Saturday, September 9, 2017

जिल्ह्यातील सर्व शाळा फूटबॉलमय व्हाव्यात
                                  - जिल्हाधिकारी डोंगरे  
महाराष्ट्र मिशन एक मिलीयन फूटबॉल अंतर्गत
15 सप्टेंबरला जिल्ह्यातील 30 हजार खेळाडू खेळणार फूटबॉल
नांदेड दि. 9 :- फिफा फूटबॉल वर्ल्डकप 2017 अंतर्गत फूटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र मिशन,  एक मिलीयन फूटबॉल सामन्याचे आयोजन नांदेड शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करण्यात यावे. यानिमित्ताने सर्व शाळा फूटबॉलमय व्हाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभागाच्या आवाहनानुसार शिक्षण विभाग व जिल्हा क्रिडा अधिकारी नांदेड यांच्यावतीने आयोजिन मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, क्रीडा शिक्षक, तालुका क्रीडा संयोजक आदींच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नांदेड वाघाळा मनपाचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे, संतोष कंदेवाड, शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री गोरे, शिवाजीराव खुडे, मनपाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव,  शिवछत्रपती पुरस्कार विजेते रामलू पारे, फूटबॉलचा आंतरराष्ट्रीय  खेळाडू जगदीश गादेवाड आदींची उपस्थिती होती.
ऑक्टोबर महिन्यात आयोजित 17 वर्षांखालील जागतिक फूटबॉल स्पर्धेचे आयोजन भारतात 6 ठिकाणी करण्यात आले आहे, पैकी महाराष्ट्रात डी.वाय. पाटील स्टेडीयम नवी मुंबई येथेही हे सामने होणार आहेत.  त्यासाठी वातावरण निर्मिती व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांत खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यातील संपूर्ण शाळांमधून येत्या 15 सप्टेंबर रोजी फूटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या नियोजनानिमित्त या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
            यावेळी जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, खेळातून एक सकस मन तयार होते. आज जगात अनेक खेळ खेळले जातात. परंतु आज व्यस्त शिक्षण संस्कृती व मोबाईल गेममध्ये गुरफटून गेलेली मुले अभावानेच मैदानावर खेळतांना दिसतात. यामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला खिळ बसत आहे. म्हणून शिक्षक, पालकांसह सर्वांनी खेळाला प्राधान्य देवून खेळाडू तयार करावेत असेही श्री. डोंगरे म्हणाले.
            नांदेड वाघाळा महापालिकेचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सांगितले की, फूटबॉल स्पर्धेची वातावरण निर्मीती करण्यासाठी महापालिकेने विशेष नियोजन केले आहे. यासाठी इंदिरा गांधी मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच खेळाडूंना रात्रीच्यावेळीही खेळण्यासाठी मैदानावर फ्लडलाईटची व्यवस्था केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री गोरे म्हणाल्या की, शालेय स्तरापासून खेळातूनच  शिक्षण प्रक्रिया राबवली गेली पाहिजे व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांतील शक्ती सामर्थ्य ओळखून त्यांच्यातील क्रीडा वृत्तीला चालना द्यायला हवी. या फूटबॉल सामन्याच्या निमित्ताने 15 सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्हा फूटबॉलमय झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव यांनी नियोजनाची भुमिका विषद करताना सांगितले की, संपुर्ण जिल्हा फूटबॉलमय करण्यासाठी  जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाकडून शासनाच्या नियोजनानुसार जिल्ह्यातील ऑनलाईन नोंदणी केलेल्या शाळांना फूटबॉलचे वितरण करण्यात येणार आहे. शाळांनी उपलब्ध असलेल्या मैदानावर 15 सप्टेंबरला समारंभपूर्वक फूटबॉलचे सामने घ्यावेत व त्याचे चित्रीकरणही करण्यात यावे, असे आवाहनही श्री. यादव यांनी केले.
यावेळी मनपाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक प्रलोभ कुलकर्णी यांनी केले. प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे व उपस्थित मान्यवरांनी व्यासपीठावरील नियोजित सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढून बैठकीचे उद्घाटन केले. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू जगदीश गादेवाड यांचा सत्कार करण्यात आला. बैठक यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी सय्यद साजिद, एम.जे. सोनकांबळे, प्रवीण कोंडेकर, क्रीडा मार्गदर्शक शिवकांता देशमुख, अनिल बंदेल, आनंद गायकवाड, आनंद सुरेकर, संजय चव्हाण, पदमाकर कुलकर्णी, आनंद जोंधळे, मोहन पवार, चंद्रकांत गव्हाणे, सुभाष धोंगडे, लक्ष्मीकांत रोटे, हनमंत नरवाडे, नारायण सूर्यवंशी, संजय भालके आदींनी परिश्रम घेतले.
00000

Friday, September 8, 2017

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या
शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ
 नांदेड दि. 8 :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय, कनिष्ठ, वरिष्ठ, कला, वाणिज्य, विज्ञान अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानीत महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये तसेच व्यवसायिक महाविद्यालयातील सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी व जैन या समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची 100 टक्के पुरस्कृत अल्पसंख्यांक पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांक पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्ती नवीन मंजुरी व नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे. संबंधीत महाविद्यालयांचे प्राचार्य व संस्थाप्रमुख यांनी महाविद्यालयातील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी योग्य प्रयत्न करावेत, असे आवाहन नांदेड विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी केले आहे.   

0000000
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
युवा मंडळांनी साजरा करावा
नांदेड दि. 8 :- जिल्ह्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन युवा मंडळांनी उत्साहात साजरा करावयाचा आहे. यानिमित्ताने ध्वजारोहण, मराठवाडा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार, स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक ठिकाणी स्वच्छता करणे, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेऊन वृक्षारोपण, रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात युवकांनी आपल्या गावात साजरा करावा. त्याबाबत नेहरु युवा केंद्र नांदेड यांना अहवाल सादर करावा, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक विनायक धंडे यांनी केले आहे.  

000000
शाश्वत वीज आणि समृद्ध शेतीसाठी जिल्ह्यातील
शेतकऱ्यांनी अटल सौर कृषीपंप योजनेचा लाभ घ्यावा
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

नांदेड दि. 7 :- शाश्वत वीज आणि समृद्ध शेतीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अटल सौर कृषीपंप योजनेचा लाभ घ्यावा. त्यासाठी शेतकऱ्यांनी 11 ते 21 सप्टेंबर 2017 या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज संबंधीत उपकार्यकारी अभियंता महावितरण यांचेकडे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला असून प्रायोगिक तत्वावर राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये अटल सौर कृषीपंप योजना महावितरणकडून राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी अटल सौर कृषीपंप योजनेची भक्कम साथ मिळणार आहे. अटल सौर कृषीपंप अत्यंत माफक दरामध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
पाच एकर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदान व 5 एकरच्या पुढे 10 एकरच्या आत पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना 85 टक्के अनुदान मिळणार आहे. या पंपाची कार्य उपलब्धता ही सकाळी 8 ते सायं 5 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी वीज उपलब्धतेसाठी जागण्याची गरज नाही. तसेच वीज बिल भरण्याची  गरज भासणार नाही. लोडशेडींग, ब्रेकडाऊन, रोहित्र जळणे इत्यादी त्रासापासून मुक्तता मिळत असल्यामुळे सौरपंपाचा जास्तीतजास्त वापर होतो व पिकाची हमी मिळण्यास मदत होते. पंपाची देखभाल व दुरुस्ती 5 वर्षापर्यंतचा खर्च पुरवठादाराकडे असल्यामुळे देखभाल व दुरुस्तीच्या खर्चापासून मुक्त असेल. त्याचबरोबर सौरपंपाचा विमा शासनातर्फे उतरिवण्यात येणार असल्यामुळे पंप चोरीला जाणे आदी बाबींची शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज भासणार नाही. म्हणुन नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अटल सौरकृषी पंप योजनेचा लाभ घेऊन शाश्वत वीज आणि समृद्ध शेतीच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहनही श्री. डोंगरे यांनी केले.
ही योजना मर्यादीत कालावधीसाठी असल्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्रथम सौरपंप देण्याचे प्राधान्य दिले  जाणार आहे. म्हणुन सर्व शेतकऱ्यांनी 11 ते 21 सप्टेंबर 2017 या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज संबंधीत उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. सौर कृषीपंप बसवायाचा आहे त्या शेतजमीनीचा मालक संबंधीत लाभार्थी असणे गरजेचे आहे. सौरकृषीपंप मिळण्यासाठी लाभार्थ्यांकडे महावितरणचे विद्युत कनेक्शन नसावे. लाभार्थ्याकडे दहा एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. विहिर, विंधन विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असावे. लाभार्थ्यांकडे सौर ऊर्जा पॅनल बसविण्यासाठी सावली विरहीत जागा असावी, असे या योजनेच्या पात्रतेसाठी निकष आहेत, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाची अटल सौर कृषीपंप योजना
अ.क्र.
सोलार सबमर्सिल पंप
किंमत रु. / पंप
शेतकऱ्याचा वाटा 5 एकर पर्यंत रु. / पंप
शेतकऱ्याचा वाटा 10 एकर पर्यंत रु. / पंप
1
3000 वॅट ( 3 एच. पी. ए. सी. )
3,24,000/-
16,200/-
48,600/-
2
3000 वॅट ( 3 एच. पी. ए. सी. )
4,05,000/-
20,250/-
60,750/-
3
4800 वॅट ( 5 एच. पी. ए. सी. )
5,40,000/-
27,000/-
81,000/-
4
4800 वॅट ( 5 एच. पी. ए. सी. )
6,75,000/-
33,750/-
1,01,250/-
5
6750 वॅट ( 7.55 एच. पी. ए. सी. )
7,20,000/-
36,000/-
1,08,000/-
पात्र लाभार्थ्यांमध्ये प्राधान्यक्रम ठरविण्याचे निकष असून त्यामध्ये सिंचन योजनेंतर्गत विहिरीचा लाभ घेतलेले शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, महावितरणकडे पैसे भरलेले प्रलंबित ग्राहक, ज्यांना तांत्रिक अडचणीमुळे व नजिकच्या काळात वीज पुरवठा करणे शक्य नाही असे शेतकरी, वनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, राज्यातील पारंपारिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी यांचा समावेश आहे. राज्य शासनाने ठरवुन दिलेल्या निकषानुसार लाभार्थ्यांची निवड यादी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीद्वारे करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी  सांगितले.                   000000

वृत्त क्र. 840         

Thursday, September 7, 2017

दिवाळीसाठी फटाका दुकानांच्या
परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 7 :- दिपावली उत्सव बुधवार 18 ऑक्टोंबर ते शनिवार 21 ऑक्टोंबर 2017 या कालावधीत साजरा होणार आहे. या कालावधीतील तात्पुरती फटाका विक्रीची दुकाने सुरु करण्यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरते फटाका परवाना जि‍ल्‍हादंडाधिकारी तर जिल्‍हयातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी त्‍यांच्या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरता फटाका विक्री परवाने देतील. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्‍यात आले आहेत. इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज सोमवार 25 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने केले आहे.
नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्‍या मार्फत व जिल्‍हयातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्‍या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विस्‍फोटक अधिनिमय 2008 नुसार शनिवार 16 सप्टेंबर ते सोमवार 25 सप्टेंबर 2017 या कालावधीत विक्री व स्विकारले जातील.
तात्‍पुरता फटाके विक्री परवानासाठी विहित नमुन्‍यात पुढील कागदपत्रांसह अर्ज आपल्‍या  कार्यक्षेत्रातील कार्यालयात दाखल करावेत.   नमुना AE-5 मधील अर्ज, परवाना घेण्‍याच्‍या दुकानाचा नकाशा ज्‍यात साठा व विक्री करावयाचे ठिकाण, साठवणूक क्षमता, त्‍याचा मार्ग परिसरातील सुविधा इत्‍यादी तपशील दर्शविण्‍यात यावा. The Explosive Rules 2008 मधील नियम 86(3) अन्‍वये सदर व इतर दुकान यात किमान 15 मीटरचे अंतर असणे आवश्‍यक  आहे. नकाशात दुकान क्रमांक नमुद असावा. नकाशा स्थानिक प्राधिकरणाकडून साक्षांकित केलेला असावा. अर्जदाराचे दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र. परवाना शुल्कासाठी 500 रुपये चलनाची प्रत जोडलेली असावी. एकाच परिसरात सामुहिकरित्‍या दुकाने टाकण्‍यात येत असल्‍यास संबंधीत अर्जदारास देण्‍यात आलेला दुकान क्रमांक नमुद असलेले प्रमाणपत्र (Allotment Letter). आयुक्‍त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड किंवा संबंधीत नगरपरिषद, नगरपंचायत यांचे मुख्याधिकारी किंवा ग्रामपंचायत कार्यालय यांचे  नाहरकत प्रमाणपत्र. संबंधीत पोलीस स्‍टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्र व नाहरकत प्रमाणपत्र. जागेच्‍या मालकी हक्‍काचा पुरावा. नोंदणीकृत, मान्यता प्राप्त असोसिएशन मार्फत तात्पुरता फटाका परवानासाठी अर्ज केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या परवान्यातील नमूद ज्या अटी व शर्तीनुसार संबंधीत दुकानांची उभारणी करणे बंधनकारक राहील. तसेच कोणत्याही विस्फोटक नियमांचे व परवान्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन होऊन कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत असोसिएशनची असले याबाबत संबंधीत असोसिएशनकडील शपथपत्र. दुकानाच्‍या ठिकाणी करण्‍यात आलेली व्‍यवस्‍था तपशील अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक इ.. इतर अटी व शर्ती नियम 84 नुसार.
अर्जदाराने विहित नमुन्‍यातील सर्व कागदपत्राची पुर्तता केली असल्‍याची खात्री झाल्‍यानंतर सबंधीत कार्यालयाकडून चलन नोंदवून देण्‍यात येईल. चलनाद्वारे शुल्क शासन जमा झाल्‍यानंतर चलनाची प्रत अर्जासोबत जोडून, सबंधीत परिपुर्ण अर्जाच्‍या अनुषंगाने मंगळवार 3 ऑक्टोंबर व बुधवार 4 ऑक्टोंबर 2017 या कालावधीत नांदेड महानगरपालिका हद्दीतील परवाने जिल्‍हादंडाधिकारी नांदेड यांच्‍यामार्फत तसेच उ‍पविभागीय दंडाधिकारी यांच्‍या हद्दीतील परवाने संबंधीत उपविभागीय दंडाधिकारी यांच्‍यामार्फत दिले जातील.
       या कालावधीत The Explosive Rules 2008 मधील नियम 84 (6) अन्‍वये एकाच ठिकाणी 50 पेक्षा जास्‍त दुकानास अनुज्ञाप्‍ती दिली जाणार नाही. विहित केलेल्‍या साठा व विक्री परिणामापर्यतचाच व्‍यवहार करता येईल. याबाबत The Explosive Rules 2008 मधील नियमानुसार व SET-X ते SET-Xv मधील निर्देशानुसार साठा नोंदवही तयार करुन ती तपासणीसाठी उपलब्‍ध ठेवावी लागेल. The Explosive Rules 2008 अन्‍वये अनाधिकृतपणे विस्‍फोटक साठा व विक्री करणे हा गंभीर स्‍वरुपाचा अपराध असून तो दंडनीय आहे, याची नोंद घ्यावी असेही जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने कळवले आहे.

000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...