदार याद्यांची प्रसिध्‍दी करण्‍यात आली आहे. नाव नोंदणी संदर्भात दावे व हरकती गुरुवार 30 नोव्‍हेंबर  2017 पर्यंत स्विकारण्‍यात येणार आहेत. जिल्‍हयातील जास्‍तील जास्‍त मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी, दुरूस्‍ती, वगळणी करून घेण्‍यासाठी संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ), तहसिल कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अरूण डोंगरे यांनी केले आहे.
मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्‍या पात्र नागरीकांना नमुना 6 मधील अर्ज तसेच दुबार, स्‍थलांतरीत मतदारांना, मयत मतदारांच्‍या नातेवाईकांना मतदार यादीतील नाव वगळण्‍यासाठी नमुना 7 मधील अर्ज, मतदार यादीतील चुका दुरूस्‍तीसाठी नमुना 8 मधील अर्ज संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, तसेच तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकरी यांच्‍याकडे सादर करता येतील. जास्‍तीतजास्‍त पात्र मतदारांची नोंदणी होण्‍यासाठी मतदार यादी अचुक होण्‍यासाठी व मतदारांना मतदार नोंदणीविषयक चांगल्‍या सुविधा उपलब्‍ध देता याव्‍यात यासाठी 15 नोव्‍हेंबर ते 30 नोव्‍हेंबर 2017 या कलावधीत जिल्‍हयातील सर्व मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी ( बीएलओ ) हे घरोघरी भेटी देऊन मतदारांची नोंदणी व पडताळणी करणार आहेत. 
पुर्वीच्‍या पुनरीक्षण कार्यक्रमात मतदार यादीत नाव नोंदणी पासून वंचित राहिलेल्‍या पात्र नागरीकांना नमुना 6 चे वाटप करणे व त्‍यांच्‍याकडुन परत घेणे, जमा करणे मतदार नोंदणीसाठी पात्र होणाऱ्या  नागरीकांची माहिती जमा करणे. स्‍थलांतरीत व मयत मतदारांच्‍या वगळणीसाठी नमुना- 7 चे वाटप करणे व जमा करणे. प्रारूप मतदार यादीतील तपशिल दुरूस्‍तीसाठी नमुना आठचे वाटप करणे व जमा करणे. मतदारांचे मोबाईल व दुरध्‍वनी क्रमांक गोळा करणे. मोबाईल अज्ञावलीचा वापर करून मतदारांच्‍या घरांचे अक्षांक्ष व रेखांक्ष गोळा करणे. दुबार मतदारांना सूचना बजावणी करणे अथवा पंचनामा करणे, मतदार यादीत फोटो नसलेल्‍या व कृष्‍णधवल फोटो असलेल्‍या मतदारांची नजीकच्‍या काळातील रंगीत  फोटो मतदारांकडून प्राप्‍त  करून घेणे. 

00000
दहावीच्या मार्च 2018 परीक्षेसाठी
ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 15 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या मार्च 2018 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास गुरुवार 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ मंडळाने जाहीर केली आहे.  
परीक्षेस नियमित प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले पुर्वीचे खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे विद्यार्थी व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणारे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याच्या सुधारीत वाढीव तारखा जाहीर करण्यात आल्या असून www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यात यावेत.
माध्यमिक शाळांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची मुदत विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरावयाची मुदत गुरुवार 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत आहे. शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाची मुदत शुक्रवार 1 डिसेंबर 2017 पर्यंत. विभागीय मंडळाकडे चलन व विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची मुदत शुक्रवार 8 डिसेंबर 2017 आहे.   
शाळांनी विद्यार्थ्यांच्या याद्या गुरुवार 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत एक्सलमध्ये मुद्रीत कराव्यात. परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी शाळेशी संपर्क साधावा. ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीबाबत मुख्याध्यापक यांनी संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.  ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांचे जन्म ठिकाण नमूद करण्याची कार्यवाही शाळांनी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये करावी. प्रचलित शुल्क बॅक ऑफ इंडियात जमा करुन बँक ऑफ इंडियाची चलनाची प्रत, विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर करण्यात याव्यात. अर्जामध्ये आधारकार्ड क्रमांक नमुद करण्याबाबत अनिवार्य केलेले असले तरी एखादा विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नोंदणी केलेली असेल तर नोंदणी क्रमांक देखील ग्राह्य धरण्यात येईल. आधार नोंदणी केली नसेल तर निकालापर्यंत आधार कार्ड काढण्यात येईल असे विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांना लेखी हमीपत्र देणे आवश्यक आहे. आधार कार्ड क्रमांक नाही म्हणून अर्ज भरले नाही असे होणार नाही याची दक्षता घ्यावी. लातूर विभागीय  मंडळातील शाळांनी एच.डी.एफ.सी. बँकेत मंडळाच्या जमा खात्यात शुल्क जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. या कालावधीत शाळांनी ऑनलाईन प्रीलिस्ट प्रिंट करुन घ्याव्यात व प्रीलिस्टची विद्यार्थ्यामार्फत तपासणी करुन त्यांच्या ऑनलाईन दुरुस्त्या गुरुवार 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत करणे आवश्यक आहे. मंडळामार्फत वेगळी प्री-लिस्ट दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी. मार्च 2018 परीक्षेसाठी खाजगीरित्या ऑनलाईन नावनोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याच्या तारखा स्वतंत्रपणे कळविण्यात येतील, असे लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी कळविले आहे.

0000000

Tuesday, November 14, 2017

श्री खंडेरायाच्या माळेगाव यात्रेसाठी
काटेकोर सुनियोजन करा
- अशोक शिनगारे
नांदेड, दि. 14 :- श्रीक्षेत्र माळेगाव येथील श्री खंडेरायाची यात्रा 16 ते 20 डिसेंबर 2017 कालावधीत भरणार आहे. या यात्रेत कृषि-प्रदर्शन, पशू-प्रदर्शन यांच्यासह कुस्ती स्पर्धेसह विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी नेमके आणि यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा मिळाव्यात यासाठी सुनियोजन करा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे दिले. यात्रेच्या पुर्वतयारीसाठी जिल्हा स्तरीय नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार जवळगावकर होत्या. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक संपन्न झाली.  
बैठकीस आमदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, शिक्षण व आरोग्य समिती सभापती माधव मिसाळे, समाज कल्याण सभापती श्रीमती शिला निखाते, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती दत्तात्रय रेड्डी, महिला व बालविकास समितीचे सभापती श्रीमती मधुमतीताई देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईमोदिन कुरेशी, पदाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.
 बैठकीत पाणी पुरवठा, पोलीस बंदोबस्त, पशुसंवर्धन, कृषि, बांधकाम, शिक्षण आरोग्य, महावितरण, आदी विभागांच्या जबाबदाऱ्या व सहभागाबाबत पुर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. पशू प्रदर्शन यावर्षीही भव्य आणि सुनियोजितपणे होईल यासाठी नियोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, यात्रेसाठी समन्वयाने आणि वेळेत नियोजन करा. प्रत्येक विभागाला सोपविलेले काम आणि त्याची अमंलबजावणी चोखपणे करा, या यात्रेची परंपरा फार मोठी आहे. दक्षिण भारतातील महत्त्वाची यात्रा आहे. त्यामुळे या यात्रेद्वारे पशू-प्राण्यांचे प्रदर्शन आणि त्यांच्या जाती-प्रजातींचे जतन करण्याचे काम होते. त्यामुळे या सर्व घटकांचा विचार करून नियोजन करा. विशेषतः आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेविषयी दक्ष रहण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी वीज व्यवस्था, अग्निशमन दलाच्या वाहनांची व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्ताबाबतचा आढावा घेण्यात आला.  आरोग्य विभागाकडून चोवीत तास तीन पाळ्यांमध्ये वैद्यकीय पथकांची नियुक्ती तसेच पुरेसा औषधसाठा, तीन रुग्णवाहिका, 108 रुग्णवाहिका उपलब्ध राहतील असे नियोजन करण्यात आले आहे.
बैठकीत माळेगाव ग्रामपंचायतीचे सदस्यांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आदींसह उपस्थिती नागरिकांनाही चर्चेत भाग घेतला व सूचना केल्या.              

0000000
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
अर्जासाठी 25 नोव्हेंबरची मुदत
अर्ज ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने करता येणार   
नांदेड दि. 14 :- शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील सन 2018 साठी इयत्ता 6 वी प्रवेशाचे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शनिवार 25 नोव्हेंबर 2017 पर्यंत जमा करता येतील. संबंधीत मुख्यापक, शिक्षक व पालकांनी जास्तीतजास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज त्वरीत जमा करावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य हरिवरा प्रसाद यांनी केले आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय अधिकृत सेतु केंद्राच्या माध्यमातून ऑनलाइन प्रवेश अर्ज करता येतील. तसेच संबंधीत शाळा मुख्याध्यापकांनी शाळेतील ऑफलाइन प्रवेश अर्ज जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथे ऑनलाईन करण्यासाठी त्वरीत जमा करावेत. प्रवेशासाठी अर्ज www.jnvnanded.com, या विद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.  ही प्रवेश परीक्षा 10 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्ह्यात घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.  
000000




 ग्रंथोत्सवात शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा
नांदेड दि. 14 :- शालेय विद्यार्थ्यांचा ग्रंथोत्सवामध्ये सहभाग असावा यासाठी माध्यमिक स्तरावरील शालेय विद्यार्थ्यांसाठी "मानवी जीवनात ग्रंथाचे महत्व" या विषयावर 2 हजार शब्दमर्यादेत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांनी निबंध शनिवार 18 नोव्हेंबर 2017 पर्यंत स्पर्धेचे संयोजक वसंतनगर येथील राजर्षी शाहू विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. सुरेश सावंत यांचेकडे पाठवावेत. या स्पर्धेमध्ये जास्तीतजास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन ग्रंथोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने "नांदेड ग्रंथोत्सव 2017" चे आयोजन 22 व 23 नोव्हेंबर 2017 रोजी करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवामध्ये ग्रंथप्रदर्शन, ग्रंथविक्री व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथ व रोख रक्कम देण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम विजेत्यांना 500 रुपये, द्वितीय 400 रुपये, तृतीय 300 रुपये व दोन उत्तेजनार्थक विजेत्यांना प्रत्येकी 200 रुपयाचे बक्षिस देण्यात येईल, अशी माहिती  ग्रंथोत्सव समन्वय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी दिली.   

000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...