Tuesday, July 4, 2017

वृक्षरोपणासह संगोपनाची जबाबदारी घ्यावी
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 4 :- जीवनात वृक्षाचे मोठे महत्व असून सर्वांनी वृक्षारोपणासह वृक्ष संगोपनाची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
          
  चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत नांदेड तहसिल कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नांदेड उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालयाच्यावतीने सामुहिक वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अधिकारी, कर्मचारी यांनी सुमारे दोनशे वृक्षांची लागवड केली.  
            यावेळी उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, तहसिलदार किरण अंबेकर, नायब तहसिलदार (पुरवठा) विजय चव्हाण, नायब तहसिलदार (निवडणुक) स्नेहलता स्वामी व गजानन नांदगावकर, नायब तहसिलदार (महसूल) मुगाजी काकडे व विजय पाटे, वनपरिक्षेत्र अधिकारी के. वाय. शेख, मंडळ अधिकारी, महसूल व पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
            पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकांने वृक्षाची लागवड करुन इतरांनाही वृक्षलागवडीसाठी प्रेरीत करावे, असे आवाहन करुन श्री. डोंगरे यांनी पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे विविध समस्या निर्माण होतात. त्यासाठी प्रत्येकांनी झाडे लावून ते जगवण्याचा संकल्प केला पाहिजे, असे सांगितले.
नांदेड तहसिल परिसरात वड, पिंपळ, लिंब, अशोका, जांभुळ, कदबा, कोनोक्राप्स, महागुनी, सप्तपर्णी आदी प्रजातीचे वृक्षांची लागवड करण्यात आली. सामाजिक वनिकरण विभागाकडून या वृक्षांची रोपे देण्यात आली. नांदेड तालुक्यात महसूल विभागाच्यावतीने 2 हजार वृक्ष लागवड करण्‍यात येणार आहे. त्‍याकरीता तालक्‍यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांचेमार्फत प्रत्‍येक गावांमध्‍ये वृक्षारोपण करणार आहेत.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...