Friday, December 16, 2016

तुर, हरभरा पिक संरक्षणासाठी
कृषि विभागाचा संदेश
 नांदेड , दि. 16 : -  जिल्ह्यात तुर व हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. किडीपासून संरक्षणासाठी पुढील प्रमाणे संदेश देण्यात आला आहे.
तुर पिकांवरील शेंगा खाणाऱ्या अळ्याच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के एसजी 0.45 ग्रॅम प्रति लिटर किंवा क्लोरॅनट्रयानीप्रोल 18.5 टक्के एससी 0.3 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. हरभरा घाटेअळीसाठी निंबोळी अर्क 5 टक्के किंवा एचएएनपीव्ही 500 मिली प्रति हेक्टर या प्रमाणे फवारणी करावी. पक्षी थांबे प्रति हेक्टर 50 उभारावेत, असे आवाहन नांदेड उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

0000000
केळी पिक संरक्षणासाठी संदेश
 नांदेड , दि. 16 : - उपविभागीय कृषि  कार्यालय नांदेड अंतर्गत मुदखेड व अर्धापूर  या तालुक्यात  केळी पिकासाठी  किड व रोग सर्वेक्षण हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. केळी पिक संरक्षणासाठी पुढील प्रमाणे  संदेश देण्यात आला आहे.
केळीच्या पानावर रोगाचा प्रादुर्भाव आकाराने जास्त असेल तर  त्याचा परिणाम प्रकाश संश्लेषणावर होतो. पानाचा प्रादुर्भाव ग्रस्त भाग काढून टाकावा.  झाडावर प्रोपीकोनेझॉल 0.05 टक्के (0.5मि.ली.) मिनरल ऑईल 1 टक्के ( 10 मि.ली ) प्रति लिटर पाण्यात  मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन डॉ. व्ही. व्ही. भरगंडे  उपविभागीय कृषि अधिकारी  नांदेड  यांनी केले आहे.

000000

Thursday, December 15, 2016

लेख क्र. 36

लोकशाही बळकटीकरणात राज्य
निवडणूक आयोगाची महत्त्वपुर्ण भुमिका  
लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांचेही महत्त्व आणि स्थान महत्त्वपुर्ण आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणाची वाटचाल या संस्थांच्या माध्यमातूनच सुरु होते. या संस्थांच्या संवैधानिक निवडणुकांसाठी प्रत्येक राज्यात राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. भारतीय संविधानाच्या 73 व 74 घटना दुरुस्तीनुसार राज्य निवडणूक आयोगांची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना दिनांक 26 एप्रिल, 1994 रोजी करण्यात आली. संविधानातील भाग -9 मधील अनुच्छेद 243 ट (243 K) अन्वये ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत व अनुच्छेद 243 यक (243 ZA) नुसार नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्याबाबत संवैधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे. संविधानातील सदर अनुच्छेदातील तरतुदीनुसार निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधिक्षण, संचलन आणि नियंत्रण आणि अशा निवडणुकांचे आयोजन  राज्य निवडणूक आयोग करीत आहे.  
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल, 1994 रोजी  झाली. त्यावेळी राज्याचे पहिले निवडणूक आयुक्त म्हणून डी. एन. चौधरी यांनी 26 एप्रिल 1994 ते 25 एप्रिल 1999 या कालावधीत कामकाज पाहिले. त्यानंतर वाय. एल. राजवाडे यांनी 15 जून 1999 ते 14 जून 2004 पर्यंत. तर नन्दलाल यांनी 15 जून 2004 ते 14 जून 2009 पर्यंत कार्यकाळ पूर्ण केला आहे. पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त म्हणून श्रीमती नीला सत्यनारायण यांनी 6 जुलै 2009 ते 5 जुलै 2014 या कालावधीत कामकाज पाहिले आहे. तर सध्याचे जगेश्वर एस. सहारिया हे 5 सप्टेंबर 2014 पासून ते आजपर्यंत राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. या सर्व आयुक्तांनी राज्य आयोगाच्या कामकाजाबरोबरच निवडणुका पारदर्शक , शांततेत पार पाडण्यासाठी विविध माध्यमातून मतदार जागृती अभियानाद्वारे मतदार, नागरिकांच्या मदतीने राज्य निवडणूक आयोगाची प्रतिमा उंचावण्यात मोलाचे काम केले आहे.  
माजी आयुक्त डी. एन. चौधरी यांच्या कार्यकाळात विधानसभा मतदार यादीचा वापर, विविध अधिनियम, नियम, आदेश व सूचना पारीत करण्यात आल्या आहेत. यातून निवडणुका घेण्याची पध्दती व त्यास कायदेशीर आधार प्राप्त झाला. माजी आयुक्त श्री.राजवाडे यांच्या कार्यकाळात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरण्यास सुरुवात झाली. त्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या पध्दतीत बदल घडून आणण्यात आले आहे. माजी आयुक्त श्री. नन्दलाल यांच्या कार्यकाळात राजकीय पक्षांच्या नोंदणीस सुरुवात करण्यात आली. विविध कायद्यातील तरतुदींबाबत सक्त अंमलबजावणीवर लक्ष देण्यात आले आहे. माजी आयुक्त श्रीमती नीला सत्यनारायण यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन निवडणुकांचे व्यवस्थापन अत्यंत कार्यक्षमतेने पारदर्शकरित्या पार पाडले. त्यांच्या कार्यकाळात निवडणूक व्यवस्थापन प्रकल्प, मतदार व्हा अभियान, ग्रामपंचायतीतील नवनिर्वाचित महिला सदस्यांचे सक्षमीकरण करुन आदर्श व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ‘क्रांती ज्योती’ प्रकल्पातंर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यास सुरुवात करण्यात आली, मतदारांची गैरसोय टाळण्याकरिता मतदार केंद्रीत सुधारणा, बहुसदस्यीय निवडणूक पध्दतीची यशस्वीपणे अंमलबजावणी, मतदान यंत्रात सुधारणा व अद्ययावतीकरण, कोणत्याही उमेदवाराला मतदान करण्याची इच्छा नसेल तर मतदारांसाठी “नोटा”ची अंमलबजावणी आणि अनर्ह करण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत.
आताचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी नवीन तंत्रज्ञानाद्वारे  निवडणूक कामकाज करण्यावर भर देत आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांची एकूण संख्या सुमारे 29 हजार आहे. तर या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुका लढविणारे उमेदवारांची संख्या सुमारे 3 लाख आहे. हे लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे कामकाज व्यापक आहे. हे व्यापक कामकाज उत्कृष्ट पध्दतीने नियंत्रण व समन्वयाने करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अतिशय महत्वाचे आहे. यासाठी राज्य निवडणूक आयुक्त श्री. सहारिया यांच्या संकल्पनेतून नवीन सॉफ्टवेअर आणि मोबाईल अप्लिकेशनचे विकसन सुरु करण्यात आले आहे. निवडणूक विभागांची गुगलमॅप्स व प्रगणट गटाद्वारे प्रभाग रचना, मतदार यादी संगणकीकृत विभाजन, उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र ऑनलाईन भरुन घेणे, निवडणुकीतील प्रत्येक टप्प्यावरील प्रक्रिया सॉफ्टवेअरद्वारे करण्यावर मोठा भर देण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने कामाचे मोठे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे राज्य आयोगाच्या कामकाजात योग्यप्रकारे सनियंत्रण होऊ शकणार आहे. याद्वारे आज राज्यातील निवडणुका अधिक पारदर्शक, स्वतंत्र, मोकळ्या वातावरणात होताना दिसत आहेत.
राज्य निवडणुक आयोगाच्या मतदार जनजागृती अभियानामुळे मतदारांना त्यांच्या प्रभागातील कार्यक्षम उमेदवार निवडण्यासाठी मोठी मदत होत आहे. मतदारांनी मतदान केंद्र, मतदार यादीतील नाव, अधिक माहितीसाठी जवळच्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद, नगरपंचायत कार्यालयास संपर्क साधावा किंवा https://mahasec.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. लक्षात ठेवा आपलं मत हे आपलं भविष्य आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून टप्पा क्र. 3 मध्ये नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, उमरी, हदगाव, मुखेड, बिलोली, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, देगलूर या नगरपरिषदा व अर्धापूर, माहूर येथील नगरपंचायतीसाठी रविवार 18 डिसेंबर 2016 रोजी मतदान होणार आहे. मतदारांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करणे आवश्यक आहे. मतदान हा लोकशाही प्रणालीला बळकट करणारा घटक आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव समाविष्ट करणे आणि मतदान केंद्रात जावून मतदान करणे विसरु नका. मतदान हा सर्वोच्च अधिकार आहे.
              -         संकलन
काशिनाथ र. आरेवार ,
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

000000
महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी
आयुर्वेद महाविद्यालयात तीन मतदान कक्ष
 नांदेड , दि. 15 : - महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2016 साठी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे तीन मतदान कक्ष स्‍थापन करण्‍यात आले आहेत. निवडणुकीसाठी रविवार 18 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 8 ते सायं. 5 या कालावधीत मतदान घेण्‍यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक 2016 ही प्रत्‍येक जिल्‍ह्याच्‍या मुख्‍यालयी घेण्याबाबत अवर सचिव तथा नि‍वडणूक निर्णय अधिकारी महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक-2016 यांनी कळविले आहे.  नऊ सदस्‍यांच्‍या या निवडणुकीकरीता एकूण 49 उमेदवार आहेत. महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी झालेले नांदेड जिल्‍ह्यातील एकूण 1 हजार 883 वैद्यकीय व्‍यावसायिक ( एमबीबीएस झालेले डॉक्‍टर्स) या निवडणुकीचे मतदार आहेत. ही मतदार यादी प्रबंधक महाराष्‍ट्र वैद्यकीय परिषद यांचेमार्फत प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. निवडणुकीसाठी 14 अधिकारी-कर्मचारी आणि 4 चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच प्रत्‍येक मतदान कक्षा करीता 2 पोलीस कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

00000
कर्मचाऱ्यांचा माहितीकोषाबाबत
सांख्यिकी कार्यालयाचे आवाहन
 नांदेड , दि. 15 : -  जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करण्यासाठी शासन निर्णयानुसार जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने कार्यवाही सुरु केली आहे. त्यासाठी नियोजन विभागाच्या 3 डिसेंबर 2016 रोजीच्या परिपत्रकानुसार जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी लॉगइन आयडी व पासवर्ड त्वरीत उपलब्ध करुन घ्यावीत, असे आवाहन सांख्यिकी कार्यालायाने केले आहे.
कार्यालयांनी ही सर्वकंष माहिती वेळेत सादर करणे आवश्यक आहे. संबंधित सर्व कार्यालयांनी जानेवारी ते मे 2017 या महिन्यातील वेतन देयकासोबत जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्रमाणपत्र जोडल्याशिवाय वेतन देयके पारित होणार नाहीत याची जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी चं. प कोंडेकर यांनी केले आहे.

0000000
नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीत
दारु विक्री बंदचे आदेश
 नांदेड , दि. 15 : - जिल्ह्यातील धर्माबाद, उमरी, हदगाव, मुखेड, बिलोली, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, देगलूर नगरपरिषद व अर्धापूर, माहूर येथील नगरपंचायत क्षेत्रात हद्दीतील मतदान होत असलेली गावे मतदानाच्या अगोदरचा दिवस शनिवार 17 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस व मतदानाच्या दिवशी रविवार 18 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस तसेच मतमोजणी होत असलेल्या मुख्यालय ठिकाणी सोमवार 19 डिसेंबर 2016 रोजी मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत दारु विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी काढले आहेत.
निवडणुकी संदर्भात होत असलेली मतदान प्रक्रिया मुक्त, निर्भयपणे व शांततेत पार पडावे तसेच शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री, विक्रीच्या नोंद वह्या इत्यादी ) नियम 1969 मधील नियम 9 (अ) मधील उपनियम (2) मधील खंड (सी) उपखंड-2 अन्वये तसेच महाराष्ट्र देशी दारु नियम 1973 च्या नियम 26 मध्ये पोटनियम (1) मधील खंड सी (1) अन्वये व महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) आणि ताडी झाडे (छेदणे) नियम 1968 च्या नियम 5 अ च्या उपनियम (1) अन्वये मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी नांदेड यांनी जिल्ह्यातील मतदान होत असलेल्या नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीतील सर्व सीएल-3, एफएल-3, एफएल-2, एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4, एफएल / बिआर-2 व ताडी विक्रीच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

000000
मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद
नांदेड , दि. 15 : -  मार्केट ॲड फेअर ॲक्ट, 1862 चे कलम 5 अन्वये जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी  धर्माबाद, मुदखेड व बिलोली या तीन नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या हद्दीत रविवार 18 डिसेंबर 2016 रोजी ज्या गावी , ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरतात ते बाजार बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. या गावचे, ठिकाणाचे आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार 19 डिसेंबर रोजी भरविण्यात यावेत, असेही आदेशात म्हटले आहे.

000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...