Friday, October 21, 2022

 निवृत्तीवेतन धारकांना पेन्शन मिळण्यासाठी

बँकेतील कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे आवश्यक

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- निवृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना निवृत्ती वेतन सुरू ठेवण्यासाठी ज्या बँकेत त्यांचे खाते आहे त्याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शाखा व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी किंवा अंगठा आपल्या नावासमोरच्या रकान्यात करणे अत्यावश्यक आहे. जिल्हा कोषागार कार्यालयाकडून बँकांना अद्याक्षर निहाय यादी पाठविण्यात आली असून ही स्वाक्षरी दिनांक 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत करावी, असे आवाहन कोषागार अधिकारी अभय चौधरी यांनी केले आहे.

 

याचबरोबर बायोमॅट्रीक्स पध्दतीने जीवन प्रमाण दाखल करण्याकरिता http://jeevanpramam.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 1 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत सादर  करण्याची सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सदरील यादीत जर कोणी स्वाक्षरी  किंवा अंगठा उमटवलेला नसेल अथवा ऑनलाईन जीवन प्रमाण दाखला सादर केलेला नसेल त्यांचे माहे डिसेंबर 2022 चे निवृत्तीवेतन अदा केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

00000

 दिवाळी सणानिमित्त नवीन वाहन नोंदणीसाठी

सुट्टीच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू राहणार

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- दिवाळी सणानिमित्त नवीन वाहनांची नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने नांदेड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय शनिवार 22 व रविवार 23 ऑक्टोंबर 2022 रोजी नवीन वाहन नोंदणी व कर वसुली कामकाजासाठी सुरु राहणार आहे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

0000  

 लेंडी प्रकल्पाला जलसंपदा विभागाकडून गती

 

·  3 गावातील 329 कुटुंबाच्या स्वेच्छा पुनर्वसनाबाबत शासन निर्णय

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील संयुक्त प्रकल्प असलेल्या लेंडी प्रकल्पाला जलसंपदा विभागाने गती दिली आहे. राज्यात भूमीसंपादन, पूनर्वसन व पूर्नस्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 लागू करण्यात आला. यातील नियम क्रमांक 108 नुसार स्वेच्छा पुनर्वसनाबाबत तरतूद करण्यात आली. त्यानुसार लेंडी प्रकल्पातील ईटग्याळ गावातील 165 कुटूंब, कोळनूर गावातील 30, वळंकी गावातील 134 अशा एकुण 329 कुटुंबासाठी सुमारे 16 कोटी 42 लाख रुपये आवश्यक अनुदान मंजूर करण्याचा शासनाने निर्णय निर्गमीत केला.

 

नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा सीमेवर असलेल्या देगलूर, मुखेड सह तेलंगणातील मदनूर भागातील शेतकऱ्यांना या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्यासह दोन पिकांची हमी मिळणार आहे. या प्रकल्पाचे 80 टक्के काम पुर्ण झाले असून घळभरणीचे काम प्रलंबित आहे. प्रकल्पाच्या संयुक्त कालव्याची कामे पूर्णत्वास आली आहेत. 14 दरवाजांपैकी फक्त 4 द्वार उभारणीचे काम बाकी आहे. सन 2021 पासून पुर्नवसनाबाबत प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या मागण्यांच्या पूर्ततेअभावी हे काम स्थगित होते. या प्रकल्पामुळे 26 हजार 914 हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ होणार असून यातील 15 हजार 710 हेक्टर क्षेत्र देगलूर व मुखेड तालुक्यातील असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बी. के. शेटे यांनी दिली.

00000     

 हवामानावर आधारित फळपीक विमा

योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :-  पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार रब्बी सन 2022-23 साठी राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये ही योजना मोसंबी, केळी व आंबा या अधिसूचित पिकाकरीता महसूल मंडळामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी लि. स्टॉक एक्चेंच टॉवर्स मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे.

 

अंबिया बहार रब्बी विमा हप्ता दर पुढील प्रमाणे आहे. मोसंबी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम (नियमित) 80 हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम 4 हजार 400 आहे. केळी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम (नियमित) 1 लाख 40 हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम 8 हजार 400 आहे. आंबा फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम (नियमित) 1 लाख 40 हजार रुपये, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम 23 हजार 100 आहे. ही योजना नांदेड जिल्ह्यात पुढील प्रमाणे अधिसुचित फळपिकांसाठी, अधिसुचित महसुल मंडळांना लागु राहिल. मोसंबी फळपिकासाठी पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर 2022 आहे. महसुल मंडळात अर्धापूर तालुक्यात मालेगाव, कंधार तालुक्यातील बारुळ, फुलवळ, कंधार. नांदेड तालुक्यातील लिंबगाव, विष्णुपुरी, नाळेश्वर. मुदखेड तालुक्यातील बारडचा समावेश आहे. विमा संरक्षण प्रकार अवेळी पाऊस, जास्त तापमाण, जास्त पाऊस, गारपीटचा समावेश आहे. विमा संरक्षण कालावधी 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर, 1 ते 31 मार्च, 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर, 1 जानेवारी ते 30 एप्रिल याप्रमाणे आहे.  

 

केळी फळपिकासाठी पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर 2022 आहे. महसुल मंडळात अर्धापूर तालुक्यात दाभड, मालेगाव. उमरी तालुक्यात उमरी. किनवट तालुक्यात इस्लापूर, शिवणी, किनवट, बोधडी. देगलूर तालुक्यात मरखेल, हानेगाव, नरंगल, शाहापूर. नांदेड तालुक्यात तरोडा बु. तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी, नांदेड (ग्रामीण), नाळेश्वर, वाजेगाव. नायगाव तालुक्यातील बरबडा, भोकर तालुक्यात भोकर. मुदखेड तालुक्यात मुदखेड, मुगट, बारड. लोहा तालुक्यातील शेवडी बा. कापसी बु. हदगाव तालुक्यात हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी या मंडळाचा समावेश आहे. विमा संरक्षण प्रकार कमी तापमाण, वेगाचा वारा, जादा तापमान, गारपीटचा समावेश आहे. विमा संरक्षण कालावधी 1 नोव्हेंबर ते  28 फेब्रुवारी, 1 मार्च ते 31 जुलै, 1 एप्रिल ते 31 मे, 1 जानेवारी ते 30 एप्रिल याप्रमाणे आहे.

 

आंबा फळपिकासाठी पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2022 आहे. महसुल मंडळात अर्धापूर तालुक्यात दाभड, मालेगाव. कंधार तालुक्यात बारुळ, फुलवळ, पेठवडज. नांदेड तालुक्यातील लिंबगाव, मुखेड तालुक्यात मुक्रमाबाद. हदगाव तालुक्यात निवघा, तळणी विमा संरक्षण प्रकार कमी तापमाण, वेगाचा वारा, जादा तापमान, गारपीटचा समावेश आहे. विमा संरक्षण कालावधी 1 जानेवारी ते 31, 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी, 1 मार्च ते 31 मार्च, 1 एप्रिल ते 31 मे, 1 फेब्रुवारी ते 31 मे याप्रमाणे  विमा संरक्षण कालावधी आहे.

 

या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणारा शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी सहभाग घेऊ शकतात. पिक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारासाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे. बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाईन फळपिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in  वर विमा हप्ता जमा करून सहभागी होता येते. यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा सात/बारा, आठ-अ उतारा व पिक लागवड, स्वयंघोषणापत्र, फळबागेचा केलेला फोटो, बँक पासबुक, वरील बँकखात्यामध्ये सविस्तर माहिती द्यावी लागेल. कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाईन भरता येईल.

 

या योजनेत शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकापूर्वी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, अधीक माहितीसाठी संबंधित विमा कंपनी किंवा कृषि विभागाचे कृषि सहाय्यक, पर्यवेक्षक, कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

00000

--

 मोजणी कामाच्या जलद निपटाऱ्यासाठी

भूमि अभिलेख कार्यालयास 22 लॅपटॉप

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :-   संचालक भूमि अभिलेख पुणे यांच्या पुढाकाराने जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयास 22 लॅपटॉप प्राप्त झाले आहेत. जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख श्रीमती एस.पी.सेठीया यांचे हस्ते प्राप्त 22 लॅपटॉपचे वितरण प्रातिनिधिक स्वरूपात नुकतेच करण्यात आले. जिल्ह्यातील नऊ अधिनस्त उप अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी, भूकरमापक व निमतानदार/परीरक्षण भूमापक यांना आता लॅपटॉप उपलब्ध झाल्याने कामाचा जलद गतीने निपटारा करता येणे शक्य झाले आहे.

 

ईटीएस व रोव्हर मशिनने केलेले मोजणी काम अचुक व जलद नोंदविला जाईल. कार्यालयात प्राप्त मोजणी प्रकरणात मोजणी करुन हद्दीखुणा देणेची कार्यवाही त्याच दिवशी करणे सोईचे होईल. याचबरोबर ड्रोनद्वारे गावठाण भुमापन केलेल्या गावांचे पुढील कामकाज करणे व इपीसीएसद्वारे नगर भुमापनकडील ऑनलाईन फेरफार घेणे याकामी याचा उपयोग होईल असे श्रीमती एस.पी.सेठीया यांनी सांगितले.

0000



Thursday, October 20, 2022

 बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ 

नांदेड, (जिमाका) दि. 20 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास शनिवार 22 ऑक्टोंबर पासून 5 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत.    

बँकेत परीक्षा शुल्क भरल्याबाबत चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करण्याचा कालावधी पुढील प्रमाणे आहे. उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाउनलोड करुन शुल्क बुधवार 9 नोव्हेंबर 2022 पर्यंत भरावयाचा आहे. तसेच शुल्क आरटीजीएस / एनइएफटीद्वारे भरणा केल्याची पावती / चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट शुक्रवार 11 नोव्हेंबर 2022 पर्यंत जमा करावयाची आहे.    

व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेवून परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा अर्ज 22 ऑक्टोंबर 2022 पासून ऑनलाईन भरण्यास सुरू होत आहेत. 

सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमीट केल्यानंतर अर्ज भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगीनमधून प्रिलिस्ट उपलब्ध करुन दिलेली असेल. कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टर नुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्ट वर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी.त्यानंतर प्रिलिस्ट परीक्षा शुल्क चलन व विद्यार्थी यादीसोबत विभागीय मंडळाकडे निर्धारित कालावधीत जमा करावी. 

विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क पुढे नमूद केलेल्या बँकेमध्ये आरटीजीएसद्वारे भरणा करून चलनाची प्रत तसेच विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. लातूर, नागपूर, मुंबई विभागीय मंडळासाठी एचडीएफसी बँक Virtual Account, अमरावती, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर विभागीय मंडळासाठी बँक ऑफ इंडिया Virtual Account तर नाशिक, कोकण मंडळासाठी AXIS Virtual Account या बँकेचा समावेश आहे. 

अर्ज सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क संगणकीय चलन डाऊनलोड करून चलनावरील Virtual Account मध्ये आरटीजीएस / एनईएफटी द्वारे भरावयाचे आहे. सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी एनईएफटी / आरटीजीएसद्वारे भरणा केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यातून प्रत्यक्ष वजा झाली आहे किंवा नाही तसेच खाते क्रमांक व आयएफसी कोड चुकीचा नमूद केला गेल्यास सदरची रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्यांची राहील. 

कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर केलेल्या सर्व अर्जाचे विहित परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांचे प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत याची सर्व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी नोंद घ्यावी. परिपूर्ण व अचूक शुल्क भरल्याची खात्री विभागीय मंडळ स्तरावर करून त्याबाबतचा अहवाल गणकयंत्र विभागाच्या नमून्यात राज्यमंडळ कार्यालयास सादर केल्यानंतर संबंधित उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येतील, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

0000

 

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- नांदेड जिल्ह्यात शनिवार 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 5 नोव्हेंबर   2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 22 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 5 नोव्हेंबर   2022 च्या  मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी,  शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

वृत्त क्रमांक उपलब्ध चाऱ्याचे मूल्यवर्धन करून चारा टंचाईवर मात चारा साक्षरता अभियानाला वेग नांदेड (जिमाका), दि. ३ : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमा...