Wednesday, October 8, 2025

 वृत्त क्रमांक  1069

#भारतीयवायुसेनादिन

वृत्त क्रमांक  1068

महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, कार्यक्षमतेतून पारदर्शकतेकडे वाटचाल : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

•  “सेवा पंधरवाडा” अंतर्गत जिल्हा प्रशासनाचे नाविन्यपूर्ण उपक्रम  

•  १९ हजार ६३९ कि.मी. रस्ते मोकळे 

•  ७२ आर जमीन घरकुलधारकांना 

•  २७ गावांना स्मशानभूमी, २ हजार ४०८ शासकीय जमिनींची केएमएल फाईल अद्ययावत 

•  एआय चॅटबॉटद्वारे नागरिकांना विविध सुविधेचा लाभ

नांदेड, दि. ८ ऑक्टोबर : "सेवा पंधरवाडा" उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून सर्व उपक्रम युद्धपातळीवर राबविण्यात आले असून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक बनविण्याकडे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर या कालावधीत हा सेवा पंधरवाडा राबविण्यात आला. 

टप्पा 1 अंतर्गत रस्ते मोकळे करून नागरिकांना दिलासा

गावरस्ते, शिवारस्ते, शेतरस्ते व पायरस्ते मोकळे करण्याच्या उपक्रमात जिल्ह्यातील एकूण २ हजार १६९ रस्ते मोकळे करण्यात आले असून त्यांची लांबी तब्बल १९ हजार ६३९ कि.मी. आहे. या माध्यमातून १ लाख ५१ हजार ५१९ शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

टप्पा २ : सर्वांसाठी घरे- घरकुलधारकांना जमीन प्रदान

‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमांतर्गत घरकुलधारकांना घरबांधणीसाठी ७२ आर शासकीय जमीन प्रदान करण्यात आली आहे. ज्यामुळे अनेक कुटुंबांना निवारा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टप्पा ३ अंतर्गत : गाव तिथे स्मशानभूमी/दफनभूमी

जिल्ह्यातील ५२ गावांपैकी २७ गावांना शासकीय गायरान जमिनीसह स्मशानभूमी / दफनभूमीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उर्वरित गावांसाठी प्रक्रिया सुरू आहे.

सर्व शासकीय जमिनींची माहिती एका क्लिकवर

जिल्ह्यातील सर्व शासकीय जमिनींची माहिती लॅंड बँकच्या माध्यमातून संकलित करण्यात आली आहे. यात एकूण २ हजार ४०८ जमिनींच्या KML फाईल तयार करून GIS प्रणालीवर नकाशावर दर्शविण्यात आल्या आहेत. यामुळे शासकीय जमिनींचे डिजिटल सिमांकन (geo-fencing) झाले असून त्या जमिनींचे संरक्षण व विविध योजनांसाठी जलद वाटप शक्य झाले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर नागरिकांसाठी A.I. चॅटबॉट

जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर A.I. चॅटबॉट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून विविध योजनांची माहिती, अर्ज नोंदणी आणि ऑनलाईन तक्रारींची सुविधा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. आतापर्यंत ३०८ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

तांड्यांना महसूली गावाचा दर्जा

संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गत जिल्ह्यातील १० तांड्यांना महसूली गावांचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे.

भटक्या व विमुक्त समाजासाठी शिबिर

भटक्या व विमुक्त समाजातील नागरिकांसाठी आयोजित शिबिरांद्वारे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत कार्ड इत्यादी १ हजार ९७५ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तसेच १ हजार  ८२३ नागरिकांची नवी मतदार नोंदणी करण्यात आली आहे.

या सर्व उपक्रमांमुळे जिल्ह्यातील महसूल प्रशासनात पारदर्शकता, गतीमानता आणि लोकाभिमुखतेचा नवा आदर्श निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा प्रशासनाने “सेवा पंधरवाडा”ला खऱ्या अर्थाने जनसेवेचा उत्सव बनवला आहे.

0000















वृत्त क्रमांक  1067

नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे सायबर सुरक्षा विषयक जनजागृती कार्यक्रम

नांदेड, दि. ८ ऑक्टोबर – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या समान किमान कार्यक्रमांतर्गत आणि नांदेडचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे ७ ऑक्टोबर रोजी कोनाळे कोचिंग क्लासेस, स्टेडियमजवळ, नांदेड येथे सायबर सुरक्षा (Cyber Security) विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये पोलीस अधीक्षक (सायबर नांदेड) वसंत सप्रे, श्रीमती अनुसया कोनाळे (संचालिका, कोनाळे कोचिंग क्लासेस), स.पो.नि. दयानंद पाटील (कम्युनिटी पोलिसिंग), पो.उ.नि. एम.बी. चव्हाण, आणि पो.उ.नि. काशिनाथ कारखेडे यांचा समावेश होता.

कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. शरद देशपांडे यांनी अध्यक्षीय भाषणात सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले व न्यायव्यवस्था नागरिकांच्या दारी न्याय पोहोचविण्याचे कार्य करते, असे सांगितले.

वसंत सप्रे यांनी ऑनलाईन फ्रॉड विषयक मार्गदर्शन केले. स.पो.नि. दयानंद पाटील यांनी चाइल्ड पॉर्नोग्राफीसंबंधी माहिती दिली, तर पो.उ.नि. एम.बी. चव्हाण यांनी डिजिटल अरेस्ट या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक शरद देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन स.पो.नि. दयानंद पाटील यांनी केले. या कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी मिळून २४८ जणांची उपस्थिती होती.

00000

वृत्त क्रमांक  1066 

भूमिहीन आदिवासी लाभार्थ्यांकडून शेतीजमिनींसाठी अर्ज मागविणे सुरू 

नांदेड दि. ८ ऑक्टोबर : जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत भूमिहीन आदिवासी लाभार्थ्यांना शेतीची जमीन देण्यासाठी शासनामार्फत एक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत भूमिहीन आदिवासी लाभार्थ्यांना चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर सिंचित शेती देण्यात येणार आहे.

या संदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी इच्छुक लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत. पात्र आदिवासी नागरिकांनी आपले अर्ज व आवश्यक कागदपत्रे प्रकल्प कार्यालय किनवट येथे सादर करावीत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.

सदर योजना ही शासन निर्णय क्र. एपीजी-२०१८/प्र.क्र.१२७/१८, दिनांक २८ जुलै २०२१ अन्वये राबविण्यात येत असून या माध्यमातून भूमिहीन आदिवासींना स्वावलंबनाचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ही माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जितेंद्रचन्द्रा दोन्तुला यांनी प्रसिद्ध केली आहे.

---

Tuesday, October 7, 2025

 वृत्त क्रमांक  1065 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे आज ऑनलाईन उद्घाटन 

नांदेड, दि. ७ ऑक्टोबर :  ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन 8 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे​. त्याचबरोबर एकाच वेळी राज्यातल्या ५६० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि तांत्रिक विद्यालयांमध्ये​ विश्वकर्मा कारागिरांच्या उपस्थितीत अत्याधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रमांची सुरुवात​ होणार आहे, अशी माहिती ​कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मंत्रालय येथे दिली. 

​कामगार हा समाजाचा अविभाज्य घटक असून या घटकाचा सन्मान झाला पाहिजे हा विचार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला असून याच अनुषंगाने कामगारांचा सन्मान करण्यात येत असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. एकीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ या महत्वकांक्षी उपक्रमाचे उदघाटन होत असतानाच  राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये​ विश्वकर्मांच्या हस्ते अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येत असल्याचेही मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले. 

नांदेड जिल्ह्यातील श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय  औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड संस्थेत विश्वकर्मा मारोती पांचाळ  यांच्या हस्ते 8 अल्पमुदत अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी  स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार  रविंद्र  चव्हाण, विधान परीषद सदस्य तथा मा. बाळासाहेब ठाकरे हरीद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके, आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

या कार्यक्रमात विश्वकर्मा अर्थात कामगार वर्गाचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. सुदृढ आणि सौहार्दपूर्ण समाज निर्माण करण्यासाठी कामगारांना सन्मानाचे स्थान मिळायला हवे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांचा विचार आम्ही या निमित्ताने पुढे घेऊन जात असल्याचेही मंत्री लोढा यांनी नमूद केले आहे. याच संकल्पनेतून  प्रस्तूत संस्थेमध्ये आयोजित या कार्यक्रमात कामगारांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण ​देण्याच्या उद्देशाने ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.​ या माध्यमातून चालू वर्षात ७५ हजार प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून, पुढील वर्षापासून ही संख्या १ लाख प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत वाढविण्याचा संकल्प​ कौशल्य विभागाने केला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील उद्योग व्यवस्थापन समित्या (IMC) स्थानिक पातळीवर हे अभ्यासक्रम चालविणार आहेत. त्यामुळे शिक्षणाचे नियोजन, अंमलबजावणी आणि गुणवत्ता नियंत्रण या सर्व बाबींमध्ये स्थानिक सहभाग व उत्तरदायित्व वाढणार आहे. 

या कार्यक्रमांतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित अभ्यासक्रमांचा समावेश असून त्यात अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहन, सोलर ऊर्जा, सायबर सुरक्षा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रीन हायड्रोजन, मोबाईल दुरुस्ती तंत्रज्ञ, सोशल मीडिया प्रभावक (इन्फ्लुएंसर) इत्यादी विषयांचा समावेश ​ करण्यात आला आहे. महिला उमेदवारांसाठी ३६४ विशेष बॅचेस तसेच उदयोन्मुख क्षेत्रांसाठी ४०८ विशेष बॅचेस सुरू करण्यात येणार आहेत. गडचिरोली, लातूर, नागपूर आणि अमरावती येथे स्थानिक उद्योग गरजांनुसार विशेष प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार असून नाशिक येथे होणारा कुंभमेळा लक्षात घेऊन “वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट” हा विशेष अभ्यासक्रमही राबविण्यात येईल, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे नांदेड येथील श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. व्ही. सुर्यवंशी यांनी दिली आहे.

00000

वृत्त क्रमांक  1064 

दहावी परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी 27 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ 

नांदेड, दि. ७ ऑक्टोबर : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेचे नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंडळाने केले आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाच्या इयत्ता दहावी फेब्रु-मार्च २०२६ परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरून ऑनलाईन पध्दतीने त्यांचे शाळा प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत. तसेच पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखांना 7 ते 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

माध्यमिक शाळांनी दिनांक 15 सप्टेंबर, 7 ते 27 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नियमित शुल्काने आवेदनपत्र भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क RTGS/NEFT द्वारे भरणा करावे. शुल्क जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या Application Status मध्ये "Draft चा “Send to Board” व Payment Status मध्ये Not Paid चा Paid असा बदल झाला आहे का याची खात्री करावी. शुल्क जमा केलेली आरटीजीएस/एईएफटीसह पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येईल याची सर्व माध्यमिक शाळाप्रमुख, मुख्याध्यापक यांनी नोंद घ्यावी. 

सर्व माध्यमिक शाळांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी School Profile मध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन SUBMIT केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉगिन मधून प्रिलिस्ट उपलब्ध करुन दिलेली असेल. माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी.. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्याची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत मुख्याध्यापक यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी. 

इ. १० वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. 

माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी UDISE + मधील PEN-ID मध्ये विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे व सदर UDISE + मधील PEN-ID वरुनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे. 

पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) विद्यार्थी यांची माहिती UDISE + मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहेत.ज्या विद्यार्थ्यांचा APPAR-ID उपलब्ध आहे त्याची नोंद आवेदनपत्र भरताना करण्यात यावी, असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.

0000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...