Friday, April 5, 2024

वृत्‍त क्रमांक 311

अनुपस्थित मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण

·   पुन्हा दांडी मारली तर सक्त कारवाई करणार

नांदेड दि. 5 :- निवडणूक काळात अनुपस्थितीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नव्याने ट्रेनिंग घेण्यात आले असून पुन्हा कोणी दांडी मारू नये प्रशिक्षणाला उपस्थित रहावे असा इशारा प्रशासनाने दिला आहे . 16 नांदेड लोकसभा मतदार संघातर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे पहिले प्रशिक्षण 29 मार्च रोजी झाले होते. त्या प्रशिक्षणास 141 मतदार अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित होते. अशाना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या होत्या. अनुपस्थितीचे योग्य कारणे देत मतदान कर्तव्यावर उपस्थित राहण्याचे लेखी उत्तर दिल्यामुळे नांदेड दक्षिण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार उमाजी बोथीकर व प्रशिक्षण प्रमुख तथा नायब तहसीलदार निवडणूक शाखा नितेशकुमार बोलेलू यांनी अनुपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आज तहसील कार्यालयातील मिटींग हॉल मध्ये एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते.

या प्रशिक्षणास मतदान अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संगरत्न सोनसळे, कार्यकारी अभियंता मनपा व एस.व्ही.भालके यांनी पिपिटीच्या माध्यमातून संपूर्ण मतदान प्रक्रिया समजून सांगितली. मतदान साहित्य हस्तगत करुन तपासणी करणे, मतदान केंद्रावर नेमून दिलेल्या वाहनातूनच जाणे,प्रत्यक्ष मतदान दिवसाच्या एक दिवसापूर्वी मतदान केंद्र उभारणी करणे, त्याची दक्षता कोणती, मतदान यंत्र व व्हिव्हिपँटची जोडणी, विविध लिफाफे, विविध अर्ज कसे भरणे, मतदान यंत्र सिलींग प्रक्रिया या बाबीतून हे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्रशिक्षकांच्या समस्येवर शंका समाधान करण्यात आले. यानंतर प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे सुयोग्य प्रात्यक्षिक देण्यात आले. विविध शंकांचे समाधान करण्यात आले. या प्रशिक्षण सत्राचे सूत्रसंचालन संजय भालके यांनी केले. प्रशिक्षिण यशस्वी करण्यासाठी राजेश कुलकर्णी, राजकुमार कोटुरवार, विजय चोथवे, मकरंद भालेराव, चंद्रकला यमलवाड, साधना देशपांडे, एस.व्ही.शिंदे, डि.बी.कदम, प्रतिभा मारतळेकर, रवी दोन्तेवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार - विकास माने

 16 नांदेड लोकसभा मतदारसंघातंर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे पहिले प्रशिक्षण 29 मार्च रोजी झाले. त्या प्रशिक्षणास 141 मतदार अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित होते. अनुपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या आहेत. अशा अनुपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आज 5 एप्रिल रोजी तहसील कार्यालयात एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते. परंतु निवडणूक कार्य करण्याची संधी देवूनही पुन्हा 38 कर्मचारी या प्रशिक्षणात गैरहजर आढळून आले. अशा अनुपस्थित मतदान अधिकारी कर्मचारी यांचेवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी विकास माने यांनी संबंधित विभागास दिले.

 0000

 वृत्‍त क्रमांक  310

 

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन,

पोलीस सर्वांनी मिळून एकत्रित काम करा : शशांक मिश्र

 

पोलीस निवडणूक निरीक्षक जयंती आर. यांनीही घेतला जिल्ह्याचा आढावा

 

नांदेड दि ५ एप्रिल : १६-नांदेड लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या कार्यासाठी आता सज्ज झाला आहे. तुम्ही सर्वांनी उत्तम तयारी केली आहे. पुढील काही दिवस डोळ्यात तेल घालून प्रशासन व पोलीस यांनी एकत्रित समन्वय आणि काम करा, असे आवाहन सर्वसामान्य निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी आज येथे केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज सर्वसाधारण निरीक्षक शशांक मिश्र, पोलीस निवडणूक निरीक्षक जयंती आर या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने, सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह निवडणूक यंत्रणेतील सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्याच्या निवडणूक तयारीचे सादरीकरण यावेळी केले. याशिवाय सीईओ मीनल करनवाल, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह विभाग प्रमुखांनी सादरीकरण केले.

 

जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था परिस्थिती कठोरपणे हाताळा आणि कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचे त्यांनी निर्देश दिले. यासाठी पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाने निवडणूक काळात संवेदनशीलतेने समन्वय ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

पोलीस निवडणूक निरीक्षक जयंती आर. यांनी यावेळी स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षा व्यवस्थेपासून तपासणी पथकाच्या तत्परतेबाबत आढावा घेतला. सर्व वरिष्ठ अधिकारी निवडणुकीच्या काळात कार्यरत असून स्थानिक गुन्हे क्षेत्र व या ठिकाणीची वारंवारता याबद्दल उत्तम माहिती असणारे आहात. त्यामुळे उत्तम समन्वय ठेवण्याची सूचना त्यांनी केली.

 

निवडणूक निर्णय कक्ष, स्वीप, प्रशिक्षण व व्यवस्थापन, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, ईव्हीएम कक्ष, मतदान, मीडिया, माहिती व्यवस्थापन तक्रार निवारण कक्ष सीव्हीजील, वाहतूक व संपर्क व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, तसेच नांदेड जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्राच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना असलेल्या समस्यांबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.

000000










 वृत्‍त 309

छाननी नंतर नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी

66 उमेदवार पात्र तर 8 अपात्र

 

·         शनिवारी सायं 6.15 पर्यंत अर्ज परत घेता येणार

·         सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम मुदत 

नांदेड दि. 5 एप्रिल : 16-नांदेड लोकसभा निवडणुकीच्‍या छाननीमध्‍ये 66 उमेदवार पात्र ठरले आहेत. तर 8 उमेदवार अपात्र ठरले आहेत. 8 एप्रिलला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहेत. त्‍यामुळे 8 एप्रिल नंतर 16-नांदेड लोकसभा मतदारसंघामध्‍ये अंतिम उमेदवारी निश्चित होणार आहे. 

तत्‍पूर्वी आज जिल्‍हा‍ निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्वसाधारण निरीक्षक शशांक मिश्र यांच्‍यासह प्रशासनातील वरिष्‍ठ अधिका-यांसोबत नियोजन भवनामध्‍ये झालेल्‍या बैठकीत अर्ज रद्द करतांना उमेदवार व त्‍यांच्‍या प्रतिनिधींशी संवाद साधला. कोणत्‍या कारणाने त्‍यांचे उमेदवारी अर्ज रद्द होत आहेत याबद्दलची माहिती दिली. चुकीचे प्रतिज्ञापत्र, सूचकांची संख्‍या, सुरक्षा रक्‍कम जमा न करणे आदी करणांवरून 9 अर्ज रद्द करण्‍यात आले. एका इच्‍छूक उमेदवाराचे दोन अर्ज रद्द झाले. काल पर्यंत 92 अर्ज दाखल झाले होते. 9 अर्ज आज रद्द करण्‍यात आले. 66 उमेदवारांनी हे अर्ज दाखल केले होते. काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले होते. 

अपात्र उमेदवार

अपात्र ठरलेल्‍या उमेदवारांमध्‍ये विष्‍णु मारूती जाधव, अलिमोद्दीन मोहियोद्दीन काझी सय्यद, माधवराव मुकिंदा गायकवाड, आनंदा धोंडिबा जाधव, सुरेश दिगांबर कांबळे, दिगांबर धोंडिबा वाघमारे, आनंदा पुंडलिकराव वाघमारे, सोपान नवेल पाटील यांचा समावेश आहे.

पात्र उमेदवार

चिखलीकर प्रतापराव गोविंदराव (भाजप), पांडुरंग रामा अडगुळवार (बहुजन समाज पार्टी), वसंतराव बळवंतराव चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस), अब्दुल रहीम अहमद (देश जनहित पार्टी), अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी), कौसर सुलताना (इंडियन नॅशनल लीग), राहुल सुर्यकांत एंगडे (बहुजन मुक्ती पार्टी), रुक्मिणीबाई शंकरराव गीते (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष), शेख मोईन शेख रशीद (ऑल इंडिया मजलिस ए इन्कलाब ए मिल्लत), सय्यद तनवीर (बहुजन महा पार्टी), सुशीला निळकंठराव पवार (समनक जनता पार्टी), हरी पिराजी बोयाळे (बहुजन भारत पार्टी) यांचा समावेश आहे.   

तर अपक्षांमध्‍ये अकबर अख्‍तर खॉन, अक्रम रहेमान सय्यद, अनवर अ. कादर अहमद कादर शेख, अमजत खॉ सखर खॉन, अरुण भागाजी साबळे, अश्फाक अहमद, असलम इब्राहिम शेख, शेख इमरान शेख पाशा, इरफान फारूक सईद, मोहम्मद इलियाज अब्दुल वहिद मोहम्मद, कदम सुरज देवेंद्र, कल्पना संजय गायकवाड, खान अलायार युसुफ खान, अहमद खालिद अहमद रफीक, गजानन दत्तारामजी धुमाळ, जगदीश लक्ष्मण पोतरे, जफर अली खाँ मेहमूद अली खाँ पठाण, जुल्फेखान जिलानी सय्यद, तबस्सुम बेगम, तुकाराम गणपत बिराजदार, थोरात रवींद्र गणपतराव, देविदास गोविंदराव इंगळे, नय्यर जहाँ मोहम्मद फेरोज हुसेन, नागेश संभाजी गायकवाड, नागोराव दिगंबर वाघमारे, निखिल लक्ष्मणराव गर्जे, प्रमोद किसनराव कामठेकर, फहाद सलीम शेख सलीम शेख, भास्कर चंपतराव डोईफोडे, मजिद अ अकबर, मोहम्मद तौफिक मोहम्मद युसुफ, मोहम्मद मुबीन शेख पाशा, मोहम्मद सलीम मोहम्मद इकबाल, महारुद्र केशव पोपळाईतकर, अॅड. मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील, मोहम्मद नदीम मोहम्मद इक्बाल, मोहम्‍मद वसीम, मोहम्मद सिद्दीकी शेख संदलजी, युनिस खान, युनिस खाँ युसुफ खाँ, रमेश दौलती माने, राठोड सुरेश गोपीनाथ, लतीफ उल जाफर कुरेशी, लक्ष्मण नागोराव पाटील, अॅड. विजयसिंह चौव्‍हाण, विनयमाला गजानन गायकवाड, वैशाली मारोतराव हुके पाटील, शिवाजी दत्तात्रय गायकवाड,साहेबराव नागोराव गुंडीले, साहेबराव भिवा गजभारे,ज्ञानेश्वर बाबुराव कोंडामंगले  ज्ञानेश्वर रावसाहेब कपाटे, शाहरुख खमर, मोहनराव आनंदराव वाघमारे यांचा समावेश आहे. 

शनिवारीही अर्ज परत घेता येईल

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज परत घेण्‍याची मुदत 8 एप्रिल आहे. मात्र उद्या शनिवार दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र परत घेता येणार आहेत. सोमवारी सकाळी 9.45 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. रविवारी मात्र सुट्टीचा दिवस आहे. त्‍यामुळे पुढील दोन दिवसात उमेदवारांना आपले नामनिर्देशनपत्र परत घेता येणार असल्‍याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी दिली आहे.

*****






Thursday, April 4, 2024

 वृत्त क्र. 308

पेड न्यूजवर लक्ष ठेवा ; 

सारख्या बातम्या आल्यास उमेदवारांच्या खर्चाच्या खात्यात टाका 

सर्वसाधारण व खर्च निरीक्षकांकडून माध्यम कक्षाचा आढावा

नांदेड दि.  ४  : एकदा उमेदवार निश्चित झाले की त्यांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत पेड न्यूज म्हणून जे काही आले असेल तर तो खर्च म्हणून दाखल करता येईल. त्यामुळे सारख्या बातम्या आणि बातम्यांच्या आडून प्रसिद्धी सुरू असेल तर पेड न्यूज म्हणून हा खर्च पकडण्यात यावा, असे निर्देश खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी दिले. तर सर्वसामान्य निरीक्षक  वरिष्ठ सनदी अधिकारी शशांक मिश्र  यांनी भेट देऊन सोशल मीडियावरील मॉनिटरिंग सक्त करण्याचे निर्देश दिले.

राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण, प्रिंट माध्यमात येणाऱ्या जाहिराती व मजकूर या माध्यमातून पेड न्यूज तर जात नाही याची देखरेख करण्याकरिता,जाहिराती व पेड न्यूजचा खर्चाचा अहवाल एक्सपेंडिचर ( खर्च ) विभागाला देण्याकरीता माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण  समितीचे (एमसीएमसी )असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश दोन्ही निरीक्षकांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये कॅबीनेट हॉलपुढे सर्व सुविधांनी युक्त अशा एमसीएमसी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एमसीएमसी समितीचे अध्यक्ष आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्राची रोज सकाळी तपासणी करण्यात येते. तसेच स्थानिक केबल नेटवर्कवर येणाऱ्या बातम्या, अन्यवाहिन्यांवर येणाऱ्या बातम्या व जिल्ह्यातील नागरिकांच्या व संघटनांच्या सोशल मीडिया अकाउंटची तपासणी केली जाते. उभयनिरीक्षकांनी पुन्हा एकदा प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स, सोशल मिडियात आतापर्यंत झालेल्या मॉनिटरींगची पहाणी केली.

यावेळी त्यांचे स्वागत माध्यम केंद्राचे प्रमुख जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षाचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले. यावेळी एमसीएमसी समिती सदस्य व माध्यम कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.

राजकीय पक्षांनी परवानगी घ्यावी    

राजकीय पक्ष व उमेदवारांनी दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल नेटवर्क,केबल वृत्तवाहिन्या, सिनेमा हॉल,रेडिओ,सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स,सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती,ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती,बल्क एसएमएस,रेकॉर्ड केलेले व्हॉईस मेसेजेस,सोशल मीडिया,इंटरनेट संकेतस्थळे यावर दर्शविण्याच्या सर्व जाहिरातीची परवानगी घेणे आवश्यक आहे.

वृत्तपत्र जाहिरातीसाठी शेवटचे दोन दिवस

तसेच मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या एक दिवस अगोदर वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचे माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एम.सी.एम.सी.) पूर्व प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. अन्‍य दिवशी आचारसंहितेचे पालन करून जाहिराती देता येणार आहे. अनोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा इतर व्यक्तींनी किमान सात दिवसापूर्वी समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे.माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती अर्थात एम.सी.एम.सी समिती ही अर्ज प्राप्त झाल्यानंतर तो अर्ज ४८ तासात निकाली काढेल.समितीने जाहिरातीत बदल सुचविल्यानंतर त्यानुसार दुरुस्त्या करून नवीन निर्मित केलेली जाहिरात प्रमाणीकरणासाठी सादर करणे आवश्यक आहे

जाहिरात बातमीमध्ये काय नको

आदर्श आचारसंहितेनुसार दिलेल्या निर्देशाचे जाहिरातीमध्ये पालन होणे आवश्यक आहे.या प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोहोचविणाऱ्या बाबी,धार्मिक भावना दुखावणे, भारतीय घटनेचा अवमान करणे,गुन्हा दाखल करण्यास प्रवृत्त करणे,कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणे, गुन्हेगारीचे उदात्तीकरण,महिलांचे चुकीचे चित्रण,तंबाखूजन्य किंवा नशा आणणाऱ्या पदार्थाच्या जाहिराती, हुंडा,बालविवाह यांना उत्तेजन देणाऱ्या जाहिराती प्रसारित करण्यास प्रतिबंध आहे.इतर देशावर टिका नसावी.न्यायालयाचा अवमान जाहिरातीतून होता कामा नये. राष्ट्रपती व न्याय संस्था यांच्याबाबत साशंकता नसावी.राष्ट्रीय एकात्मतेला, सौहार्दतेला आणि एकतेला बाधा पोहचविणारा मजकूर त्यामध्ये नसावा.सुरक्षा दलातील कोणतेही सैनिक,व्यक्ती,अधिकारी यांची अथवा सैन्य दलाचे छायाचित्र जाहिरातीत नसावे.कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी, वैयक्तिक जीवनातील घटनांना धरुन त्यावर भाष्य नसावे.

पेड न्यूज सारखे वृत्त नको

निवडणुकीच्या काळात अनेक वेळा सारख्या हेडींगच्या बातम्या उमटतात. जाहिरातींच्या मोबदल्यात ही प्रेस नोट पेड न्यूज म्हणून तर छापली जात नाही ना याकडे लक्ष देण्यात येत आहे. याचा सर्व खर्च उमेदवाराच्या खर्चामध्ये जाणार असल्यामुळे उमेदवाराचा खर्चाचा बजेट बिघडू शकतो. या निवडणुकीमध्ये उमेदवारांना 95 लक्ष रुपये खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वृत्तपत्रात प्रचार सभा व अन्य बाबींच्या सारख्या बातम्या येणार नाही याबाबत राजकीय पक्ष तसेच वृत्तपत्रांनी दक्ष रहावे अशी सूचनाही यावेळी करण्यात आली. निवडणुकीबाबतचे सर्व वृत्त संपादकीय संस्कारातून जावेत अशी अपेक्षा आयोगाने केली आहे. तसेच या वृत्तांतून आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

***

 वृत्त क्र. 307

शेवटच्या दिवशी ७२ अर्ज दाखल

नांदेडमध्ये एकूण ९२ अर्ज दाखल

नांदेड दि. ४ एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी ७२ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ९२ अर्ज दाखल झाले असल्याची जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी माहिती दिली आहे.

अर्जाची छाननी ५ एप्रिलला होईल. दुपारी 11 वाजेनंतर छाननीच्‍या कामास सुरूवात होणार आहे. त्‍यामुळे उद्या दुपारपर्यंत ९२ अर्जापैकी किती अर्ज रद्य झाले हे कळेल. उमेदवारांना अर्ज ८ एप्रिल पर्यंत मागे घेता येईल. ८ तारखेला अंतिम उमेदवार निश्चित होईल.

००००

 वृत्त क्र. 306

नामनिर्देशन कक्षाकडून उमेदवारांना मदत

नांदेड दि. ४ : नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी दाखल झाले. अर्ज दाखल करताना उमेदवारांना प्रतिनिधींना मोठ्या प्रमाणात विविध बाबींच्या माहितीची गरज असते. नामानिर्देशन कक्षाकडून उमेदवारांना मोठया प्रमाणात मदत झाली. सहाय्यक निवडणूक अधिकारी विकास माने यांच्या नेतृत्वात हा कक्ष कार्यरत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नामनिर्देशन सहाय्यता कक्षामध्ये शेवटच्या दिवशी 72 उमेदवारांना सहायता करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून हा कक्ष सुरू करण्यात आला होता. या कक्षाच्या माध्यमातून सर्व उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना विशेष सहाय्य केले गेले.
0000


Wednesday, April 3, 2024

  वृत्त क्र. 305 

पोलीस निवडणूक निरीक्षक जयंती आर. नांदेडमध्ये दाखल

नांदेड दि. 3 एप्रिल : 16-नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या पोलीस निवडणूक निरीक्षक श्रीमती जयंती आर. यांचे आज नांदेड येथे आगमन झाले. 

पोलीस निवडणूक निरीक्षक (पोलीस ऑब्झर्वर) श्रीमती जयंती आर. (भा.पो.से.) पोलीस विभागाकडून आलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. त्या तामीळनाडू कॅडरच्या २०१० च्या आयपीएस अधिकारी आहेत. तामीळनाडू येथे त्या पोलीस उप- महानिरिक्षक आहेत. शासकीय विश्रामगृहावर निवडणूक काळामध्ये त्या थांबणार आहेत. त्यांचा दूरध्वनी क्रमांक ९४९८११११५५ असून नागरिकांना लोकसभा निवडणुकी संदर्भात असणाऱ्या समस्यांबाबत त्यांच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो.

00000

वृत्त   केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी छत्रपती संभाजीनगर, दि.९(जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या क...