Sunday, July 16, 2017

जिल्हा कुष्ठरोग कार्यालयाचा
नवीन दुरध्वनी क्रमांक
नांदेड दि. 16 :- जिल्हा कुष्ठरोग कार्यालय व पर्यवेक्षिय नागरी कुष्ठरोग पथक नांदेड ही दोन्ही कार्यालय डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जुनी इमारत, सामान्य रुग्णालय परिसर, वजिराबाद नांदेड येथे स्थालांतरीत करण्यात आले आहे. या कार्यालयाचा नवीन दूरध्वनी क्र. 02462-230128 हा आहे. संबंधीतांनी नवीन दुरध्वनी क्रमांकाची नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेडचे आरोग्य सेवा कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. डी. टी. कानगुले यांनी केले आहे.

000000
बालकांच्या हक्काबाबत
समाजात जागरुकता आवश्यक
- न्या. वसावे
नांदेड दि. 16 :- मुलांना इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत मोफत शिक्षण आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेने बालकांना प्रवेश शुल्क व परिक्षा शुल्क घेतल्यास संस्थेवर दंडात्मक कार्यवाही होते. बालकांच्या शैक्षणिक हक्कासंबंधी व संरक्षणाबाबत संस्थेने पालाकांना माहिती देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकाराचे सचिव न्या. डी. टी. वसावे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने सुमन मुलींचे बालगृह, हनुमानगड नांदेड येथे ‘‘बालकांचे अधिकार, त्यांची काळजी व संरक्षण’ या विषयावर कायदे विषयक शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षावरुन न्या. वसावे हे बोलत होते. यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हरदीप सिंघ, अभिवक्ता संघाचे उपाध्यक्ष अॅड. जगजीवन भेदे, सुमन मुलींचे बालगृहाचे अधिक्षक ए. व्ही. दिनकर, आर. जी. कानोटे, अॅड. वैशाली ढवळे, श्रीमती पुरन शेट्टीवार, श्रीमती तुमवाड, श्री. घाटे यांची उपस्थिती होती.
न्या. वसावे यांनी बालकांच्या विविध कायदा विषयी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून मिळणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली. तत्पुर्वी डॉ. हरदीपसिंघ यांनी बाल कल्याण समितीचे कार्य याविषयी सांगितले. अॅड. भेदे यांनी बाल गुन्हेगारांचे संरक्षण तर अॅड. वैशाली ढवळे, अॅड. कानोटे यांनी बाल गुन्हेगारांची काळजी याबाबत माहिती दिली.
श्रीमती तुमवाड व बालगृहाचे अधिक्षक श्री. दिनकर यांनी संस्थेतील मुलींच्या यशाबद्दल व त्यांच्या पुनर्वसनाबाबत माहिती दिली.  यावेळी संस्थेच्या विद्यार्थीनी निकीता गोविंद मोरे, कांचन बद्रे, अनुराधा घुगे यांनी  मार्गदर्शन केल्याबद्दल मान्यवरांचे आभार मानले. अॅड. नयुम खान पठाण यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी सुमन बालगृहातील मुली उपस्थित होत्या.  

000000

Saturday, July 15, 2017

दिशा समिती बैठकीत विविध योजना ,
विकास कामांचा सर्वंकष आढावा
नांदेड दि. 15 :- जिल्ह्यातील विविध विकास योजना, तसेच विकास  कामांबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. योजना, उद्दीष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर नियोजन करण्यात यावेत, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण हे होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आज बैठक संपन्न झाली.
बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई निवृत्ती पवार, नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या महापौर शैलजा स्वामी, आमदार अमर राजुरकर, आमदार डी. पी. सावंत, आमदार वसंत चव्हाण, विविध पंचायत समितींचे  सभापती  नांदेड- सुखदेव जाधव, भोकर- झिमाबाई चव्हाण, लोहा- सतीश पाटील उमरेकर, नायगाव- श्रीमती वंदना पवार, देगलूर- शिवाजी देशमुख, मुखेड- अशोक पाटील, धर्माबाद- श्रीमती रत्नमाला कदम, अर्धापूर- श्रीमती मंगल स्वामी, हदगाव- श्रीमती सुनिता दवणे, हिमायतनगर- श्रीमती माया राठोड, माहूर- मारोती रेकुलवार, किनवट- श्रीमती कलावती राठोड, तसेच समिती सदस्य सुभाष पाटील दापकेकर, रामचंद्र मुसळे, ॲड नामदेव राणवळकर, समिती सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) बी. एन. कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती.
बैठकीत सुरवातील 13 ऑगस्ट 2016 रोजी झालेल्या सभेच्या इतिवृत्ताचे वाचन व त्यास मान्यता देण्यात आली. तसेच सन 2016-17 वर्षातील मार्च 2017 अखेर व सन 2017-18 वर्षातील जुन 2017 अखेर योजनेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दिनदयाळ अंत्योदय योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण, स्वच्छ भारत मिशन शहरी व ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, राष्ट्रीय भुमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, अमृत योजना, महावितरणची उज्ज्वल योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य मिशन, सर्व शिक्षा अभियान, महिला व बाल विकास योजना, शालेय व पोषण आहार योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, डिजिटल इंडियाअंतर्गत ग्राम पंचायत इंटरनेट सुविधा, रेल्वे, भारत संचार निगम लिमीटेड, राष्ट्रीय महामार्ग या योजनांच्या प्रगतीचा आढावाही घेण्यात आला. खासदार श्री. चव्हाण यांनी विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावाणीसाठी संबंधित यंत्रणेने त्वरीत कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.
यावेळी गोदावरी नदी प्रदुषणाबाबत चर्चा करण्यात आली. गोदावरी नदीत दुषीत पाणी जाणार नाही, नागरिकांना दुषीत पाणी पुरवठा होणार नाही याबाबत संबंधीत यंत्रणेंनी दक्ष रहावे. केंद्र शासनाच्या नदी शुद्धीकरण योजनेतून मनपाने गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी पाऊल उचलावे. याबाबत पर्यावरण विभागाशी चर्चा करुन जिल्हाधिकारी यांच्या स्तरवर आढावा बैठक घेऊन वेळेत कार्यवाही पूर्ण करावी, अशी सूचना खासदार श्री. चव्हाण यांनी केली.   
बैठकीत अनुषंगीक योजना तसेच त्यातील कामाबाबत अहवाल संबंधीत यंत्रणांनी सादर केला. त्यावर उपस्थित समिती सदस्यांनी विविध मुद्यांवर चर्चा करुन उपयुक्त सूचना केल्या. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले व शेवटी आभार मानले. 
0000000


Friday, July 14, 2017

वैद्यकीय संस्थेतील हल्ले प्रकरणात
पोलीस विभागाने त्वरीत कार्यवाही करावी  
- जिल्हाधिकारी डोंगरे 
          नांदेड, दि. 14 :- वैद्यकीय सेवा संस्थेतील डॉक्टर, कर्मचाऱ्यांवरील हल्ले व मारहाणी प्रकरणात संबंधीत व्यक्तींवर आरोपपत्र दाखल झाले नाहीत त्याबाबत पोलीस विभागाने त्वरीत कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले.
            महाराष्ट्र वैद्यकीय सेवा-व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम 2010 अंतर्गत जिल्हास्तरीय सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात आज संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
            बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. पी. कदम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमती वाघमारे, पोलीस निरीक्षक व्ही. के. मुंढे, निमाचे अध्यक्ष डॉ. डी. लक्ष्मण, परिचारीका संघटनेचे अध्यक्ष एस. आर. मंगोत्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस. एन. गवारे, एस. डी. वाघमारे  यांची उपस्थिती होती.
             जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, रुग्णांच्या नातेवाईकांनी सत्य परिस्थिती समजून घ्यावी व रुग्णसेवेमध्ये अप्रिय घटना घडणार नाहीत याबाबत सहकार्य करावे. जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा संस्थेतील सीसीटीव्ही यंत्रणेबाबत सद्यस्थिती तपासून ती पुर्णवेळ सुरु राहतील याकडेही लक्ष दयावे. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे गुन्हा शोधण्यासाठी मोठी मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.    
            प्रास्ताविकात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कदम यांनी वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था अधिनियम, जिल्ह्यातील डॉक्टर, कर्मचारी यांच्यावरील हल्ले व मारहाण प्रकरणांबाबत माहिती दिली.

000000
जिल्ह्यात गत 24 तासात
 सरासरी 7.55 मि. मी. पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत 19.85 टक्के पाऊस
          नांदेड, दि. 14 :- जिल्ह्यात शुक्रवार 14 जुलै 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 7.55 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात एकूण 120.82  मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 189.71 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 19.85 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 14 जुलै 2017 रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 13.13 (285.79), मुदखेड- 3.00 (235.33), अर्धापूर- 8.33 (179.33), भोकर- 7.50  (222.25) , उमरी- 7.00 (151.66), कंधार- 10.67 (200.67), लोहा- 9.00 (177.49), किनवट- 3.00 (240.43), माहूर- 1.63 (194.01), हदगाव- 11.29 (219.32), हिमायतनगर- 15.00 (131.81), देगलूर- 3.83  (132.31), बिलोली- 6.60 (172.20), धर्माबाद- 10.67 (182.34), नायगाव- 4.60 (148.06), मुखेड- 5.57 (162.43) आज  अखेर  पावसाची सरासरी 189.71 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 3035.43) मिलीमीटर आहे.

00000
महिला लोकशाही दिनी
अर्ज करण्याचे आवाहन 
  नांदेड, दि. 14 :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी सोमवार 17 जुलै 2017 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 17 जुलै रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000
नांदेड तहसिल येथे  
सोमवारी लोकशाही दिन

नांदेड दि. 14 :- नागरिकांच्या अडीअडचणी जाणुन त्याचे निरसर करण्यासाठी तहसिल कार्यालय नांदेड येथे महिन्याचा तिसऱ्या सोमवार 17 जुलै 2017 रोजी सकाळी 11 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे तालुकास्तरीय लोकशाही दिन घेण्यात येणार आहे. संबंधितांनी लोकशाही दिनास उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.                           
000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...