Wednesday, July 5, 2017

वृध्द साहित्यीक कलावंत निवडीसाठी  
प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचे आयोजन  
नांदेड , दि. 5 :- जिल्ह्यातील पात्र वृद्ध कलावंतासाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वृद्ध साहित्यीक कलावंत व मानधन योजनेंतर्गत जिल्हास्तरीय निवड समितीकडून कलावंताची निवड करण्यासाठी शुक्रवार 7 जुलै व शनिवार 8 जुलै 2017 रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी 11 ते सायंकाळी 6 यावेळेत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेऊन अंतिम निवड करण्यात येणार आहे.
त्यानुसार सन 2015-16  व सन 2016-17 या वर्षातील पात्र 120 कलावंताची अंतिम निवड करण्यासाठी शुक्रवार 7 जुलै रोजी नांदेड, अर्धापूर, मुदखेड, किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर नायगाव  व शनिवार 8 जुलै रोजी कंधार, लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, उमरी, हदगाव या तालुक्यासाठी निवड करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक कला सादर करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य, मुळ अर्जाची प्रत, ओळखपत्रासाठी आधार कार्ड व पासपोर्ट साईजचा एक फोटो सोबत आणावा. जे कलाकार अनुपिस्थत राहतील त्यांची अंतिम निवड यादीसाठी विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन निवड समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत तांबोळी  व सदस्य सचिव तथा अतिमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे.

000000
आस्थापनांनी कर्मचाऱ्यांचे माहिती
प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 5 : -  मासिक वेतन जुलै 2017 चे देयक दाखल करताना सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्याकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती सादर करावी, असे आवाहन असे सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नांदेड यांनी केले आहे.
माहिती बाबतचे जुन 2017 अखेरचे ई-आर-1 त्रैमासिक विवरणपत्र सोमवार 31 जुलै 2017 पर्यंत भरावयाची मुदत असून ऑनलाईन ई.आर-1 भरुन दिल्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. त्याशिवाय वेतन देयके स्विकारले जाणार नाहीत. सर्व कार्यालयांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयामार्फत युजर आयडी व पासवर्ड यापुर्वीच कळविण्यात आले आहेत. तसेच सर्व कार्यालयांनी आपले ई-मेल आयडी व फोन नंबर, पत्ता टाकून आपली प्रोफाईल अपडेट करावी, असेही आवाहन सहायक संचालक यांनी केले आहे.

00000000
एसटीच्या सहाय्यक (कनिष्ठ) पदासाठी
रविवारी लेखी परीक्षा 
नांदेड दि. 5 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागातर्फे सरळसेवा भरती 2016-17 अंतर्गत पदे भरण्याबाबत जानेवारी 2017 मध्ये वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली होती. यापैकी सहाय्यक (कनिष्ठ) या पदासाठी लेखी परीक्षा रविवार 9 जुलै 2017 रोजी घेण्यात येणार आहे.
संबंधीत उमेदवारांना एसएमएसद्वारे लेखी परीक्षचे प्रवेशपत्र www.msrtcexam.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. याबाबत संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन  विभाग नियंत्रक, राज्य परिवहन नांदेड यांनी केले आहे.

000000

Tuesday, July 4, 2017

“उज्ज्वल नांदेड” अंतर्गत
एमपीएससी टॉपर्सचे आज मार्गदर्शन
नांदेड दि. 4 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या “उज्ज्वल नांदेड” अभियानांतर्गत बुधवार 5 जुलै 2017 रोजी दुपारी 3 वा. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे करण्यात आले आहे.
 जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या या शिबिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उपजिल्हाधिकारी या पदासाठी महाराष्ट्रातून प्रथम आलेले भूषण अहिरे, व्दितीय आलेले श्रीकांत गायकवाड, पोलिस उपअधिक्षक सुदर्शन पाटील, अश्विनी शेंडगे, सोनाली कदम व तहसीलदार श्रीकांत निळे पाटील व मार्गदर्शक प्रा. मनोहर भोळे  या सर्वांचे मार्गदर्शन  व त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी लाभणार आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिना, महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख,अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी मान्यवरांचे हस्ते या सर्व टॉपर्संचा सत्कार होणार आहे. या मार्गदर्शन ‍शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी केले आहे.

000000
वृक्षरोपणासह संगोपनाची जबाबदारी घ्यावी
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 4 :- जीवनात वृक्षाचे मोठे महत्व असून सर्वांनी वृक्षारोपणासह वृक्ष संगोपनाची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
          
  चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नांदेड तहसिल कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नांदेड उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालयाच्यावतीने सामुहिक वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अधिकारी, कर्मचारी यांनी सुमारे दोनशे वृक्षांची लागवड केली.  
            यावेळी उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, तहसिलदार किरण अंबेकर, नायब तहसिलदार (पुरवठा) विजय चव्हाण, नायब तहसिलदार (निवडणुक) स्नेहलता स्वामी व गजानन नांदगावकर, नायब तहसिलदार (महसूल) मुगाजी काकडे व विजय पाटे, वनपरिक्षेत्र अधिकारी के. वाय. शेख, मंडळ अधिकारी, महसूल व पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
            पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकांने वृक्षाची लागवड करुन इतरांनाही वृक्षलागवडीसाठी प्रेरीत करावे, असे आवाहन करुन श्री. डोंगरे यांनी पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे विविध समस्या निर्माण होतात. त्यासाठी प्रत्येकांनी झाडे लावून ते जगवण्याचा संकल्प केला पाहिजे, असे सांगितले.
नांदेड तहसिल परिसरात वड, पिंपळ, लिंब, अशोका, जांभुळ, कदबा, कोनोक्राप्स, महागुनी, सप्तपर्णी आदी प्रजातीचे वृक्षांची लागवड करण्यात आली. सामाजिक वनिकरण विभागाकडून या वृक्षांची रोपे देण्यात आली. नांदेड तालुक्यात महसूल विभागाच्यावतीने 2 हजार वृक्ष लागवड करण्‍यात येणार आहे. त्‍याकरीता तालुक्‍यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांचेमार्फत प्रत्‍येक गावांमध्‍ये वृक्षारोपण करणार आहेत.

000000

Monday, July 3, 2017

वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी
शासकीय यंत्रणांनी प्रयत्नशील रहावे - जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 3 :- समाजातील वंचित घटकांना विविध योजनांचा लाभ देवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय यंत्रणानी अधिक प्रयत्नशील रहावे , असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज येथे दिले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी कक्षात "वंचित घटकांना दिलासा" या संदर्भात आयोजित बैठकीत श्री. डोंगरे हे अध्यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प संचालक डॉ. पी. पी. घुले, के. बी. दिक्षीत, जी. बी. सुपेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय उशीर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, सहाय्यक पुरवठा अधिकारी सौ. संतोषी देवकुळे, पंचायत  समितीचे विस्तार अधिकारी डी. एच. देशपांडे, नायब तहसिलदार विजय चव्हाण आदि अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. अशा घटकांना शोधून त्यांना त्यांचे हक्क प्रदान करणे ही बाब महत्वपुर्ण आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना देण्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. जिल्ह्यात ज्या भागात वंचित घटकांची संख्या अधीक आहे असे भाग निश्चित करुन त्याठिकाणी प्राधान्य दयावे.
जिल्ह्यात कुठलाही घटक विकासापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वंचित कुटुंबाचा शोध घेवून त्यांच्या पुनर्वसनाबरोबर आरोग्य, शिक्षण, निवारा, अन्न-धान्य, शिधापत्रिका, व्यवसायासाठी अर्थसहाय्य या सारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना विविध योजनाचा एकत्रित लाभ देण्यासाठी नियोजन करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही श्री. डोंगरे यांनी सांगितले.
यावेळी श्री. अऊलवार यांनी समाज कल्याण विभागाची यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातूनही वंचित घटकांना लाभ देता येईल, असे सांगितले.
प्रारंभी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी जिल्ह्यातील वंचित घटकांचा शोध घेतला असता 668 कुटुंब संख्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्याची तालुकानिहाय यादी तयार करुन संबंधीत अधिकारी यांनी दिलेली आहे. या घटकांना लाभ देण्याच्या दृष्टिने नियोजनही करण्यात येत आहे, असे सांगितले.  

000000
नागरिकांच्या तक्रारीचे स्थानिक पातळीवर
तात्काळ निकाली काढाव्यात -  जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 3 :-  नागरिकांच्या तक्रारीचे स्थानीक पातळीवर दखल घेवून तात्काळ निकाली काढाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज येथे दिले. जिल्हास्तरीय लोकशाही दिन आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा समन्वय समिती बैठकीच्या अध्यक्षपदावरुन ते बोलत होते.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे ही बैठक संपन्न झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. पी. पी. घुले, पोलीस उपअधिक्षक व्ही. पी. नांदेडकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एम. देशमुख, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम इंगळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, कृषि, आदी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. डोंगरे म्हणाले की, नागरिकांना आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी लोकशाही दिनामध्ये सातत्याने यावे लागू नये, यासाठी त्यांचे तक्रारीचे स्थानिक पातळीवर निराकरण झाले पाहिजे. आपले सरकार वेबपोर्टल अधिकाऱ्यांनी नियमित पहावे. त्यावर दाखल तक्रारीचे अधिकाऱ्यांनी त्वरीत निराकरण करावे, दाखल तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीची माहिती वेब पोर्टलवर अद्यावत करावी. त्यामुळे या तक्रारी प्रलंबीत दिसणार नाहीत. सेवा हमी कायदामुळे सामान्य नागरिकांना विहित कालावधीत सेवा मिळण्याचा हक्क मिळाला आहे. हा कायदा लागू झाल्याने नागरिकांना शासकीय सेवा ऑनलाईन देण्यावर अधिकाऱ्यांनी भर दयावा, असा सूचनाही श्री. डोंगरे यांनी दिल्या.  
या लोकशाही दिनी 55 तक्रारी दाखल झाल्या. नागरिकांचे अर्ज, निवेदनावर प्रत्यक्ष चर्चा करुन संबंधीत यंत्रणांना अनुषंगीक कार्यवाहीबाबत निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी दिले.

0000000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...