Friday, June 30, 2017

सौर ऊर्जेच्या माध्यमातुन सुरळीत, सुरक्षीत व शाश्वत
वीज पुरवठा करण्यात येईल - ऊर्जा मंत्री बावनकुळे
वीज ग्राहकांशी जनता दरबारात साधला मुक्त संवाद 
नांदेड दि. 30 :- राज्यातील जनतेला सौर ऊर्जेच्या माध्यमातुन सुरळीत, सुरक्षीत आणि शाश्वत वीज पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिली.
नांदेड येथील कुसुम सभागृहात महावितरणच्यावतीने वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरणासाठी आयोजित जनता दरबारात ऊर्जा मंत्री श्री. बावनकुळे हे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, आमदार सुभाष साबणे, आमदार डॉ. तुषार राठोड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, शहराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, श्रीमती शोभाताई वाघमारे, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, मुख्य अभियंता अविनाश पाटोळे, अधीक्षक अभियंता रामदास कांबळे आदी अधिकारी उपस्थित होते.  
यावेळी ग्राहकांनी रोहित्र दुरुस्ती, वाकलेले खांब, लोंबकाळणाऱ्या तारा, प्रलंबित शेतीपंप जोडण्या, घरगुती व वाणिज्य वर्गवारीतील प्रलंबित जोडण्या, चुकीची देयके, वीज मिटर वाचक एजन्सी विरुद्ध तक्रारीसह शेतकऱ्यांना नियम बाह्य रोहित्र वाहतुकीसाठी दयावा लागणारा खर्च, मोबाईल बंद ठेवणे आदींबाबत 96 तक्रारी मांडण्यात आल्या.
या सर्व तक्रारींची दखल घेऊन ऊर्जा मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, सन 2030 पर्यंत सर्वांना शाश्वत वीज देण्यासाठी शासन कटीबध्द आहे. त्याचा आराखडा आणि नियोजन करण्यात आले असुन सौर ऊर्जा विकास आणि वापर वाढविण्यावरही भर देण्यात येणार आहे. वीज ग्राहकांच्या तक्रारीचा अधिकाऱ्यांनी तात्काळ निपटारा करावा. शेतकऱ्यांनी ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर ने-आण करण्यासाठी पैसे देऊ नयेत. शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात असतील तर संबंधीत अभियंतावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही निर्देश त्यांनी दिले. वीज बिलासंबंधी आलेल्या तक्रारीवर बोलतांना श्री. बानवकुळे म्हणाले की, महावितरणकडून लवकरच नवीन मोबाईल ॲप सुरु करण्यात येत आहे. त्याद्वारे वीज देयके नागरिकांना भरता येतील. तसेच यामाध्यमातुन वीज देयकेही दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात 3 हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये विद्युत व्यवस्थापक नेमण्याच्या सुचना त्यांनी केल्या. रोहित्रे दुरुस्ती क्षेत्रातील मक्तेदारी संपविण्यासाठी अभियांत्रिकी पदवी असणाऱ्या बेरोजगार अभियंत्यांना 15 लाखापर्यंत तर अभियांत्रिका पदविका असणाऱ्यांना साडेसात लाखापर्यंतची कामे देण्यात येतील. त्यासाठी मेळावे आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. ट्रान्सफार्मरला मीटर बसविल्याने वीज चोरीला आळा बसू शकेल, त्यादृष्टिनेही प्रयत्न केले जात आहेत. शाखा अभियंता, उपअभियंता यांनी मुख्यालय ठिकाणी राहिले पाहिजे व ग्राहकांना दर्जेदार सेवा दिली पाहिजे. सेवा बजावण्यास दिरंगाई केल्याचे आढळल्यास दोषीवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.  
प्रारंभी मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांनी मागील एक महिन्यात 34 ठिकाणी ग्राहक तक्रार मेळावे घेण्यात आले. 433 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील 320 तक्रारीचा निपटारा करण्यात आल्या. उर्वरीत तक्रारी निवारण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.   
0000000

( छाया : विजय होकर्णे, नांदेड )

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...