Tuesday, December 6, 2022

 समता पर्वा निमित्त विद्यार्थ्यांना डिजीटल जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण

नांदेड (जिमाका) दि. 6 :- समता पर्व सप्ताहनिमित्त लोहा येथील श्री संत गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोहा व कंधार तालुक्यातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात विद्यार्थ्यांना जात पडताळणीबाबत मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पुणे यांच्या विद्यमाने समता पर्व निमित्त आयोजित मार्गदर्शन शिबिरात जात पडताळणी समितीचे सहाय्यक संशोधन अधिकारी वैजनाथ मुंडे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी कोणकोणते कागदपत्र सादर करावेत, ऑनलाइन अर्ज कसा भरावा याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. इयत्ता 11 वी 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाची तयारी म्हणून जात प्रमाणपत्र प्राप्त करून त्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी प्रस्ताव महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या "समान संधी केंद्रात" दाखल करावेत असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

मंडणगड पॅटर्ननुसार सर्व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना गोंधळून न जाता, व्यवस्थित व अचूक माहिती भरावी. जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रीया सोपी आहे. सर्वांना जात वैधता कमीत कमी वेळेत देण्याचा नांदेड समितीचा प्रयत्न आहे. एकही मागास प्रवर्गातील विद्यार्थी प्रमाणपत्रापासून वंचित राहणार नाही. त्यासाठी 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी 31 जानेवारीपर्यंत आपले परिपूर्ण प्रस्ताव "समान संधी केंद्रात" सादर करावेत असे आवाहन सहाय्यक संशोधन अधिकारी वैजनाथ मुंडे यांनी केले.  

समिती मार्फत अर्जदारांना ऑनलाइन पद्धतीने जात वैधता प्रमाणपत्र त्यांनी ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या ईमेल आयडी वर पाठवले जातील. ऑनलाइन प्राप्त झालेले वैधता प्रमाणपत्र संगणकावरून Adobe Reader DC या प्रणालीमध्ये ओपन करावे. त्यामुळे डिजिटल स्वाक्षरीची पडताळणी होईल. अर्जदारांना ऑनलाइन जात प्रमाणपत्र पडताळणी प्रणाली बाबत काही शंका असतील तर मुक्त शुल्क क्रमांक 18001208040 किंवा ईमेल cvcnanded@gmail.com  वर संपर्क साधावा, असेही कळविले आहे. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी मोरे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. सूर्यवंशी यांनी केले. यावेळी आनंदा कदम,  सूर्यकांत केंद्रे , एस. एम. मुंडकर , आर. जी. चौकले, के. आर. वरपडे, एस. ए. मलशेट्टे, एन. एम. हिपर्गेकर, पी.पी. विभुते यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचाऱ्याची उपस्थित होती.

0000




Monday, December 5, 2022

 राज्य सेवा हक्क आयोगामार्फत औरंगाबाद विभागातील

अधिसूचित सेवेच्या 20 लाख 58 अर्जाचा निपटारा

 

आयोगाचे आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी घेतला

विविध विभागांचा वेळोवेळी आढावा 

नांदेड (जिमाका) दि. 5 :- जनतेला विहित मुदतीत सेवा देण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत औरंगाबाद विभागात मागील वर्षात एकूण 26 लाख 92 हजार 779 तुलनेत यावर्षी यावर्षी नोव्हेंबर 2022 अखेर 23 लाख 76 हजार  681 प्राप्त अर्जांपैकी 20 लाख 58 हजार 165 लोक सेवा हक्क अर्जांचा निपटारा करण्यात आला. राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी औरंगाबाद विभागातील जिल्हाधिकारी औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष वेळोवेळी जाऊन सर्व विभाग प्रमुखांच्या बैठका त्यांनी घेतला. या बैठकीत राज्य सेवाहक्क आयोगाचे ब्रिदवाक्य “आपली सेवा, आमचे कर्तव्य” याची जाणीव त्यांनी करुन दिली. 

शासनाने विकसित केलेले आरटीएस महाराष्ट्र (RTS MAHARASHTRA) हे मोबाईल ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण दिले. आपले सरकार या पोर्टलवर सेवा मागणी करण्याबाबत जनतेत जनजागृती करण्याबाबत नियंत्रण अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले. राज्यामध्ये नागरिकांना सेवेचा हक्क देणारा कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा आहे. नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार या कायद्यान्वये प्राप्त झाला आहे. या कायद्यांचे काटेकोर अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करुन सर्व महसूली विभागामध्ये डिसेंबर 2021 मध्ये राज्य सेवा हक्क आयुक्तांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 

आयोगाच्या घोषवाक्यानुसार सरंजामशाही कार्य संस्कृतीच्या मानसिकतेत बदल करुन पात्र अर्जदारांना केंद्रबिंदू मानून आपले ग्राहक मानून त्यांची कमी गैरसोय होईल, याची दक्षता घेत त्यांना नियत कालावधीमध्ये सेवा देण्यात यावी. पात्र नागरीकांना वारंवार सेवेसाठी शासकीय कार्यालयालयात येण्याची आवश्यकता गरज भासू देवू नये. त्यांच्या मोबाईलवर सर्व अधिसूचित मागणी सेवा पुरविण्यात याव्यात. सेवेसाठी पात्र नसतील तर तसे कोणत्या क्षेत्रात पात्र होतील त्याबद्दल समुपदेशन करणे हा सुध्दा त्यांच्या कर्तव्यपूर्तीचा भाग असल्याचे समजावून सांगीतले. 

विभाग प्रमुखांकडे प्रलंबीत असलेल्या सेवेचा आढावा घेऊन जिल्हयात चालू असलेल्या सेतू सुविधा / आपले सरकार सेवा केंद्राची पाहणी करुन जनतेला सेवा देण्यात येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. अधिसूचित केलेल्या सेवा वेळेत मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. लोकसेवा अधिनियम 2015 नियम 2016 ची पुन:श्च सर्व अधिकाऱ्यांकडून उजळणी करुन घेण्यात आली. 

महसूल विभागात औरंगाबाद, सिल्लोड, वैजापूर, पैठण, कन्नड, अंबाजोगाई, बीड आदी ठिकाणी उपविभागीय , तहसील कार्यालयास भेटी देवून तपासणी करण्यात आली. उपमहासंचालक मुद्रांक, अधिक्षक भूमि अभिलेख तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, यांच्या बैठका घेवून नियतकालावधीमध्ये सेवा पुरविण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत प्रबोधन केले. 

औरंगाबाद विभागातील ग्रामीण भागात 6 हजार 500 पेक्षा पद निर्देशित असलेला विभाग म्हणजे ग्रामविकास व पंचायतराज विभाग आहे. या विभागाकडे विशेष लक्ष देवून महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिनियम 2015 बाबत पंचायत ग्रामपातळीवरील पद निर्देशित अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. मुख्य सचिव दर्जाचे आयुक्त यांनी जनतेला सेवा मिळवून देण्यासाठी कमतरता जाणवू नये म्हणून औरंगाबाद विभागातील खुलताबाद, फुलंब्री, औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, कन्नड, पैठण, बीड, बदनापूर, सोयगाव, अंबाजोगाई अशा एकूण 12 पंचायत समितीमध्ये 1 हजार 300 ग्रामसेवक तथा पदनिर्देशित अधिकारी यांचे प्रशिक्षण स्वत: पूर्ण केले. 

सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांनी आपले सरकार पोर्टल व आटीएस महाराष्ट्रा RTS MAHARASHTRA मोबाईल ॲप डाऊनलोड करून ॲप वापरण्याबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले. प्रत्यक्ष संवाद साधुन जनतेला अधिसूचित सेवा पुरविण्यासाठी संवेदनशीलता वाढविली. लोक सेवा हक्क अधिनियम 2015 मधून लहान लहान तरतूदी समजावून आपली सेवा, आमचे कर्तव्य या ब्रिद वाक्या नुसार अधिसूचित सेवा पुरविणे हे कर्तव्य आहे याची जाणीव करुन दिली. पंचायत समिती स्तरावर प्रथम व द्वितीय अपील अधिकारी गटविकास अधिकारी यांच्याशी बैठकीत प्रत्यक्ष चर्चा करुन गेल्या सात वर्षापासून प्रलंबीत असलेले 3 हजार 652 पैकी 3 हजार 386 अपील निकाली काढून जनतेला सेवा देण्यात आल्या. मुख्य सचिव दर्जाचे असणारे राज्य सेवा हक्क आयोग औरंगाबाद विभागाचे आयुक्त डॉ. किरण जाधव (सेवानिवृत्त भा.पो.से) हे सर्व/ पद निर्देशित अधिकारी, प्रथम व व्दितीय अधिकारी, नियंत्रण अधिकारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या, अशी माहिती राज्य सेवा हक्क आयोगाचे सचिव दा. अं. वानखेडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.   

00000






Saturday, December 3, 2022

 समता पर्व अंतर्गत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग,

तृतीयपंथीयांसाठी कार्यशाळा संपन्न

 

नांदेड, दि. 3  :-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 26 नोव्हेंबर संविधान दिन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन  6 डिसेंबर 2022 हा कालावधी सामाजिक समता पर्व म्हणून साजरा केला जात आहे. त्याअनुषंगाने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी यांच्यासाठी विविध योजनेबाबत माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात आज करण्यात आले होते.   या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघ उत्तर मराठवाडाचे अध्यक्ष अशोक तेरकर हे होते. ज्येष्ठ नागरिक संघ उत्तर मराठवाडाचे सचिव जयवंत सोमवाड, तृतीयपंथी गुरु गौरी बकस, दिव्यांग उद्धव त्र्यंबकराव शेळके, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, समाजकल्याण निरिक्षक श्रीमती माधवी राठोड, समतादूत प्रकल्पाचे प्रकल्पधिकारी सुजाता पोहरे यांची उपस्थिती होती.  

 

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी यांना सार्वजनिक ठिकाणी तसेच घरामध्ये आदरयुक्त वागणुक दिली पाहिजे. सामुहिक ठिकाणी त्यांचा आदर केला पाहिजे. शासनाच्या विविध योजनेचा त्यांनी लाभ घ्यावा व स्वत:चे जीवनमान समृद्ध करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. विविध योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन याप्रसंगी करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांना कार्यालयात स्वतंत्र हॉल, हेल्पलाईन नंबरची सुविधा देण्यात आली आहे. बसमध्ये सर्व नागरिकांनी आपले प्रामाणिक कर्तव्य म्हणुन त्यांना बसण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. तृतीयपंथी  यांना समाजामध्ये संविधानातंर्गत मानाचा व समानतेचा हक्क म्हणुन त्यांना त्यांचे ओळखपत्र तसेच आधारकार्ड देण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकांने त्यांना समान वागणुक द्यावी, असे आवाहन समाज कल्याण अधिकारी बापु दासरी यांनी केले. तृतियंपथी यांच्या कार्यशाळेत 16  तृतीयंपथीयांना ओळखपत्र देण्यात आले.

 

प्रास्ताविक तालूका समन्वयक श्रीमती अंजली नरवाडे यांनी केले तर सूत्रसंचालन गजानन पांपटवार यांनी केले. शेवटी आभार सहाय्यक ग्रंथपाल श्रीमती ममता गंगातीर यांनी केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजकल्याण निरिक्षक श्रीमती माधवी राठोड, आर. डी. सुर्यवंशी, खानसोळे, नागुलवार, दवणे, गायकवाड, राठोड, ममता गंगातीर, पेंडकर, इंगेवाड अंजली नरवाडे यांनी परिश्रम घेतले.

0000





Friday, December 2, 2022

 धर्माबाद येथे 17 तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई 

नांदेड (जिमाका) दि. 2 :-  धर्माबाद शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003  कायद्याचे उल्लंघन होत असल्याची  माहिती मिळताच जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने धर्माबाद शहरात अचानक धाड टाकून 17 तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई केली. या कार्यवाहीत तंबाखू विक्रेत्यांना 18 हजार 300 रुपयाचा दंड आकारला.  

ही कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे,  कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड तसेच ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथील वैद्यकीय अधीक्षक वेणुगोपाल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन आडे तसेच स्थानिक पोलीस  निरीक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.जयराम चुकेवाड व पी.सी. एस.आर.घोसले आदी होते. 

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000

 

 समता पर्व अंतर्गत 16 तालुक्यात

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 26 नोव्हेंबर ते      महापरिनिर्वाण दिन  6 डिसेंबर 2022 या कालावधीत समता पर्व साजरा करण्यात येत आहे. समता पर्व निमित्त आज समाज कल्याण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील 16 तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांना भेटी देवून समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. 

या भेटी दरम्यान तळागाळातील लोकांना समाज कल्याण विभागाच्या योजनाची माहिती होण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांना भेटून मिनी ट्रॅक्टर योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान  योजना, विशेष घटक योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, रमाई आवास घरकुल योजना, मुला-मुलीसाठी शासकीय वसतिगृह व निवासी शाळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे या योजनांची माहिती दिली. तसेच यावेळी समाज कल्याण विभागाच्या विविध योजनाबाबत  माहिती व घडीपत्रिका देवून प्रचार व प्रसिध्दी करण्यात आली. एल.ई.डी व्हॉनद्वारे प्रत्येक तालुक्यात योजनाची प्रचार व प्रसिध्दी करण्यात आली आहे.

00000






 जागतिक दिव्यांग दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन 

नांदेड, दि. 2 (जिमाका) :- जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नांदेड,  महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 3 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वा. यशवंतराव चव्हाण सभागृह येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, लॉयन्स क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष प्रेमकुमार फेरवानी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज, बालरोग तज्ञ डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

या परिसंवादामध्ये दिव्यांगांसाठी न्यायालयीन तरतुदी, दिव्यांगत्व निर्मुलनासाठी शिघ्र निदान व उपचाराचे महत्व या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त दिव्यांगांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे.

00000

Thursday, December 1, 2022

 वृत्त क्र. 1131

 समता पर्व निमित्त समाज कल्याण कार्यालयात

युवा गटाची कार्यशाळा संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 26 नोव्हेंबर ते महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 2022 हा कालावधीत समता पर्व म्हणून साजरा केला जात आहे. समता पर्व च्या निमित्ताने आज स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी उपलब्ध करुन देणे याबाबत समाज कल्याण कार्यालयात युवागटांची कार्यशाळा संपन्न झाली. 

यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक अनिल गचके, एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी शंकर पवार, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी व प्रकल्पधिकारी सुजाता पोहरे, समतादूत प्रकल्प आणि नांदेड जिल्हयातील अनु.जाती बचत गटाचे प्रतिनिधी व अनु. जातीचे उद्योजक बनु इच्छिणारे युवक युवती हजर होते. 

यावेळी स्टँड अप योजनेअंतर्गत अनु.जातीच्या नवउद्योजकांना विविध उद्योग सुरु करण्यासाठी प्रस्ताव कसे सादर करावेत. अचूक प्रस्ताव सादर करण्यासाठी नेमकी कोणकोणत्या बाबींची दक्षता घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने एमसी ईडीकडून सुमारे 32 योजना युवा उद्योजकांसाठी राबविल्या जातात असे एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी शंकर पवार यांनी विशद केले. अनिल गचके यांनी नवउद्योजकांनी फक्त सबसीडी हे उद्दिष्ठ न ठेवता कल्पक नवउद्योजकांनी त्यांच्या जीवनात यशस्वी होणाच्या उद्देशाने शासन योजनांचा लाभ घ्यावा व स्वत:चे जीवनमान समृध्द करावे असे आवाहन केले. 

प्रास्ताविकात समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांनी युवकांनी आपल्या जीवनाचे नेमके उद्दीष्ट आणि ध्येय निश्चित करावे. उद्योजक बनायचे असेल तर प्रामाणिकपणे चिकाटीने ध्येय पथावर वाटचाल करावी. तसेच युवकांनी आपले व्यक्तीमत्व प्रामाणिक व प्रयत्नवादी ठेवावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

स्टँडअप योजनेच्या ऑनलाईन प्रणालीतील जाचक अटी सोप्या करण्याची अपेक्षा श्रीमती सुजाता पोहरे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमांचे सूत्र संचालन गजानन पांपटवार तालुका समन्वयक तर आभारप्रदर्शन अधिक्षक राजेश सुरकूटलावार यांनी केले. या कार्यक्रमांस अनेक युवक / युवती बचतगटांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाज कल्याण निरीक्षक पी.जी.खानसोळे, वरिष्ठ लिपीक रविकुमार जाधव, कनिष्ठ लिपीक व्ही.एस. पकाने, डी.आर. दवणे, तालुका समन्वयक आर.एम शेख, सहाय्यक ग्रंथपाल एन.पी.मस्के यांनी परिश्रम घेतले.

0000



वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...