Thursday, January 1, 2026

वृत्त क्रमांक 3

हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त पूर्वतयारीचा आढावा

नांदेड दि.१ जानेवारी :-“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज पूर्व तयारी आढावा घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रतिनिधी जगदीश सकवान यांनी प्रस्तावित कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. यावेळी कार्यक्रमाचे नियोजन, सुविधा, सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था तसेच इतर आवश्यक बाबींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी व गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक यांची उपस्थितीहोती.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने व गतीने काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी दिल्या.

००००००








वृत्त क्रमांक 2

नांदेड जिल्ह्यात ‘महाभूसंपादन पोर्टल’चा शुभारंभ

‘महाभूसंपादन पोर्टल’मधून ऑनलाईन पद्धतीने होणार भूसंपादन प्रक्रिया

नांदेड, दि. 1 जानेवारी :- महाराष्ट्र राज्यामध्ये विविध सार्वजनिक प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर खाजगी जमिनीचे भूसंपादन करण्यात येते. सन 2013 पासून भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 या कायद्यान्वये भूसंपादनाची कार्यवाही केली जाते.

या कायद्यातील तरतुदीनुसार भूसंपादन प्रक्रियेचे संपूर्ण डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी शासनाच्या “सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने 150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम” अंतर्गत भूसंपादनासाठी विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यावर सोपवली होती. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात https://mahabhusampadan.in, या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

या महाभूसंपादन पोर्टलच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. या सॉफ्टवेअरमध्ये जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, संपादीत  संघ तसेच भूमी अभिलेख विभागासाठी स्वतंत्र लॉग-इन सुविधा उपलब्ध आहे.

या पोर्टलचे वैशिष्ट्य म्हणजे, संपादन यंत्रणेकडून भूसंपादन प्रस्ताव सादर झाल्यापासून ते भूधारकांना मोबदला वाटप होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सॉफ्टवेअरद्वारे पार पडणार आहे. यामध्ये कमी-जास्त पत्रके, नवीन सातबारा उतारे तयार होणे, इतर पत्रव्यवहार, अधिसूचना, भूधारकांना नोटीस आदी सर्व कागदपत्रे ऑटो-जनरेट पद्धतीने तयार होतील. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात गती व अचूकता येणार आहे.

भूसंपादन प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे निवाडे विनाविलंब होतील. परिणामी जनतेच्या उपयोगाचे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन शासनाचा खर्चही कमी होणार आहे. भूधारकांना त्यांच्या जमिनीच्या संपादनाबाबतची माहिती व नोटीस थेट मोबाईलवर मिळण्याची सुविधाही या प्रणालीमध्ये उपलब्ध आहे.

या प्रणालीचा प्रायोगिक वापर करताना भूसंपादन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, महाभूसंपादन पोर्टलमुळे कार्यालयीन कामकाज अधिक सुसूत्र, पारदर्शक व वेळेत होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

सध्या भूसंपादन अधिनियम, 2013 अंतर्गत सुरू असलेली सर्व प्रकरणे या सॉफ्टवेअरद्वारे हाताळण्यात येणार आहेत. पुढील टप्प्यात महाराष्ट्र महामार्ग अधिनियम, 1955, महाराष्ट्र औद्योगिक वसाहत अधिनियम, 1961, रेल्वे (सुधारणा) अधिनियम, 2008 तसेच राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, 1956 अंतर्गत होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेचाही या सॉफ्टवेअरमध्ये समावेश करण्यात येणार आहे.

या संकेतस्थळावर भूसंपादनाशी संबंधित कायदे, नियम, शासन निर्णय, कलम 1 व 19 अंतर्गत अधिसूचना सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच सन 2013 पासून नांदेड जिल्ह्यात घोषित झालेल्या सर्व भूसंपादन निवाड्यांचा तपशील महाभूसंपादन पोर्टलवर उपलब्ध आहे. नोटीस व माहिती थेट मोबाईलवर मिळत असल्याने भूसंपादन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येऊन तक्रारींचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

ही प्रणाली विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर जितेंद्र पापळकर यांनी गठित केलेल्या समितीच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वात विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या निर्मितीत अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रविण मेंगशेट्टी, उपजिल्हाधिकारी श्रीमती प्रियांका पवार, उपविभागीय अधिकारी विकास माने, नायब तहसीलदार सतीश कुलकर्णी, आय.टी. कन्सल्टंट संतोष निलेवार तसेच भूसंपादन सहायक संदीप ढवळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

महाभूसंपादन पोर्टलच्या वापरामुळे भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता, गतिमानता व लोकाभिमुखता येणार असून प्रशासनासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

चौकट :

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले : महाभूसंपादन पोर्टलमुळे भूधारकांना भूसंपादनाशी संबंधित माहिती, अधिसूचना व स्थिती पाहण्यासाठी सुलभ व्यवस्था उपलब्ध झाली आहे. यामुळे पारदर्शकता येणार असून भू-धारकांना भूसंपादनाबाबतची माहिती तात्काळ मिळणार आहे. तसेच मोजणीमध्ये अक्षांश-रेखांशासह आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अचूकता येणार असून प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ व पारदर्शक होणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये याचा वापर करणे प्रस्तावित आहे.

०००००



 वृत्त क्रमांक 1

रस्ता सुरक्षा अभियान २०२६चा नांदेडमध्ये शुभारंभ

अपघात रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, दि. १ जानेवारी :-दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अपघातांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होत आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच रस्ते अपघात रोखण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

वाहन अपघातांना आळा बसावा तसेच नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. यावर्षी रस्ता सुरक्षा अभियान २०२६ हे १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असून, या अभियानाचा शुभारंभ आज प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे करण्यात आला.

या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले होते. तसेच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना दिल्या. नांदेड जिल्ह्यात डंपर व हायवा वाहनांच्या धोकादायक वाहनचालना मुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नागरिकांनी वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करून उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय शिवराम अहिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राम गलधर, निवासी वैद्यकीय अधिकारी गुट्टे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज यांनी केले. त्यांनी देश, राज्य व जिल्ह्यातील अपघातांची आकडेवारी सादर करून अपघातांमुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती दिली. तसेच नांदेड जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत १ ते ३१ जानेवारीदरम्यान राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

त्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी रस्ते अपघात कमी करण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम स्पष्ट केला. यामध्ये मद्यपान करून वाहन न चालविणे, वेगमर्यादेचे पालन करणे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर, चारचाकी वाहनात सीट बेल्टचा वापर तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

नांदेड जिल्ह्यात २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये रस्ते अपघातांमध्ये ५.०४ टक्के वाढ झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अपघातांमधील मृत्यूसंख्या ही इतर गुन्ह्यांतील मृत्यूंपेक्षा अधिक असल्याचे सांगून नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘रस्ते की पाठशाला’ या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. तसेच मोटार वाहन निरीक्षक प्रदीप नन्नावरे यांनी “मी राष्ट्रीय महामार्ग बोलतोय” या विषयावर आधारित उद्बोधनात्मक गीताचे प्रकाशन केले.

या कार्यक्रमास गुरू गोबिंदसिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), नांदेड येथील विद्यार्थी, विविध संघटनांचे पदाधिकारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक, वाहन वितरक तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अशा एकूण २७५ नागरिकांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोटार वाहन निरीक्षक श्रीमती रेणुका राठोड यांनी केले, तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित बोरकर यांनी आभार प्रदर्शन केले.

०००००






Wednesday, December 31, 2025

 वृत्त क्रमांक 1338

खडकुत ते जांभरुन फाटापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लगतच्या एकेरी मार्गाने 

नांदेड दि. 31 डिसेंबर :- नांदेड ते हिंगोली जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खडकूतपाटी ते जांभरुनफाटा दरम्यानचा रस्ता येत्या 2 ते 4 जानेवारी पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. यासाठी पर्यायी मार्ग जाण्या-येण्यासाठी नांदेड ते हिंगोली जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खडकूत पाटी ते जांभरुन फाटा दरम्यानचा रस्त्याच्यापलिकडे एकेरी मार्ग असा राहील. 

मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबधीत विभागाने पुढील उपाययोजना करुन 2 जानेवारी 2026 रोजीचे 6 वा. पासून ते 4 जानेवारी 2026 रोजीच्या 10 वा. पर्यंत उक्त नमुद केल्याप्रमाणे नांदेड ते हिंगोली जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खडकूत पाटी ते जांभरुन फाटा या दरम्यानची सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पलिकडच्या एकेरी मार्गाने वळविण्यास अधिसुचनेद्वारे मान्यता दिली आहे. 

पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड ग्रामीण यांनी प्रस्तुत अधिसुचना प्रचार व प्रसारसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड ग्रामीण /कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड/ प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पीआययू नांदेड यांनी रस्ता वाहतूक प्रतिबंध व पर्यायी रस्त्यासाठी आवश्यक असलेले बोर्ड, चिन्ह लावणे इत्यादी बाबतची कार्यवाही करावी, असेही अधिसूचनेत नमूद केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 1337

नांदेड जिल्ह्यासाठी 3 स्थानिक सुट्या जाहीर 

नांदेड दि. 31 डिसेंबर :- नांदेड जिल्ह्यासाठी सन 2026 या वर्षाकरीता शासन निर्णयाद्वारे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी पुढे नमुद यात्रा व सणाच्या दिवशी 3 स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत.   

मंगळवार 6 जानेवारी 2026 रोजी हजरत हाजी सय्याह सरवरे मगदुम बडी दर्गाह कंधार ऊर्स, शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधन तर शुक्रवार 18 सप्टेंबर 2026 रोजी ज्येष्ठा गौरी पूजन निमित्त स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.  

या तीन दिवसाच्या स्थानिक सुट्या नांदेड जिल्हयातील सर्व राज्य शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदअंतर्गत कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये तसेच कोषागार, उपकोषागार कार्यालये व इतर शैक्षणिक संस्था यांना लागू राहतील. तसेच हा आदेश नांदेड जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये तसेच केंद्र शासनाची कार्यालये आणि बँका यांना लागू होणार नाही, असेही अधिसुचनेत नमूद केले आहे.

00000


 वृत्त क्रमांक 1336

गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वाहतूक केल्यास कारवाई

नांदेड दि. 31 डिसेंबर :- राज्यात वाळू तसेच इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, साठवणूक व बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी शासनाने कडक धोरण राबविण्याचे अनुषंगाने महसूल व वन विभागाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी परिपत्रक प्रसिध्द केले आहे. या निर्देशानुसार परिवहन विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून संयुक्त तपासणी व प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

ज्यामध्ये बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. अवैध वाहतूकीमध्ये संबंधित वाहनाकडून पहिल्यांदा गुन्हा आढळून आल्यास वाहनाचा परवाना 30 दिवसांसाठी निलंबित करून वाहन जप्त करण्यात येईल. दुसऱ्यांदा गुन्हा सिद्ध झाल्यास 60 दिवसांसाठी परवाना निलंबित करून वाहन जप्त करण्यात येईल. तिसऱ्यांदा किंवा वारंवार गुन्हा आढळल्यास संबंधित वाहनाचा परवाना रद्द करण्याबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत कार्यवाही करुन परिवहन विभागामार्फत कारवाई पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48 (7) व 48 (8) अन्वये दोषींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईसाठी परिवहन विभागाकडून संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तात्काळ प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.  त्यामुळे नांदेड जिल्हयातील वाळू माफिया व बेकायदेशीर खनिज वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास तसेच शासनाच्या महसुलाचे संरक्षण होण्यास हातभार लागणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

वृत्त क्रमांक 1335 

सैनिकी मुलांचा वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने भरती 

नांदेड दि. 31 डिसेंबर :- सैनिकी मुलांचे वसतीगृह विष्णूपुरी नांदेड येथील वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने माजी सैनिक, माजी सैनिक अवलंबित मधुन सफाई कामगाराचे एक पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी माजी सैनिक/माजी सैनिक अवलंबित उपलब्ध नसल्यास हे पद नागरी (सिविलन) संवर्गातून भरण्यात येईल. यासाठी वयोमर्यादा 21 ते 50 वर्षे असून कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. इच्छुक उमेदवाराने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे सोमवार 5 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02462-359056 किंवा भ्रमणध्वनी क्रमांक 8380873985, 8999638872 वर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...