Saturday, July 1, 2017

वाढते प्रदुषण रोखण्यासाठी
वृक्ष लागवडीचा संकल्प केला पाहिजे
- पालकमंत्री खोतकर
                 जिल्ह्यात 17 लाख 52 हजार वृक्ष लागवड करणार              
                    
नांदेड दि. 1 :- पर्यावरणाचे असंतुलन, वाढते प्रदुषण रोखण्यासाठी वृक्ष लावणे व जगविण्याचा सर्वांनी संकल्प केला पाहिजे, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी केले.
चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गंत नांदेड जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचा शुभारंभ श्री. खोतकर यांच्या हस्ते माहूर येथील दत्तशिखर मंदिर परिसरात वृक्षारोपणाने करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रदिप नाईक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, माहूर पंचायत समिती सभापती मारुती रेकुलवार, माहूर नगरपंचायतीचे अध्यक्ष फेरोज खादर दोसानी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, शिवसेनेचे बाबुराव कदम, वन विभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे , सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक एस. व्ही. मंकावार, सहाय्यक वनसंरक्षक डी.एस. पवार आदी अधिकारी, मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
पर्यावरणाचे संतूलन राखण्यासाठी वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. या मोहिमेतून येत्या दोन वर्षात वृक्ष लागवड व संवर्धनाचे चांगले काम होईल. या वृक्ष लागवड मोहिमेत सर्वांनी सहभाग घेवून प्रत्येकांनी पाच झाडे लावावी व जतन करण्याचा संकल्प करावा, असेही आवाहन       श्री. खोतकर यांनी केले.
जीवनात वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. म्हणून वृक्ष लागवडीबरोबर वृक्ष जगविण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक झाड लावून त्यांचे संवर्धन केल्यास मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड होईल. लागवड झालेल्या वृक्षांची वाढ होईपर्यत त्यांना पाण्याची गरज असते म्हणून ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात लागवड झालेल्या वृक्षाच्या संवर्धनासाठी गावातील मजुराची नेमणूक केल्यास, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून त्यांना मजुरी मिळेल व वृक्षाचेही जतन होईल, असे श्री. खोतकर यांनी सांगितले.  
वृक्ष व मानवाचे अतूट नाते आहे. वृक्ष लावून ती जगविली पाहीजे.  मागील वर्षीही मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड झाली. परंतू पाण्याअभावी ही वृक्ष जगत नाहीत. यासाठी उन्हाळयात टॅन्करने पाणी देण्याची आवश्यकता आहे. किनवट, माहूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात एका टॅन्करने पाणी पुरविण्याची व्यवस्था केली जाईल, असे सांगून  आमदार प्रदिप नाईक यांनी रस्त्याच्या दुर्तफा , ओसाड टेकडी, अशा भागात वृक्षारोपण प्राधान्याने व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी प. पु. महंत मधुसुदनजी भारती गुरु आच्युत भारती, आमदार प्रदिप नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, आदि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
प्रारंभी उपवनसंरक्षक श्री. आशिष ठाकरे यांनी प्रास्ताविकात चार कोटी वृक्ष लागवड अंतर्गत नांदेड जिल्ह्यात 1 ते 7 जुलै 2017 या कालावधीत 17 लाख 52 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. सर्वांच्या सहकार्याने हे उदिष्ट साध्य होईल असा विश्वास व्यक्त केला, तर सहाय्यक वनसंरक्षक  डी. एस. पवार यांनी आभार मानले.
या कार्यक्रमानंतर माहूर शहरात  नगरपंचायतीच्यावतीने वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या वृक्ष दिंडीला पालकमंत्री श्री. खोतकर यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या दिंडीत शालेय विद्यार्थी "करा झाडावर माया – तर मिळेल दाट छाया", "झाडे जगवा- पर्यावरण वाचवा", "वृक्ष लावा दारोदारी- समृध्दी होईल घरोघरी", "जेथे झाडे उदंड – तेथे पाऊस प्रचंड " यासारखी घोषवाक्याची फलके हातात घेवून  सहभागी झाले होते.

                                                                 *******

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 1136 जिल्हास्तरीय   युवा महोत्सवाच्या तारखेत बदल युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 नांदेड दि.   25   नोव्हेंबर  :-   ज...