Sunday, September 11, 2016

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास
सक्त मनाई , ध्वजसंहितेचे पालन व्हावे
 नांदेड दि. 11 - राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरात येऊ नयेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह, शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात  17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी  विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी  इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच  कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी  राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती  करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर  समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी  तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त  व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.  

00000
जप्त केलेल्या रेतीसाठ्याचा  
तहसिल कार्यालयात बुधवारी लिलाव
 नांदेड दि. 11 -  नांदेड तालुक्यात विनापरवानगी अनाधिकृत रेतीसाठा केल्याचे निदर्शनास आले असून 40 ठिकाणचा अंदाजे 17 हजार 136 रेतीसाठा ब्रासमध्ये या रेती साठ्याचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली बुधवार 14 सप्टेंबर 2016 रोजी दुपारी 1 वा. तहलिस कार्यालय नांदेड येथे घेण्यात येणार आहे.   
जनतेनी नांदेड तालुक्यातील स्थळाचे ठिकाण असलेला रेतीसाठा पाहून, तपासून लिलावात, बोलीत भाग घ्यावा. अटी, शर्ती व माहितीबाबत तहसिल कार्यालय नांदेड येथे गौण खनीज विभागात कार्यालयीन वेळेत पहावयास मिळेल, असे  तहसिलदार नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

Friday, September 9, 2016

नांदेड आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी भिमराव शेळके यांची सहायक केंद्र संचालक या पदावर पदोन्नती झाल्यामुळे त्यांचा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांच्या हस्ते पुष्पहार, शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर शामकुंवर, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, डॉ. शिवाजी भोसले, डॉ. गणेश बनसोडे, वसंत मैय्या, छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

“संवाद पर्व” अभियानाद्वारे विविध योजनांचे
नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारण
नांदेड, दि. 9 :- जनतेला आनंद, उत्साह आणि ऊर्जा देणाऱ्या गणेशोत्सवाचा उपयोग सामाजिक जाणीव जागृती व प्रबोधनासाठी करता यावा यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने “संवाद पर्व” अभियान घेण्यात येत आहे. या अभियानात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी नांदेड आकाशवाणी केंद्राच्या सहकार्याने विविध योजनांच्या माहितीवर मालिकेचे प्रसारण करण्यात येत आहे.
या “संवाद पर्व” अभियानांतर्गत शुक्रवार 9 सप्टेंबर 2016 रोजी सायंकाळी 6.30 वा. जलयुक्त शिवार योजनेसंबंधीत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांची मुलाखत प्रसारीत होणार असून त्याचे पूर्नप्रसारण शनिवार 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9.10 मिनीटांनी होणार आहे. शनिवार 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा. “संवाद पर्व” या विषयी चर्चासत्राचे प्रसारण होणार असून यामध्ये शिक्षणाविषयी उमाकांत जोशी, सामाजिक कार्यकर्ते वसंत मैय्या, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी, आकाशवाणी केंद्राचे केंद्र संचालक भिमराव शेळके सहभाग घेणार आहेत. रविवार 11 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वा. अवयवदान काळाची गरज या विषयावर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर शामकुंवर, डॉ. शिवाजी भोसले, डॉ. रमेश बनसोडे हे माहिती देणार आहेत. या सर्व मुलाखती आकाशवाणीचे केंद्र संचालक श्री. शेळके यांनी घेतल्या आहेत.
या “संवाद पर्व” अभियानाच्या मालिकेत शासनाच्या विविध विकासाच्या योजना, उपक्रमांच्या माहितीचे प्रसारण होणार आहे. नागरिकांनी या मालिकेचा लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी व नांदेड आकाशवाणी केंद्राचे केंद्र संचालक भिमराव शेळके यांनी केले आहे.   

000000
“संवाद पर्व” अभियानांतर्गत
आयुर्वेदीक महाविद्यालयात कार्यक्रम
नांदेड, दि. 9 :- श्री आयुर्वेदीक गणेश मंडळ व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्यावतीने “संवाद पर्व” या अभियानांतर्गत रविवार 11 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 11  वा. “बेटी बचाओ बेटी पढाओ” या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या “संवाद पर्व” या उपक्रमाच्या पार्श्वभुमीवर श्री आयुर्वेदीक गणेश मंडळ नांदेड यांच्या सहकार्याने हा जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केला असून शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर शामकुंवर, डॉ. रमेश बनसोडे,  डॉ. शिवाजी भोसले, जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी हे उपस्थित राहणार आहेत. सर्व अध्यापक, विद्यार्थी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. भास्कर शामकुंवर व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

000000

Thursday, September 8, 2016

लेख

महिला सक्षमीकरणाला
बचत गटाच्या माध्यमातून आधार
       नांदेड जिल्हा उपक्रमशील जिल्हा म्हणुन ओळखा जातो. जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी जिल्ह्यात विविध योजना यशस्वी करण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यात विशेष करुन महिला सक्षमीकरण हा त्यांच्या प्रयत्नाचा एक भाग आहे. शहरात सर्वच धर्माच्या-जातीच्या महिला या बचत गटाच्या माध्यमातून उद्योग करतात. तशी शहरात मुस्लीम समाजाची लोकसंख्या मोठी असून या समाजातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून नवी दिशा देण्याचे प्रयत्न यशस्वी होताना दिसून येत आहेत.
नांदेड शहरात महिला सबलीकरणासाठी अनेक योजना व उपक्रम राबविणे सुरु आहे. त्याअनुषंगाने  मुस्लीम समाजातील महिलांना त्यांच्या मधील सुप्त गुणांना वाव मिळावा आणि बचत गटातून त्यांचे जीवन सुखकर व्हावे हे प्रयत्न करण्यासाठी सावित्रीबाई महिला बचत गटाच्या  विमलताई यांनी मुस्लीम महिलांना प्रोत्साहन दिले त्यामुळे या महिला शासनाच्या विविध विकास विषयक योजना समजावून घेत आहेत. त्याचेच एक उदाहरण देगलूर नाका भागातील आयशा बेगम या होतकरु कष्टाळू महिलेने चाँद बीबी महिला बचत गटाची स्थापना केली.
कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी या महिलांना दैनदिन जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी केवळ पतीच्या रोजंदारीकडे पहावे लागते. दिवसभर काम केले तरच घर चालत असे. पतीने दिले तरच संसाराचा गाडा चालविणे अशा एकतर्फी जीवन पध्दतीला फाटा देत स्ववबळावर स्वत:तील कर्तृत्वावर उभे राहण्याचा मुलमंत्र बचत गटातून या महिलांना मिळाला आहे. परिसरातील अशिक्षीत व शिक्षित महिलांनी एकत्र करून चाँदबीबी  महिला बचत गटात सहभागी करून घेतले आहे. दैनंदिन गरजा भागवून थोडी बचत करून त्यांना बचत गटाचे सभासद बनविले. आयेशा बी यांनी मोठ्‌या धाडसाने प्रयत्न केला 10 आणि नंतर 20 महिलांचा गट बनविला. घरकाम करणाऱ्या महिलांकडून थोडे-थोडे पैसे गटात भरले. सुरुवातीला 3 हजार रूपये भांडवल एकत्र केले. याच भागातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत जमा केले. “काही दिवसात आम्हाला 30 हजार रूपये कर्ज मिळाले. त्यातून आम्ही कापड उद्योग करण्यासाठी लागणाऱ्या साडया, कापड, ड्रेस, असे थोडे-थोडे भांडवल वाढवले. बचत गटाची धडपड पाहून व सर्व महिलांचा प्रामाणिक प्रयत्न पाहून काही दिवसात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी यांनी दुकानाची पाहणी करुन पुन्हा कर्जाच्या रक्कमेत वाढ करुन 60 हजार रुपये कर्ज दिले” , असे आयेशा बेगम सांगतात.  
कर्जाच्या रक्कमेत बचत गटाने दोन शिलाई मशीन, साडी वर्क, मशीन व काही कापड, साडया खरेदी केल्या.आयेशा बेगम या कर्तृत्ववान महिलेच्या पुढाकाराने बचत गटातील 20 महिला सक्रिय झाल्या. नियमित बचत करणे, बचत गटाला वाढविणे आणि त्यांचा लाभ घेणे सुरु झाले. 6 वर्षापुर्वि केलेल्या या उपक्रमामुळे आज अनेक महिलांना बचत गटातून मिळणाऱ्या अल्प व्याज दरातून स्वत:चे छोटे उद्योग करण्याची संधी मिळाली. आज या गटामुळे 6 वर्षात त्यांच्या उत्पन्नात बऱ्यांपैकी वाढ झाली. आता महिलांचे पतीही त्यांना सहकार्य करत आहेत. आज या महिलांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण देणे शक्य झाले आहे. बचत गटाची कार्यक्षमता ओळखून पुढे बँकेने आणखी  दिड लाख रुपये कर्ज दिले आहे.
त्यामुळे बचत गटाला बळ मिळाले प्रत्येक महिला स्वत:च्या पायावर उभी राहिली महिलांच्या या प्रयत्नांना बँक अधिकाऱ्यांनी चांगली दाद दिली.
बचत गटाचे महत्व बँकेचे सहकार्य करण्यात येणारा उद्योग, परतफेड, बचत गटाचा हिशोब आणि तयार केलेल्या मालाच्या विक्री या विषयीचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले. या प्रशिक्षणातून त्यांच्या उद्योगाला एक नवी दिशा मिळाली. उत्पन्नाचे नियमित साधन उपलब्ध झाल्याने, पैसे मिळु लागले आणि जगण्याला आधार मिळाला.

                                                                                                  - नागोराव हरीभाऊ  अटकोरे

  (लेखक जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे आंतरवासिता करीत आहेत)
राष्ट्रीय विरता पुरस्कारासाठी
अर्ज करण्याचे आवाहन
          नांदेड, दि. 8 –  अपघातग्रस्त, संकटात सापडलेल्या व्यक्तीचा स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धाडसाने, शौर्याने जीव वाचविणाऱ्या मुलांचा गौरव करण्याच्यादृष्टीने केंद्र शासनामार्फत “राष्ट्रीय विरता पुरस्कार” हा प्रदान करण्यात येतो. त्याअनुषंगाने 1 जुलै 2015 ते 30 जून 2016 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील वय 6 ते 18 वर्षाखालील बालकांनी अतुलनीय शौर्य दाखवून अलौकीक कार्य केलेले असेल अशा बालकांचे विहित नमुन्यातील अर्ज व प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 24 गणेशकृपा इमारत, शास्त्रीनगर नांदेड यांचेकडे शुक्रवार 30 सप्टेंबर 2016 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000000 

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...