Monday, July 3, 2017

वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी
शासकीय यंत्रणांनी प्रयत्नशील रहावे - जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 3 :- समाजातील वंचित घटकांना विविध योजनांचा लाभ देवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय यंत्रणानी अधिक प्रयत्नशील रहावे , असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज येथे दिले.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी कक्षात "वंचित घटकांना दिलासा" या संदर्भात आयोजित बैठकीत श्री. डोंगरे हे अध्यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प संचालक डॉ. पी. पी. घुले, के. बी. दिक्षीत, जी. बी. सुपेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय उशीर, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, सहाय्यक पुरवठा अधिकारी सौ. संतोषी देवकुळे, पंचायत  समितीचे विस्तार अधिकारी डी. एच. देशपांडे, नायब तहसिलदार विजय चव्हाण आदि अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. अशा घटकांना शोधून त्यांना त्यांचे हक्क प्रदान करणे ही बाब महत्वपुर्ण आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना देण्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. जिल्ह्यात ज्या भागात वंचित घटकांची संख्या अधीक आहे असे भाग निश्चित करुन त्याठिकाणी प्राधान्य दयावे.
जिल्ह्यात कुठलाही घटक विकासापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वंचित कुटुंबाचा शोध घेवून त्यांच्या पुनर्वसनाबरोबर आरोग्य, शिक्षण, निवारा, अन्न-धान्य, शिधापत्रिका, व्यवसायासाठी अर्थसहाय्य या सारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना विविध योजनाचा एकत्रित लाभ देण्यासाठी नियोजन करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही श्री. डोंगरे यांनी सांगितले.
यावेळी श्री. अऊलवार यांनी समाज कल्याण विभागाची यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातूनही वंचित घटकांना लाभ देता येईल, असे सांगितले.
प्रारंभी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी जिल्ह्यातील वंचित घटकांचा शोध घेतला असता 668 कुटुंब संख्या असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्याची तालुकानिहाय यादी तयार करुन संबंधीत अधिकारी यांनी दिलेली आहे. या घटकांना लाभ देण्याच्या दृष्टिने नियोजनही करण्यात येत आहे, असे सांगितले.  

000000
नागरिकांच्या तक्रारीचे स्थानिक पातळीवर
तात्काळ निकाली काढाव्यात -  जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 3 :-  नागरिकांच्या तक्रारीचे स्थानीक पातळीवर दखल घेवून तात्काळ निकाली काढाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आज येथे दिले. जिल्हास्तरीय लोकशाही दिन आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा समन्वय समिती बैठकीच्या अध्यक्षपदावरुन ते बोलत होते.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे ही बैठक संपन्न झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. पी. पी. घुले, पोलीस उपअधिक्षक व्ही. पी. नांदेडकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एम. देशमुख, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय उशीर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम इंगळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, कृषि, आदी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. डोंगरे म्हणाले की, नागरिकांना आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी लोकशाही दिनामध्ये सातत्याने यावे लागू नये, यासाठी त्यांचे तक्रारीचे स्थानिक पातळीवर निराकरण झाले पाहिजे. आपले सरकार वेबपोर्टल अधिकाऱ्यांनी नियमित पहावे. त्यावर दाखल तक्रारीचे अधिकाऱ्यांनी त्वरीत निराकरण करावे, दाखल तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीची माहिती वेब पोर्टलवर अद्यावत करावी. त्यामुळे या तक्रारी प्रलंबीत दिसणार नाहीत. सेवा हमी कायदामुळे सामान्य नागरिकांना विहित कालावधीत सेवा मिळण्याचा हक्क मिळाला आहे. हा कायदा लागू झाल्याने नागरिकांना शासकीय सेवा ऑनलाईन देण्यावर अधिकाऱ्यांनी भर दयावा, असा सूचनाही श्री. डोंगरे यांनी दिल्या.  
या लोकशाही दिनी 55 तक्रारी दाखल झाल्या. नागरिकांचे अर्ज, निवेदनावर प्रत्यक्ष चर्चा करुन संबंधीत यंत्रणांना अनुषंगीक कार्यवाहीबाबत निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी यावेळी दिले.

0000000
जिल्हा दक्षता, नियंत्रण समितीची बैठक संपन्न
नांदेड , दि. 3 :- जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी सभागृहात संपन्न झाली. 
यावेळी पोलीस उपअधीक्षक व्ही. पी. नांदेडकर, सहाय्यक पुरवठा अधिकारी सौ. संतोषी देवकुळे, समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार,  सहाय्यक पोलीस निरीक्षक (नाहसं) श्रीमती एम. एम. कदम आदी उपस्थित होते.
मागासवर्गीयांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांच्या गुन्ह्यांचा तपास करुन ही प्रकरणे त्वरने निकाली काढावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी दिले. अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सन 1989 नागरी हक्क संरक्षण व भादवि कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा आढावा घेवून श्री. डोंगरे यांनी या गुन्ह्याचा तपास त्वरीत करुन ही प्रकरणे त्वरेने निकाली काढण्याच्यादृष्टीने प्रयत्नशील रहावे, अशा सुचना दिल्या.
यावेळी श्री. आऊलवार यांनी जिल्ह्यात दाखल गुन्ह्यासंबंधी माहिती देताना जुन 2017 मध्ये 8 गुन्हे दाखल झाले असून हे गुन्हे पोलीस तपासावर आहेत, असे सांगितले.

00000
आदिवासी सुशिक्षीत बेरोजगारांसाठी
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षणाची संधी
नांदेड, दि. 3 :-  आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता  माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात मंगळवार 1 ऑगस्ट 2017 पासून सुरु होणाऱ्या 94 व्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षीत बरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धापरीक्षेची तयारी करीता प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करुन गुरुवार 27 जुलै 2017  तत्पुर्वी या कार्यालयास पोहचतील अशा बेताने आदिवासी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
प्रवेशाच्या अटी- उमेदवार अनुसूचित जमाती पैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवाराचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीत कमी शालांत परिक्षा उत्तीर्ण असावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: राहण्याची व जेवण्याची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महिने 15 दिवस असून शालांत परिक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदविधारकांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा उमेदवाराचे वय 31 जुलै 2017 रोजी 18 वर्ष पुर्ण असावे व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन संबंधीत प्रशिक्षणार्थीचे बँक खात्यामध्ये दरमहा जमा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थीचे बँकेमध्ये चालू खाते आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा या प्रशिक्षण सत्र अर्ध्यातून सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही.
प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यासाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करुन घेण्यात येते. तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनाची माहिती देऊन मार्गदर्शन केले जाते. पात्र इच्छूक उमेदवारांनी आपल्या स्वाक्षरीत कोऱ्या कागदावर गुरुवार 27 जुलै 2017 पर्यंत शैक्षणिक पात्रतेच्या व जातीच्या प्रमाणापत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट जि. नांदेड यांनी कळविले आहे. अधिक माहिती व तपशीलासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवाराकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, पेटकुलेनगर, गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड दूरध्वनी 02469-221801 येथे संपर्क साधावा. 
000000


Saturday, July 1, 2017

श्रीक्षेत्र माहुरगड पर्यंटन विकास आराखडयातील
कामे त्वरीत सुरु करा - पालकमंत्री खोतकर
नांदेड दि. 1 :- श्रीक्षेत्र माहुरगड पर्यंटन विकास आराखडयातील कामाचे संबंधीत यंत्रणानी प्रस्ताव तयार करुन त्वरेने कामे सुरु करावीत, असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी दिले.
माहूर येथील तहसिल कार्यालयातील कै. वसंतराव नाईक सभागृहात आयोजित श्रीक्षेत्र माहुरगड पर्यटन विकास आराखडा आढावा बैठकीत श्री. खोतकर हे बोलत होते. यावेळी आमदार प्रदिप नाईक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव, माहूर पंचायत समितीचे सभापती मारुती रेकुलवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात विविध विभागाचे  वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
श्रीक्षेत्र माहुरगड पर्यंटन विकासाच्या 216 कोटी 13 लाख रुपयाचा सुधारित आराखडयास शासनाने मंजुरी दिली आहे. मंजुर विकास आराखडयात प्रस्तावित पहिल्या टप्प्यातील कामांना संबंधित यंत्रणानी गती दिली पाहिजे. कामे गुणवत्तापुर्ण व दर्जेदार होण्याकडे लक्ष दयावे असेही श्री. खोतकर यांनी सांगितले.
यावेळी श्रीक्षेत्र माहुरगड पर्यटन विकास आराखडयानुसार करावयाच्या कामाची माहिती सादरीकरणातून देण्यात आली. ही विकास कामे करतांना काही बाबी समाविष्ट करण्याचे राहून गेले असल्यास संबंधिताशी चर्चा करुन त्या कामांचाही समावेश करावा, असे ही श्री. खोतकर यांनी सांगितले.
या बैठकीच्या चर्चेत आमदार प्रदिप नाईक यांनी भाग घेवून सूचना मांडल्या अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कामांची माहिती दिली.

                                                            ******



वाढते प्रदुषण रोखण्यासाठी
वृक्ष लागवडीचा संकल्प केला पाहिजे
- पालकमंत्री खोतकर
                 जिल्ह्यात 17 लाख 52 हजार वृक्ष लागवड करणार              
                    
नांदेड दि. 1 :- पर्यावरणाचे असंतुलन, वाढते प्रदुषण रोखण्यासाठी वृक्ष लावणे व जगविण्याचा सर्वांनी संकल्प केला पाहिजे, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी केले.
चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गंत नांदेड जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचा शुभारंभ श्री. खोतकर यांच्या हस्ते माहूर येथील दत्तशिखर मंदिर परिसरात वृक्षारोपणाने करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रदिप नाईक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, माहूर पंचायत समिती सभापती मारुती रेकुलवार, माहूर नगरपंचायतीचे अध्यक्ष फेरोज खादर दोसानी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, शिवसेनेचे बाबुराव कदम, वन विभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे , सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक एस. व्ही. मंकावार, सहाय्यक वनसंरक्षक डी.एस. पवार आदी अधिकारी, मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
पर्यावरणाचे संतूलन राखण्यासाठी वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. या मोहिमेतून येत्या दोन वर्षात वृक्ष लागवड व संवर्धनाचे चांगले काम होईल. या वृक्ष लागवड मोहिमेत सर्वांनी सहभाग घेवून प्रत्येकांनी पाच झाडे लावावी व जतन करण्याचा संकल्प करावा, असेही आवाहन       श्री. खोतकर यांनी केले.
जीवनात वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. म्हणून वृक्ष लागवडीबरोबर वृक्ष जगविण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक झाड लावून त्यांचे संवर्धन केल्यास मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड होईल. लागवड झालेल्या वृक्षांची वाढ होईपर्यत त्यांना पाण्याची गरज असते म्हणून ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात लागवड झालेल्या वृक्षाच्या संवर्धनासाठी गावातील मजुराची नेमणूक केल्यास, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून त्यांना मजुरी मिळेल व वृक्षाचेही जतन होईल, असे श्री. खोतकर यांनी सांगितले.  
वृक्ष व मानवाचे अतूट नाते आहे. वृक्ष लावून ती जगविली पाहीजे.  मागील वर्षीही मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड झाली. परंतू पाण्याअभावी ही वृक्ष जगत नाहीत. यासाठी उन्हाळयात टॅन्करने पाणी देण्याची आवश्यकता आहे. किनवट, माहूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात एका टॅन्करने पाणी पुरविण्याची व्यवस्था केली जाईल, असे सांगून  आमदार प्रदिप नाईक यांनी रस्त्याच्या दुर्तफा , ओसाड टेकडी, अशा भागात वृक्षारोपण प्राधान्याने व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी प. पु. महंत मधुसुदनजी भारती गुरु आच्युत भारती, आमदार प्रदिप नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, आदि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
प्रारंभी उपवनसंरक्षक श्री. आशिष ठाकरे यांनी प्रास्ताविकात चार कोटी वृक्ष लागवड अंतर्गत नांदेड जिल्ह्यात 1 ते 7 जुलै 2017 या कालावधीत 17 लाख 52 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. सर्वांच्या सहकार्याने हे उदिष्ट साध्य होईल असा विश्वास व्यक्त केला, तर सहाय्यक वनसंरक्षक  डी. एस. पवार यांनी आभार मानले.
या कार्यक्रमानंतर माहूर शहरात  नगरपंचायतीच्यावतीने वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या वृक्ष दिंडीला पालकमंत्री श्री. खोतकर यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या दिंडीत शालेय विद्यार्थी "करा झाडावर माया – तर मिळेल दाट छाया", "झाडे जगवा- पर्यावरण वाचवा", "वृक्ष लावा दारोदारी- समृध्दी होईल घरोघरी", "जेथे झाडे उदंड – तेथे पाऊस प्रचंड " यासारखी घोषवाक्याची फलके हातात घेवून  सहभागी झाले होते.

                                                                 *******

Friday, June 30, 2017

सौर ऊर्जेच्या माध्यमातुन सुरळीत, सुरक्षीत व शाश्वत
वीज पुरवठा करण्यात येईल - ऊर्जा मंत्री बावनकुळे
वीज ग्राहकांशी जनता दरबारात साधला मुक्त संवाद 
नांदेड दि. 30 :- राज्यातील जनतेला सौर ऊर्जेच्या माध्यमातुन सुरळीत, सुरक्षीत आणि शाश्वत वीज पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिली.
नांदेड येथील कुसुम सभागृहात महावितरणच्यावतीने वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरणासाठी आयोजित जनता दरबारात ऊर्जा मंत्री श्री. बावनकुळे हे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, आमदार सुभाष साबणे, आमदार डॉ. तुषार राठोड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, शहराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, श्रीमती शोभाताई वाघमारे, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, मुख्य अभियंता अविनाश पाटोळे, अधीक्षक अभियंता रामदास कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते.  
यावेळी ग्राहकांनी रोहित्र दुरुस्ती, वाकलेले खांब, लोंबकाळणाऱ्या तारा, प्रलंबित शेतीपंप जोडण्या, घरगुती व वाणिज्य वर्गवारीतील प्रलंबित जोडण्या, चुकीची देयके, वीज मिटर वाचक एजन्सी विरुद्ध तक्रारीसह शेतकऱ्यांना नियम बाह्य रोहित्र वाहतुकीसाठी दयावा लागणारा खर्च, मोबाईल बंद ठेवणे आदींबाबत 96 तक्रारी मांडण्यात आल्या.
या सर्व तक्रारींची दखल घेऊन ऊर्जा मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, सन 2030 पर्यंत सर्वांना शाश्वत वीज देण्यासाठी शासन कटीबध्द आहे. त्याचा आराखडा आणि नियोजन करण्यात आले असुन सौर ऊर्जा विकास आणि वापर वाढविण्यावरही भर देण्यात येणार आहे. वीज ग्राहकांच्या तक्रारीचा अधिकाऱ्यांनी तात्काळ निपटारा करावा. शेतकऱ्यांनी ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर ने-आण करण्यासाठी पैसे देऊ नयेत. शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात असतील तर संबंधीत अभियंतावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही निर्देश त्यांनी दिले. वीज बिलासंबंधी आलेल्या तक्रारीवर बोलतांना श्री. बानवकुळे म्हणाले की, महावितरणकडून लवकरच नवीन मोबाईल ॲप सुरु करण्यात येत आहे. त्याद्वारे वीज देयके नागरिकांना भरता येतील. तसेच यामाध्यमातुन वीज देयकेही दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात 3 हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये विद्युत व्यवस्थापक नेमण्याच्या सुचना त्यांनी केल्या. रोहित्रे दुरुस्ती क्षेत्रातील मक्तेदारी संपविण्यासाठी अभियांत्रिकी पदवी असणाऱ्या बेरोजगार अभियंत्यांना 15 लाखापर्यंत तर अभियांत्रिका पदविका असणाऱ्यांना साडेसात लाखापर्यंतची कामे देण्यात येतील. त्यासाठी मेळावे आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. ट्रान्सफार्मरला मीटर बसविल्याने वीज चोरीला आळा बसू शकेल, त्यादृष्टिनेही प्रयत्न केले जात आहेत. शाखा अभियंता, उपअभियंता यांनी मुख्यालय ठिकाणी राहिले पाहिजे व ग्राहकांना दर्जेदार सेवा दिली पाहिजे. सेवा बजावण्यास दिरंगाई केल्याचे आढळल्यास दोषीवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.  
प्रारंभी मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांनी मागील एक महिन्यात 34 ठिकाणी ग्राहक तक्रार मेळावे घेण्यात आले. 433 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील 320 तक्रारीचा निपटारा करण्यात आल्या. उर्वरीत तक्रारी निवारण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.   
0000000

( छाया : विजय होकर्णे, नांदेड )

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...