Wednesday, May 31, 2017

खते, बियाण्यांबाबत गुणनियंत्रण सप्ताहाचे आयोजन
ई-पॉश मशिनद्वारे खताची विक्री होणार  
          
      नांदेड दि. 31 :- रासायनिक खत विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण ( डीबीटी ) गुरुवार 1 जून 2017 पासून नांदेड जिल्हयात राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती रेड्डी दत्तात्रय लक्ष्मण यांचे अध्यक्षतेखाली  रासायनिक खत उत्पादक कंपनी प्रतिनिधी, तसेच तालुकास्तरीय कृषि अधिकारी यांची  मंगळवार 30 मे रोजी बैठक घेण्यात आली.
            राज्याचे कृषि आयुक्त यांनी आवाहन केल्यानुसार कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीचे एकात्मीक व्यस्थापन कशा प्रकारे करावे याचे प्रसिध्दी पत्रकाचे अनावरण सभापती रेड्डी दत्तात्रय लक्ष्मण यांनी केले तसेच मोनसॅन्टो कंपनीचे प्रतापसिंह काळे कपाशीवरील शेंदरी बोंडअळीबाबत माहिती व नियंत्रण याबाबतची माहिती दिली.
            सभापती रेड्डी यांनी जिल्हयात शेतकऱ्यांना बियाणे, खते उपलब्धतेबाबत अडचण येणार नाहीत. तसेच दर्जेदार बियाणे वेळेत उपलब्ध होतील याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या. त्याचप्रमाणे e-Pos मशिनद्वारे खताची विक्री करण्यात यावी मशिनबाबत अडचण उदभावल्यास तात्काळ संबंधित तालुक्याचे कृषि अधिकारी तसेच तालुक्यातील नियुक्त खत कंपनी प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा. बियाणे खताची खरेदी अधिकृत विक्रेत्यांकडूनच करावी. बियाणे खरेदी करताना रितसर पावती घेण्यात यावी. तसेच बोगस बियाणे कमी किंमतीत मिळवून शेतकऱ्यांना विक्रीचे प्रकार आढळल्यास तात्काळ भरारी पथकाच्या ताब्यात देण्यात यावे,  असे आवाहन केले.
            या  बैठकीत ई-पॉश मशीन बदल मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. मशिनचा खर्च देखील कंपन्याच करणार आहेत. विक्रीच्या नोंदीत पारदर्शकता येईल. शेतकऱ्यांच्या नावाखाली कंपन्यांकडून खत विक्रीत होणारी अनागोंदी थांबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खत विक्रीची अचूक नोंद ठेवण्यापूरताच वापर पॉस मशिनचा होणार आहे. या मशिनचा संबंध आर्थिक व्यवहाराशी राहणार नाही. शेतकऱ्याला खताची विक्री उधारीत केली असो की , रोखीने केलेली असो फक्त वाटपाचीच नोंद पॉस मशिनवर होणार आहे. या मशिनवर नोंद व शेतकऱ्यांचा अंगठा न घेतल्यास कंपनीला अनुदान मिळणारच नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी दिली.   
            कृषि विकास अधिकारी श्री. मोरे यांनी जिल्हयात 1 ते 15 जून या कालावधीत गुणनियंत्रण पंधरवाडयाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये बियाणे, खते व औषधी नमुने घेऊन तपासणीस पाठविणे, भरारी पथकामार्फत विक्री केंद्र तपासणी करणे तसेच ई-पॉश मशिनद्वारे खताची विक्री करणे शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धता, दर्जा याबाबत अडचणी करीता विक्री केंद्रावर भरारी पथकाचे तसेच खत खरेदीसाठी आधारकार्ड आवश्यक असल्याबाबतचे फ्लेक्स लावणे, बियाणे, खते विक्री केंद्रावर कृषि सहाय्यक ग्रामसेवक यांची नियुक्ती करुन बियाणे, खते उपलब्धता तसेच मार्गदर्शन आदी कामे करण्यात येणार आहेत. ई-पॉश मशिनद्वारे खत विक्री करण्यासाठी खत विक्रेते तसेच खत कंपनी प्रतिनिधी यांनी सहकार्य करावे, असे आवाहन कृषि विकास अधिकारी  श्री. मोरे यांनी केले.
            बैठकीस मोहीम अधिकारी अनंत हंडे, कृषि अधिकारी विश्वास अधापूरे, मोनसॅन्टो कंपनीचे प्रतापसिंह काळे तसेच रासायनिक खत विक्री कंपनी प्रतिनिधी व तालुकास्तरीय कृषि अधिकारी उपस्थित होते.

0000000
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त कार्यशाळा संपन्न
नांदेड दि. 31 :- जागतिक तंबाखू नकार दिन व साप्ताह निमित्त आज नांदेड जिल्हा रुग्णालयाकडून जनजागृतीपर रॅली तसेच यादिनानिमित्त कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व नर्सिंग स्कूल येथील विद्यार्थ्यांसाठी तंबाखू मुक्तीसाठी  कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या माध्यमातून उपस्थित अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांना तंबाखूच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेच्या अनुषंगाने अध्यक्षीय भाषणात  बोलतेवेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी मानवाच्या सदृढ व निरोगी जीवनासाठी प्रत्येक व्यक्तीने तंबाखू सारख्या निकोटीन युक्त घातक आशा पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. 

या कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी, नेत्ररोग तज्ञ डॉ. संतोष शिर्शिकर, डॉ. एच. के. साखरे, दंत शल्य चिकीत्सक डॉ. किरण घोडजकर, डॉ. प्रदीप बोरसे तसेच  अधिकारी, कर्मचारी व नर्सिंग स्कूल येथील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
बेटमोगरामध्ये “..चला गावाकडे जाऊ” कार्यक्रम संपन्न
नांदेड, दि. 31 :- अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या गावी जाऊन दोन दिवस तेथील नागरिकांसह श्रमदान करावे. त्यात एक दिवस सुट्टीचा व एक दिवस कार्यालयीन असे नियोजन करावे असे विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी नांदेड व तहसिलदार नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय नांदेड येथील नायब तहसिलदार स्नेहलता स्वामी यांनी बेटमोगरा या आपल्या गावी चला गावाकडे जाऊ ध्यास विकासाचा धरू हे अभियान 28 व 29 मे असे दोन दिवस राबविले.
यात पहिल्या दिवशी ग्रामस्वच्छता करण्यात आली. यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सिद्धदयाळ शिवाचार्य यांच्या हस्ते परिसर स्वच्छता कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यांनी भौतिक स्वच्छतेसोबत मने ही स्वच्छ ठेवा, एकीने गावाचा विकास करा असा संदेश गावकऱ्यांना दिला.
ग्रामसभेचे आयोजन करून नागरिकांना जनकल्याण समृद्ध योजनेच्या 11 कलमी कार्यक्रमाची माहिती तलाठी  ग्रामसेवक  व कृषी सहाय्यक  यांच्या मार्फत देण्यात आली. अॅड. उदय संगारेड्डीकर यांचे ग्रामविकासावर व्याख्यान आयोजन करण्यात आले. त्यांनी गावाचे वैभव पुन्हा गावात आणण्यासाठी व गावाची अवकळा जाऊन समृद्ध गाव कसे होईल यावर मार्गदर्शन केले.
 दुसऱ्या दिवशी सकाळी अंगणात सडा, रांगोळ्या टाकून समता दिंडी काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू यांचेसह संविधान व ग्रामगीताचे पुजन करुन ग्रंथ डोक्यावर घेऊन समता दिंडी काढण्यात आली. सरपंचामार्फत गांवकरी यांना स्वच्छता व विकासाची शपथ देण्यात आली.  सातबाराचे चावडी वाचन झाले. गावकरी यांनी शंभर झाडे लावून जगविण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमात सरपंच पद्मजा पाटील, पंचायत समिती उपसभापती व महिलांसह गांवकरी ,प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसेवक गायकवाड, तलाठी कापसे, मुख्याध्यापक भैरवाडसह गांवकरी यांनी यासाठी परिश्रम घेतले.

000000
लोकशाही दिनाचे 5 जून रोजी आयोजन
नांदेड, दि. 31 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्‍यात येतो. त्यानुसार सोमवार 5 जून 2017 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्‍याचे व न स्विकारण्‍याबाबतच्‍या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्‍यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्‍वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्‍यात येणार नाहीत. त्‍यामुळे केवळ वैयक्तिक स्‍वरुपाच्‍या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.
यादिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबित प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास  सुरुवात करण्यात येईल.  
न्यायप्रविष्ट, राजस्व तसेच अपिलातील सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे, किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तसेच तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल, तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात पंधरा दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यांनंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिना दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील  महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या उपक्रमात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल , असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000
उमरी येथील शासकीय निवासी शाळेत
प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन  
नांदेड दि. 31 :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनु.जाती व नवबौद्ध मुलांच्या उमरी येथील शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रवेश अर्ज करण्याचे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापकांनी केले आहे.
सन 2017-18 मधील इयत्ता 6 वी व 7 वी सेमी इंग्रजी वर्गास व इयत्ता 8 वी ते 10 वी मराठी माध्यमाच्या वर्गास प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. इयत्ता 6 वी साठी एकूण 40 जागा रिक्त आहे. त्यापुढील वर्गास रिक्त जागेनुसार प्रवेश दिले जाणार आहेत. अनु.जाती, अनु.जमाती, वि.जा.भ.ज., वि.मा.प्र., अपंग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी या शाळेत प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. हे प्रवेश शासनाच्या सामाजिक आरक्षणानुसार ठरवुन दिलेल्या टक्केवारी प्रमाणे दिले जाणार आहेत.

00000
आयटीआय नांदेडमध्ये सोमवारी  
कॅम्पस मुलाखतीचे आयोजन
नांदेड दि. 31 :- दोन वर्षे कालावधी असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी सोमवार 5 जून 2017 रोजी आयटीआय नांदेड येथे कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.  
मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र (बीटीआरआय) द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे दोन वर्षे कालावधीचे व्यवसाय उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी सोमवार 5 जून 2017 रोजी रेमण्ड लक्झरी कॉटन लिमिटेड अमरावती ही आस्थापना कॅम्पस मुलाखतीसाठी येत आहे. त्यासाठी इच्छुक 18 ते 24 वयोगटातील उमेदवारांनी मुळ प्रमाणपत्र, फोटोसह उपस्थित रहावे. लेखी तसेच वैयक्तीक मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार असून यासाठी शाररीक पात्रतेचीही अट आहे. या पात्रतेत उंची 165 सेंमी. व वजन 45 किलो असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना कामाद्वारे प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनींग ) व कायमस्वरुपी रोजगार देण्यात येणार आहे. इच्छुकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य आयटीआय नांदेड यांनी केले आहे.

0000000
नव मतदारांच्या नोंदणीसाठी
 जिल्ह्यात 1 जुलै पासून विशेष मोहिम
जास्तीत जास्त सहभागाचे जिल्हाधिकारी डोंगरे यांचे आवाहन

                नांदेड दि. 31 :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तरूण व पात्र प्रथम मतदारांची (वयोगट 18 ते 21) नोंदणी करण्‍याकरीता जिल्‍हयात रविवार 1 जुलै ते मंगळवार 31 जुलै 2017 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्‍यात येणार आहे. या मोहिमेत जिल्‍हयातील जास्‍तीत जास्‍त तरूण व पात्र प्रथम मतदारांनी नोंदणी करावी, असे आवाहन नांदेडचे जिल्‍हा निवडणूक अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी अरूण डोंगरे यांनी केले आहे. 
            या मोहिमेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे.
बीएलओची घरोघरी भेट
                विशेष मोहिमे अंतर्गत मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी बीएलओ त्‍यांच्‍या क्षेत्रातील घरांना 1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत भेट देतील आणि मतदारांची नोंदणी, वगळणी, व दुरूस्‍तीसाठी अर्ज नोंदवून घेतील. याशिवाय नागरिकांना संबंधित तहसिल कार्यालयात किंवा भारत निवडणूक आयोगाच्‍या www.nvsp.in या संकेतस्थळावरही ऑनलाईन अर्ज करता येतील. 
8 जुलै व 22 जुलै रोजी विशेष मोहिम
                या मोहिमे अंतर्गत 8 जुलै व 22 जुलै या दिवशी जिल्‍हयातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिर आयोजित करण्‍यात येणार आहेत. या दिवशी जिल्‍हयातील सर्व  बीएलओ हे त्‍यांच्‍या केंद्रावर हजर राहून अर्ज स्‍वीकारतील.
महाविद्यालयीन प्रवेशाच्‍या वेळी नोंदणी
                दिनांक 1  जानेवारी 2017 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्‍या नवीन पात्र मतदारांना महाविद्यालयात प्रवेशाच्‍या वेळीच मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज करता येतील. अर्जासोबत बोनाफाईड व वास्‍तव्‍याच्‍या ठिकाणासाठी जोडपत्रात माहिती दयावी लागेल.
 वय 21 पेक्षा जास्‍त असल्‍यास नोंदणीचे वेळी प्रतिज्ञापत्र आवश्‍यक
                मतदाराची दुबार नोंदणी होवू नये यादृष्‍टीने ज्‍या व्‍यक्‍तीचे वय 21 पेक्षा जास्‍त असेल त्‍यांना अर्ज करतांना अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दयावे लागेल. एखादया मतदाराची नोंदणी पुर्वीच झालेली असेल व नवीन वास्‍तव्‍याच्‍या ठिकाणी नोंदणी करावयाची असल्‍यास पूर्वीच्‍या ठिकाणी नाव वगळण्‍यासाठी अर्ज सादर केल्‍याचा पुरावा सादर करावा लागेल. मतदारांना नोंदणीसाठी अडचण होवू नये यादृष्‍टीने सर्व अर्जाचे नमूने सुटसुटीत व सोपे करण्‍यात आलेले आहेत.
मयत व स्‍थलांतरीत मतदारांची वगळणी
                या मोहिमेमध्‍ये नवीन मतदारांच्‍या नोंदणी सोबतच बीएलओ घरोघरी भेट देतांना मतदार यादीतील मतदार मयत असतील तर त्‍यांची माहिती घेतील तसेच स्‍थलांतरीत मतदाराचीही माहिती घेतील योग्‍य चौकशीनंतर मयत, स्‍थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्‍याची कार्यवाही करण्‍यात येणार आहे.
            या मोहिमेत जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदवावा. अधिक माहिती व तपशीलासाठी संबंधीत बीएलओ किंवा तहसिल कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा निवडणूक कार्यालयाचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे यांनी केले आहे. मोहिमेबाबत अधिक माहिती व तपशील आवश्यक असल्यास उपजिल्हा निवडणूक कार्यालय, नांदेड- दूरध्वनी क्र. 02462-235762 येथेही संपर्क साधता येईल.
0000000


वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...