Sunday, January 18, 2026

वृत्त क्रमांक 59

हिंद-दी-चादर’ जागतिक पातळीवरील ऐतिहासिक सोहळा ठरावा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व माध्यमांनी योगदान द्यावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड दि.१८ जानेवारी:- नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा “हिंद-दी-चादर” हा कार्यक्रम केवळ मराठवाडा किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, जागतिक पातळीवर भारताची श्रद्धा, बलिदान आणि मानवी मूल्यांची महान परंपरा अधोरेखित करणारा ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित या भव्य कार्यक्रमाकडे देश-विदेशातील भाविक, संत-महात्मे व मान्यवरांचे लक्ष वेधले जाणार असून, त्यामुळे हा कार्यक्रम जागतिक स्तरावर पोहोचवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रसिद्धी व माध्यम नियोजनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, लातूरचे उपसंचालक (माहिती) विवेक खडसे, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, लातूर जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, सहायक संचालक श्याम टरके यांच्यासह माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. पापळकर पुढे म्हणाले की, हा कार्यक्रम प्रत्येक गावागावात, प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक मुलापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व माध्यमांनी समन्वयाने व सकारात्मक दृष्टीकोनातून सहकार्य करावे. माध्यमांची भूमिका या ऐतिहासिक कार्यक्रमात अत्यंत महत्त्वाची असून, समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य माध्यमांद्वारे घडू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या सविस्तर नियोजनाची माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माध्यमांनी सेवेच्या भावनेतून सकारात्मक योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीदरम्यान माध्यम प्रतिनिधींनी आपली मते मांडली तसेच कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी व सूचनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

00000







 


नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक विकास व वक्‍फ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी #नांदेड येथे होणाऱ्या हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त आवाहन केले आहे.


वृत्त क्रमांक 58

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

नांदेड, दि. १८ जानेवारी :- पुणे येथील समाज कल्याण आयुक्त तथा लातूर येथील प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत नांदेड जिल्ह्यातील समाज कल्याण अस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी सायन्स कॉलेज, स्नेहनगर, नांदेड येथील क्रीडा प्रांगणात करण्यात आले.

या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन सायन्स कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. लक्ष्मण पी. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे उपस्थित होते. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन, क्रीडागीत व सहभागी संघांचे पथसंचलन पार पडले.

प्रस्ताविक समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले तर उद्घाटनपर मार्गदर्शन प्राचार्य प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी केले. पिपल्स महाविद्यालयाचे ग्रंथपाल संदीप गायकवाड यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा, जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी कार्यालय व समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नांदेड येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये आऊटडोअर प्रकारात क्रिकेट, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्सीखेच तसेच इनडोअर प्रकारात बॅडमिंटन, टेबल टेनिस व बुद्धिबळ स्पर्धांचा समावेश होता. महिला विभागातील कबड्डी स्पर्धेत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण महिला कर्मचारी संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृह महिला संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. खो-खो व रस्सीखेच स्पर्धांमध्ये शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृह महिला संघाने प्रथम क्रमांक मिळविला.

पुरुष विभागात क्रिकेट स्पर्धेत शासकीय वसतिगृह नांदेड संघाने प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय चषक जिंकला, तर द्वितीय क्रमांक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड संघाने मिळविला. व्हॉलीबॉल स्पर्धेत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड संघ विजेता ठरला, तर खो-खो स्पर्धेत शासकीय निवासी शाळा कर्मचारी संघाने प्रथम क्रमांक पटकावला.

स्पर्धा संपन्न झाल्यानंतर लगेचच बक्षीस वितरण समारंभ पार पडला. पिपल्स महाविद्यालयाचे ग्रंथपाल संदीप गायकवाड, प्रा. विजयानंद कदम व समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक गजानन पांपटवार यांनी केले, तर आभार सहाय्यक लेखाधिकारी संतोष चव्हाण यांनी मानले.

या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडल्या.

000000






 #हिंददीचादर श्री #गुरुतेगबहादूर साहिब यांच्या ३५० व्या #शहीदीसमागम वर्षानिमित्त दि. 24 व 25 जानेवारी 2026 रोजी #नांदेड येथे भव्य ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.






वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...