Friday, October 2, 2026

वृत्त क्रमांक

येरगी ग्रामसभेत व रिफॉर्म उत्सवात केंद्रीय सहसचिव पी. नरहरी यांचा सहभाग

ग्रामस्थांशी संवाद साधत शाश्वत ग्रामविकासासाठी केले मार्गदर्शन

बालिका पंचायत उपक्रमाचे विशेष कौतुक

ग्रामसभेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

नांदेड (जिमाका), दि. २  : केंद्र सरकारचे सहसचिव पी. नरहरी यांनी येरगी येथे आयोजित ग्रामसभा व रिफॉर्म उत्सवात सहभागी होऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. ग्रामविकासाच्या विविध विषयांवर ग्रामस्थांची मते, सूचना व अनुभव जाणून घेत त्यांनी शासनाच्या योजना आणि उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले.

रिफॉर्म उत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, लोककल्याणकारी उपक्रम आणि प्रशासकीय सुधारणांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात आली. यावेळी श्री. नरहरी यांनी विविध शासकीय योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधून योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्यानंतर त्यांच्या जीवनात झालेल्या बदलांची माहिती घेतली. योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

येरगी येथील बालिका पंचायत उपक्रमाची श्री. नरहरी यांनी विशेष दखल घेत कौतुक केले. ग्रामीण भागातील बालिकांना ग्रामविकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणे, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे आणि निर्णयप्रक्रियेची जाणीव निर्माण करणे, हा उपक्रम अनुकरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी श्री. नरहरी यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली तसेच जलतारा कामांचे भूमिपूजन करण्यात आले. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून जलसंधारणाची कामे, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत ग्रामविकासाला गती देण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची यावेळी उपस्थिती होती.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत शासकीय योजनांच्या प्रचार-प्रसारासाठी तयार करण्यात आलेले पोस्टर्स, बॅनर्स तसेच विविध शासन आदेशांची मांडणी श्री. नरहरी यांनी पाहिली. शासनाच्या योजना व उपक्रमांची माहिती सोप्या आणि प्रभावी पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी करण्यात येत असलेल्या या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

ग्रामसभेस मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांच्यासह जिल्हा परिषद स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी, गावस्तरावरील विविध विभागांचे कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामसभेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत ग्रामविकासाशी संबंधित विविध विषयांवर आपली मते, सूचना आणि अनुभव मांडले. ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग, शासनाच्या योजनांची माहिती आणि स्थानिक पातळीवरील विकासकामांचा आढावा यामुळे येरगी येथील ग्रामसभा व रिफॉर्म उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.














****


वृत्त क्रमांक

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य हरदीप सिंग गिल यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका), दि. 2 : राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य हरदीप सिंग गिल हे दि. 8 ते 11 ऑक्टोबर, 2026 या कालावधीत नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

गुरुवार, दि. 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता बिदर येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण करुन रात्री 9.30 वाजता नांदेड येथे आगमन व मुक्काम. 

शुक्रवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता हजूर साहिब गुरुद्वाराला भेट. दुपारी 2 वाजता नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त यांच्यासोबत बैठकीस उपस्थिती आणि नंतर मुक्काम. 

शनिवार, दि. 10 ऑक्टोबर रोजी स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. रविवार, दि. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.05 वाजता रेल्वेने दिल्लीकडे प्रयाण करतील. 

**

वृत्त क्रमांक

राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव यांचा नांदेड दौरा

नांदेड (जिमाका), दि. 2 : छत्रपती संभाजीनगर विभागाचे राज्य सेवा हक्क आयुक्त डॉ. किरण जाधव हे दि. 12 ते 13 ऑक्टोबर, 2026 या कालावधीत नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 

सोमवार, दि. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता रेल्वेने नांदेड येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे राखीव. 11.30 वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख यांच्याकडून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात आढावा घेतील. दुपारी 4 वाजता तहसील कार्यालय माहूर येथे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 16(1)(ख) नुसार कार्यालयीन तपासणीस उपस्थिती व शासकीय विश्रामगृह माहूर येथे मुक्काम. मंगळवार, दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता हिंगोलीकडे प्रयाण करतील. 

**

 वृत्त क्रमांक

पीक कापणी प्रयोग व जलतारा प्रकल्पाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

• दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे निर्देश

नांदेड (जिमाका), दि. 02 : देगलूर तालुक्यातील मौजे कुशावाडी येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोगाची पाहणी करण्यात आली. तसेच मौजे येरगी येथे त्यांच्या हस्ते जलतारा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी देगलूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय प्रमुखांची आढावा बैठक घेऊन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या.

कुशावाडी येथे शेतकरी सुरेश हणमंत हिंगोले यांच्या गट क्रमांक 123 मध्ये आयोजित पीक कापणी प्रयोगाची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी पाहणी केली. पीक कापणी प्रयोगाची कार्यपद्धती, नोंदणी व अचूकता याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

यावेळी उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी गीते, तहसीलदार भरत सूर्यवंशी, निवासी नायब तहसीलदार गिरीश सर्कलवाड, नायब तहसीलदार गणेश रायेवार, तालुका कृषी अधिकारी सोनकांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

येरगी येथे जलतारा प्रकल्पाचे उद्घाटन

मौजे येरगी येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते जलतारा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. शेतातील पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविणे, मातीची धूप रोखणे तसेच दुष्काळाच्या परिस्थितीत जलसुरक्षेला बळकटी देणे, हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे.

जलतारा प्रकल्पामुळे विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होत असून, पाण्याची उपलब्धता सुधारल्याने शेती उत्पादनातही वाढ होण्यास हातभार लागतो. हा उपक्रम विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे.

यावेळी सहसचिव (भू.सं.) ग्रामीण विकास मंत्रालय पी. नरहरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी श्रीकांत बलदे यांच्यासह संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश

त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी देगलूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय प्रमुखांची आढावा बैठक घेतली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहून नागरिकांना आवश्यक सेवा व सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

दुष्काळाच्या अनुषंगाने उपलब्ध पाणी, चारा, शेती व महसूलविषयक बाबींचा सातत्याने आढावा घेण्यासोबतच शासनाच्या विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. तालुक्यातील परिस्थितीवर नियमित लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. या बैठकीस देगलूर तालुक्यातील विविध विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

***







वृत्त क्रमांक

पीक कापणी प्रयोगात अचूकता व पारदर्शकतेवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा भर

• ताकबीड येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोगाची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी

• दुष्काळसदृश परिस्थितीत प्रयोगांना विशेष महत्त्व

• मोटारसायकलने शेतांमध्ये जाऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

• वरिष्ठ महसूल व कृषी अधिकाऱ्यांची उपस्थिती

नांदेड (जिमाका), दि. 02 : खरीप हंगामातील पिकांची प्रत्यक्ष उत्पादकता अचूकपणे निश्चित करण्यासाठी तसेच पीक विमा, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पीक नुकसान आणि शासनामार्फत देण्यात  येणाऱ्या नुकसानभरपाईच्या निर्धारणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पीक कापणी प्रयोगांना जिल्ह्यात वेग आला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध महसूल मंडळांमध्ये हे प्रयोग निर्धारित कार्यपद्धतीनुसार व शास्त्रोक्त पद्धतीने राबविण्यात येत आहेत.

याच अनुषंगाने नायगाव तालुक्यातील मौजे ताकबीड येथे शेतकरी सोनी सतीश टेकाळे यांच्या गट क्रमांक 183 मधील सोयाबीन पिकावर पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रत्यक्ष शेतावर उपस्थित राहून या प्रयोगाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रयोगाची कार्यपद्धती, निवडलेले क्षेत्र, पिकाची सद्यस्थिती तसेच उत्पादकतेच्या नोंदीबाबत सविस्तर माहिती घेतली.

पीक कापणी प्रयोगाच्या अचूकतेवर विशेष लक्ष

जिल्ह्यात खरीप हंगामातील विविध पिकांच्या उत्पादकतेचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी नियोजित पद्धतीने पीक कापणी प्रयोग घेण्यात येत आहेत. महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या समन्वयातून हे प्रयोग निर्धारित निकष व कार्यपद्धतीनुसार पार पाडले जात आहेत.

पीक कापणी प्रयोगाची अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी प्रयोगाच्या वेळी प्रत्यक्ष क्षेत्रावर उपस्थित राहून पाहणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या आहेत. त्यानुसार वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष शेतावर उपस्थित राहून प्रयोगाच्या प्रक्रियेचे निरीक्षण करीत आहेत.

पीक कापणी प्रयोगासाठी निवडण्यात आलेल्या शेतगटांमध्ये प्रयोग पूर्ण होण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांनी पीक कापणी करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीत प्रयोगांना विशेष महत्त्व

जिल्ह्यातील सद्यस्थितीतील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या पीक कापणी प्रयोगांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पावसाचे प्रमाण, पिकांची वाढ, पिकांची सद्यस्थिती आणि प्रत्यक्ष उत्पादकता यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी पीक कापणी प्रयोग ही महत्त्वाची प्रक्रिया आहे.

पीक कापणी प्रयोगातून प्राप्त होणाऱ्या आकडेवारीच्या आधारे संबंधित महसूल मंडळातील पिकांची सरासरी उत्पादकता निश्चित केली जाते. ही उत्पादकता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाईच्या निर्धारणासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत शासनाच्या प्रचलित निकषांनुसार देण्यात येणाऱ्या मदतीच्या निर्धारणासाठी महत्त्वाचा आधार ठरते.

त्यामुळे पीक कापणी प्रयोगाची प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने होण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे या प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवून आहेत.

मोटारसायकलने शेतांमध्ये जाऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

ताकबीड येथे पीक कापणी प्रयोगाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मोटारसायकलने परिसरातील विविध शेतगटांना भेट दिली. या वेळी त्यांनी मार्गातील शेतांमधील सोयाबीनसह विविध पिकांची स्थिती, पिकांची वाढ, पावसाचा परिणाम तसेच शेतकऱ्यांच्या शेतीतील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.

निवडलेल्या पीक कापणी प्रयोगासोबतच परिसरातील एकूण पीक परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून आवश्यक माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या प्रत्यक्ष क्षेत्रभेटीमुळे पीक कापणी प्रयोगांची अचूकता, गांभीर्य आणि निर्धारित कार्यपद्धतीनुसार अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.

वरिष्ठ महसूल व कृषी अधिकाऱ्यांची उपस्थिती

या पीक कापणी प्रयोगावेळी बिलोलीचे उपविभागीय अधिकारी अजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, नायगावच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, देगलूरचे उपविभागीय कृषी अधिकारी विठ्ठल गित्ते आणि नायगावचे तालुका कृषी अधिकारी दिपेश देवरे यांच्यासह महसूल, ग्रामविकास व कृषी विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रावर पीक कापणी प्रयोगाची कार्यपद्धती, पिकाची स्थिती आणि प्रयोगाशी संबंधित विविध बाबींची पाहणी केली.

पीक कापणी प्रयोगातून प्राप्त होणारी आकडेवारी विविध शासकीय योजना व नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मदतीच्या निर्धारणासाठी महत्त्वाची असल्याने प्रयोग निर्धारित पद्धतीने, अचूक व पारदर्शकपणे पार पाडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व पीक कापणी प्रयोगांमध्ये संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून वस्तुनिष्ठ नोंदी करण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ तसेच महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.

***






वृत्त क्रमांक

उपलब्ध चारा सकस करण्यासाठी ‘चारा साक्षरता अभियानास’ प्रारंभ

• चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा पुढाकार

नांदेड (जिमाका), दि. 02 : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात संभाव्य चारा टंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपलब्ध चाऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन व व्यवस्थापन करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘चारा साक्षरता अभियान’ व्यापक स्वरूपात राबविण्यात येत असून, या अभियानाची सुरुवात आज बिलोली तालुक्यातील मौजे रामतीर्थ येथे करण्यात आली.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत प्रगतिशील शेतकरी व पशुपालक गुणवंत शिवाजीराव देगलूरे यांच्या प्रक्षेत्रावर ‘निकृष्ट चारा सकस करणे’ या विषयावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले. संभाव्य चारा टंचाईच्या काळात उपलब्ध चाऱ्याचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करून पशुधनास आवश्यक पोषणमूल्ययुक्त चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या अभियानातून शेतकरी व पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

सोयाबीन व हरभरा कुटारावर युरिया-काकवी प्रक्रिया

रामतीर्थ येथील प्रात्यक्षिकात उपलब्ध सोयाबीन कुटार व हरभरा कुटारावर युरिया व मोलासेस (काकवी) प्रक्रिया करण्याची शास्त्रीय पद्धत प्रत्यक्ष दाखविण्यात आली. या प्रक्रियेमुळे उपलब्ध निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता, पाचकता व रुचकरता वाढविण्याच्या पद्धतीची माहिती पशुपालकांना देण्यात आली. 

दुष्काळी परिस्थितीत नवीन चारा उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असल्याने उपलब्ध चाऱ्याचे योग्य संवर्धन करणे, त्याची साठवणूक करणे आणि उपलब्ध चाऱ्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे. याबाबतही या वेळी शेतकरी व पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

चारा टंचाईच्या काळात शास्त्रीय व्यवस्थापनावर भर

चारा टंचाईच्या काळात उपलब्ध चाऱ्याची पौष्टिकता वाढवून त्याचा प्रभावी वापर केल्यास पशुधनासाठी आवश्यक पोषणमूल्ययुक्त चारा उपलब्ध करून देता येतो. त्यामुळे पशुपालकांनी उपलब्ध चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन व संवर्धन करण्याबरोबरच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार चारा प्रक्रिया तंत्रज्ञानाचा वापर करावा, हा संदेश या प्रात्यक्षिकातून देण्यात आला.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘चारा साक्षरता अभियान’ अंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालकांना उपलब्ध चाऱ्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर, चारा संवर्धन, प्रक्रिया व व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संभाव्य चारा टंचाईच्या काळात पशुधनाचे पोषण अबाधित ठेवण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती व प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येत आहे.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ.सखाराम खुणे, सहायक आयुक्त डॉ.प्रविणकुमार घुले यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****










वृत्त क्रमांक

महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

नांदेड (जिमाका), दि. 02 :  जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे,तहसीलदार शंकर लाड, रावसाहेब पोहरे, गजानंद ऐनवाड, गणेश नरहिरे, भास्कर गुंगे, बालासाहेब भराडे, गजानन पोतदार, आशिष सातारे,डॉ स्वाती अलोने, मिरा इंदुरकर,मनिषा पानपट्टे, ज्योती कदम, अनिता काळे, सखू शहाणे, रेखा राठोड , माधुरी ठाकुर यांच्या सह अधिकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. 

***



वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...