Thursday, December 15, 2016

लेख क्र. 36

लोकशाही बळकटीकरणात राज्य
निवडणूक आयोगाची महत्त्वपुर्ण भुमिका  
लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांचेही महत्त्व आणि स्थान महत्त्वपुर्ण आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणाची वाटचाल या संस्थांच्या माध्यमातूनच सुरु होते. या संस्थांच्या संवैधानिक निवडणुकांसाठी प्रत्येक राज्यात राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. भारतीय संविधानाच्या 73 74 घटना दुरुस्तीनुसार राज्य निवडणूक आयोगांची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना दिनांक 26 एप्रिल, 1994 रोजी करण्यात आली. संविधानातील भाग -9 मधील अनुच्छेद 243 ट (243 K) अन्वये ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत व अनुच्छेद 243 यक (243 ZA) नुसार नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्याबाबत संवैधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे. संविधानातील सदर अनुच्छेदातील तरतुदीनुसार निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधिक्षण, संचलन आणि नियंत्रण आणि अशा निवडणुकांचे आयोजन  राज्य निवडणूक आयोग करीत आहे.  
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल, 1994 रोजी  झाली. त्यावेळी राज्याचे पहिले निवडणूक आयुक्त म्हणून डी. एन. चौधरी यांनी 26 एप्रिल 1994 ते 25 एप्रिल 1999 या कालावधीत कामकाज पाहिले. त्यानंतर वाय. एल. राजवाडे यांनी 15 जून 1999 ते 14 जून 2004 पर्यंत. तर नन्दलाल यांनी 15 जून 2004 ते 14 जून 2009 पर्यंत कार्यकाळ पूर्ण केला आहे. पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त म्हणून श्रीमती नीला सत्यनारायण यांनी 6 जुलै 2009 ते 5 जुलै 2014 या कालावधीत कामकाज पाहिले आहे. तर सध्याचे जगेश्वर एस. सहारिया हे 5 सप्टेंबर 2014 पासून ते आजपर्यंत राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. या सर्व आयुक्तांनी राज्य आयोगाच्या कामकाजाबरोबरच निवडणुका पारदर्शक , शांततेत पार पाडण्यासाठी विविध माध्यमातून मतदार जागृती अभियानाद्वारे मतदार, नागरिकांच्या मदतीने राज्य निवडणूक आयोगाची प्रतिमा उंचावण्यात मोलाचे काम केले आहे.  
माजी आयुक्त डी. एन. चौधरी यांच्या कार्यकाळात विधानसभा मतदार यादीचा वापर, विविध अधिनियम, नियम, आदेश व सूचना पारीत करण्यात आल्या आहेत. यातून निवडणुका घेण्याची पध्दती व त्यास कायदेशीर आधार प्राप्त झाला. माजी आयुक्त श्री.राजवाडे यांच्या कार्यकाळात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरण्यास सुरुवात झाली. त्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या पध्दतीत बदल घडून आणण्यात आले आहे. माजी आयुक्त श्री. नन्दलाल यांच्या कार्यकाळात राजकीय पक्षांच्या नोंदणीस सुरुवात करण्यात आली. विविध कायद्यातील तरतुदींबाबत सक्त अंमलबजावणीवर लक्ष देण्यात आले आहे. माजी आयुक्त श्रीमती नीला सत्यनारायण यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन निवडणुकांचे व्यवस्थापन अत्यंत कार्यक्षमतेने पारदर्शकरित्या पार पाडले. त्यांच्या कार्यकाळात निवडणूक व्यवस्थापन प्रकल्प, मतदार व्हा अभियान, ग्रामपंचायतीतील नवनिर्वाचित महिला सदस्यांचे सक्षमीकरण करुन आदर्श व्यक्तिमत्व घडवण्यासाठी क्रांती ज्योतीप्रकल्पातंर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यास सुरुवात करण्यात आली, मतदारांची गैरसोय टाळण्याकरिता मतदार केंद्रीत सुधारणा, बहुसदस्यीय निवडणूक पध्दतीची यशस्वीपणे अंमलबजावणी, मतदान यंत्रात सुधारणा व अद्ययावतीकरण, कोणत्याही उमेदवाराला मतदान करण्याची इच्छा नसेल तर मतदारांसाठी नोटाची अंमलबजावणी आणि अनर्ह करण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत.
आताचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी नवीन तंत्रज्ञानाद्वारे  निवडणूक कामकाज करण्यावर भर देत आहेत. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांची एकूण संख्या सुमारे 29 हजार आहे. तर या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुका लढविणारे उमेदवारांची संख्या सुमारे 3 लाख आहे. हे लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे कामकाज व्यापक आहे. हे व्यापक कामकाज उत्कृष्ट पध्दतीने नियंत्रण व समन्वयाने करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अतिशय महत्वाचे आहे. यासाठी राज्य निवडणूक आयुक्त श्री. सहारिया यांच्या संकल्पनेतून नवीन सॉफ्टवेअर आणि मोबाईल अप्लिकेशनचे विकसन सुरु करण्यात आले आहे. निवडणूक विभागांची गुगलमॅप्स व प्रगणट गटाद्वारे प्रभाग रचना, मतदार यादी संगणकीकृत विभाजन, उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र ऑनलाईन भरुन घेणे, निवडणुकीतील प्रत्येक टप्प्यावरील प्रक्रिया सॉफ्टवेअरद्वारे करण्यावर मोठा भर देण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने कामाचे मोठे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे राज्य आयोगाच्या कामकाजात योग्यप्रकारे सनियंत्रण होऊ शकणार आहे. याद्वारे आज राज्यातील निवडणुका अधिक पारदर्शक, स्वतंत्र, मोकळ्या वातावरणात होताना दिसत आहेत.
राज्य निवडणुक आयोगाच्या मतदार जनजागृती अभियानामुळे मतदारांना त्यांच्या प्रभागातील कार्यक्षम उमेदवार निवडण्यासाठी मोठी मदत होत आहे. मतदारांनी मतदान केंद्र, मतदार यादीतील नाव, अधिक माहितीसाठी जवळच्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषद, नगरपंचायत कार्यालयास संपर्क साधावा किंवा https://mahasec.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. लक्षात ठेवा आपलं मत हे आपलं भविष्य आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून टप्पा क्र. 3 मध्ये नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, उमरी, हदगाव, मुखेड, बिलोली, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, देगलूर या नगरपरिषदा व अर्धापूर, माहूर येथील नगरपंचायतीसाठी रविवार 18 डिसेंबर 2016 रोजी मतदान होणार आहे. मतदारांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करणे आवश्यक आहे. मतदान हा लोकशाही प्रणालीला बळकट करणारा घटक आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव समाविष्ट करणे आणि मतदान केंद्रात जावून मतदान करणे विसरु नका. मतदान हा सर्वोच्च अधिकार आहे.
              -         संकलन
काशिनाथ र. आरेवार ,
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड

000000

No comments:

Post a Comment

​   वृत्त क्र. 1138 ​ वेगळी निवडणूक ! यंत्रणेवर विश्वास वाढविणाऱ्या घटनांनी लक्षवेधी ठरली   25 वर्षानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी नांद...