Monday, January 20, 2025

21.1.2025

 ​वृत्त क्र. 75

महारेशीम अभियान रथाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड दि. 20 जानेवारी : नांदेड जिल्ह्यातील महारेशीम अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रथाला हिरवी झेंडी दाखवून केली आहे.

सन 2025-26 मध्ये महारेशीम अभियान अंतर्गत तुती लागवड, मनरेगा सिल्क, समग्र दोन योजनेअंतर्गत तसेच वैयक्तिक नवीन तुती लागवड करणास उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी दिनांक 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत महा रेशीम अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे . नवीन तुती लागवड करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, रामकृष्ण इमारत, दुसरा मजला, एम एफ होंडा शोरूमच्या बाजूला, जॉन डियर सर्विस सेंटरच्या समोर, हिंगोली रोड नांदेड येथे संपर्क करावा. तसेच तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधून नवीन तुती लागवड करिता सभासद नोंदणी करावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

जिल्ह्यात महारेशीम अभियानाच्या रथास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते दिनांक 15 जानेवारी रोजी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी संजीव मोरे, उपजिल्हाधिकारी शिंदे, रेशीम विकास अधिकारी पी. बी.नरवाडे, क्षेत्र सहाय्यक पी. यु. भंडारे, ए. एन. कुलकर्णी, एन. वाय.कोरके, ए.बी.यलकटवाड, दत्ता भुसकटे, प्रसाद डुबुकवाड उपस्थित होते.

00000




Sunday, January 19, 2025

 ​वृत्त क्र. 74 

नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतनचा

जेफ्रॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार

 

·         विद्यार्थ्यांना मिळणार औद्योगिक प्रशिक्षणाची संधी 

नांदेड दि. 19 जानेवारी :- शासकीय तंत्रनिकेतन नांदेडच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाने 'जेफ्रॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीसोबत सामंजस्य करार (MOU) करून अद्ययावत प्रयोगशाळा उभारणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यावेळी शासकीय तंत्रनिकेतनचे विद्युत विभागप्रमुख व्ही.व्ही.सर्वज्ञ व ओ.एस.चव्हाण तसेच जेफ्रॉन इंडियाचे डायरेक्टर कल्पेश देसाई व अभय चव्हाण उपस्थित होते. 

या कराराचा उद्देश विद्यार्थ्याना औद्योगिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून ज्ञानाची देवाण-घेवाण करणे हा आहे. यावेळी कंपनीमार्फत विद्युत अभियांत्रीकी विभागाला ट्रान्सड्यूसर प्रदान करण्यात आले आहेत. या उपकरणांच्या सहाय्याने संस्थेत एक अद्ययावत प्रयोगशाळा तयार केली जाणार आहे. यामुळे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील तफावत कमी होऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळण्याची मोठी संधी निर्माण होईल, असा विश्वास संस्थेचे प्राचार्य डॉ. एन एल. जानराव यांनी व्यक्त केला. 

याप्रसंगी महाराष्ट्र तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसंचालक डॉ. धनपाल कांबळे तसेच तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक व छत्रपती संभाजीनगर विभागाचे सहसंचालक अक्षय जोशी यांनी संस्थेचे अभिनंदन केले.

000





18.1.2025

 राज्यातील  जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर

मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड.आशिष जयस्वाल यांच्याकडे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

उर्वरित जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची व सहपालकमंत्री पदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :

नागपूर व अमरावती : चंद्रशेखर बावनकुळे,

अहिल्यानगर : राधाकृष्ण विखे-पाटील,

वाशीम : हसन मुश्रीफ,

सांगली : चंद्रकांत पाटील,

नाशिक : गिरीश महाजन, 

पालघर : गणेश नाईक,

जळगाव : गुलाबराव पाटील,

यवतमाळ : संजय राठोड,

मुंबई उपनगर : ॲड.आशिष शेलार तर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा,

रत्नागिरी : उदय सामंत,

धुळे : जयकुमार रावल,

जालना : श्रीमती पंकजा मुंडे,

नांदेड : अतुल सावे, 

चंद्रपूर : डॉ.अशोक उईके,

सातारा : शंभूराज देसाई,

रायगड : कु.आदिती तटकरे,

लातूर : शिवेंद्रसिंह भोसले,

नंदुरबार : ॲड.माणिकराव कोकाटे,

सोलापूर : जयकुमार गोरे,

हिंगोली : नरहरी झिरवाळ,

भंडारा : संजय सावकारे,

छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाट,

धाराशिव : प्रताप सरनाईक,

बुलढाणा : मकरंद जाधव (पाटील),

सिंधुदुर्ग : नितेश राणे,

अकोला : आकाश फुंडकर,

गोंदिया : बाबासाहेब पाटील,

कोल्हापूर : प्रकाश आबिटकर तर सहपालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ,

वर्धा : डॉ.पंकज भोयर आणि 

परभणी : श्रीमती मेघना बोर्डीकर

000

Saturday, January 18, 2025

मंत्री आणि राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे #पालकमंत्री, #सहपालकमंत्री म्हणून नियुक्ती जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री. तर इतर मागास बहूजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे #नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री.







 वृत्त क्र.  73

राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेत मुले व मुलींच्या संघास सुवर्ण पदक प्राप्त  

नांदेड दि. १८ जानेवारी :- आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय बेसबॉल (19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन 14 ते 18 जानेवारी 2025 या कालावधीत पिपल्स कॉलेज नांदेड व सायन्स कॉलेज नांदेड येथे संपन्न झाले. 

या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मा. श्री. महेश वडदकर, निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन मा.श्री.जयकुमार टेंभरे (जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड) मा. श्री. राजेंद्र इखनकर (सचिव, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन), मा.श्री.संजय कुमार (सदस्य, एस.जी.एफ.आय.), श्री.ज्ञानेश काळे (सातारा) ,श्री. आनंदा कांबळे (नांदेड), तांत्रीक समिती सदस्य श्री. इंद्रजित नितनवार (अमरावती), श्री.शंकर शहाणे (परभणी), श्री.संतोष खेंडे (सोलापूर) आदी मान्यवर उपस्थित होते. 

समारोप कार्यक्रम प्रसंगी मा.महेश वडदकर म्हणाले की, शालेय जिवनात खेळ हा अतिशय महत्वाचा घटक असुन खेळाडूंनी शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही उल्लेखणीय कार्य करुन करीयर घडवावे व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवावी असे सांगीतले. 

या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत संपुर्ण भारतातून 15 मुले , 14 मुली असे एकण 29 मुला-मुलींच्या संघानी सहभाग घेतला असून यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या संघाचे वर्चस्व राहीले आहे. स्पर्धेचा अंतिम निकाल 19 वर्षे मुले-  प्रथम- महाराष्ट्र, द्वितीय- छत्तीसगड व तृतिय- दिल्ली तर 19 वर्षे मुली मध्ये प्रथम- महाराष्ट्र,  द्वितीय- छत्तीसगड व तृतिय- पंजाब या संघाने प्राविण्य प्राप्त केले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या विजयी संघात 19 वर्षे मुले- शुभम धोत्रे (पुणे), श्रीवर्धन बनसोडे (परभणी), निखील माने (पुणे), शिवराज शिंदे (पुणे), अदित्य गवळी (जळगांव), प्रज्वल पाटील (कोल्हापूर), दक्ष रामटेके (यवतमाळ), सार्थक गावडे (मुंबई), तौफिक शाहू (अमरावती), रणवीर जाधव (पुणे), युवराज मांडकर, विशाल जारवाल (छ.सं.नगर), सक्षम पवार (सातारा), अदित्य चव्हाण (नांदेड), संस्कार संकपाळ (सांगली), उदय रेटवडे (पुणे) तर 19 वर्षे मुलीच्या संघात – दुर्वा भोंगळे (पुणे), रत्नमाला चौर (बीड), संस्कृती कुंभार (सांगली), अक्षदा महाजन (जळगांव), पंकजा चौर (बीड), सानिका नलवडे (पुणे), मानसी पाटील (जळगांव), स्मृती सांगळे (पुणे), रोहीणी नवटक्के (लातूर), अनिशा देवकर (पुणे), अमृता शिंदे (जालना), अनुष्का पुल्लरवार (नागपूर), श्रृध्दा गावडे (पुणे), श्रध्दा कांबळे (पुणे), तन्वी फलफले (पुणे), राणी जाधव (नांदेड) या खेळाडूंचा समावेश होता.

या स्पर्धेकरीता पंच म्हणुन श्री.गणेश बेतुडे (छ.संभाजीनगर),आकाश साबणे (परभणी), मनिष मोकल (मुंबई शहर), राहुल खुडे (लातूर), श्री.विशाल कदम (हिंगोली), रोहित ठाकोर (पुणे), पवन सैरासे (अमरावती), प्रफुल वानखेडे (बुलढाणा), गौस शेख (नांदेड), हरिश डोनगांवकर (नांदेड), बालाजी गाडेकर (नांदेड), सायमा बागवान (परभणी), अर्चना कोलोड (नांदेड) आदीनी काम पाहीले.

सदर स्पर्धा यशस्वी करणेसाठी मा.जयकुमर टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, श्री.राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी) श्री. विपुल दापके (क्रीडा अधिकारी), वरिष्ठ लिपीक श्री.संतोष कनकावार, कनिष्ठ लिपीक श्री दत्तकुमार धुतडे, श्री. संजय चव्हाण, श्री. आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, वैभव दोमकोंडवार, ज्ञानेश्वर सोनसळे मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे व बेसबॉल असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदिनी सहकार्य केले आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जयकुमार टेंभरे यांनी कळविले आहे.

0000





 वृत्त क्र.  72

समाज कल्याण विभागाच्या क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न 

नांदेड दि. 18 जानेवारी : समाज कल्याण विभागाचा विभागीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे नुकताच 17 व 18 जानेवारी रोजी समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या विभागीय क्रीडा स्पर्धेत विभागातील धाराशिव, हिंगोली, लातूर व नांदेड येथील समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संघाचे खेळाडू सहभागी झाले होते. 

विभागातील 4 जिल्ह्यातील खेळांडुसाठी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी, धावण्याची स्पर्धा व इनडोर स्पर्धामध्ये बॅडमिंटन, टेबलटेनिस, बुद्धिबळ या स्पर्धेचा समावेश होता. या विभागीय स्पर्धा सहायक आयुक्त शिवानंद निमगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या.

0000



  वृत्त क्र.  71

समाज कल्याण विभागाचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न  

नांदेड दि. 18 जानेवारी : लातूर विभागातील अनु.जातीच्या मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थींनींचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवार 17 रोजी सायं. आयोजित करण्यात आला होता. व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, सायबर क्राईम, आदिवासी, बंजारा नृत्य असे विविध नाट्य, नाट्यस्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेतील सर्व विजेत्या शाळांना समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे होते तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशार सिंग साबळे यांची प्रमुख उपस्थितीत भारत सांस्कृतिक संघ राष्ट्रीय कार्य सदस्य डॉ. सान्वी जेठवानी यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.  

या सांस्कृतिक कार्यक्रमात नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशीव या जिल्ह्यातील शासकीय अनु.जाती निवासी शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत घेण्यात आलेल्या मुलीच्या गटात कळमनुरी शासकीय निवासी शाळेला बंजारा नृत्य या लोकनाट्य नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला तर द्वितीय क्रमांक शिक्षणाचे महत्त्व नृत्य  या विषयावर शासकीय निवासी शाळा हदगाव यांना दुसरा क्रमांक मिळाला. 

तर मुलाच्या गटात धाराशीव जिल्ह्यातील घोडेगाव येथील शासकीय निवासी शाळेने मुला-मुलीचे एक समान नृत्यमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. औसा तालुक्यातील लांबचाना शासकीय निवासी शाळेचा झाडे लावा या लोकनृत्य दुसरा क्रमांक आला. लातूर जिल्ह्यातील बावची रेणापूर येथील शासकीय निवासी शाळेने अभिनय स्पर्धेत व्यसनमुक्ती अभियानात प्रथम क्रमांक पटकावला. याच अभिनय स्पर्धेत मुलींमध्ये धाराशिव जिल्ह्यातील मुरूम शासकीय निवासी शाळेला इंटरनेटच्या सुरक्षिततेचा वापर या अभिनयास प्रथम क्रमांक मिळाला. सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.

0000



वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...