Friday, June 13, 2025

वृत्त


प्रधानमंत्री जनजातीय आबा उत्कर्ष योजनेच्या अभियानाबाबत

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आदिवासी जनतेला आवाहन  

 

प्रधानमंत्री जनजातीय आबा उत्कर्ष योजना अभियान नांदेड जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. नांदेड जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्यावतीने हातात घेण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने आदिवासी समाजातील आरोग्य शिक्षण, पायाभूत सुविधांचा विकास यासारख्या सोयी-सुविधा देऊन आवश्यक लाभ आदिवासी नागरिकांना देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये शिबिर आयोजित केले जात आहेत. त्यामध्ये ज्या काही योजना आहेत त्यात शिक्षण विभागाच्या, आरोग्य, नविनिकरण ऊर्जा, जलशक्ती, दूरसंचार, ऊर्जा मंत्रालय यासारखे अनेक योजना आहेत. त्या आदिवासी जनेतेसाठी या शिबिराच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. यासाठी किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला यांनी नियोजन केले आहे. सर्व आदिवासी क्षेत्रातील आदिवासी परिसरातील जनतेनी या योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी नांदेड जिल्हा प्रशासन कॅम्प मोडवर ध्येय ठेवून आदिवासी नागरिकांना लाभ देईल, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.



वृत्त

प्रधानमंत्री जनजातीय आबा उत्कर्ष योजना अभियान

शिबिराचा आदिवासी जनतेने लाभ घ्यावा : सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तुला

 

प्रधानमंत्री जनजातीय आबा उत्कर्ष योजना अभियान संपुर्ण देशात 15 ते 30 जून या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात हे अभियान 169 गावात रबविण्यात येत आहे. या दरम्यान विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरात प्रत्येक विभागाचे संबंधित नोडल अधिकारी असणार आहेत आणि त्या संबंधित विभागाच्या विविध योजना आदिवासी जनतेला उपलब्ध करून देणार आहे. आदिवासी नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या शिबिरात सहभाग घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन किनवटचे सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी प्रकल्प अधिकारी जेनीत चंद्रा दोन्तुला यांनी आदिवासी नागरिकांना केले आहे.

00000


 

 वृत्त क्रमांक 616

“हे पत्र २०३५ ला उघडून पहा” 

जिल्हा परिषदेचा दहावीपर्यंत आठवण जपणारा आगळावेगळा उपक्रम

नांदेड, दि. १३ जून :- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने यंदा पहिल्या वर्गात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव आणि भावनिक उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मेघना कावली यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील प्रारंभ अधिक गोड आणि संस्मरणीय ठरणार आहे.

१६ जूनपासून सर्व शाळा सुरू होत असून, पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक विशेष “आठवणींचा फॉर्म” देण्यात येणार आहे. या फॉर्ममध्ये शाळेचे नाव, तालुका, विद्यार्थ्याचे नाव, आई-वडिलांची नावे, विद्यार्थ्याने लिहिलेले पहिले मराठी व इंग्रजी अक्षर, पहिली संख्या, त्याचे स्वतःचे विचार आणि एक छायाचित्र अशा विविध गोष्टींची नोंद घेण्यात येईल.

या फॉर्मवर “हे पत्र २०३५ ला उघडून पहा आणि आमची आठवण करा…” असा खास संदेश लिहिण्यात आला असून, जेव्हा हे विद्यार्थी दहावीत पोहोचतील, तेव्हा त्यांनी हा फॉर्म पुन्हा उघडून पहावा आणि आपल्या शालेय जीवनाच्या पहिल्या दिवसाच्या आठवणींना उजाळा द्यावा, असा या उपक्रमामागील मनापासूनचा हेतू आहे.

हा फॉर्म शाळेकडे किंवा पालकांकडे सुरक्षित ठेवला जाणार असून, विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी तो एक अनमोल आठवण ठरणार आहे.

शालेय शिक्षणाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भावनिक नातं निर्माण करणारा, शाळेशी आत्मीयता वाढवणारा आणि शिक्षण प्रक्रियेविषयी आत्मस्मरण जागवणारा हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सर्जनशीलतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे.

०००००

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती

 वृत्त क्रमांक 615

साथी मोहिम निराधार मुलांचे सर्वेक्षण

नांदेड दि. 13 जून :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे 26 मे ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान दुर्लक्षित निराधार, बेघर, अनाथ किंवा रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण करून त्यांचा आधार नोंदणीद्वारे स्वतःचे ओळख प्रदान करण्याची मोहिम नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत सुरू झाली आहे.

त्याअनुषंगाने विविध ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या मुलांचे शिक्षण, आरोग्य, उदरनिर्वाह, समितीच्या समावेश कायदेविषयक सर्वेक्षण इत्यादी बाबी त्यांना उपलब्ध करून देण्याची मोहिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनिल वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जाणार आहे. या मोहिमेत पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकरी, शिक्षण अधिकारी, सामाजिक संस्था, बालकल्याण समिती व विधी स्वयंसंस्था यांचा समावेश आहे. अशा मुलांची माहिती असल्यास संबंधितांनी सदरची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांचे कार्यालयात द्यावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शरद देशपांडे यांनी केले आहे. 

00000

 वृत्त क्रमांक 614

जीबीएस दुर्मिळ आजाराने ग्रस्त तरुण उपचारानंतर बरा 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात झाला उपचार   

नांदेड दि. 13 जून :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी नांदेड येथे अपघात विभागात GBS (Guillain-Barre Syndrome) ने ग्रस्त असलेला एक 25 वर्षीय तरुण जेव्हा उपचारासाठी दाखल झाला होता तेव्हा तो चालू शकत नव्हता, बोलू शकत नव्हता व ‍गिळू शकत नव्हता. काही तासांमध्ये श्वासोच्छवासाची क्रिया मंदावली त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले व कृत्रिम श्वासोच्छवास चालू ठेवला गेला. सदर रुग्णांवर प्राध्यापक डॉ. शीतल राठोड व प्रमुख औषधवैद्यकशास्त्र यांचे मार्गदर्शनाखाली एक विशेष आसीयू टिम तयार करण्यात आली होती. सदर टिममध्ये डॉ. उबेद खान, डॉ.कपिल मोरे, डॉ.अंजली देशमुख व डॉ.फारुखी, सहयोगी प्राध्यापक व डॉ. अमितकुमार पोतुलवार व डॉ.मोहन भंडारे सहायक प्राध्यापक होते. 

जीबीएस GBS हा प्रकार या दुर्मिळ आजारात आणि झपाट्याने वाढणाऱ्या मज्जास्नायूंच्या आजारामुळे रुग्णाचे शरीर पूर्णतः अकार्यक्षम झाले होते. रुग्णाचे दोन्ही हात व पाय असून नसल्यासारखे Intravenous Immunoglobulin (IVIG) थेरपीसह सातत्यपूर्ण व्हेंटिलेटर व्यवस्थापन आवश्यक ते तातडीचे औषधउपचार करण्यात आले. सदर रुग्ण हा 42 दिवस व्हेंटिलेटरवर कृत्रिम श्वासोच्छवासावर वरिष्ठ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार हे सुरू होते. सदर रुग्णास आवश्यकते प्रमाणे फिजिओथेरपी व मानसरोग तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेण्यात आले.  सदर रुग्ण हा तब्बल 85 दिवसाच्या उपचारानंतर हळूहळू हालचाल करू लागला. सदर रुग्ण हा आज बोलतोय, हसतोय आणि डॉक्टरांचे आभार मानत घरी जातांना त्याने व त्याच्या नातेवाईक यांनी आनंद व्यक्त केला.

GBS (Guillain-Barre Syndrome)  या दूर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णावर डॉक्टर व परिचर्या संवर्गातील कर्मचारी यांनी जे अथक पूर्ण शर्तीचे उपचार करुन हे साध्य झाल्याचे समाधान व आनंद डॉ.विजयकुमार कापसे, वैद्यकीय अधीक्षक व डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता महोदय डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी, नांदेड यांनी व्यक्त केले.

0000




 वृत्त क्रमांक 613

समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी

16 जून रोजी महिला लोकशाही दिन  

नांदेड, दि. 13 जून :-  समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 16 जून 2025 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.   

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 16 जून 2025 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधनी प्रशिक्षण केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

मुंबई रायझिंग : एका आंतरराष्ट्रीय शिक्षणनगरीचा प्रारंभ !
नवी मुंबईत साकारण्यात येत असलेल्या #शैक्षणिकहब मध्ये जागतिक स्तरावरील मोठ्या विद्यापीठांचा समावेश… उत्तम शिक्षण, सुविधा व उज्ज्वल भविष्य यातून मुंबईचा जागतिक शैक्षणिक नकाशावर ठसा उमटणार आहे.





 

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...