Wednesday, April 1, 2026

वृत्त क्रमांक  385

किनवट तालुक्यातील थारा येथे ‘महारेशीम अभियान’ नोंदणीचा शुभारंभ; 

शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - जेनीत चंद्रा दोन्तुला

नांदेड, दि. 1 एप्रिल :- किनवट तालुक्यातील थारा येथे ‘महारेशीम अभियान’ नोंदणीचा शुभारंभ सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तुला यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने रेशीम शेतीसाठी नोंदणी करून सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर न थांबता वस्त्रोद्योगाशी जोडले जाणे आवश्यक आहे. शेतीत उद्योगाचा समावेश करून शेतकऱ्यांना उद्योजक बनविणे हे शासनाचे धोरण असून, रेशीम उद्योग हा त्यासाठी अत्यंत फायदेशीर पर्याय आहे.

कार्यक्रमास जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड, क्षेत्र सहायक रेशीम कांचन जाधव, सहायक संचालक प्रवीण भुरके, प्रगतशील शेतकरी कपील सोनटक्के तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तुला पुढे म्हणाले की, या अभियानाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास शासनस्तरावर अधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. वैयक्तिक स्तरावरही शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात व आवश्यक त्या अनुदानासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.

नगदी पीक म्हणून रेशीम शेतीकडे वळा – अशोक वडवळे

जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी सांगितले की, पोकरा, मनरेगा व ‘सिल्क समग्र’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकरी चार लाख रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध आहे. समूहाच्या माध्यमातून रेशीम शेती केल्यास अधिक फायदा होऊन बाजारपेठेतही स्थिर उत्पन्न मिळू शकते.

शेतकऱ्यांनी 5 एप्रिल 2026 पर्यंत संबंधित अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी. उत्पन्नवाढ व वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रेशीम शेतीसाठी लागणारी सर्वतोपरी मदत रेशीम संचालनालयामार्फत करण्यात येणार आहे. तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व अनुदानाबाबत माहिती दिली.

00000




वृत्त क्रमांक  384

अनुज्ञप्तीविषयक शिबिराचे 3 ऐवजी 2 एप्रिलला कंधार येथे आयोजन

शिबिराच्या दिवशी अनुज्ञप्तीधारकांनी आपली कामे करुन घेण्याचे आवाहन

नांदेड दि. 01 एप्रिल :- नांदेड जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियोजीत एक दिवशीय अनुज्ञप्तीविषयक कामकाजाचे शिबिर कंधार येथे 3 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेले होते. परंतु शुक्रवार 3 एप्रिलला गुड फ्रायडे निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे अनुज्ञप्तीविषयक शिबिर गुरुवार 2 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. तरी सर्व नागरिक, अनुज्ञप्तीधारक अर्जदार यांनी यांची नोंद घ्यावी व कार्यालयास सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले आहे. 

तरी कंधार येथील एक दिवशीय अनुज्ञप्ती विषयक कामकाजाचे शिबिर 2 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. सर्व नागरिकांनी/अनुज्ञप्तीधारकांनी आपली सर्व कामे शिबिराच्या दिवशी उपस्थित राहून करुन घ्यावीत, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे. 

00000

वृत्त क्रमांक  383

सहकारी संस्थांसाठी चौकशी प्राधिकृत अधिकारी नामतालिका ; अर्ज 30 एप्रिलपर्यंत करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 01 एप्रिल :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 83 व 88 अन्वये सहकारी संस्थांच्या चौकशीसाठी प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका तयार करण्यात येत आहे. यासाठी सहकार खात्यातून निवृत्त झालेले (वय 70 वर्षे पूर्ण न झालेले) अधिकारी, निवृत्त न्यायाधीश, वकील तसेच सनदी लेखापाल यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर विभाग, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, लातूर येथे तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर/धाराशिव/बीड/नांदेड व संबंधित जिल्ह्यांतील सर्व उपनिबंधक व सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत.

हे अर्ज 01 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत प्राप्त होऊ शकतात. संबंधित पात्र व्यक्तींनी परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत संबंधित कार्यालयात सादर करावेत.

याबाबतची सविस्तर सूचना संबंधित कार्यालयांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. असे आवाहन प्रवीण फडणवीस, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांनी केले आहे.

००००००

वृत्त क्रमांक  382

मोटार सायकल वाहनांसाठी नवीन मालिका सुरु

पसंतीक्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 01 एप्रिल :- परिवहनेत्तर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी एमएच 26- डीबी ही नवीन मालिका लवकरच सुरु होणार आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे. त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक व ईमेलसह अर्ज 2 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2.30 पर्यत स्विकारण्यात येणार आहेत. अर्जासोबत संबंधीत पसंती क्रमांकाच्या शुल्काचा धनादेश (डीडी) सुध्दा सादर करावा. विहित केलेल्या दिनांक व वेळेनंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत यांची नोंद घ्यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

ज्या पसंतीक्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्‍त झाल्यास 2 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता दुरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. तरी सर्वानी याबाबतची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. 

00000

वृत्त क्रमांक  381

दहावी-बारावी विद्यार्थ्यांना एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्र; दुरुस्तीसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू

नांदेड, दि. 01 एप्रिल :- फेब्रुवारी-मार्च 2026 पासून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र न देता एकत्रित स्वरूपात देण्यात येणार आहेत.

या एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचे पहिले नाव, वडिलांचे नाव व आडनाव यामध्ये काही त्रुटी असल्यास संबंधित दुरुस्ती ऑनलाईन पद्धतीने करून घेणे आवश्यक आहे. जर अशी दुरुस्ती अद्याप केलेली नसेल, तर ती मंडळामार्फत तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, फेब्रुवारी/मार्च 2026 च्या प्रवेशपत्रावरील छायाचित्र अस्पष्ट असल्यास त्यावर योग्य फोटो चिकटवून संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी घेण्याचे निर्देश यापूर्वी देण्यात आले होते. ज्या विद्यार्थ्यांचे फोटो दुरुस्त करण्यात आले आहेत, त्यांची माहिती अचूकपणे एकत्रित गुणपत्रक व प्रमाणपत्रावर छापण्यासाठी संबंधित फोटो पुन्हा अपलोड करणे आवश्यक आहे.

यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर “फोटो करेक्शन” ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या लिंकद्वारे फोटो दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करावी.

निर्धारित कालावधीनंतर कोणत्याही प्रकारच्या दुरुस्त्या स्वीकारल्या जाणार नाहीत. त्यामुळे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी, असे लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

Tuesday, March 31, 2026

वृत्त क्रमांक  380

“प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र” योजनेंतर्गत   

इच्छुक संस्थांना प्रस्ताव सादर करण्याची 10 एप्रिल पर्यंत मुदत   

नांदेड दि. 31 मार्च :- “प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र” योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी पात्र प्रशिक्षण भागीदार (Training Partner TP/Training Center TC) संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आली आहेत. इच्छुक व पात्र प्रशिक्षण भागीदार, प्रशिक्षण केंद्र (TP/TC) संस्थांनी आपले प्रस्ताव शुक्रवार 10 एप्रिल 2026 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड येथे दोन प्रतित सादर करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.   

या योजनेअंतर्गत ग्रामीण युवकांना उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश आहे. जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील मालेगाव, भोकर तालुक्यातील वाकद, बिलोली तालुक्यात कासराळी, धर्माबाद तालुक्यात येताळा, हदगाव तालुक्यात तामसा, नांदेड जिल्ह्यात धनेगाव, किनवट तालुक्यात गोकुंदा, उमरी तालुक्यात शिंधी (स्थलांतरित वाडी) या 8  ठिकाणी ही केंद्रे स्थापन करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. प्रत्येक ठिकाणी एक केंद्र कार्यान्वित केले जाणार आहे. 

प्रस्ताव सादर करणारी संस्था ही भागीदारी संस्था, एलएलपी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी, ट्रस्ट किंवा सोसायटी म्हणून विधिवत नोंदणीकृत, मान्यताप्राप्त प्रशिक्षण भागीदार, प्रशिक्षण केंद्र (TP /TC) असणे आवश्यक आहे. संबंधित संस्थेकडे कौशल्य विकास क्षेत्रातील अनुभव, प्रशिक्षण दिल्याचा पुरावा, तसेच उद्योग संलग्नता (Placement/Industry Linkage) असणे आवश्यक आहे. तसेच संस्थेची नोंदणी Skill India Digital Portal वर असणे बंधनकारक आहे. 

प्रस्ताव सादर करताना मागील 4 वर्षांचा केवळ कौशल्य विकास प्रशिक्षणातील आर्थिक उलाढाल, आवश्यक पायाभूत सुविधा, तसेच संबंधित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त प्रस्तावांची छाननी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीद्वारे करण्यात येऊन पात्र संस्थांची निवड करण्यात येणार आहे. या विषयीची तपशीलवार माहिती जिल्हा कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे. संदर्भाकरिता तिचे अवलोकन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्रमांक  379

विविध कृषि पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ   

नांदेड दि. 31 मार्च :- राज्य शासनातर्फे दरवर्षी कृषीक्षेत्रात संघटनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्ती, गट/संस्थेला पुरस्कार देण्यात येतो. उल्लेखनिय/अतिउल्लेखनिय कार्य करणारे तसेच राज्याला, जिल्ह्याला दिशादर्शक ठरणारे शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. विविध कृषि पुरस्कारासाठी जिल्हास्तर समितीकडे अर्ज सादर करण्यास  बुधवार 15 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आयुक्त कृषी यांनी इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट यांना सन 2025 पासूनचे विविध कृषी पुरस्कार बाबतचे अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करणेबाबत आवाहन केले आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी तात्काळ आपला अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करावा. अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना पुरस्कारासाठी आवश्यक असलेला जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेकडील चारित्र्य पडताळणी दाखला प्राप्त करून घेण्यास 15-20 दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. त्याबरोबर नेटवर्क, तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना विहित मुदतीत अर्ज सादर करण्यास अडचण येत आहे. मार्च महिन्यात आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने कामकाज असल्याने क्षेत्रीय यंत्रणाना प्रत्यक्ष पडताळणीसाठी देखील कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी व क्षेत्रीय स्तरावरून दूरध्वनीद्वारे सदरची मुदत वाढवून मिळण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्याअनुषंगाने सन 2025 करीता विविध कृषी पुरस्कार सादर करण्यासाठी सुधारीत नियोजन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे.

सन 2025 च्या सर्व पुरस्कारांसाठी सुधारित कालावधी

अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरणे. सहाय्यक कृषी अधिकारी यांनी अर्जदाराचा ऑनलाईन अर्जाची छाननी करून, समक्ष भेट देऊन अनुषंगिक बाबींची पूर्ततेची कार्यवाही करून तालुका कृषी अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करणे. तालुका कृषी अधिकारी यांनी अर्जदाराचा ऑनलाईन अर्ज छाननी, समक्ष भेट, सहाय्यक कृषी अधिकारी यांचे अभिप्राय यांची प्रत्यक्ष पडताळणी करून जिल्हास्तर समितीकडे अर्ज सादर करण्याचा कालावधी आता बुधवार 15 एप्रिल 2026 पर्यंत राहील. 

जिल्हास्तर समितीने प्राप्त प्रस्तावांची छाननी करून, समक्ष भेट देऊन उल्लेखनीय कार्याबाबतच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शिफारशीसह अर्ज विभागस्तरीय समितीकडे सादर करण्याची मुदत गुरूवार 30 एप्रिल 2026 असेल.

तर विभागस्तरीय समितीने प्राप्त प्रस्तावांची छाननी करून, समक्ष भेट देऊन उल्लेखनीय कार्याबाबतच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शिफारस केलेले परिपूर्ण, निकषाप्रमाणे पात्र प्रस्ताव विभागस्तरीय समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तासह कृषी आयुक्तालयास सादर करण्याची मुदत शुक्रवार 15 मे 2026 पर्यंत राहील.   

महाराष्ट्र राज्य हे कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात दरवर्षी शेती, फलोत्पादन व पुरक क्षेत्रात अतिउल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिला शेतकरी तसेच पुरुष शेतकरी अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभुषण पुरस्कार, जिजामाता कृषीभुषण पुरस्कार, कृषीभुषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार इत्यादी पुरस्कार मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.

यापूर्वी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. प्रस्ताव बनविण्यासाठी खर्च येत असल्याने सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. या पारंपारिक पद्धतीमुळे प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलनासाठी अधिक कालावधी लागत होता. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदर प्रणाली कृषी विभागाच्या संकेतस्थळावर https://krishi.maharashtra.gov.in कृषी पुरस्कार टॅबमध्ये उपलब्ध आहे.

सदर संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुरस्कार प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवाल निर्मिती ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविणे शक्य होणार आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढणार असून पुरस्कार प्रक्रियेची कार्यक्षमता, विश्वासार्हता व परिणामकारकता अधिक बळकट होणार आहे.  

000000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...