Friday, June 30, 2017

नांदेड, उस्मानाबाद, लातूरच्या सर्व शाळा-पाणीपुरवठा योजना
सौर ऊर्जेवर आणणार - ऊर्जा मंत्री बावनकुळे
 16 उपकेंद्रांचे भुमिपुजन संपन्न
नांदेड दि. 30 :-  उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आणि नळ पाणी पुरवठा योजनांना सौर ऊर्जाने जोडण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली.  
नांदेड परिमंडळांतर्गत जिल्हयातील पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत मंजूर असलेल्या 12 व एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत मंजूर असलेल्या चार 33 / 11 केव्ही विद्युत उपकेंद्राचे भुमिपुजन ऊर्जा मंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते नांदेड येथील कुसुम सभागृहात आज झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, आमदार सर्वश्री प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, सुभाष साबणे, डॉ. तुषार राठोड, माजी खासदार सुभाषराव वानखेडे, माजी आमदार गुरुनाथ कुरुडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, शहराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, श्रीमती शोभाताई वाघमारे, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, मुख्य अभियंता अविनाश पाटोळे, अधीक्षक अभियंता रामदास कांबळे आदी अधिकारी मान्यवर उपस्थित होते.
ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, सन 2030 पर्यंत राज्याला शाश्वत वीज देण्याची राज्याचे मुख्यमंत्री महोदयांची सूचना लक्षात घेता 4 हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार कामे सुरु आहेत. वीज विकासात मागे पडलेल्या नांदेड जिल्ह्यासाठी 360 कोटीची पारेषणची कामे केली. जिल्हयासाठी 165 कोटीच्या योजनेचे भुमिपूजन  केवळ झाले नाही तर त्यासाठी निधीही देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या वीज बील थकबाकीमुळे त्यांची वीज खंडीत करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांनी आपल्याकडील थकबाकीची मुळ रक्कम भरावी. तो पैसा त्यांच्या भागात वीज विकासासाठीच वापरला जाईल. आगामी काळात वाहनेही विजेवर चालणार आहेत. त्यावेळी विजेचे दरही कमी राहतील. वर्षाच्या 328 दिवस सुर्याची ऊर्जा उपलब्ध आहे. ही ऊर्जा वापरुन सौर ऊर्जेच्या माध्यमातून नांदेड, उस्मानाबाद व लातूर जिल्हा परिषदेच्या शाळा व नळ पाणीपुरवठा योजनांना सौर ऊर्जावर आणण्याचा निर्णय घेतला आहे, असे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आगामी काळात सौर ऊर्जेची वीज देणार. त्यासाठी 500 ते 1 हजार शेतकऱ्यांचा गट तयार करुन त्यांच्याच शेतात वीज निर्माण करुन तेथेच वीज देणार.  नांदेडसाठी 87 कोटी व ग्रामीणसाठी 77 कोटी खर्च केले जात आहेत. या निधीतून होणारी कामे ही चांगल्या दर्जाची व्हावी , असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार सर्वश्री सुभाष साबणे, प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील यांचीही समोयोचित भाषणे झाली.
यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत हाळदा ता.कंधार, कासारखेडा, ता.अर्धापूर, आमराबाद, ता.मुखेड, पांडूरणा, ता.भोकर, पोटा, ता.हिमायतनगर, माळबोरगाव, ता.किनवट, घोगरी, ता.हदगाव, ढोल उमरी, ता.उमरी, चांडोळा, ता. धर्माबाद, जांब, ता.मुखेड, येताळा, ता.धर्माबाद, लोहगाव, ता.बिलोली. एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत तरोडा नाका, नांदेड, लोहा, कंधार, बिलोली. या 16 कामांचे भुमिपूजन एकाचवेळी ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते सभागृहात करण्यात आले.
प्रारंभी नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता रामदास कांबळे यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्यावतीने जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी, नागरीक, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
00000
  

No comments:

Post a Comment

    वृत्त क्र. 1136 जिल्हास्तरीय   युवा महोत्सवाच्या तारखेत बदल युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 नांदेड दि.   25   नोव्हेंबर  :-   ज...