Tuesday, March 25, 2025

 वृत्त क्रमांक 328

माळी कामासाठी 31 मार्चपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 25 मार्च  :- सैनिकी मुलांचे वसतिगृह, विष्णुपूरी नांदेड येथील परिसरात सुंदर फुलांची व शोभनीय झाडे व बगीचा रखरखाव कामासाठी अशासकीय माळी कर्मचारी  कंत्राटी पध्दतीने निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारीच्या कामावर नियुक्त करणे आहे. इच्छूक आणि अनुभवी व्यक्तीने 31 मार्च 2025 पर्यत जिल्हा सैनिक कार्यालय, नांदेड येथे अर्ज करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी  तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे. 

00000

  वृत्त क्रमांक 327

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात देशभक्तीपर कार्यक्रमाची रंगत 

 'जीवन गाणे ',गृह विभाग व सांस्कृतिक विभागाचा कार्यक्रम 

नांदेड दि.२५ मार्च :  नांदेड जिल्हा कारागृहामध्ये जीवन गाणे गातच जावे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बंदिवानांमधील काही कलाकारांनी देखील या कार्यक्रमात भाग घेऊन देशभक्ती, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रभक्तांवर आधारित गायन स्पर्धेमध्ये भाग घेऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व गृह विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारणे सेवा यांच्या विशेष सहकार्याने 25 मार्चला नांदेड जिल्हा कारागृहामध्ये हा कार्यक्रम रंगला. राज्याच्या सांस्कृतिक विभागामार्फत निर्धारित केल्याप्रमाणे एकाच दिवशी 36 कारागृहात एकाच वेळी या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

नांदेड जिल्हा कारागृहामध्ये अधीक्षक एस. एच.आढे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, कारागृहाचे तुरुंग अधिकारी विजय मेश्राम, रूकमे, तसेच गायक रंजीत भद्रे व त्यांच्या संचाच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमांमध्ये देशभक्तीपर कार्यक्रम गीतांसोबतच, महापुरुषांच्या संदर्भातील गीते तसेच अनेक लोकप्रिय गाण्यांचे गायन सांस्कृतिक विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या संचाने केले.

मात्र प्रमुख आकर्षण ठरले ते बंदीवानांपैकी अनेकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रॅप पासून तर भजनापर्यंत आणि कविता वाचनापासून तबलावादनापर्यंत कार्यक्रमात भाग घेऊन आपल्या नियमित रोजच्या बंदीवानाच्या जीवनातून काही निवांत क्षण घालवले. यावेळी अशा कार्यक्रमाचा आनंद झाल्याचे बंदीवानानी यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले.

00000






मुलींच्या स्वप्नांना बळ सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
महाराष्ट्रातील मुलींना #मोफतशिक्षण







 

Monday, March 24, 2025

 वृत्त क्रमांक 326

बोगस रेशन कार्ड देणाऱ्या सेतू चालकावर गुन्हा दाखल

नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा 

नांदेड दि. २४ मार्च : नांदेड ग्रामीण परिसरात बोगस रेशन कार्ड काढून देणाऱ्या सेतू चालकावर आज गुन्हा दाखल करण्यात आला. नागरिकांनी पात्रता नसताना रेशन कार्ड काढण्याचा प्रयत्न करू नये व कोणाच्याही खोट्या दाव्याला बळी पडू नये, असे आवाहन तहसीलदार नांदेड संजय वारकड यांनी केले आहे.

आज तहसील कार्यालय नांदेड येथील पुरवठा विभागामध्ये एक व्यक्ती त्यांच्या रेशन कार्ड ऑनलाइन झाले आहे. परंतु धान्य मिळत नाही म्हणून तक्रार करायला आला होता, कर्मचाऱ्यांनी अधिक तपासणी केली असता असे निदर्शनास आले की त्यांचे रेशन कार्ड हेच फसवे आहे.

संबंधित व्यक्तीला फक्त ऑनलाइन एक पेज देण्यात आले होते. तर रेशन कार्ड हे बोगस असल्याचे निष्पन्न आहे.

या प्रकार लक्षात येता तात्काळ पोलीस निरीक्षक वजीराबाद पोलीस स्टेशन यांना बोलावून त्या व्यक्तीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री.रवींद्र राठोड  यांना प्राधिकृत करून संबंधित सेतू चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी दिलेले सहा रेशन कार्ड असे बनावट सापडले आहेत. संबंधीत सेतू चालक ऋषिकेश पेदेवाड राहणार सिडको नांदेड यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, तहसील कार्यालयातील कोणत्याही दस्तऐवज काढून देण्यासाठी किंवा सुविधा देण्यासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांशी चर्चा करावी. एजंट व अनोळखी लोकांच्या तोतयेगिरीला बळी पडू नये, असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे.

वृत्त क्रमांक 325

जागतिक क्षयरोग दिन आणि टीबी मुक्त 

ग्रामपंचायत गौरव सोहळा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

नांदेड दि. 24 मार्च  :- जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 24 मार्च 2025 रोजी वर्षभरात, निकषाच्या आधारावर टीबी मुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या 16 तालुक्यातील 248 पैकी 67 ग्रामपंचायती रौप्य पदक स्मृतीचिन्हास पात्र ठरल्या आहेत. या ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते महात्मा गांधी स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. 

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) मंजुषा कापसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हिरानी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ  बुट्टे, अर्धापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या झिने , जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बदीउद्दीन, जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार डॉ. सम्यक खैरे यांची उपस्थिती होती. 

या ग्रामपंचायती मागील वर्षीही ब्राँझ स्मृती चिन्हाने गौरविल्या गेल्या होत्या. मागच्या वर्षातील 86 ग्रामपंचायतीपैकी 67 ग्रामपंचायती पुन्हा टीबी मुक्त ठरल्याने या ग्रामपंचायतींना सिल्वर स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.

जनसामान्यांमध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती करून , क्षयरुग्ण शोधून यांना नियमित औषधोपचार देत लवकरात लवकर क्षयमुक्त करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी केले. यानंतर अप्पर जिल्हाधिकारी राम बोरगावकर यांनी क्षयरुग्णांनी नियमित औषधोपचार घेऊन रोगमुक्त व्हावे असे आवाहन केले. यासोबतच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड आदींची समयोचित भाषणे झाली. 

00000





वृत्त क्रमांक 324


चित्रपट कथा व पटकथाकार वसंत सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची सांस्कृतिक मानवंदना

कुसुम नाट्यगृहात २२ मार्च २०२५ रोजी वसंत सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वसंत बहार सांस्कृतिक कार्यक्रम                                                                                                                                      

नांदेड दि. 23 मार्च:-    चित्रपट कथा व पटकथाकार वसंत सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त  सांस्कृतिक कार्य विभागाने सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन 22 मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता केले होते.  चित्रपट कथा व पटकथाकार वसंत सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वसंत बहार या सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाची निर्मिती झाली आहे.  

                                                                                                                                                                          या कार्यक्रमात ख्यातनाम कलावंत सहभाग घेतला.  संगीत संयोजन आनंदी विकास तर  संवाद निरजा आपटे, देविदास फुलारी यांचा होता. ख्यातनाम गायक गायिका सागर जाधव, शेफाली कुलकर्णी, विश्वास अंबेकर, मीना सोलापूरे, आसावरी रवंदे या कलाकारांच्या कला सादरीकरणातून  तसेच मुर्तिकार व्यंकट पाटील यांच्या सादरीकरणातून चित्रपट कथा व पटकथाकार वसंत सबनीस यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसंचालक श्रीराम पांडे यांनी केले.

00000











वृत्त क्रमांक 323





  वृत्त क्रमांक 323

राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 7 हजार 558 प्रकरणे समोचाराने निकाली

आपसातील वाद मिटवून 7 जोडप्यांनी एकत्र नांदण्याचा घेतला निर्णय

विविध प्रकरणात 25 कोटी 39 लाख 35 हजार इतक्या रकमेची तडजोड
नांदेड दि. 23 मार्च:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.जी. वेदपाठक यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेडच्या प्रांगणात शनिवार 22 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत 25 कोटी 39 लाख 35 हजार 78 रुपये इतक्या रकमेची तडजोड झाली.
या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश 02, श्रीमती आर.आर. पटवारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज, अधिवक्ता संघाचे अध्यक्ष आशिष गोदमगावकर, जिल्हा सरकारी वकील रणजीत देशमुख तसेच नांदेड येथील सर्व सन्माननीय न्यायाधीश उपस्थित होते.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. वेदपाठक यांनी राष्ट्रीय लोकअदालतीच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित पक्षकारांना लोकअदालतीचे महत्व काय आहे याची जाणीव करुन दिली. लोकअदालतीमध्ये दोन्ही बाजुंच्या पक्षकारांना बोलण्याची पुरेपुर संधी मिळते. दोघांना मान्य असलेला तोडगा काढला जातो. ज्यामुळे दोघांनाही तितकाच आनंद आणि समाधान मिळत असते असे मार्गदर्शन केले व लोकअदालत ही एक संधी असून या संधीचा लाभ घ्यावा, असे उपस्थित पक्षकारांना आवाहन केले.
तसेच नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका न्यायालयात व कौटुंबिक न्यायालय, नांदेड येथे 22 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्हयामध्ये एकुण 7 हजार 558 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाली असून 25 कोटी 39 लाख 35 हजार 78 (अक्षरी पंचवीस कोटी एकोणचाळीस लाख पस्तीस हजार आठ्याहत्तर केवळ) इतक्या रकमेबाबत विविध प्रकरणांत तडजोड झाली.
त्यामध्ये दिवाणी, फौजदारी, धनादेश अनादरीत झालेली प्रकरणे, बॅंक प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसानभरपाई, भूसंपादन, लोहमार्ग गुन्हा कबुली प्रकरणे, ग्रामपंचायतीचे घरपट्टी व पाणीपट्टीचे प्रकरणे तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय येथील प्रलंबीत प्रकरणांचा व नांदेड वाघाळा महानगर पालिका, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे वसुली प्रकरणे, विविध बॅंकांचे तसेच विद्युत प्रकरणे, दूरसंचार विभागाचे टेलिफोन, ट्रॅफिक चालन इत्यादींचे दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश होता. तसेच पाच दिवस घेण्यात आलेल्या विषेश मोहीमेअतंर्गत 794 प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे.
विषेष म्हणजे या लोकअदालतीमध्ये नांदेड जिल्ह्यातील पती-पत्नीचे कौटुंबिक वादाची एकूण आठ प्रकरणे आपसात तडजोडीने मिटविण्यात आली असून त्यापैकी 7 वैवाहिक दांपत्यांनी आपसातील वाद संपवून पुन्हा एकत्र येवून संसाराची सुरुवात करण्याचा निर्णय लोकअदालतीच्या माध्यमातून घेतला.
या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून लोकअदालत यशस्वी करण्या साठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज मुख्यालयातील व तालुकास्तरावरील सर्व सन्माननीय जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश यांनी विशेष प्रयत्न केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये परिश्रम घेतलेल्या सर्व न्यायालयीन कर्मचारी वृंदांचे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार व्यक्त करुन यापुढेही अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
00000



  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच...